Monday, January 16, 2006

सफर राजप्रासादाची

रविवारी नेहमीप्रमाणे वर्तमानपत्रातलं साप्ताहिक राशिभविष्य वाचलं. दर आठवडयाला मी नित्यनेमानं भविष्य वाचतो खरं, पण त्यातलं फारसं काही मनावर घेत नाही. आणि भविष्य वाचून झाल्यावर दुस-या मिनीटाला त्यातलं काहीही लक्षातही राहिलेलं नसतं. पण वाचताना मजा येते. ज्योतिषी महोदयांनी बहुदा एकदाच काय ते पाच-पन्नास प्रकारचं भविष्य लिहून ठेवलेलं असावं. अचानक धनलाभ संभवतो, प्रत्येक कृतीतून यश, खर्चाला आवर घाला, अनुकूलतेकडे नेणारा सप्ताह, मानसन्मान मिळेल, वाहन जपून चालवा, आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, विचारपूर्वक निर्णय घ्या असं काहीतरी भविष्य १२ राशींना परम्युटेशन आणि कॉम्बीनेशन करुन आलटून पालटून येत असावं. या आठवड्यात मात्र माझ्या भविष्यामध्ये चक्क ‘लेखन व प्रकाशनाच्या क्षेत्रात प्रसिध्दी मिळेल’ असं लिहीलं होतं. खरं तर अलिकडे काही लिहायला वेळ मिळत नाहीये. पण भविष्य वाचल्यावर मनात म्हटलं आता काहीतरी लिहायलाच पाहिजे. पण काही सुचेना. मग मागच्या महिन्यातल्या राजप्रासादाच्या सहलीविषयी थोडसं लिहावं म्हटलं.

२३ डिसेंबरला जपानच्या सम्राटाचा वाढदिवस असतो. त्या दिवशी पूर्ण जपानला सुट्टी असते. लोकांना राजप्रासादात जाउन सम्राटाला भेटायची संधी मिळते. राजप्रासाद वर्षातून दोनच दिवस सामान्य लोकांना पाहण्यासाठी खुला असतो. एक म्हणजे २३ डिसेंबर आणि दुसरा नविन वर्षाच्या पहिला आठवड्यातील दुसरा दिवस. या वेळी प्रयोगशाळेतील एक मुलगा आम्हा परदेशी विद्यार्थ्यांना सम्राटाला पाहण्यासाठी घेउन गेला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याची सुध्दा ही पहिलीच वेळ होती.

टोकियो शहराच्या मध्यभागी टोलेजंग इमारतींच्या मधोमध शेकडो एकर जमिन एखाद्या राजाचीच असू शकते. टोकियो स्थानकावर उतरुन समोर थोडंसं अंतर चालून गेल्यावर राजवाड्याची सर्वात बाहेरील बाग आणि प्रवेशद्वार दिसू लागतं.
राजवाडा चोहोबाजूंनी असा खंदकानं वेढलेला आहे. आत अजून किती अंतर चालावं लागतं कोण जाणे असा विचार करत पुढे निघालो.बाहेरील प्रवेशद्वारावर असं शाही स्वागत झालं.खूप अंतर आत चालून गेल्यावर ही मुख्य राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरील इमारत दिसली.मुख्य राजवाड्याच्या आत राजाला पाहण्यासाठी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. प्रत्येकाच्या हातात जपानचा राष्ट्रध्वज होता. सम्राट शाही परिवारासोबत दूरवर दिसणा-या बाहेरील सज्जावर येताच लोकांनी हातातील झेंडे फडकावत 'सम्राटांना दहा हजार वर्षे आयुष्य लाभो' अशा जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. पाच मिनीटं सारं वातावरण घोषणांनी एकदम भरुन गेलं.


सम्राट आणि सम्राज्ञी यांनीही हात उंचावून अभिवादनाचा असा स्वीकार केला.
राजवाड्यातून दुस-या मार्गानं बाहेर पडताना ही आणखी एक प्रवेशद्वारावरील इमारत दिसली.
सर्वात बाहेरच्या बगीच्यातील कारंजे.
बाहेर पडल्यावर राजवाड्याभोवती एक चक्कर टाकून पाहावी म्हटलं. बाहेरच्या तटबंदीवरील अशी एक चौकी दिसली.


(छायाचित्रांवर टिचकी मारल्यास मोठ्या आकारात पाहता येतील.)


5 comments:

Shailesh S. Khandekar said...

मोजके शब्द आणि सुंदर छायाचित्रांचा हा लेख वाचुन खुप बरे वाटले. प्रथम वाचनात लेख संपला यावर विश्वासच बसेना त्यामुळे तीनदा वाचन केले. छानच!

शैलेश

Vishal said...

शैलेश,

प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या प्रतिक्रियेमुळे पुढील लेखनास निश्चितच स्फूर्ति मिळेल.

- विशाल

shashank said...

विशालराव लेख छान आहे, वाचनीय आहे.
शशांक

Anonymous said...

いい です。Good.:)

ganesh said...

tumhi kadhlele photo far apratim ahet tasech tumhi ghatna kami pan yogya shabdat vacta karta ahat tyamule bar watla.