Tuesday, December 20, 2005

परीक्षा

गेल्या रविवारी जपानीची परीक्षा देऊन आलो. दर वर्षी डीसेंबरमध्ये सर्वात सोपी चौथी आणि सर्वात अवघड पहिली अशा चार श्रेणीत जपानी भाषेची प्रमाणपत्र परीक्षा घेतली जाते. भारतातून मी चौथी श्रेणी आधीच पूर्ण केली होती. तिसरी श्रेणी माझ्यासाठी जरा सोपी असल्यामुळे मी दुस-या श्रेणीसाठी फॉर्म भरला होता. अभ्यास नेहमीप्रमाणे काहीही झाला नव्हता. रविवारी सकाळी थंडीनं कुडकुडतच परीक्षा केंद्रावर पोचलो. स्टेशनपासूनच परीक्षा केंद्राकडे जाणा-या रस्त्यांवर गर्दी ओसंडून वाहात होती. गर्दीमध्ये चीनी, कोरीयन आणि इतर आशियाई लोकांचाच भरणा होता. ‘इन्दोजिन्’ म्हणजे भारतीय लोकांमध्ये परीक्षा देणा-या बायका आणि त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे नवरे सोडल्यास माझ्यासारखे लोक कमीच होते. ती गर्दी पाहून मला मुंबईत एकदा दिलेली BSNL ची परीक्षा आठवली. वांद्र्यात का कुठेसं माझं परीक्षा केंद्र होतं. स्टेशनवर उतरुन बाहेर येतो तोच रोज दादर-दादर, कुर्ला, माटुंगा असं ओरडणारे शेअर टॅक्सीवाले BSNL-BSNL असं ओरडत होते. पत्ता शोधत फिरायची गरजच पडली नाही. टॅक्सीवाल्यानं न सांगता डायरेक्ट परीक्षा केंद्रावर नेऊन सोडलं. इथंही काहीसं तसंच होतं. फक्त ओरडणा-या टॅक्सीवाल्यांऐवजी परीक्षा केंद्रावरचे लोक हातात बोर्ड घेऊन स्टेशनवर उभे होते. मीही गर्दीबरोबर चालू लागलो आणि आपोआपच केंद्रावर येउन पोचलो. तिथेही पुन्हा BSNL चाच अनुभव आला. आपल्यासारखेच इथेही काही लोक शेवटच्या क्षणी अभ्यास करत बसले होते. नेहमीप्रमाणं चिनी मुलामुलींचा ‘च्याउ-म्याउ’ चिवचिवाट चालू होता. थोड्या वेळानं परीक्षा सुरु झाली.

पहिल्या सत्रात ‘कांजी’ म्हणजे चित्रलिपीतील अक्षरं आणि शब्दांचा समावेश होता. मी थोडा सावध पवित्रा घेतला. पहिली एक दोन षटकं तशीच खेळून काढली. मग अधूनमधून एकेरी दुहेरी चोरटी धाव घ्यायला सुरुवात केली. पण फार काही धावा जमवता आल्या नाहीत. विश्रांतीनंतर listening comprehension चं दुसरं सत्र सुरु झालं. इथं राहून एक वर्ष झाल्यामुळे कसलेल्या खेळाडूप्रमाणे मी एकेरी दुहेरी धावा चालू ठेवल्या. अधूनमधून एखाद्या खराब चेंडूवर चौकार मारायलाही सुरुवात केली. या डावात ब-याच धावा जमल्या. चहापानानंतर Reading comprehension आणि व्याकरण असं अखेरचं सत्र सुरु झालं. परीक्षेचे निम्मे गुण या सत्रात असल्यामुळे हे सत्र मोठं आणि अवघड होतं. यात खरा कस लागणार होता. सामना जिंकण्यासाठी ४०० चेंडूंत २४० धावा करायच्या होत्या. मला २०० चेंडूत ७०-८० तरी धावा कराव्या लागणार होत्या. मी सावधपणे खेळायचं ठरवलं. पहिली चार-पाच षटकं निर्धाव गेली. चेंडू फारच स्विंग होत होते. अधूनमधून बाउन्सर्सही येत होते. दहा षटकं संपली, पंधरा झाली पण धावांचं खातं काही उघडायचं नाव होईना. षटकांमागं काढाव्या लागणा-या धावांची गती वाढत चालली होती. षटकंही संपत आली होती. मला चेंडूंचा अजिबात अंदाज येत नव्हता. मी डोळे झाकून हवेत बॅट घुमवायला सुरुवात केली. पण काही केल्या चेंडू बॅटला लागायला तयार नव्हता. व्याकरणाच्या फिरकीपुढे तर मी पुरती नांगी टाकली. सामना माझ्या हातातून केव्हाच निसटला होता. तरीही मी अखेरपर्यंत किल्ला लढवायचं ठरवलं. शेवटी मी बचावात्मक धोरण स्वीकारलं आणि उरलेली षटकं खेळून काढली. भोपळाही न फोडता आउट होउन नामुष्कीजनक पराभवापेक्षा भोपळा न फोडता सर्व षटके नाबाद खेळून काढून केलेल्या विक्रमातला पराभव त्यातल्या त्यात दिलासा देणारा होता. सामन्याचा अधिकृत निकाल आणि बक्षिस वितरण समारंभ फेब्रुवारीत असला तरी चारी मुंड्या चित झाल्यावर आता आम्ही कशाला तिकडे तोंड दाखवायला जातोय.

परीक्षा देऊन घरी आल्यावर सहजच विचार केला आणि लक्षात आलं की असा अभ्यास न करता परीक्षा देऊन चार वर्ष लोटली. इंजिनीअरींगनंतर असा प्रसंग कधी आलाच नाही. क्षणार्धात इंजिनीअरींगच्या परीक्षेचे दिवस आठवले आणि मन त्या दिवसात रमलं. त्या वेळीही त्या वेळीही सामना जिंकण्यासाठी चाळीस मार्कांची गोळाबेरीज करावी लागायची. फक्त एक दिवस आधी सराव करुन आम्ही बॅटींग(बेटींग नाही) ला जायचो खरं, पण रनर घेउन खेळल्याशिवाय मॅच काही जिंकता यायची नाही. पण एक मात्र आहे, फॉर्म नसला तरी एकही सामना हरलो नाही. त्या परीक्षांमध्ये एक वेगळंच थ्रिल असायचं. आता तशी मजा कधीच येणार नाही. गेले ते दिन गेले. असो.

पुढच्या वेळी मात्र तिस-या श्रेणीचा साखळी किंवा दुस-या श्रेणीचा उपांत्य सामना न खेळता थेट २००७ चा अंतिम सामना खेळायचं ठरवलं आहे. आता चॅपेल गुरुजींसारखा कोणीतरी प्रशिक्षक शोधायला हवा. नको, नाहीतर गांगुलीसारखं कप्तानालाच संघातून बाहेर जावं लागेल.

Saturday, December 17, 2005

Stay hungry, stay foolish

"Sometimes life hits you in the head with a brick. Don't lose faith. You've got to find what you love. And that is as true for your work as it is for your lovers. Your work is going to fill a large part of your life, and the only way to be truly satisfied is to do what you believe is great work. And the only way to do great work is to love what you do. If you haven't found it yet, keep looking. Don't settle. As with all matters of the heart, you'll know when you find it. And, like any great relationship, it just gets better and better as the years roll on. So keep looking until you find it. Don't settle.
Your time is limited, so don't waste it living someone else's life. Don't be trapped by dogma — which is living with the results of other people's thinking. Don't let the noise of others' opinions drown out your own inner voice. And most important, have the courage to follow your heart and intuition. They somehow already know what you truly want to become. Everything else is secondary."

- Steve Jobs , CEO of Apple Computer and of Pixar Animation Studios.
Commencement address at Standford delivered on June 12, 2005.


हे विचार

Try to get what you like....
Otherwise you will be forced to like what you get !

ह्या माझ्या ईमेलच्या शेवटी असणा-या सहीशी किती मिळतेजुळते आहेत ना? म्हणूनच मला आवडले.
हा माणूस विलक्षण ताकदीचा आहे. त्याच्या एखाद्या नविन प्रॉडक्टचं सादरीकरण पाहिलं की लगेच अंदा़ज येईल. जेव्हा जेव्हा मी हे भाषण ऐकतो तेव्हा तेव्हा मला काम करायला नविनच उत्साह मिळतो. अतिशय स्फूर्तिदायक भाषण. एकदा तरी वाचावं असं. संपूर्ण भाषण इथे वाचता येईल किंवा ध्वनिमुद्रण इथे ऐकता येईल.

Friday, December 02, 2005

व्यत्यय

या संकेतस्थळावरील काही तांत्रिक बिघाडामुळे या ब्लॉगवर नविन लेख लिहीण्यात व्यत्यय आला. त्यातच ऑगस्टपासूनचे जुने लेख आणि प्रतिसादही पुसले गेल्यामुळे काही काळासाठी हा ब्लॉग बंद राहीला. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. हा ब्लॉग छायाचित्रांसह पूर्ववत सुरु करण्यात आला आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.

Thursday, December 01, 2005

अखेर...

अखेर... मी जपानी ड्रायव्हींग लायसन्स् मिळवण्यासाठीच्या दिव्व्यातून बाहेर पडलो. खरं तर माझ्याकडे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हींग लायसन्स् आहे. पण ते वापरुन आणखी फार फार तर सहा महिने गाडी चालवता येईल म्हणून जपानी लायसन्स् मिळवायचं ठरवलं. इकडेतिकडे बरीच चौकशी केल्यावर ते मिळवणं फारच कठीण आहे असं कळालं. कित्येक जणांनी हा नाद अर्धवट सोडून दिला असंही ऐकीवात आलं. पण भारतात सरकारी कचे-यांच्या चकरा मारण्याची सवय झालेल्या माझ्यासारख्याला या जपानी सरकारी कामकाजाचा असा किती त्रास होणार आहे असा विचार करुन मी परवाना मिळवायचं नक्की केलं. घरापासून दोन तास ट्रेनचा प्रवास करुन परवाना मिळण्याच्या परीक्षा केंद्रात पोचलो. चार पैसे हातावर ठेवले की लायसन्स् घरी पोचवणारे एजंट सोडले तर तिथलं वातावरण आपल्याकडच्या R.T.O. पेक्षा फार काही वेगळं नव्हतं. लोकांची वर्दळ, गोंगाट सारं काही तसंच होतं. फरक होता तो फक्त कामातील शिस्तबद्धता आणि प्रामाणिकपणाचा.

लेखी परीक्षेत पहिल्या प्रयत्नातच पास झालो. त्या दिवशीच्या माझ्या बॅच मध्ये टेस्ट पास करणारा मी एकटाच आहे असं तिथल्या अधिका-यानं सांगितलं. मग काय, अस्मादिकांची कॉलर एकदम ताठ. अरे काय चेष्टा आहे काय? इथल्या लोकांना जे दोन-दोन तीन-तीन प्रयत्नांनंतरही करता येत नाही ते आम्ही पहिल्याच प्रयत्नात करुन दाखवलं. मग गाडी चालवण्याच्या टेस्टसाठी एक आठवड्यानंतरची तारीख मिळाली. 'ही टेस्ट फार अवघड असते. पहिल्या प्रयत्नात कोणालाच यश मिळत नाही' असं प्रयोगशाळेतल्या मुलांनी वारंवार सांगितलं होतं. पण लेखी परीक्षेतल्या यशामुळं अजून हवेतच असलेली आमची स्वारी 'ये टेस्ट किस झाड की पत्ती' असं म्हणून काहीही तयारी न करता टेस्ट देण्यासाठी पुन्हा एकदा परीक्षा केंद्रावर पोचली. टेस्टची वेळ झाली. अधिका-यानं मला गाडीत बसायला सांगितलं. गाडीत पुढे एक आणि मागे एक असे दोन अधिकारी बसले होते. एकाचं लक्ष फक्त माझ्या नजरेवर आणि दुस-याचं माझ्या हालचाली आणि गाडीच्या दिशेवर. त्यांना बघितल्यावर मला हळूहळू प्रयोगशाळेतल्या एकेक सहका-यांचे शब्द आठवू लागले. थोडीतरी तयारी करायला हवी होती असा विचार करतच मी गाडी सुरु करुन टेस्ट ट्रॅकवर चालवायला सुरुवात केली. अर्ध्या वाटेवरच शेजारी बसलेल्या अधिका-यांनं थांबायला सांगितलं तेव्हाच मला कळलं की ही टेस्ट इथेच संपली. मी स्टॉपलाईनच्या पुढं ६ इंच गाडी थांबवली होती. टेस्टचा निकाल तिथंच लागला. तरीही अधिकृत निकाल आणि पुढची तारीख मिळण्यासाठी आणखी चार तास वाट पहावी लागणार होती. माझ्याबरोबर एक अमेरीकन मुलगा टेस्ट देण्यासाठी आला होता. त्याची ही तिसरी वेळ होती. मला पाहिल्यावर त्याचा चेहरा जणू 'बेटा, ये तो शुरुआत है' असंच सांगत होता. मी पण मग त्याला 'बेटा, हम इतनी आसानी से हार मानने वालों में से नही है' असा चेहरा करुन उत्तर द्यायचा प्रयत्न केला. जगात कुठेही जा, सरकारी कचे-यांच्या चकरा मारण्याच्या भारतीयांच्या नशिबाचे भोग कधी चुकायचे नाहीत. आता या कचेरीच्या किती फे-या माराव्या लागतात कुणास ठावूक असा विचार करत पुढच्या आठवड्याची तारीख मिळवून घरी परतलो. दुस-या वेळीही फारशी तयारी केली नव्हती.यावेळी मात्र कसाबसा ट्रॅक पूर्ण केला. पण अधिका-यांच्या चेह-यावरचे भाव काही समाधानकारक दिसले नाहीत. निकाल कळेपर्यंत आणखी चार तास वाट पाहावी लागणार होती. मागच्या वेळचा अमेरीकन मुलगा पुन्हा याही वेळी भेटला. या वेळी मात्र त्याचा पेशन्स संपला होता. त्यानं सगळ्या सिस्टीमवर आग ओकायला सुरुवात केली. आपल्याकडच्या कामाच्या पध्दतीतून तावून सुलाखून बाहेर पडल्यामुळे मला यात नविन काहीच नव्हतं. त्यामुळे मी शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होतो. चार तासांनंतर अधिका-यानं निकाल जाहीर करायला सुरुवात केली. टेस्ट पास झालेली मुलं आणि मुली असा काही आनंद व्यक्त करत होती की एखाद्याला वाटावं यांना लॉटरी लागली की काय, किंवा मिस् वर्ल्डचा किताब मिळाला की काय? कदाचित जपानी लोकांच्या जीवनात दोनच गोष्टी सर्वात महत्वाच्या असाव्यात. विद्यापीठात प्रवेश आणि ड्रायव्हींग लायसन्स्. मी याही वेळी पास होण्याची आशा सोडली होती. पण अखेरीस अधिका-यानं माझं नाव पुकारलं आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला. अमेरीकन महोदयांच्या नशिबानं पुन्हा एकदा त्यांना हुलकावणी दिली. दुस-याच प्रयत्नात मला मिळालेला परवाना पाहून चार-चार पाच-पाच प्रयत्नांनंतरही परवाना न मिळालेल्या लोकांची बोटं आपोआपच तोंडात गेली. काही लोकांना तर दहा प्रयत्नांनंतरही यश मिळत नाही. म्हणूनच बहुदा इथली बहुतांश जनता एखादी स्वस्तातली कार घेता येईल एवढी किंमत मोजून ड्राईव्हींग स्कूल मध्ये जात असावी. काही का असेना, आता मी जपानमध्ये गाडी चालवायला मोकळा. आता लवकरच एक 'दिल चाहता है' ची गाण्यांची सी.डी. मागवायला हवी. पण गोव्याला गाडीने जाण्यात जी मजा आहे ती इथे कुठली येणार आहे म्हणा. ठीक आहे. गोवा नाही तर नाही, इथल्या एखाद्या हिरोशिमाला जायला काय हरकत आहे? पाहू या, केव्हा मुहूर्त मिळतो ते !

फुकुशिमा सहल

योगायोगानं एक महिन्यांच्या अंतरानं पुन्हा एकदा निसर्गरम्य ‘तोहोकु’ प्रांताला भेट देण्याची संधी मिळाली. पण या वेळी सहलीचा उद्देश निराळा होता. ‘यागामी फेस्टीव्हल’ हा आमच्या विद्यापीठाचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम. या वर्षी या कार्यक्रमात आपलाही बॅंड उतरवायचा असं आमच्या प्रयोगशाळेतील मंडळींनी ठरवलं. एकेक वाद्यासाठी एकेक सदस्य जमू लागला. गायकही ठरला. कार्यक्रम १० दिवसांवर येउन ठेपला होता. पण सरावासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता आणि जागाही. मग टोकियोपासून लांब कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात सराव करायचं ठरलं. त्यासाठी ‘तोहोकु’ शिवाय दुसरी कुठली चांगली जागा असणार? ठरलं. तीन दिवसांच्या फुकुशिमा सहलीचा आराखडा तयार झाला.

रविवारी सकाळी ७ वाजता एका ठिकाणी जमायचं ठरलं होतं. मंडळी आमची वाट पाहातच थांबली होती. जपानी मुलांबरोबर जाण्यात आणि आपण स्वतंत्र जाण्यात हाच फरक आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट कशी अगदी ठरल्याप्रमाणे व्यवस्थित. एका सेकंदाचाही फरक नाही. आम्ही मात्र ‘भारतीय वेळे’नुसार ७.१५ ला तिथे पोचलो. प्रयोगशाळेतील आम्हा दोघा ‘हिंदी’ मुलांबरोबर दोन ‘चिनी भाई’ पण होते. त्यांच्याबरोबर आम्हा १२ जणांची टीम दोन गाड्यांमधून फुकुशिमाच्या दिशेने निघाली. फुकुशिमा राज्य म्हणजे ‘तोहोकु’ प्रांताची सुरुवात. टोकियोच्या उत्तरेला ३०० कि.मी. वर फुकुशिमा राज्यात असणा-या ‘निहोनमात्सु’ या गावात आम्हाला पोचायचं होतं. तीन सदस्य संध्याकाळी उशीरा येणार असल्यामुळे जपानी गाण्यांचा आस्वाद घेत रमतगमत दुपारी १२ वाजता निहोनमात्सु ला पोचलो. दुपारचं जेवण आटोपून आरक्षित केलेल्या ‘पेन्शन’(जपानी ‘-योकान्’,’मिनशोकु’ अशा घरगुती हॉटेलांचंच एक भावंड) मध्ये पोचलो. त्या एवढ्याश्या गावात एका छोट्या ‘पेन्शन’मध्ये एका संगीतकाराच्या स्टुडीओलाही लाजवेल असा स्टुडीओ पाहून मी थक्क झालो. पेन्शनच्या सभोवतालचा परिसरही रम्य होता. तीन बाजूंना हिरवीगार शेतं आणि मागे डोंगर उतरुन गेल्यावर खळाळत वाहणारा छोटासा झरा अशा या पेन्शनरुपी फार्महाउसमध्ये तीन दिवस बाहेरचं जग विसरुन निसर्गाच्या सानिध्यात सुट्टी घालवायची या कल्पनेनं मन सुखावलं. ‘यागामी फेस्टीव्हल’ला अवघा एक आठवडा राहिला होता. त्यामुळे बॅंडच्या सदस्यांना वेळ घालवून चालणार नव्हतं. त्यांनी पोचल्यापोचल्या लगेच स्टुडीओचा ताबा घेतला आणि आपापली वाद्यं जोडून सरावाची तयारी सुरु केली. आम्हाला संगीतात गती नसल्यामुळे आणि जपानी गाणी म्हणण्याएवढा जपानीचा अभ्यास झाला नसल्यामुळे आम्ही आजुबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायचं ठरवलं. पेन्शनच्याएक काकूंना विचारलं असता त्यांनी जवळपासच्या २-३ ठिकाणांची नावं सांगितली. त्यात तिथलं एक प्रसिध्द प्राणिसंग्रहालय होतं. त्या प्राणिसंग्रहालयात पांढरा सिंह आणि पांढरा वाघ आहे असं ऐकिवात आलं. पण मंडळींना प्राणिसंग्रहालय पाहण्यात कोणतंही स्वारस्य नव्हतं. शिवाय ढगाळ वातावरणात पावसाची चिन्हं होतीच. त्यामुळे जवळच असलेला निहोनमात्सु ‘ज्यो’(castle) पाहण्यावर एकमत झालं.

१२व्या शतकात ‘योशित्सुने’ या सामुराई योद्धयाने ही गढी बांधली आहे. आता आपल्याकडील शनिवारवाड्याप्रमाणे इथलेही आतील अवशेष नष्ट झाले आहेत. पण बाहेरील मुख्य बांधकाम सुरक्षित आहे. प्रवेशद्वारावरील ‘योशित्सुने’च्या पुतळ्याने लक्ष वेधून घेतले. आतमध्ये ‘योशित्सुने’चा जीवनप्रवास दृकश्राव्य देखाव्यांच्या स्वरुपात मांडला आहे. ते देखावे आणि त्यांच्यासमोरील रंगाबेरंगी फुलांचे ताटवे पाहून मन प्रसन्न झालं. संध्याकाळी लवकर अंधार पडल्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी पेन्शनमध्ये परतलो. जेवण आटोपून ओनसेनचा आनंद लुटण्यासाठी पुन्हा एकदा बाहेर पडलो. एव्हाना पाउसही सुरु झाला होता. अर्धा-पाउण तास ओनसेनमध्ये डुंबून परतलो. रात्री थोडा वेळ बॅंडचा सराव पाहून झोपी गेलो.दुस-या दिवशी सकाळी न्याहारी उरकून ‘गोशिकीनुमा’ हे आणखी एक नयनरम्य ठिकाण पाहण्यास निघालो.

निहोनमात्सुपासून साधारण एक तासाच्या अंतरावर हा ‘पाच तळ्यांचा समूह’ आहे. या ठिकाणाचं वैशिष्टय म्हणजे पाचही तळ्यांमधील पाण्याचा वेगवेगळा रंग. शरद ऋतुतील वनराईच्या रंगामुळे या तळ्यांचं सौंदर्य आणखीच खुलून दिसत होतं. डोंगरांमधून हे दृश्य पाहण्यासाठी तयार केलेली पायवाट पाहून ‘ओईरासे’ची आठवण झाली. वर्णनापेक्षा ही छायाचित्रे पाहाणे उत्तम.तीन दिवसांच्या सुट्टीमुळे गर्दीने सगळी ठिकाणं फुलून गेली होती. ‘गोशिकीनुमा’तच दुपारचं जेवण आटोपून जपानमधील ४थ्या क्रमांकाचं सर्वात मोठं, ‘इनावाशिरो’ सरोवर पाहण्यासाठी निघालो. सरोवराच्या जवळ गाडी जात नसल्यामुळे बरंच अंतर जालून जावं लागणार होतं. शिवाय ढगाळ वातावरण आणि नंतर पाऊस सुरु झाल्यामुळे सरोवराजवळ जायचा बेत रद्द करुन आम्ही जवळपासची दुकानं आणि काचेचं वस्तूसंग्रहालय पाहून परतलो. रात्रीचं जेवण आटोपल्यावर पावसानं थोडी मोकळीक दिली. बॅंडच्या सदस्यांनाही थोडी विश्रांती हवी होतीच. त्यामुळे बाहेर ‘हानाबी’ म्हणजे फटाक्यांची आतषबाजी करायचं ठरलं.

इथं जपानमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वत्र हानाबी साजरी केली जाते. प्रत्येक शहरात उन्हाळ्यात एकदा तरी समुद्राच्या किंवा नदीच्या काठाला संध्याकाळी एक जोरदार सार्वजनिक आतषबाजीचा कार्यक्रम असतो. जपानी तरुण मुले आणि मुली पारंपारिक ‘किमोनो’ परिधान करुन हानाबीचा आनंद लुटतात. हा आतषबाजीचा देखावाही अतिशय पाहण्यासारखा असतो. शिवाय इथली तरुण मुलं बाहेर सहलीला गेल्यावर किंवा घराजवळच स्वतंत्र हानाबी साजरी करतात ती वेगळीच. आम्हीही रात्री आमच्या पेन्शनच्या बाहेर हानाबीचा आनंद लुटला. तोहोकु प्रांत टोकियोच्या उत्तरेला असल्यानं इथं हळूहळू थंडी वाढायला सुरुवात झाली होती. बाहेरच्या गारठ्यात फटाक्यांच्या आतषबाजीचा आनंद लुटताना दिवाळीचा आठवण आल्याशिवाय कशी राहील? इथले काही फटाके आपल्यासारखे असले तरी बहुतेक सर्व फटाके कमी आवाज करणारे आणि जास्त प्रकाश देणारे. पण हानाबीची खरी मजा येते ती ‘सेंको हानाबी’मध्ये. गवताच्या काडीप्रमाणे बारीक असणा-या फुलबाजीचं एक टोक सर्वांनी एकाच वेळी पेटवायचं आणि दुस-या टोकाला धरुन फुलबाजी वर जळत येताना पाहायचं. शेवटी संपल्यावर काचेच्या फुग्यासारखा एक फुगा तळाशी तयार होतो आणि तो वा-याने किंवा छोट्याश्या धक्क्यानेही गळून पडतो. जो शेवटपर्यंत हा फुगा टिकवेल तो जिंकला. इथं अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ‘सेंकोहानाबी’चा आनंद लुटतात. किंबहुना त्याच्याशिवाय हानाबी पूर्णच होत नाही. त्याला आम्हीतरी अपवाद कसा असणार? सेंकोहानाबीची अगदी अटीतटीची लढत संपवून,१५ दिवस लवकर का असेना, छोटीशी दिवाळी साजरी करुन रात्री झोपी गेलो. तिस-या दिवशी दुपारी १२ वाजता पेन्शनची मुदत संपत असल्यामुळे सकाळची न्याहारी आटोपून पेन्शनच्या मागे असणा-या झ-याकाठी थोडा वेळ चक्कर मारुन सामानाची आवराआवर सुरु केली. एव्हाना बॅंडच्या सदस्यांची तालीमही व्यवस्थित झाली होती. पेन्शनच्या काका-काकूंचा निरोप घेउन १२ वाजता परतीला निघालो. वाटेत एक छान नैसर्गिस ओनसेन आहे असं कळालं. मग गाड्या तिकडे वळवल्या. जसं चौपाटीवर गेल्यावर भेळ खाल्याशिवाय चौपाटीवर गेल्याची मजा येत नाही तसं जपानमध्ये सहलीला जाउन ओनसेनमध्ये गेलो नाही तर सहल पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही. भुरुभुरु पडणा-या पावसात नैसर्गिक ओनसेनच्या गरम पाण्यात डुंबण्यात वेगळीच मजा असते. अर्धा-एक तास ओनसेनमध्ये डुंबून दुपारचं जेवण उरकून पुन्हा एकदा 'तोहोकु' सहलीच्या आठवणी मनात साठवून टोकियोच्या परतीच्या प्रवासाला लागलो.

(आणखी छायाचित्रे इथे पाहा.)

मराठी टंकलेखन

माझा ब्लॉग प्रकाशित झाल्यापासून अनेक जणांनी विचारलं की आम्हालाही मराठीत कसं लिहीता येईल? कोणत्याही एका संकेतस्थळावर मराठी किंवा देवनागरी टंकलेखनाविषयी सर्वसमाधानकारक माहिती उपलब्ध नाही असं लक्षात आल्यामुळे हा लेखनप्रपंच करायचं ठरवलं. अर्थात हे फक्त मा.सॉ.(मायक्रोसॉफ्ट) प्रणालींसाठीच, कारण मी तीच वापरतो.

मायक्रोसॉफ्टने नविन विंडोज् आणि ऑफिस मराठी संवाद माध्यम संच बाजारात आणल्यापासून मराठीसाठी वापरल्या जाणा-या संगणकांचे दोन गट पडले आहेत. पहिला गट म्हणजे ज्यांच्याकडे विंडोज् एक्स.पी. व ऑफिस २००३ आहे तो आणि दुसरा गट म्हणजे ज्यांच्याकडे इतर प्रकारचे विंडोज् किंवा ऑफिस आहे. आता या दोन्ही गटांमध्ये मराठीतून लिहीण्यासाठी काय करावे लागेल ते पाहू.

पहिल्या गटासाठी हे काम मायक्रोसॉफ्टनं फारच सोपं केलं आहे. नविन विंडोज् आणि ऑफिस मराठी संवाद माध्यम संच डाउनलोड करून इंस्टॉल केल्यास प्रश्नच मिटला. यामुळे विंडोज् व ऑफिसमधील जवळजवळ सर्व संहिता(programmes) आणि मेनू मराठीत बदलले जातील. नियंत्रण पटल(control panel) उघडून त्यात थोडेसे बदल केले की तुम्ही मराठीतून लिहायला मोकळे. ह्या बदलांविषयी पुढे लिहीलेलेच आहे. सध्या मी ह्याच प्रकारे माझा वैयक्तिक संगणक वापरतोय. मराठीतून संगणक वापरण्याचा आनंद काही औरच असतो. त्यातून गुगल निरोप्या (google talk) वर मराठीतून लिहीता आल्यापासून तर हा आनंद द्विगुणीत झालाय. हां, पण "मला तर हे मेनू समजतच नाहीयेत, आमची आपली आधीचीच English OS बरी." किंवा "काय करणार, इंग्लीशची इतकी सवय झालीये ना की मराठी वापरताच येत नाही मुळी" असं म्हणणारीही बरीच मंडळी असतात. शिवाय काही लोकांना कार्यालयातील संगणकावर हा प्रयोग करता येत नाही. त्यांच्यासाठी आणखी एक उपाय आहे. मराठी संवाद माध्यम संच न वापरताही मराठीतून लिहीण्यासाठीची कृती खाली देत आहे.

Enabling South Asian Language Support :
Windows XP:
1. Navigate to: Start > Control Panel > Date, Time, Language, and Regional Options
2. Click on "Add Other Languages"
3. In the dialog window, select the "Supplemental Language Support" tab.
4. Check "Install files for complex script and right-to-left languages (including Thai) and click "Ok." Windows may require you to insert the original installation CD to complete the installation.
5. Reboot the computer.

Activating Keyboard Layouts:
Windows XP:
1. Navigate to: Start > Control Panel > Date, Time, Language and Regional Options
2. Click on Add Other Languages"
3. In the dialog window, select the "Supplemental Language Support" tab.
4. Click on "Details" under the "Text Services and Input Languages" header.
5. Under the "Installed Services" menu, select "Add." This will take you to a dialog window which will allow you to add language input services, including assorted keyboard layouts for South Asian languages.

माझ्या मते ही कृती विंडोज् २००० आणि ऑफिस एक्स.पी. साठीही चालू शकेल. पण या प्रकारात एक अडचण आहे. विंडोज् च्या मराठी कळफलकाचा आराखडा इंग्रजी अक्षरांच्या उच्चारांप्रमाणे(phonetic keyboard) नाही. त्यामुळे आपण बोलतो तसे लिहिता येत नाही . त्याकरिता पडद्यावरील कळसंचाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे सुरवातीला टाईप करताना अडतण येते. पण सवय झाल्यावर मात्र त्यासारखी मजा नाही. या संकेतस्थळावर याविषयी आणखी माहिती मिळू शकेल.

आता दुस-या गटाचा विचार करु. यामध्ये विंडोज् एक्स.पी. व्यतिरिक्त इतर नियंत्रण प्रणालींचा समावेश होतो. अर्थात एक्स.पी. वापरणा-यांसाठीही हा पर्याय उपलब्ध आहेच. बरहा किंवा अक्षरमाला यासारखी सॉफ्टवेअर वापरुन या प्रकारात मराठी टंकलेखन करता येतं. शिवाय यात मराठी उच्चारांप्रमाणे कळफलकावरील कळा वापरता येत असल्यामुळे हा दुसरा प्रकार बहुतांश लोकांना जास्त सोपा पडेल. बरहा डाउनलोड केल्यावर मराठीतून लिहिण्याच्या पाय-या अशा.

१. बराहा डायरेक्टच्या आयकन वर टिचकी (एक किंवा दोन, चवीनुसार;) मारा
२. संगणक फलकाच्या खालील-उजव्या कोपऱ्यात (जिथे सामान्यतः घड्याळ असते) बराहा डायरेक्ट चे चिह्न दिसेल.
३. F12 कळ दाबली असता "बराहा डायरेक्ट युटिलिटी" ची खिडकी उघडेल.
४. त्यात "इंडियन लँग्वेज" आणि "आउटपुट फॉरमॅट" निवडा.
५. इंग्लिश-मराठी उडी इथे F11 कळ दाबल्याने मारता येईल.
६. आता ओपनऑफिस रायटर (किंवा वर्ड, किंवा कोणतीही युनिकोड ओळखणारी प्रणाली) ची खिडकी उघडून थेट मराठीत लिहायला सुरू करा!
७. विंडोज डब्यावर भारतीय भाषासंच इंस्टॉल नसल्यास नोटपॅड मध्ये जोडाक्षरे, वेलांट्या बरोबर दिसत नाहीत. पण ओपनऑफिस मध्ये अगदी आरामात मराठीत लिहू आणि सुरक्षित करू शकतो.
(सौजन्य : शशांक जोशी)

मी पहिल्या प्रकारात मोडत असल्यामुळे या सॉफ्टवेअर विषयी मला फारशी माहिती नाही. पण मराठी टंकलेखनासाठी हाही एक चांगला पर्याय आहे असं ब-याच जणांकडून ऐकलं आहे.
या विषयावरील आणखी माहितीसाठी विकीपीडीयाचा उपयोग होईल.

तेव्हा मंडळी, चला, पुन्हा एकदा करुया संगणकाचा 'श्रीगणेशा', मराठीतून !

गणपती बाप्पा मोरया!


गणेशचतुर्थीच्या शुभदिनी गणरायाला वंदन करुन धुळ खात पडलेली ही Blog ची गाडी पुन्हा सुरु करावी असा विचार आला आणि हा Blog लिहायला घेतला. गणेशोत्सवाला बाहेर असण्याची ही पहिली वेळ नसली तरी आज जरा जास्तच चुकल्याचुकल्यासारखं वाटतंय. आज शाळा-कॉलेजातल्या गणपतीच्या वेळच्या सगळ्या आठवणी एकदम दाटून आल्या. ती गणपतीची आरास करण्यासाठी केलेली धावपळ, आदल्या दिवशी गणपती घरी घेउन आल्यावर दारात आईनं धुतलेले पाय, चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून केलेली प्रतिष्ठापना, पूजा आणि आरतीपेक्षा नंतर मिळणा-या मोदकांकडे लागून राहिलेलं लक्ष, सर्व भावंडाबरोबर मिळून म्हटलेल्या आरत्या, रात्री मित्रांबरोबर गर्दीत गणपती पाहाण्यासाठी केलेली पायपीट, घराबाहेर पडताच जागोजागी कानावर पडणारी 'गणराज रंगी नाचतो' किंवा 'ओंकारस्वरुपा' सारखी गाणी, विसर्जनावेळचा 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, विसर्जनानंतर प्रसादाचे चुरमुरे आणि खोबरं वाटताना मध्येच एक घास तोंडात टाकण्याची मजा, अशा एक ना अनेक, कितीतरी आठवणी. आता हे सगळं परत अनुभवायला मिळेल का? कदाचित मिळणारही नाही. कारण आता ते वयही राहिलं नाही आणि तो गणेशोत्सवही. विसर्जनाच्या मिरवणुकीबाबत तर काही बोलायचीच गरज नाही. हे वाचा.

पण या वर्षी गणेशोत्सव साजरा करायची दुधाची तहान ताकावर का असेना भागवता आली. तोक्यो (जपानीत 'टोकियो'ला 'तोक्यो' म्हणतात) मराठी मंडळानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. गेल्या वर्षी इथं येउन एकच आठवडा झाला असल्यामुळे जाता आलं नव्हतं. या वर्षी मात्र गणेशोत्सव चुकवायचा नाही असं ठरवलं. कार्यक्रमही तसा खासच होता. यावर्षी खास पाहुणे म्हणून प्रशांत दामले आणि सुधीर गाडगीळ येणार होते. ठरल्याप्रमाणे शनिवारी दुपारी सर्वात प्रथम गणपतीची पूजा आणि सामुहिक अथर्वशीर्ष पठण आणि आरती झाल्यावर भारताच्या राजदूतांचं १०-१२ पानांचं (छोटंसं) भाषण होउन कार्यक्रमाला सुरुवात झाली. आमच्यामध्ये एक होउन आरत्या म्हणणारे प्रशांत दामले आणि सुधीर गाडगीळ यांच्याबरोबर आरती, अथर्वशीर्ष आणि 'गणपती बाप्पा मोरया' म्हणताना आपण टोकियोमध्ये आहोत याचा विसरच पडला.

नंतर प्रशांत दामले आणि सुधीर गाडगीळ यांचा 'रंग शब्द सुरांचे' हा कार्यक्रम सुरु झाला. सुधीर गाडगीळांनी प्रशांत दामलेंची अनौपचारीक मुलाखत घेतली आणि नंतर दोघांनी जमलेल्या मंडळींबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या. मध्येमध्ये त्यांनी दूरदर्शनवरील मुलाखतीत दाखवतात तश्या प्रशांत दामलेंच्या नाटक आणि चित्रपटातल्या काही चित्रफिती दाखवल्या. सुरवातीला चित्रफितींसोबत आवाजच येईना. त्याबरोबर लगेच सुधीर गाडगीळांच्या "अहो आम्ही दूरदर्शनची माणसं. जिथं जाऊ तिथं 'व्यत्यय' हा येणारच" या वाक्यानं हॉलमध्ये एकच हशा पिकला. राजदूतांच्या (छोटयाश्या) भाषणावर टोमणा मारायलाही त्यांनी कमी केलं नाही. कार्यक्रमाची मजा इथे लिहीता येण्यासारखी नाही. त्याचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा. प्रशांत दामलेंबद्दल तर काही बोलायची गरजच नाही. त्या दोघांबरोबर गप्पा मारताना वेळ कसा गेला ते कळलंच नाही. शेवटी कार्यक्रम संपल्यावर खास भारतीय जेवणावर ताव मारल्यावर खरा गणेशोत्सव साजरा झाला.

उत्तर जपानची सहल - २

सुरवातीला दोन नंतर तीन दिवस ठरलेल्या या सहलीचे पहीले दोन्ही दिवस हिराईझुमीमध्येच गेल्याने ही सहल आणखी एक दिवस वाढवायचं ठरलं. मोरीओकात कारची मुदत आणखी एक दिवस वाढवून बुधवारी सकाळी ६ वाजता उत्तरेला १४० कि.मी.वर असणा-या ‘आओमोरी’ राज्यातील ‘तोवादा’ सरोवर पाहण्यासाठी निघालो.

‘होन्शु’ या जपानच्या मुख्य बेटावरील उत्तरेकडील टोकाच्या, हिरव्यागार, गर्द जंगलांनी भरलेल्या या राज्याला ‘आओमोरी’ हे नाव सार्थच आहे. निसर्गाचं देणं लाभलेल्या या प्रदेशात वर्षातील कोणत्याही ऋतुत सृष्टीसौंदर्य पाहायला गेलेला पर्यटक निराश होउन परतण्याची शक्यता कमीच. ‘ऋतु हिरवा’ ची गाणी ऐकत आणि त्या गाण्यांची समोर दिसणा-या चित्राशी तुलना करत तोवादा शहरात केव्हा पोचलो ते कळलंदेखील नाही.

तोवादामध्ये हॉटेल्स शोधताना पुन्हा मोरीओकाचाच प्रत्यय आला. बरीचशी हॉटेल्स आरक्षित होती आणि उरलेल्यांच्या किंमती गगनाला भिडलेल्या. अशातच मोडकीतोडकी जपानी आणि इंटरनेटविना लुळेपांगळे झालेलो आम्ही एका मोठया हॉटेलमध्ये घुसलो. हॉटेलचं एका दिवसाचं भाडं ऐकून आमचे उतरलेले चेहरे पाहून व्यवस्थापिकेला आमची दया आली आणि तिनं आम्हाला काही स्वस्तातल्या ‘-योकान्’ची नावं आणि पत्ते दिले. ते शोधत शेवटी एका ‘मिनशोकु’मध्ये विचारलं असता तिथल्या काकूंनी जागा रिकामी असल्याचं सांगितलं आणि आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. तेव्हा ठरवलं की इथून पुढे कुठेही नियोजनाशिवाय गेलं तरी आरक्षणाशिवाय जायचं नाही. ‘मिनशोकु’ म्हणजे एक प्रकारचं –योकानच, पण कमी व्यावसायिक आणि जास्त घरगुती. मिनशोकुच्या काकूंना आम्हा जपानी बोलू शकणा-या भारतीयांना पाहून कुतूहल आणि कौतुक वाटलं. दुपारी ३ वाजेपर्यंत मिनशोकुमध्ये उतरता येत नाही असं काकूंनी सांगितल्यामुळं आमची टीम तेवढया वेळात तोवादा सरोवराची परिक्रमा करण्यास बाहेर पडली.

पर्वतावर ४४० मीटर उंचीवर असणारं तोवादा सरोवर तोहोकु प्रांताच्या सौंदर्याचं प्रतीक आहे. ५२ कि.मी.चा परिघ असणारा हे सरोवर ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालं आहे. चोहोबाजुंनी वेढलेल्या पर्वतांमधून नागमोडी वळणं घेत जात असलेल्या रस्त्यावरुन सरोवराचं दृश्य सुंदर दिसत होतं. पण गाडी चालवताना त्याचा मनमुराद आस्वाद घेता येईना म्हणून मी गाडीचा वेग जरा कमी केला. पण लगेच मागे गाडयांची भली मोठी रांग उभी. हॉर्न वाजवणे किंवा पुढे जाणे हे जपानी लोकांच्या स्वभावातच नाही. तुम्ही ज्या वेगाने जाल त्याच वेगाने ते तुमच्या मागेमागे येतील पण पुढे जाणार नाहीत. रस्त्यात मध्येच थांबायला मनाई असल्याने थांबायचीदेखील पंचाईत आणि हळू गेलं तरी पंचाईत. या जपानी लोकांना खास भारतीय ‘कट मारणे’ या संकल्पनेचं प्रात्यक्षिक दाखवावं असं मला राहूनराहून वाटत होतं. शेवटी डोंगराच्या माथ्यावर सरोवर पाहण्यासाठी तयार केलेल्या एका निरीक्षणस्थळावर आम्ही आणि आमच्या मागुन येणारा तो लवाजमा असे सगळे पोचलो आणि आमचा ससेमिरा थांबला. या निरीक्षणस्थळावरुन तोवादा सरोवराचं दिसणारं दृश्य डोळ्यात मावत नव्हतं. सर्व बाजूंनी वेढलेले हिरवे डोंगर आणि मध्ये स्वच्छ, निळंशार पाणी छानच दिसत होतं. काही लोक हेलिकॉप्टरमधुन या दृश्याचा आनंद घेत होते. तोवादा सरोवराची परिक्रमा पूर्ण करुन आम्ही ३ वाजता मिनशोकुमध्ये परतलो. काही काळ विश्रांती घेऊन ‘यासुमिया’ या ठिकाणी सरोवराचं जवळून दर्शन घेण्यासाठी निघालो.

‘यासुमिया’ याचा शब्दशः अर्थ विश्रांतीस्थळ असा होतो. नावाप्रमाणेच ते विश्रांतीस्थळ होतं. सरोवराच्या किना-यावर हॉटेल्स, उपहारगृहं यांची कॉफीचा आस्वाद घेताना सरोवराचं सुंदर दृश्य दिसेल अशी रचना केली होती. काही काळ आम्हीही बाहेरचं जग विसरुन तिथं विश्रांती घेतली. तिथून जवळच किना-यावर ‘Statue of Maidens’ नावाचा प्रसिध्द पुतळा आहे असं कळलं. तो पाहण्यासाठी गेल्यावर तिथं बरीच गर्दी दिसली. पुतळ्याचं वर्णन जपानीत लिहीलं असल्यामुळं तो पुतळा कशासाठी प्रसिध्द आहे हे मात्र कळू शकलं नाही. या पूर्ण सहलीत एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटत होतं. हिराईझुमी आणि तोवादा या दोन्ही प्रसिध्द ठिकाणी आमच्याखेरीज कोणी परदेशी पर्यटक दिसत नव्हते. कदाचित सुदूर जपानमध्ये यासारख्या ठिकाणी भाषेच्या अडचणीमुळे फारसे परदेशी पर्यटक येत नसावेत. पण जपानी लोक मात्र सहलीचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत होते. यासुमियापासुन तोवादा सरोवरामध्ये बोटीची सफरही करता येते. पण आम्ही पुन्हा एकदा सरोवराभोवती गाडीने चक्कर मारणेच पसंत केले. संध्याकाळी सात वाजता अर्ध्या सरोवराभोवती चक्कर मारुन रात्रीच्या जेवणासाठी यासुमियाला परत येउन पाहिलं तर अर्ध्या-एक तासापूर्वी गर्दीनं फुलून गेलेल्या त्या ठिकाणी अगदी सामसुम होती. सारी दुकानं आणि उपहारगृहं बंद झाली होती. सारे लोक आपापल्या '–योकान्' आणि 'मिनशोकु' मध्ये जेवायला गेले असावेत असा विचार करुन उघडया असलेल्या एकुलत्या एक उपहारगृहात रात्रीचं जेवण आटोपून आम्ही पण आमच्या 'मिनशोकु'मध्ये परतलो.

इथं ‘–योकान्’ किंवा ‘मिनशोकु’मध्ये नैसर्गिक नसला तरी कृत्रिम ओनसेनचा आनंद घेण्याची सोय असते. त्याला ‘ओफुरो’ म्हणतात. रात्री झोपण्यापूर्वी स्नान करुन १५-२० मिनीटं ओफुरोमध्ये डुंबणे हा जपानी माणसाच्या दिनक्रमाचा एक भाग असतो. मग तो ‘मिनशोकु’मध्येही कसा चुकेल? ‘–योकान’प्रमाणंच इथंही ‘युकाता’ घालायला मिळतो. ‘किमोनो’ ह्या पारंपारिक पोषाखात बाहेरील मुख्य पोषाखाच्या आत घालायचा पेहराव म्हणजे ‘युकाता’. हल्ली ‘किमोनो’ किंवा ‘युकाता’ यांचा वापर आपल्याकडच्या धोतर-कोट-पगडी किंवा नऊवारी साडी यांच्यासारखा सणा-समारंभात किंवा अशा मिनशोकुपुरताच मर्यादित राहिला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी एकाच प्रकारचा युकाता असतो. पण बाहेरील ‘किमोनो’ मात्र वेगळा असतो. आम्हीही थोडावेळ ‘ओफुरो’मध्ये डुंबुन नंतर ‘युकाता’ घालून खास जपानी ‘ओच्या’ म्हणजे ‘ग्रीन टी’चा आस्वाद घेतला आणि त्यानंतर अशी शांत झोप लागली की बस्स.

गुरुवारी सकाळी लवकर उठून आम्ही 'मिनशोकु'च्या काकूंचा निरोप घेतला आणि तोवादापासून जवळच असलेल्या ‘ओईरासे’ या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. तोवादा परिसरातील सर्वात प्रसिध्द असलेलं हे ठिकाण कल्पनेपेक्षाही सुंदर होतं. तोवादा सरोवरातून निघून पाण्याचा एक छोटासा झरा गर्द झाडीतून सरोवराच्या डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या १४ कि.मी. अंतरावरील ‘ओईरासे’ या ठिकाणी येतो. ‘ओईरासे’ पासून तोवादा सरोवरापर्यंत झ-याच्या कडेने १२ कि.मी.ची पायवाट खास हा झरा पाहण्यासाठी तयार केली आहे. ओईरासेला गाडी लावून आम्ही या पायवाटेने डोंगर चढण्यास निघालो. हा १२ कि.मी.चा प्रवास या सहलीतील सर्वात अविस्मरणीय अनुभव होता. त्याचं शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य. घनदाट, गर्द हिरव्या जंगलात कडेकपारींमधून खळाळत, फेसाळत वाहणारं ते स्वच्छ, नितळ पाणी, वाटेत लागणारे असंख्य छोटे-मोठे धबधबे पाहून निसर्गानं मुक्त हस्तानं केलेली उधळण म्हणजे काय याचा प्रत्यय आला. आत्तापर्यंत असं दृश्य मी केवळ दिवाणखान्यातल्या भिंतीवर लावलेल्या शोभेच्या छायाचित्रांमध्ये आणि ती छायाचित्रं विकणा-या दुकानांमध्येच पाहिलं होतं. पण प्रत्यक्ष पाहण्याची ही पहिलीच वेळ होती. डोंगरामधून वेडीवाकडी वळणे घेत, उडया मारत तो झरा जात होता आणि प्रत्येक वळणावर स्वप्नवत वाटावं असं चित्र डोळ्यांपुढे येत होतं. काही जण ते कॅमे-यात साठवून ठेवत होते तर काही कुंचल्यानं कॅनव्हासवर उतरवत होते. भान हरवून चालत असताना १२ कि.मी.चं ते अंतर कधी संपलं ते कळलंच नाही. या परिसरात एक गोष्ट मला अतिशय आवडली आणि त्याबद्दल मला जपानी लोकांचं कौतुक करावंसं वाटलं. ती म्हणजे या पूर्ण १२ कि.मी. परिसराचं नैसर्गिक सौंदर्यं आहे तसं जपलं आहे. वाटेत कुठेही कचरा नाही, घरं, किंवा हॉटेल्स नाहीत, सिमेंट, कॉंक्रीटचे पूलही नाहीत. झ-याभोवतीची पायवाटही अगदी नैसर्गिक वाटावी अशीच. झ-यात कोणी माणसं किंवा मुलं डुंबताना दिसत नाहीत. थोडक्यात अगदी १००-२०० वर्षांपूर्वी जाउन पाहिलं तरी आताचं हे दृश्य असंच दिसावं असं. कठीण चढण असलेल्या त्या पायवाटेवरुन डोक्यावर टोपी, पाठीवर पिशवी आणि हातात कॅमेरा घेउन जोमानं चालणा-या जपानी आजीआजोबांचंही मला कौतुक करावंसं वाटलं. या ठिकाणाहून निघण्याचं मनच होत नव्हतं. वाटलं, आणखी एक दिवस राहायला काय हरकत आहे. पण कारची मुदत संपत आल्यानं मन मारुन आम्हाला तिथून निघावं लागलं. तिथून निघून संध्याकाळी साडेपाच वाजता मोरीओकात परत आलो. कार परत करुन टोकियोला जाणा-या शिंकानसेनचं तिकीट काढलं. पुन्हा एकदा इथं यायचंच असा निश्चय करुन शिंकानसेनमध्ये बसलो. परत येताना ओठांवर एकच गाणं तरळत होतं
‘हे जीवन सुंदर आहे.......’

(ही आणि इतर छायाचित्रे इथे पाहा. )

Thursday, September 01, 2005

उत्तर जपानची सहल - १

शाळेत असताना निबंध लिहावा लागायचा. त्यानंतर मराठीत काहीतरी लिहायची माझी ही पहिलीच वेळ असावी. लेखन हा माझा प्रांत नाही. आणि 'पूर्वरंग' वाचल्यावर जपानविषयी आणखी काही वाचायची गरज आहे असं मला वाटत नाही. तरीही एका अविस्मरणीय सहलीच्या आठवणी साठवून ठेवाव्यात असं वाटलं म्हणून हा छोटासा प्रयत्न.

आत्तापर्यंत जपानमध्ये अनेक ठिकाणी फिरुन आलो, पण जपानी मित्र बरोबर नसताना फिरायची ही पहिलीच वेळ होती. या उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी ड्राईव्हला जायचंच असा निश्चय करुन जपानी भाषेचा गंध नसणारा एक आणि कामचलाऊ जपानी येणारे आम्ही दोघे अशी तिघा जणांची टीम तयार झाली. अशा परिस्थितीत सुदूर जपानमध्ये कोणत्याही नियोजनाअभावी फिरायला जाणं हेच मुळी एक साहस होतं. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे तिघांचीही जपानी जेवण जेवायची तयारी होती. क्योतो, ओसाका ही प्रसिध्द ठिकाणं पाहिली असल्यामुळं शेवटी भरभरुन निसर्गसौंदर्य लाभलेल्या उत्तर जपानच्या 'तोहोकु' नावाच्या प्रांतात फिरायला जायचं ठरलं. इंटरनेट आणि जपानी मित्रांकडून माहिती मिळवल्यावर तोहोकुमधील 'हिराईझुमी' आणि 'तोवादा' ही दोन ठिकाणं उन्हाळी सहलीसाठी प्रसिध्द आहेत असं कळलं. दोन्ही ठिकाणांच्या मध्ये असलेल्या 'मोरीओका' या मोठया स्थानकावर उतरुन तिथून कार रेंट करुन दोन दिवसात दोन्हीकडे जाऊन परत य़ायचं असा बेत ठरवून रविवारी रात्री आम्ही झोपी गेलो.

सोमवारी भल्या पहाटे सहा वाजता आम्ही टोकियोहून उत्तरेला ५०० किलोमीटरवर असणा-या मोरीओकाला जाणारी पहिली शिंकानसेन (बुलेट ट्रेन) पकडली. सकाळी ९ वाजता मोराओकाला पोचल्यापोचल्याच साहसाला सुरुवात झाली. मोरीओकाला जाऊन तिथूनच कार रेंट करायची असा आमचा बेत होता. पण जपानमध्ये जवळजवळ एक वर्ष राहूनही जपानी लोकांकडून अजून ब-याच गोष्टी शिकायच्या आहेत हे कार शोधताना आमच्या लक्षात आलं. तिथे पोचल्यावर कळलं की आरक्षणाशिवाय कार मिळतच नाही आणि जपानी लोकांनी अगोदरच ब-याचश्या जागी गाडयांचं आरक्षण करुन ठेवलं होतं. अनोळखी गावाची काहीच माहीती नव्हती. शिवाय भाषेची मोठी अडचण होतीच. चारच दिवसांपू्र्वी फुजी पर्वतारोहण करुन तिथून सूर्योदय पाहण्याच्या आमच्या बेतावर वरुणराजांनी पाणी फिरवल्यामुळे आम्हाला अर्ध्या वाटेवरुनच निराश होउन परतावं लागलं होतं. त्यामुळे यावेळीही सुट्टी अशीच फुकट जाणार असं वाटत असतानाच शेवटी एकदाची एका ठिकाणी कार मिळाली आणि आमचा खरा प्रवास सुरू झाला.

दुपारी ३ वाजता मोरीओकाच्या दक्षिणेस ९० कि.मी.वर असणा-या हिराईझुमी या गावी आम्ही पोचलो. 'किता आल्पस्' म्हणजे उत्तर आल्पस् असे संबोधल्या जाणा-या पर्वतरांगांमधून ड्राईव्ह करणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. उन्हाळ्यातही गर्द झाडी आणि हिरव्यागार शेतांनी भरलेला तो परिसर पाहून काश्मीरची आठवण येणं साहजिकच होतं. लोकांनी सार्वजनिक रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी लावलेली रंगीबेरंगी फुलझाडे आणि त्यांची राखलेली निगा पाहून जपानी माणसाविषयी माझ्या मनात असलेला आदर आणखीनच वाढला. हिराईझुमी, अकराव्या शतकात फुजीवारा संस्थानिकांनी वसवलेलं हे गाव त्या काळातील जपानमधील एक समृध्द आणि महत्वाचं शहर होतं. मोठाले डोंगर, हिरवीगार शेतं आणि त्यांच्यामधून वाहणारी नदी अशा या गावात प्रेक्षणीय ठिकाणांची कमी नसती तर नवलच. हिराईझुमीत पोचल्यावर सर्वात प्रथम पर्यटन केंद्रात जाउन आम्ही स्थानिक पर्यटन स्थळांची माहिती मिळवली. दुपारचं जेवण उरकून (जेवणाबद्दल काही लिहीत नाही. तो एक स्वतंत्र लेखनाचा मुद्दा आहे) आम्ही सर्वात प्रथम मोत्सुजी मंदिर पाहावयास निघालो. नवव्या शतकात बांधलेल्या या मंदिराचे बरेचसे अवशेष नष्ट झाले असले तरी त्याभोवती असणा-या छोट्या तळ्यांनी आणि देवदार वृक्षांनी नटलेला तो परिसर पाहून तिथून निघायची कोणाचीच इच्छा होत नव्हती. अखेर संध्याकाळी मंदिर बंद झाल्यावर तिथून निघून जवळच असलेला 'गेम्बेकी गॉर्ज' पाहावयास गेलो. कडेकपारींमधून खळाळत वाहणा-या नदीचं सूर्यास्ताच्या वेळी दिसणारं चित्र विहंगमच होतं. थोडा वेळ सारं काही विसरुन ते दृश्य डोळ्यात आणि कॅमे-यात साठवून हिराईझुमीला परतलो.

जपानचं एक वैशिष्टय म्हणजे पूर्ण जपानमध्ये 'ओनसेन' म्हणजे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे पसरलेले आहेत. काही ठिकाणी अशा ओनसेनच्या ठिकाणी हॉटेल्स बांधलेली आहेत. तिथे तुम्हाला काही पैसे देउन ठराविक वेळासाठी ओनसेनचा आनंद लुटता येतो. ओनसेन हा औषधी तर असतोच, पण थकवा दूर करण्यासाठी अतिउत्तम. जपानी लोकांच्या दीर्घायुष्याच्या रहस्यांपैकी एक म्हणजे ओनसेन. अशाच एका ओनसेनमध्ये दिवसभराचा थकवा दूर करून आम्ही '-योकान' म्हणजे जपानी पध्दतीच्या घरगुती हॉटेलमध्ये उतरलो. आम्हा परदेशी पाहुण्यांना पाहून -योकानमधल्या आजोबांना नवल वाटणं स्वाभाविकच होतं. रात्री खास जपानी पाहुणचार घेतल्यावर दुस-या दिवशी सकाळी हिराईझुमी परिसरातील उरलेली ठिकाणं पाहायची असं ठरवून झोपलो. '-योकान' मध्ये पारंपारिक जपानी पोषाख 'युकाता' घालून झोपण्याची मजा काही औरच होती.

दुस-या दिवशी सकाळी 'इवाया केव्ह टेंपल्' पासून सुरुवात केली. पाषाणातील गुहेत बांधलेल्या या मंदिराचा परिसरही सुंदरच. मंदिराभोवतीच्या छोटया तळ्यांमधील कमळे पाहून मन प्रसन्न झालं. इथल्या सगळ्या मंदिरांची रचना एकाच प्रकारची असते. आणि देवही एकच. अर्थातच बुध्द. बाकी मंदिरातील दिवे, उदबत्त्या, घंटा नमस्कार करण्याची पध्दत अशा गोष्टी थोडयाफार फरकाने आपल्यासारख्याच. एकच वेगळी गोष्ट म्हणजे गाभा-यात नसली तरी मुख्य मंदिरात चपला घालून जाण्यास परवानगी असते. पण जपानी घरात मात्र चपला घालून जाता येत नाही. मंदिरात आपल्यासारखा प्रसादही मिळत नाही. मात्र ब-याचश्या मंदिरांच्या बाहेर भविष्य पाहायची सोय असते. काही पैसे देऊन एक कागद उचलायचा आणि आपलं भविष्य पाहायचं. जर भविष्य चांगलं असेल तर कागद आपल्याकडेच ठेवायचा. नाहीतर मंदिराशेजारीच एका दो-याला बांधून पुजा-याला आपल्या चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करायला सांगायचं. एकदा मी असा भविष्याचा कागद घेतला होता. पण भविष्य वाचता न आल्यामुळे ते चांगलंच असेल असा विचार करुन खिशात ठेउन दिला. तिथून निघून हिराईझुमीमधील सर्वात मोठं आकर्षण असणा-या च्युसोंजी मंदिरात पोचलो. बाहेरुन साधं दिसणारं हे मंदिर एवढं प्रसिध्द का आहे हे मला मंदिराच्या आत गेल्यावर कळलं. आतील मुख्य मंदिर आणि मूर्तींना सोन्याचा मुलामा दिला आहे. कलाकुसरही अप्रतिम. मात्र छायाचित्र काढण्यास मनाई असल्यामुळे या वेळी ते चित्र फक्त डोळ्यातच साठवावं लागलं. नवव्या शतकात बांधलेलं हे मंदिर त्या काळी हिराईझुमीच्या समृध्दतेचं प्रतीक होतं. छोट्या टेकडीवर बांधलेल्या या मंदिरावरुन दिसणारं हिरवंगार हिराईझुमी गाव, त्यातून वाहणारी नदी पाहून इथं कडक उन्हाळा सुरू आहे यावर विश्वास बसत नव्हता. या सहलीला सुरुवात झाल्यापासून प्रत्येक दिवशी एक नवीनच अनुभव येत होता. च्युसोंजी मंदिराच्या परिसरात फिरत असतानाच अचानक पायाखालची जमीन हादरु लागली आणि आमच्या लक्षात आलं की भूकंप सुरु झाला. रस्त्यावरचे सारे लोक स्तब्ध झाले. आजवर इथं असताना अनेक भूकंप अनुभवले आणि आता त्याची सवयही झाली आहे. पण हा भूकंप त्यातला सर्वात मोठा आणि प्रदीर्घ होता. तिथली प्रचंड झाडं भूकंपामुळं इतकी हालत होती की आपल्यावर पडली तर या विचारानं अंगावर काटा येउन गेला. त्यानंतर दोन तास आमची भूकंपाविषयीच चर्चा सुरु होती. पण जपानी लोक मात्र काही न झाल्याच्या आविर्भावात दोन मिनीटांत कामाला लागलेदेखील.

हिराईझुमीतील मुक्काम आटोपून आम्ही मोरीओकाच्या परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत सेनमाया इथं एक चांगलं ठिकाण आहे असं GPS महोदयांनी सांगितलं. ( GPS ला मराठी शब्द माहिती नाही). मग मुख्य रस्त्यावरुन गाडी वळवून सेनमाया इथला 'गेईबेकी गॉर्ज' पाहायला निघालो. पूर्वनियोजन न केल्याचा हा सर्वात मोठा फायदा. तुम्हाला कोठेही, केव्हाही आणि हवा तितका वेळ जाता येतं. वेळापत्रकानुसार जाण्यात मजा ती कसली. असो. दोन्ही बाजूंना १०० मीटर उंचीचे कडे, गर्द झाडी, मधून वाहणारी नदी, नदीत छोट्या नावेतून सफर, नावेत 'ओ माजी रे' अशाच अर्थाचं काहीतरी जपानी लोकगीत म्हणणारा नावाडया, याशिवाय सहलीची आणखी मजा ती कोणती? दोन दिवसातच सहलीचे पैसे वसूल. 'गेईबेकी गॉर्ज' चा मनमुराद आनंद लुटून आम्ही संध्याकाळी मोरीओकाला परतलो. रात्री मोरीओकात मुक्काम करुन तिस-या दिवशी सकाळी आणखी एका साहसी प्रवासाला निघण्यास सज्ज झालो.

क्रमशः

(ही आणि इतर छायाचित्रे इथे पाहा. )

Monday, August 01, 2005

पहिला ब्लॉग

नमस्कार,

माझा पहिला (so called) blog सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. प्रस्तुत blog माहितीच्या महाजालावर पडून(कार्यरत) असलेल्या माझ्यासारख्या अनेक जणांना उपयोगी ठरेल अशी आशा करतो. (घाबरु नका. ही काही कुठल्या मोठया पुस्तकाची प्रस्तावना नाही. पण असं काहीतरी लिहीलं नाही की सुरुवात केल्यासारखं वाटत नाही.)

लेखन हा माझा प्रांत नाही. आधीही नव्हता. माझ्या मित्रांसारखी मला भाषेची देणगीही लाभलेली नाही. शाळेत असताना मला सर्वात कोणत्या प्रश्नाची भीती वाटली असेल तो म्हणजे निबंध. पण म्हणतात ना, 'लग्न पाहावे करुन आणि घर पाहावे बांधून.' तसं मीही ठरवलं.. लिखाण पाहावे करुन. पण मला माहिती आहे, हा माझा खटाटोप फार दिवस चालणारा नाही. मी सुरुवात तर अगदी हौसेने केली आहे खरी पण 'नव्याचे नऊ दिवस' या म्हणीप्रमाणे हा लेखनाचा उपद्व्यापही नऊ दिवसांच्या वर टिकणार नाही याची मला खात्री आहे. पण यात नवीन काहीच नाही. जॉगींग, टेबलटेनिस, पोहणे, जिम, टेनिस ह्या यादीमध्ये आणखी एका मेंबरची भर पडेल एवढंच. जाउदे. रंगाचा बेरंग व्हायच्या आत सुचतंय तेवढं लिहीलेलं बरं.

हां. तर मी काय सांगत होतो? हां. आधी मंदार, मग शशांक, मग अभिजीत, अभय, रोहन, अमित... अशा मित्रांच्या हळूहळू वाढत जाणारया blog लिस्ट मध्ये मग मीही सामील व्हायचं ठरवलं. And here I am.. with my first blog.. (आंग्लभाषा वापरायची नाही असं कितीही ठरवलं तरी त्याची इतकी सवय झाली आहे की इंग्रजी वापरलं नाही की काहीतरी चुकल्यासारखं वाटतं.) जपानला आल्यापासून माझा मराठी भाषेविषयीचा अभिमान आणि प्रेम जरा जास्तच वाढलंय. अगदी उफाळून आलंय म्हटलं तरी चालेल. कदाचित जपानी लोकांचं त्यांच्या भाषेवरील प्रेम पाहून असेल किंवा घरापासून दूर आल्यामुळे असेल. अगदी कोल्हापूरी भाषेत सांगायचं तर आमच्या घरावरुन इंग्रजांचं विमान गेलेलं नाही. म्हणूनच हा ब्लॉग मी मराठीत लिहीतोय. पण मी खात्रीपूर्वक सांगतो, जर मी कुठे दुसरीकडे असतो, तर हा ब्लॉग मी नक्कीच इंग्रजीत लिहीला असता. पण आज मला माझ्या मराठी न वाचू शकणारया मित्रांना अजिबात सॉरी म्हणावंसं वाटत नाही.

पण वर लिहीलेल्या ओळी पुन्हा एकदा वाचल्यावर मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. मराठी भाषेवर माझं प्रेम असलं तरी प्रभुत्व नाही.