Thursday, September 01, 2005

उत्तर जपानची सहल - १

शाळेत असताना निबंध लिहावा लागायचा. त्यानंतर मराठीत काहीतरी लिहायची माझी ही पहिलीच वेळ असावी. लेखन हा माझा प्रांत नाही. आणि 'पूर्वरंग' वाचल्यावर जपानविषयी आणखी काही वाचायची गरज आहे असं मला वाटत नाही. तरीही एका अविस्मरणीय सहलीच्या आठवणी साठवून ठेवाव्यात असं वाटलं म्हणून हा छोटासा प्रयत्न.

आत्तापर्यंत जपानमध्ये अनेक ठिकाणी फिरुन आलो, पण जपानी मित्र बरोबर नसताना फिरायची ही पहिलीच वेळ होती. या उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी ड्राईव्हला जायचंच असा निश्चय करुन जपानी भाषेचा गंध नसणारा एक आणि कामचलाऊ जपानी येणारे आम्ही दोघे अशी तिघा जणांची टीम तयार झाली. अशा परिस्थितीत सुदूर जपानमध्ये कोणत्याही नियोजनाअभावी फिरायला जाणं हेच मुळी एक साहस होतं. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे तिघांचीही जपानी जेवण जेवायची तयारी होती. क्योतो, ओसाका ही प्रसिध्द ठिकाणं पाहिली असल्यामुळं शेवटी भरभरुन निसर्गसौंदर्य लाभलेल्या उत्तर जपानच्या 'तोहोकु' नावाच्या प्रांतात फिरायला जायचं ठरलं. इंटरनेट आणि जपानी मित्रांकडून माहिती मिळवल्यावर तोहोकुमधील 'हिराईझुमी' आणि 'तोवादा' ही दोन ठिकाणं उन्हाळी सहलीसाठी प्रसिध्द आहेत असं कळलं. दोन्ही ठिकाणांच्या मध्ये असलेल्या 'मोरीओका' या मोठया स्थानकावर उतरुन तिथून कार रेंट करुन दोन दिवसात दोन्हीकडे जाऊन परत य़ायचं असा बेत ठरवून रविवारी रात्री आम्ही झोपी गेलो.

सोमवारी भल्या पहाटे सहा वाजता आम्ही टोकियोहून उत्तरेला ५०० किलोमीटरवर असणा-या मोरीओकाला जाणारी पहिली शिंकानसेन (बुलेट ट्रेन) पकडली. सकाळी ९ वाजता मोराओकाला पोचल्यापोचल्याच साहसाला सुरुवात झाली. मोरीओकाला जाऊन तिथूनच कार रेंट करायची असा आमचा बेत होता. पण जपानमध्ये जवळजवळ एक वर्ष राहूनही जपानी लोकांकडून अजून ब-याच गोष्टी शिकायच्या आहेत हे कार शोधताना आमच्या लक्षात आलं. तिथे पोचल्यावर कळलं की आरक्षणाशिवाय कार मिळतच नाही आणि जपानी लोकांनी अगोदरच ब-याचश्या जागी गाडयांचं आरक्षण करुन ठेवलं होतं. अनोळखी गावाची काहीच माहीती नव्हती. शिवाय भाषेची मोठी अडचण होतीच. चारच दिवसांपू्र्वी फुजी पर्वतारोहण करुन तिथून सूर्योदय पाहण्याच्या आमच्या बेतावर वरुणराजांनी पाणी फिरवल्यामुळे आम्हाला अर्ध्या वाटेवरुनच निराश होउन परतावं लागलं होतं. त्यामुळे यावेळीही सुट्टी अशीच फुकट जाणार असं वाटत असतानाच शेवटी एकदाची एका ठिकाणी कार मिळाली आणि आमचा खरा प्रवास सुरू झाला.

दुपारी ३ वाजता मोरीओकाच्या दक्षिणेस ९० कि.मी.वर असणा-या हिराईझुमी या गावी आम्ही पोचलो. 'किता आल्पस्' म्हणजे उत्तर आल्पस् असे संबोधल्या जाणा-या पर्वतरांगांमधून ड्राईव्ह करणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. उन्हाळ्यातही गर्द झाडी आणि हिरव्यागार शेतांनी भरलेला तो परिसर पाहून काश्मीरची आठवण येणं साहजिकच होतं. लोकांनी सार्वजनिक रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी लावलेली रंगीबेरंगी फुलझाडे आणि त्यांची राखलेली निगा पाहून जपानी माणसाविषयी माझ्या मनात असलेला आदर आणखीनच वाढला. हिराईझुमी, अकराव्या शतकात फुजीवारा संस्थानिकांनी वसवलेलं हे गाव त्या काळातील जपानमधील एक समृध्द आणि महत्वाचं शहर होतं. मोठाले डोंगर, हिरवीगार शेतं आणि त्यांच्यामधून वाहणारी नदी अशा या गावात प्रेक्षणीय ठिकाणांची कमी नसती तर नवलच. हिराईझुमीत पोचल्यावर सर्वात प्रथम पर्यटन केंद्रात जाउन आम्ही स्थानिक पर्यटन स्थळांची माहिती मिळवली. दुपारचं जेवण उरकून (जेवणाबद्दल काही लिहीत नाही. तो एक स्वतंत्र लेखनाचा मुद्दा आहे) आम्ही सर्वात प्रथम मोत्सुजी मंदिर पाहावयास निघालो. नवव्या शतकात बांधलेल्या या मंदिराचे बरेचसे अवशेष नष्ट झाले असले तरी त्याभोवती असणा-या छोट्या तळ्यांनी आणि देवदार वृक्षांनी नटलेला तो परिसर पाहून तिथून निघायची कोणाचीच इच्छा होत नव्हती. अखेर संध्याकाळी मंदिर बंद झाल्यावर तिथून निघून जवळच असलेला 'गेम्बेकी गॉर्ज' पाहावयास गेलो. कडेकपारींमधून खळाळत वाहणा-या नदीचं सूर्यास्ताच्या वेळी दिसणारं चित्र विहंगमच होतं. थोडा वेळ सारं काही विसरुन ते दृश्य डोळ्यात आणि कॅमे-यात साठवून हिराईझुमीला परतलो.

जपानचं एक वैशिष्टय म्हणजे पूर्ण जपानमध्ये 'ओनसेन' म्हणजे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे पसरलेले आहेत. काही ठिकाणी अशा ओनसेनच्या ठिकाणी हॉटेल्स बांधलेली आहेत. तिथे तुम्हाला काही पैसे देउन ठराविक वेळासाठी ओनसेनचा आनंद लुटता येतो. ओनसेन हा औषधी तर असतोच, पण थकवा दूर करण्यासाठी अतिउत्तम. जपानी लोकांच्या दीर्घायुष्याच्या रहस्यांपैकी एक म्हणजे ओनसेन. अशाच एका ओनसेनमध्ये दिवसभराचा थकवा दूर करून आम्ही '-योकान' म्हणजे जपानी पध्दतीच्या घरगुती हॉटेलमध्ये उतरलो. आम्हा परदेशी पाहुण्यांना पाहून -योकानमधल्या आजोबांना नवल वाटणं स्वाभाविकच होतं. रात्री खास जपानी पाहुणचार घेतल्यावर दुस-या दिवशी सकाळी हिराईझुमी परिसरातील उरलेली ठिकाणं पाहायची असं ठरवून झोपलो. '-योकान' मध्ये पारंपारिक जपानी पोषाख 'युकाता' घालून झोपण्याची मजा काही औरच होती.

दुस-या दिवशी सकाळी 'इवाया केव्ह टेंपल्' पासून सुरुवात केली. पाषाणातील गुहेत बांधलेल्या या मंदिराचा परिसरही सुंदरच. मंदिराभोवतीच्या छोटया तळ्यांमधील कमळे पाहून मन प्रसन्न झालं. इथल्या सगळ्या मंदिरांची रचना एकाच प्रकारची असते. आणि देवही एकच. अर्थातच बुध्द. बाकी मंदिरातील दिवे, उदबत्त्या, घंटा नमस्कार करण्याची पध्दत अशा गोष्टी थोडयाफार फरकाने आपल्यासारख्याच. एकच वेगळी गोष्ट म्हणजे गाभा-यात नसली तरी मुख्य मंदिरात चपला घालून जाण्यास परवानगी असते. पण जपानी घरात मात्र चपला घालून जाता येत नाही. मंदिरात आपल्यासारखा प्रसादही मिळत नाही. मात्र ब-याचश्या मंदिरांच्या बाहेर भविष्य पाहायची सोय असते. काही पैसे देऊन एक कागद उचलायचा आणि आपलं भविष्य पाहायचं. जर भविष्य चांगलं असेल तर कागद आपल्याकडेच ठेवायचा. नाहीतर मंदिराशेजारीच एका दो-याला बांधून पुजा-याला आपल्या चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करायला सांगायचं. एकदा मी असा भविष्याचा कागद घेतला होता. पण भविष्य वाचता न आल्यामुळे ते चांगलंच असेल असा विचार करुन खिशात ठेउन दिला. तिथून निघून हिराईझुमीमधील सर्वात मोठं आकर्षण असणा-या च्युसोंजी मंदिरात पोचलो. बाहेरुन साधं दिसणारं हे मंदिर एवढं प्रसिध्द का आहे हे मला मंदिराच्या आत गेल्यावर कळलं. आतील मुख्य मंदिर आणि मूर्तींना सोन्याचा मुलामा दिला आहे. कलाकुसरही अप्रतिम. मात्र छायाचित्र काढण्यास मनाई असल्यामुळे या वेळी ते चित्र फक्त डोळ्यातच साठवावं लागलं. नवव्या शतकात बांधलेलं हे मंदिर त्या काळी हिराईझुमीच्या समृध्दतेचं प्रतीक होतं. छोट्या टेकडीवर बांधलेल्या या मंदिरावरुन दिसणारं हिरवंगार हिराईझुमी गाव, त्यातून वाहणारी नदी पाहून इथं कडक उन्हाळा सुरू आहे यावर विश्वास बसत नव्हता. या सहलीला सुरुवात झाल्यापासून प्रत्येक दिवशी एक नवीनच अनुभव येत होता. च्युसोंजी मंदिराच्या परिसरात फिरत असतानाच अचानक पायाखालची जमीन हादरु लागली आणि आमच्या लक्षात आलं की भूकंप सुरु झाला. रस्त्यावरचे सारे लोक स्तब्ध झाले. आजवर इथं असताना अनेक भूकंप अनुभवले आणि आता त्याची सवयही झाली आहे. पण हा भूकंप त्यातला सर्वात मोठा आणि प्रदीर्घ होता. तिथली प्रचंड झाडं भूकंपामुळं इतकी हालत होती की आपल्यावर पडली तर या विचारानं अंगावर काटा येउन गेला. त्यानंतर दोन तास आमची भूकंपाविषयीच चर्चा सुरु होती. पण जपानी लोक मात्र काही न झाल्याच्या आविर्भावात दोन मिनीटांत कामाला लागलेदेखील.

हिराईझुमीतील मुक्काम आटोपून आम्ही मोरीओकाच्या परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत सेनमाया इथं एक चांगलं ठिकाण आहे असं GPS महोदयांनी सांगितलं. ( GPS ला मराठी शब्द माहिती नाही). मग मुख्य रस्त्यावरुन गाडी वळवून सेनमाया इथला 'गेईबेकी गॉर्ज' पाहायला निघालो. पूर्वनियोजन न केल्याचा हा सर्वात मोठा फायदा. तुम्हाला कोठेही, केव्हाही आणि हवा तितका वेळ जाता येतं. वेळापत्रकानुसार जाण्यात मजा ती कसली. असो. दोन्ही बाजूंना १०० मीटर उंचीचे कडे, गर्द झाडी, मधून वाहणारी नदी, नदीत छोट्या नावेतून सफर, नावेत 'ओ माजी रे' अशाच अर्थाचं काहीतरी जपानी लोकगीत म्हणणारा नावाडया, याशिवाय सहलीची आणखी मजा ती कोणती? दोन दिवसातच सहलीचे पैसे वसूल. 'गेईबेकी गॉर्ज' चा मनमुराद आनंद लुटून आम्ही संध्याकाळी मोरीओकाला परतलो. रात्री मोरीओकात मुक्काम करुन तिस-या दिवशी सकाळी आणखी एका साहसी प्रवासाला निघण्यास सज्ज झालो.

क्रमशः

(ही आणि इतर छायाचित्रे इथे पाहा. )