Friday, March 31, 2006

पुन्हा व्यत्त्यय!

हुश्श... पुन्हा एकदाचा ब्लॉग परत सुरु झाला बुवा. महिनाभर तरी बंद पडला असावा. मागची नोंद पण आत्ता कुठे प्रकाशित झाली. नाहीतर कितीतरी दिवस २२% वरच अडखळतच होती. 'ब्लॉगर'नं हा असा दुस-यांदा दगा दिलाय. या 'ब्लॉगर'चा काही भरवसा नाही. सारख्या काही ना काही अडचणी येतच असतात. त्यामुळे या वेळी दुसरीकडे कुठेतरी याचा बॅकअप घेउन ठेवायला हवा म्हणून इथं बॅकअप घेउन ठेवला. पण कुठेही बॅकअप वगैरे घेतला तरी गुगलवर जीव जडलेला असल्यामुळे फिरुन फिरुन परत इथं आल्याशिवाय राहवत नाही. आज ब-याच दिवसांनी ब्लॉगवर काहीतरी उचापती केल्याचं समाधान मिळालं. ब-याच विषयांवर ब-याच दिवसांपासून काहीतरी लिहायचं मनात आहे. पण ब्लॉग पूर्ववत सुरु झाला तरी नजिकच्या भविष्यकाळात लिहायला मुहूर्त मिळेल असं वाटत नाही.

Friday, March 17, 2006

कैफियत टायपिंग येणा-याची

पूर्वी म्हणजे आपले आईवडील ग्रॅज्युएट झालेल्या दिवसांत इंटरव्ह्यूसाठी ‘बायो-डाटा’ भरला जायचा. (आजकाल ‘बायो-डाटा’ साठी ‘रिझ्युमे’ वगैरे ‘फ्याशनेबल’ शब्द आले आहेत. अर्थात आम्हीही तेच वापरतो.) त्या काळी बायो-डाटावर Skills मध्ये ‘टायपिंग’ असलं तर तो फार मोठा प्लसपॉईंट असायचा. म्हणजे आजकाल आपण कोणत्याही शाखेचे पदवीधर असलो तरी ‘रिझ्युमे’ वर ‘जावा’, ‘सी’, ‘सी++’ असं काहीतरी असलं की जसा प्लस पॉईंट असतो तसा. (एकदा इंजिनीअरींगला असताना आमच्या मास्तरांनी ‘सी++’ मधले दोन ++ कशासाठी असतात असा याच विषयाच्या तोंडी परिक्षेत प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर मला अजूनही सापडलेलं नाहीये. कोणाला माहिती असेल तर जरुर कळवा.) विषयांतर बाजूला, मुद्दा असा आहे की पूर्वीच्या काळी टायपिंग येणं हा एक प्लस पॉइंट होता. तुम्हाला वाटेल, आज, या संगणकाच्या युगात जिथं एक सहस्रांश सेकंदालाही इतकं महत्व आहे, तिथं टायपिंगची गरज जास्त आहे. कारण सरळ आहे. वेळ वाचावा म्हणून. पण मला तसं मुळीच वाटत नाही. इथे वेळ वाचवायचाय कुणाला. त्यामुळे टायपिंग येण्याचे फायद्यापेक्षा तोटेच जास्ती आहेत हे मी स्वानुभवावरुन सांगू शकतो. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याल्या टायपिंग येतं आणि आपण रेल्वेचं आरक्षण करायला गेलो आहोत असं समजा.

कुठेही गेलं तरी रांगेत उभं राहणं हे आपल्या पाचवीलाच पुजलेलं असतं. कारण.... बरोबर... रांगेचा फायदा सर्वांना. अर्धा-पाउण तास रांगेत उभं राहिल्यावर आपल्या पुढच्या माणसाचा नंबर येतो. तो आरक्षण खिडकीजवळ जातो. आपण त्याच्या मागेच उभे असतो त्यामुळे आपल्याला खिडकीच्या आतलं सगळं दिसत असतं. पुढच्याला महालक्ष्मी एक्स्प्रेसचं स्लीपरचं आरक्षण हवं असतं. मिश्रा किंवा राव असा कोणीतरी आरक्षण अधिकारी त्याच्याकडचा फॉर्म घेतो. एकदा चष्म्यातून फॉर्मकडे बघतो. नंतर चष्म्यावरुन तिरप्या नजरेने फॉर्म भरणा-याकडे बघतो. महालक्ष्मी मधलं ‘म’ टाईप करण्यासाठी तर्जनी पुढे करुन ‘म’ शोधू लागतो. दोनेक मिनीटांनी त्याला सगळी अक्षरं सापडतात. त्याला तसं एका हाताच्या एका बोटानं अक्षरं शोधताना पाहून आपले हात टाईप करण्यासाठी शिवशिवत असतात. महालक्ष्मीचा डबा भरलेला असतो. आरक्षण हव्या असलेल्या समोरच्या माणसाला तो अधिकारी विचारतो,
“महालक्ष्मी १२ तारीखको फुल है, १३ का चलेगा क्या?”
“१२ का फुल्ल है क्या? मग सह्याद्रीका देखो.” आपल्या पुढचा म्हणतो.
पुन्हा ह्याचा ‘स’ शोधण्याचा खेळ सुरु होतो. आता मात्र आपला संयम सुटलेला असतो. त्याच्या हातातून तो कीबोर्ड हिसकावून घेउन फटाफट फॉर्म टाईप करुन देण्यासाठी आपले हात असे शिवशिवत असतात. पण निमूटपणे त्याचा तो अक्षरं शोधाशोधीचा खेळ पाहण्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे आपला संताप अनावर होतो.

पण टायपिंग येत नसेल तर असा संताप अनावर होण्याचा प्रश्न येत नाही. कारण आपल्याला स्वतःला येत नसल्यामुळे आपण इतरांना फारसा दोष देत नाही. टायपिंग येत असेल तर मात्र असा छळ इतर ब-याच ठिकाणी सहन करावा लागतो.

कुणाशीही याहू निरोप्या किंवा गुगल बोलक्यावर आपण चॅटिंग करायला बसतो. आपण फटकन काहीतरी प्रश्न विचारतो आणि पलिकडच्याच्या उत्तराकडे डोळे लावून बसतो. खालच्या चौकटीत दोन मिनीटं ‘अमुक व्यक्ती टाईप करत आहे’ असं दिसत असतं. नंतर थोड्या वेळानं ‘अमुक व्यक्तीनं संदेश पाठवेलेला आहे’ असं दिसतं. पण तो संदेश काही लवकर येत नाही. शेवटी कंटाळून आपण पुढचा संदेश लिहीत असतानाच त्याच्याकडून उत्तराऐवजी दुसराच प्रश्न येतो. मग आपण अर्धवट लिहीलेला पहिला संदेश खोडून त्याच्या प्रश्नाला उत्तर पाठवतो आणि प्रत्युत्तराची वाट पाहात बसतो. पण पुन्हा आपण पहिल्याच चक्रामध्ये अडकतो आणि हा खेळ असाच सुरु राहातो. हल्ली इंटरनेटचा वेग वाढल्यामुळं वेबकॅमवर पलिकडच्या व्यक्तीला पाहण्याची सोय झाली आहे. पण वेबकॅम लावला तरी आपला प्रॉब्लेम काही सुटत नाही. आपण वेबकॅम लावतो ते पलिकडच्या व्यक्तिला पाहायला. पण दिसतं ते फक्त मान खाली घालून कीबोर्डवरची अक्षरं शोधणारं डोकं. आत्ता वर बघेल, नंतर वर बघेल म्हणून आपण अगदी स्क्रीनकडे पाहात बसतो. पलिकडचा ज्या वेळी वर बघतो त्यावेळी कॅमेरा रिफ्रेशच होत नाही आणि पुन्हा स्क्रीनवरचं दृश्य तेच राहतं. आपला धीर असा हळूहळू सुटतच जातो आणि सर्वांना शाळेतच टायपिंग सक्तीचं का केलं नाही म्हणून शिक्षणमंत्र्यांना आपण शिव्यांची लाखोली वाहातो.

त्यामानानं टायपिंग न येणा-या लोकांचं बरं असतं. टायपिंग न येणा-या दोन व्यक्ती चॅटींग करत असल्या की त्यांना काही अडचणी येत नाहीत. आपण काहीतरी टाईप करताना समोरच्यानं उत्तर दिलं तरी आपण आपलं उत्तर पाठवून झाल्यावरच वरती स्क्रीनकडे बघतो. त्यामुळं आधी लिहीलेलं खोडून परत दुसरं लिहिण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपण उत्तर पाठवेपर्यंत आणखी दोन संदेश आलेले असतात. त्याला उत्तर देईपर्यंत आणखी दोन येतात. पलिकडेही तशीच परिस्थिती असल्यामुळं दोघांचं सिंक्रोनायझेशन अगदी छान जमतं.

बघा. टायपिंगचे फायद्यापेक्षा तोटेच कसे जास्त आहेत. टायपिंगमुळे वेळ वाचतो वगैरे या सर्व बाता आहेत. वेळ वाचण्यापेक्षा असा वायाच जातो आणि वर मनस्ताप होतो तो वेगळाच. त्यामुळे टायपिंग शिकू इच्छिणा-या सर्व लोकांना माझा एक सल्ला आहे. तो म्हणजे पुन्हा एकदा विचार करा. कारण पुढे केव्हाही जाता येईल पण एकदा पुढे गेलात की मागे फिरता येणार नाही. टायपिंग न येणा-या लोकांना टायपिंग न शिकण्याचे फायदे इतरांना पटवून देण्यासाठी या लेखाचा निश्चितच उपयोग होईल अशी आशा करतो आणि ही 'टायपिंग येणा-याची कैफियत' इथेच संपवतो.

Wednesday, March 01, 2006

एक अनुभव संयुक्त संस्थानांचा

संयुक्त संस्थानाचा दोन आठवड्यांचा दौरा, त्यानंतर तीन दिवसांची स्की सहल आणि या सर्वांची तयारी. त्यामुळे मागचा महिना तसा धावपळीतच गेला. प्रयोगशाळेतल्या दोन मुलांचे दोन शोधनिबंध निवडले गेल्यामुळे त्यांच्याबरोबर आम्हालाही सॅन फ्रान्सिस्कोतील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राला उपस्थित राहण्याची संधी प्राध्यापकांनी दिली. त्यानिमित्त संयुक्त संस्थानाला भेट देण्याचा योग आला. एके काळी तिथं जाऊन उच्च शिक्षणाचं स्वप्न पाहणा-या माझं जपानला आल्यापासून संस्थानाचं आकर्षण ब-याच प्रमाणात कमी झालं होतं. किंबहूना संस्थानाला भेट देण्यापेक्षा माझ्या संशोधन क्षेत्रामध्ये सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या ISSCC (International Solid State Circuits Conference) या चर्चासत्राचच मला जास्त आकर्षण होतं. पण तरीही आत्तापर्यंत निरनिराळ्या लोकांकडून ऐकलेली वर्णनं, हॉलिवू़ड चित्रपट आणि मालिकांमधून दिसणारी प्रतिमा आणि भारतीयांना (का कुणास ठावूक) एकदा गेल्यावर परत न यावसं वाटणारा असा हा देश प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता होतीच. एक-दीड वर्ष जपानच्या राहणीमानाची सवय होऊन अमेरीकेला भेट देणारे माझ्यासारखे फारच थोडे जण असावेत. प्रत्येक भेटीगणिक आपला एखाद्या देशाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. म्हणूनच आपला अमेरीकेच्या पहिल्या प्रवासाचा अनुभव कसा होता हे परत कधीतरी वाचण्यासाठी लिहून ठेवावंसं वाटलं. अर्थात माझं लिखाण हे इतरांनी वाचण्याच्या पात्रतेचं नसल्यामुळं त्यात थोडी छायाचित्रं घालून माझ्या लेखनमर्यादा लपवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. तसा इथेही केलाय.

नेहमीप्रमाणे सामानाची आवराआवर करुन प्रयोगशाळेतल्या दहा जणांसोबत टोकियोजवळील नारिता विमानतळावर पोचलो. शनिवारी दुपारी ४ वाजता विमानात बसून शनिवारीच सकाळी ६ वाजता सॅन फ्रान्सिस्कोला पोचलो. वेळेतील फरकामुळे आपल्याला एक दिवस ज्यादा अनुभवायला मिळाला याची मजा वाटली. पण परत येताना निघण्याच्या वेळेपेक्षा एक दिवस उशीरा पोचल्यामुळे ती मजा विरली. व्हीजा मिळवताना अमेरीकनांच्या व्यावसायिकतची झलक दिसलीच होती. सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर उतरल्यापासून त्याची पुरेपूर प्रचिती येऊ लागली. विमानतळावर उतरल्यावर इमिग्रेशन आटोपून बाहेर आम्ही काही सहका-यांची वाट पाहात थांबलो असतानाच तिथल्या एका अधिका-यानं "hey you guys, party's over. leave now" असं म्हणत आम्हाला तिथून अक्षरशः हाकलून लावलं. एरवी भारतातून थेट गेलो असतो तर मला त्याच्या या वागण्याचं काहीच वाटलं नसतं. पण जपानमधील आदरातिथ्य आणि आपुलकीची सवय झाल्यामुळं मला आणि माझ्याबरोबरील भारतीय आणि चीनी मुलांना त्याचं ते बोलणं फारच उर्मट आणि गुर्मीनं भरलेलं वाटलं. पण जिथे जॉर्ज फर्नांडिस संरक्षणमंत्री असूनदेखील यातून सुटले नाहीत तिथे आम्ही काय असा विचार करत आम्ही बाहेर पडलो.

विमानतळापासून हॉटेल फार दूर नव्हतं. लोकल ट्रेनमधून चाळीसएक मिनीटांमध्ये हॉटेलवर पोचलो. चर्चासत्र सुरु होण्यास अजून दोन दिवस अवकाश होता. त्यामुळे थोडा वेळ विश्रांती घेऊन शहराचा फेरफटका मारायला निघालो. हॉटेल अगदी शहराच्या डाउनटाउन की काय म्हणतात तश्या जागी होतं. तिथून जवळच केबल कारचं स्टेशन होतं. केबल कारमध्ये बसून जवळच्या 'Fishermans Wharf' कडे निघालो. आजूबाजूला दिसणा-या प्रत्येक गोष्टींची तुलना मन आपोआपच जपानशी करत होतं. अमेरीकेतील गोष्टींचं (त्यात माणसंही आली) दुपटीने किंवा तिपटीनं मोठं असणारं आकारमान सोडलं तर दोन्हींमध्ये तुलनात्मक फरक तसा कमीच होता. टोकियोत भारतीय फारच कमी दिसतात. इथे मात्र पावलोपावली बरेच भारतीय दिसत होते. 'Fishermans Wharf' वर पोचल्यावर जपानी आणि चीनी सहका-यांनी खेकड्यांवर यथेच्छ ताव मारला. आम्ही मात्र ब-याच दिवसांनंतर शाहाकारी जेवण मिळाल्याच्या वेगळ्याच आनंदात होतो. 'Fishermans Wharf' वरुन जगप्रसिध्द गोल्डन गेट पुल दिसत होता. पण तिथे जाण्यासाठी गाडी नसल्यामुळे बेत रद्द करावा लागला. इथं गाडी नसेल तर माणूस अपंगच आहे असं ऐकून होतो. त्याचा प्रत्यय आला. मग तिथेच जवळपास थोडा फेरफटका मारुन हॉटेलवर परतलो. रात्री वालचंदमधले चार मित्र भेटले. त्यांच्याबरोबर जुन्या आठवणींना उजाळा देत रात्र कशी गेली ते कळलंच नाही.

दुस-या दिवशी जगविख्यात स्टॅन्फर्ड विद्यापीठ पाहून आलो. पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेपुढे गुडघे टेकून कसंबसं विद्यापीठात पोचलो. पण विद्यापीठाच्या परिसरात पोचल्यावर मात्र एवढी कसरत करुन गेल्याचं समाधान मिळालं. विद्यापीठाच्या मोठ्या नावाला साजेसाच असणारा विस्तीर्ण पसरलेला हिरवागार परिसर आणि कल्पक रचनेच्या इमारतींनी लक्ष वेधून घेतलं. रविवार असल्यामुळे बरेच विभाग आणि इमारती बंद होत्या. तरीही उरलेल्या इमारती आणि परिसर पाहण्यात दिवस कसा गेला ते कळलंच नाही. पण खरोखरच स्टॅन्फर्ड विद्यार्थ्यांची 'dream university' का आहे ते तिथे गेल्यावर लक्षात आलं.

पुढचे तीनही दिवस चर्चासत्रामध्ये व्यग्र असल्यामुळे कुठेही फिरता आलं नाही. पण ज्यांची पुस्तकं वाचून आम्ही इंजिनिअरींगचे धडे गिरवले अशा जगभरातून आलेल्या प्राध्यापक आणि इतर बुध्दीवंतांना प्रत्यक्ष भेटल्यावर तिथे गेल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. चर्चासत्र आटोपल्यावर मी काही दिवसांसाठी आप्तेष्ट आणि मित्रांना भेटण्यासाठी फिलाडेल्फियाला निघालो. मला डेट्रॉइटवरुन विमान बदलायचे असल्यामुळे मी डेट्रॉइटकडे जाणा-या विमानाजवळच्या प्रतिक्षाकक्षात बसलो. तिथे एक भारतीय मुलगा भेटला. विमान सुटायला बराच अवकाश असल्यामुळे आम्ही बोलायला सुरुवात केली. माझ्या मते भारतीयांचे काही गुणधर्म ते कुठेही गेले तरी बदलत नसावेत (त्याला मीही अपवाद नाही). दोन भारतीय माणसे भेटली तरी आधी इतरच गोष्टी होतात. नावाचा उल्लेख नेहमी शेवटी होतो. यावेळेही तसंच झालं. त्यानं थेट प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली.
"कुठे निघाला आहेस?" - तो
"फिलाडेल्फिया" -मी
"मीही फिलाडेल्फियालाच निघालो आहे. कुठे राहतोस तू?" - तो
"मी फिलाडेल्फियामध्ये राहात नाही. मी काही कामानिमित्त निघोलो आहे"
"अच्छा अच्छा. मग कुठे असतोस तू?"
"मी जपानला असतो"
मी जपान म्हटल्याबरोबर त्याच्या भुवया उंचावल्या. चमत्कारीक नजरेने माझ्याकडे पाहात तो म्हणाला "जपानमध्ये काय करतोस तू?" जपान ही काय राहायची जागा आहे का, असंच त्याच्या आविर्भावावरुन वाटत होतं.
"मी तिथे एका विद्यापीठात शिकतो."
"मग इकडे काय करतो आहेस?"
"इथे एका चर्चासत्रासाठी आलो होतो" मी मनात म्हटलं, 'का बाबा, मी जपानमध्ये राहातो म्हणजे अमेरीकेला येवू शकत नाही का? की पुढच्या वेळी तुझी परवानगी घेऊन येऊ?'
"जपानमध्ये काय शिकतोस तू?" - जपानमध्ये शिकण्यासारखं काही असतं का अश्या आविर्भावात त्यानं पुढचा प्रश्न केला.
"मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगमध्ये एम.एस. करतो आहे." - मी
हा 'चुकून भारतात जन्मला' आहे हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं.
"तू पण इथे शिकतोस का?" - मी
"हो. मी फिलाडेल्फीयामधल्या एका विद्यापीठात शिकतो. तू तूझं इंजिनिअरींग कुठून केलंस?" -त्यानं विचारलं.
"मी सांगलीच्या वालचंद इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिकलो" - मी
"कोणती युनिव्हर्सिटी?"
"कोल्हापूरची शिवाजी युनिव्हर्सिटी"
"ती कुठे आहे?"
"महाराष्ट्रात." याला सांगली आणि कोल्हापूर कुठे आहे ते माहीत नसणार असं मला वाटलंच होतं. मी ही त्याला तोच प्रश्न विचारला.
"तू तुझं याधीचं शिक्षण कुठे पूर्ण केलंस?" - मी
त्यानं 'बँगलोर" असं उत्तर दिलं. मी काही पुढं बोलणार एवढ्यात त्यानं खिशातून मोबाईल काढून मित्राला/मैत्रिणीला फोन लावला आणि जे मोठ्यानं बोलायला सुरुवात केली ते विमानात बसेपर्यंत त्याचं बोलणं चालूच होतं.
'बाबा रे, तू इथं आहेस हेच बरं आहे. भारतात परत येण्याचा विचार करु नकोस' असं मनात म्हणत मीही हेडफोन लावून गाणी ऐकायला सुरुवात केली.
कोणीतरी भारतीय बोलायला भेटल्यामुळे मला झालेला आनंद असा थोड्याच वेळात विरला.

दुस-या दिवशी सकाळी फिलाडेल्फियाला पोचलो. विमानतळापासून ऍलनटाउनमधल्या घरी जाईपर्यंत शहराबाहेरील (ग्रामीण अमेरीका असं लिहायचं होतं पण ही कल्पना जरा झेपत नाहीये.) अमेरीकेचं दर्शन घडत होतं. रस्ताच्या दुतर्फा टुमदार पण प्रशस्त बंगले, त्यांच्यासमोर असलेली हिरवळ आणि सभोवती उभ्या असणा-या अनेक गाड्या असं दृश्य चित्रपटात पाहिलेलं दृश्याशी अगदी मिळतंजुळतं होतं. फिलाडेल्फियात पाच-सहा दिवस घरच्या जेवणावर ताव मारत वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही. मध्येच एका शनिवारी वालचंदमधला मित्र प्रशांत भेटला. त्याच्या समवेत न्यूयॉर्कला जायचा बेत आखला. हवामान खात्यानं बर्फाची सूचना दिली होतीच. तरीही आल्यासारखं न्यूयॉर्कला एक चक्कर टाकून येवू असं म्हणून निघालो. दोन अडीच तास ड्राईव्ह करुन न्यूजर्सीला पोचलो. गाडी पार्किंगचा तिथं मोठाच प्रश्न होता. त्यात एक-दीड तास खर्ची पडला. शेवटी एका ठिकाणी गाडी पार्किंगसाठी जागा मिळाली. तिथून लोकल ट्रेन पकडून सर्वात आधी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा पाहण्यासाठी फेरी सुटण्याच्या जागेवर पोचलो. वाटेत स्टेशनवर वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीची जागा दिसली. एका मोठ्या खड्ड्याशिवाय आता तिथं काहीही उरलं नव्हतं. त्यामुळे तिथे जास्त वेळ न घालवता फेरी सुटण्याच्या जागेकडे निघालो. पुतळ्याकडे जाणारी शेवटची फेरी अगदी पाच मिनीटांच्या अंतराने चुकल्यामुळं आम्ही थोडं निराश झालो. पण धूसर हवामानामुळं तिथं जाउनही फारसा फायदा झाला नसता अशी मनाची समजूत घालून आजूबाजूला चक्कर टाकायला निघालो. ब्रॉडवे, वॉल स्ट्रीट अशी प्रसिध्द ठिकाणं पाहिल्यावर टाईम्स स्क्वेअरला जायचं ठरलं. वाटेत प्रसिध्द मादाम तुसॉ संग्रहालय लागलं. त्यामध्ये दोन तास वेळ कसा गेला ते कळलंच नाही. बाहेर पडून टाईम्स स्क्वेअरला पोचलो. एव्हाना तुरळक बर्फ पडायला सुरुवात झाली होती. टाईम्स स्क्वेअरला थोडा वेळ थांबून जवळच असलेल्या प्रसिध्द एंपायर स्टेट इमारतीकडे निघोलो. एंपायर स्टेटच्या टोकावरुन रात्री न्यूयॉर्क शहराचं दर्शन घेण्याचा बेत होता. पण खराब हवामानामुळे त्या इमारतीमधला निरीक्षण कक्ष बंद आहे असं कळल्यामुळे तिथेही निराशाच झाली. रात्र झाल्यामुळे परत फिलाडेल्फियाला निघालो. बर्फाचा जोर वाढला होता. बर्फात रस्त्यावरुन गाडी चालवणं तसं साहसच होतं. प्रशांतसाठीही बर्फातून गाडी चालवण्याची पहिलीच वेळ होती. पण तरीही त्यानं दोन तासात गाडी व्यवस्थित फिलाडेल्फियाला पोहोचवली.

दुस-या दिवशी रविवार असल्यामुळे निवांत उठून नाष्टा उरकल्यावर 'रंग दे बसंती' चित्रपट पाहायला जायचं ठरलं. चित्रपटगृह चाळीस मैलावर होतं. वाटेत बरंच बर्फ साठल्यामुळे पत्ता शोधत तिथं पोचेपर्यंत दीड-दोन तास जाणार होते. आमच्याकडे जेमतेम सव्वा तास होता. टोकियोत हिंदी चित्रपट पाहण्याची कोणतीही संधी उपलब्ध नसल्यामुळे ही संधी न दवडता हा चित्रपट पाहायचाच असं ठरवलं. पुन्हा मी आणि प्रशांत बर्फामध्ये गाडी घेउन बाहेर पडलो. चित्रपट सुरु होण्याची वेळ जवळ येत चालली होती आणि अंतर मात्र संपत नव्हतं. निम्मं अंतर आल्यावर लक्षात आलं की चित्रपटाचा सुरुवातीचा अर्धा-पाऊण तास चुकणार आहे. मग तशीच गाडी परत मागे वळवावी का असा विचार चालू होता. पण प्रशांतला बर्फात गाडी चालवण्यात एक वेगळीच मजा येत होती. त्यामुळं हा साहसी प्रवास असाच पुढे चालू ठेवायचं ठरलं. त्यानं मोठ्या शिताफिनं गाडी चालवत आम्हाला चित्रपटगृहापाशी आणलं पण तरीही अर्धा तास उशीर झालाच. चित्रपटगृहाजवळ जाउन पाहतो तर तिथे टाळं. पण येतानाच्या दोन तासांच्या थ्रिलिंग प्रवासामुळे त्याचं फारसं वाईट वाटलं नाही. चार तासांचा ड्राईव्ह आटोपून पुन्हा घरी परतलो.

एक दोन शॉपिंग मॉल आणि ग्रंथालय यांना दिलेल्या भेटी सोडल्या तर नंतर ऍलनटाउनमध्ये इतरत्र कुठे जाण्याचा प्रसंग आलाच नाही. पण एकंदरीत भारतीयांच्या मोठ्या संख्येमुळे किराणा दुकानात मिळणा-या भारतीय वस्तू आणि ग्रंथालयात मिळणा-या हिंदी चित्रपटांच्या चकत्या पाहिल्यावर अमेरीका म्हणजे एक छोटेखानी भारतच असल्यासारखं वाटलं.

अमेरीकेतील दोन आठवड्यांचा मुक्काम संपवून पुन्हा टोकियोकडे येण्यासाठी निघालो. दोन आठवडे तिथे राहताना तिथले प्रशस्त रस्ते, टुमदार बंगले, भारतातली कोणतीही मिळणारी वस्तू, सर्वत्र इंग्रजीत असणा-या पाट्या, कुठेही मिळणारं शाकाहारी जेवण या सर्वांचा हेवा वाटला. पण अमेरीकन व्यावसायिकता आणि कोरड्या औपचारीकपणामध्ये जपानच्या आदरातिथ्यामधला ओलावा आणि आपुलकीची उणीव भासली. नारिता विमानतळावर पोचल्यावर जपानी पाट्या दिसल्या आणि जपानी सूचना ऐकल्यावर एकदम हायसं वाटलं. नाही म्हटलं तरी आपण जिथं राहतो त्या जागेशी एक भावनिक बंध तयार होतोच. (अर्थात् या वाक्याचा 'हा आता जपानचा झाला' असा कोणी अर्थ काढू नये). कोण जाणे, उद्या मी अमेरीकेत एक वर्ष राहिलो तर तिथंही असाच बंध तयार होईल. असो.

अमेरीकेहून आल्यावर दुस-या दिवशी लगेच तीन दिवसांची स्की सहल झाली. पण त्याविषयी पुन्हा केव्हातरी. तूर्तास इतकेच.