Tuesday, December 20, 2005

परीक्षा

गेल्या रविवारी जपानीची परीक्षा देऊन आलो. दर वर्षी डीसेंबरमध्ये सर्वात सोपी चौथी आणि सर्वात अवघड पहिली अशा चार श्रेणीत जपानी भाषेची प्रमाणपत्र परीक्षा घेतली जाते. भारतातून मी चौथी श्रेणी आधीच पूर्ण केली होती. तिसरी श्रेणी माझ्यासाठी जरा सोपी असल्यामुळे मी दुस-या श्रेणीसाठी फॉर्म भरला होता. अभ्यास नेहमीप्रमाणे काहीही झाला नव्हता. रविवारी सकाळी थंडीनं कुडकुडतच परीक्षा केंद्रावर पोचलो. स्टेशनपासूनच परीक्षा केंद्राकडे जाणा-या रस्त्यांवर गर्दी ओसंडून वाहात होती. गर्दीमध्ये चीनी, कोरीयन आणि इतर आशियाई लोकांचाच भरणा होता. ‘इन्दोजिन्’ म्हणजे भारतीय लोकांमध्ये परीक्षा देणा-या बायका आणि त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे नवरे सोडल्यास माझ्यासारखे लोक कमीच होते. ती गर्दी पाहून मला मुंबईत एकदा दिलेली BSNL ची परीक्षा आठवली. वांद्र्यात का कुठेसं माझं परीक्षा केंद्र होतं. स्टेशनवर उतरुन बाहेर येतो तोच रोज दादर-दादर, कुर्ला, माटुंगा असं ओरडणारे शेअर टॅक्सीवाले BSNL-BSNL असं ओरडत होते. पत्ता शोधत फिरायची गरजच पडली नाही. टॅक्सीवाल्यानं न सांगता डायरेक्ट परीक्षा केंद्रावर नेऊन सोडलं. इथंही काहीसं तसंच होतं. फक्त ओरडणा-या टॅक्सीवाल्यांऐवजी परीक्षा केंद्रावरचे लोक हातात बोर्ड घेऊन स्टेशनवर उभे होते. मीही गर्दीबरोबर चालू लागलो आणि आपोआपच केंद्रावर येउन पोचलो. तिथेही पुन्हा BSNL चाच अनुभव आला. आपल्यासारखेच इथेही काही लोक शेवटच्या क्षणी अभ्यास करत बसले होते. नेहमीप्रमाणं चिनी मुलामुलींचा ‘च्याउ-म्याउ’ चिवचिवाट चालू होता. थोड्या वेळानं परीक्षा सुरु झाली.

पहिल्या सत्रात ‘कांजी’ म्हणजे चित्रलिपीतील अक्षरं आणि शब्दांचा समावेश होता. मी थोडा सावध पवित्रा घेतला. पहिली एक दोन षटकं तशीच खेळून काढली. मग अधूनमधून एकेरी दुहेरी चोरटी धाव घ्यायला सुरुवात केली. पण फार काही धावा जमवता आल्या नाहीत. विश्रांतीनंतर listening comprehension चं दुसरं सत्र सुरु झालं. इथं राहून एक वर्ष झाल्यामुळे कसलेल्या खेळाडूप्रमाणे मी एकेरी दुहेरी धावा चालू ठेवल्या. अधूनमधून एखाद्या खराब चेंडूवर चौकार मारायलाही सुरुवात केली. या डावात ब-याच धावा जमल्या. चहापानानंतर Reading comprehension आणि व्याकरण असं अखेरचं सत्र सुरु झालं. परीक्षेचे निम्मे गुण या सत्रात असल्यामुळे हे सत्र मोठं आणि अवघड होतं. यात खरा कस लागणार होता. सामना जिंकण्यासाठी ४०० चेंडूंत २४० धावा करायच्या होत्या. मला २०० चेंडूत ७०-८० तरी धावा कराव्या लागणार होत्या. मी सावधपणे खेळायचं ठरवलं. पहिली चार-पाच षटकं निर्धाव गेली. चेंडू फारच स्विंग होत होते. अधूनमधून बाउन्सर्सही येत होते. दहा षटकं संपली, पंधरा झाली पण धावांचं खातं काही उघडायचं नाव होईना. षटकांमागं काढाव्या लागणा-या धावांची गती वाढत चालली होती. षटकंही संपत आली होती. मला चेंडूंचा अजिबात अंदाज येत नव्हता. मी डोळे झाकून हवेत बॅट घुमवायला सुरुवात केली. पण काही केल्या चेंडू बॅटला लागायला तयार नव्हता. व्याकरणाच्या फिरकीपुढे तर मी पुरती नांगी टाकली. सामना माझ्या हातातून केव्हाच निसटला होता. तरीही मी अखेरपर्यंत किल्ला लढवायचं ठरवलं. शेवटी मी बचावात्मक धोरण स्वीकारलं आणि उरलेली षटकं खेळून काढली. भोपळाही न फोडता आउट होउन नामुष्कीजनक पराभवापेक्षा भोपळा न फोडता सर्व षटके नाबाद खेळून काढून केलेल्या विक्रमातला पराभव त्यातल्या त्यात दिलासा देणारा होता. सामन्याचा अधिकृत निकाल आणि बक्षिस वितरण समारंभ फेब्रुवारीत असला तरी चारी मुंड्या चित झाल्यावर आता आम्ही कशाला तिकडे तोंड दाखवायला जातोय.

परीक्षा देऊन घरी आल्यावर सहजच विचार केला आणि लक्षात आलं की असा अभ्यास न करता परीक्षा देऊन चार वर्ष लोटली. इंजिनीअरींगनंतर असा प्रसंग कधी आलाच नाही. क्षणार्धात इंजिनीअरींगच्या परीक्षेचे दिवस आठवले आणि मन त्या दिवसात रमलं. त्या वेळीही त्या वेळीही सामना जिंकण्यासाठी चाळीस मार्कांची गोळाबेरीज करावी लागायची. फक्त एक दिवस आधी सराव करुन आम्ही बॅटींग(बेटींग नाही) ला जायचो खरं, पण रनर घेउन खेळल्याशिवाय मॅच काही जिंकता यायची नाही. पण एक मात्र आहे, फॉर्म नसला तरी एकही सामना हरलो नाही. त्या परीक्षांमध्ये एक वेगळंच थ्रिल असायचं. आता तशी मजा कधीच येणार नाही. गेले ते दिन गेले. असो.

पुढच्या वेळी मात्र तिस-या श्रेणीचा साखळी किंवा दुस-या श्रेणीचा उपांत्य सामना न खेळता थेट २००७ चा अंतिम सामना खेळायचं ठरवलं आहे. आता चॅपेल गुरुजींसारखा कोणीतरी प्रशिक्षक शोधायला हवा. नको, नाहीतर गांगुलीसारखं कप्तानालाच संघातून बाहेर जावं लागेल.

4 comments:

Nandan said...

:-). Nice post.

Kalyani said...

I really hope u clear this exam. All the best & good post as usual :)

shashank said...

>> फक्त एक दिवस आधी सराव करुन आम्ही बॅटींग(बेटींग नाही) ला
>> जायचो खरं, पण रनर घेउन खेळल्याशिवाय मॅच काही जिंकता
>> यायची नाही. पण एक मात्र आहे, फॉर्म नसला तरी एकही सामना
>> हरलो नाही.

बस काय इ-शालराव, अहो तुम्ही म्हणजे संघातील प्रमुख/भरवश्याचे खेळाडू, तुम्ही असे म्हणू लागलात तर आमच्यासारख्यांनी कुठे जावे? :(

शशांक

borntodre@m said...

Chhaan aahe ;)