Thursday, June 04, 2009

होक्काईदो सहल ४

शिरेतोकोमध्ये एक दिवस राहूनही अजून तिथलं मुख्य आकर्षण पाहायचंच राहिलं होतं. सकाळी लवकर उठून नाश्ता केला आणि पेन्शनच्या आजोबांचा निरोप घेऊन पुढे निघालो. शिरेतोको नॅशनल पार्क म्हणजे होक्काईदोच्या आग्नेय दिशेला निमुळता होत गेलेला एक टोकदार peninsula आहे. त्याचा बराचसा भाग पायी फिरुन किंवा गाडीतून पाहता येत नसल्यामुळे उतोरो ओनसेन पासून समुद्रातून क्रूझने या नॅशनल पार्कच्या वरच्या टोकापर्यंत चक्कर मारता येते. मे ते ऑक्टोबरदरम्यान तिथे दिवसातून काही वेळा क्रूझच्या फेऱ्या असतात. क्रूझमध्ये दीड तासाचा आणि पावणेचार तासांचा असे दोन पर्याय निवडता येतात. आमचं पावणेचार तासांच्या क्रूझचं आधीच बुकींग झालेलं होतं. त्यामुळे साडेनऊ वाजता थेट क्रूझ सुटतात तिथे पोचलो. सुट्टीचा मौसम असल्यामुळे बरीच गर्दी होती. प्रवासात वाटेत खाण्यासाठी काही मिळत नसल्यामुळे जेवण बरोबर घेऊनच क्रूझमध्ये चढलो.
सकाळी दहाची वेळ होती. पण उन्हाळ्याच्या मौसमामुळे उन्हाची प्रखरता जाणवत होती. क्रूझने वेग घेतला तशी समुद्रावरुन येणाऱ्या थंड वाऱ्याची झुळूक अंगावर पडली आणि मन उल्हसित झालं. अशा क्रूझच्या सफरीमध्ये वाटेत दिसणाऱ्या प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती सांगणारी ध्वनिफीत ऐकवली जाते. आम्ही मात्र जपानीतली ती ध्वनिफित ऐकण्यापेक्षा डेकवर जाणे पसंत केले. उजवीकडे घनदाट जंगलांनी वेढलेला शिरेतोको द्वीपकल्प आणि डाव्या बाजूला अथांग सागरावरुन क्रूझशी स्पर्धा करत उडणारे सीगल पक्षी. सकाळच्या वेळी अशा क्रूझमधून सफर करण्याची मजा काही औरच. दीड तासांच्या सफरीमध्ये शिरेतोकोच्या डोंगरांवरुन थेट समुद्रात कोसळणारे अनेक धबधबे दृष्टीस पडतात. मुख्य द्विपकल्पाच्या टोकाला पोचल्यावर शिरेतोकोचे लाईट हाऊस पाहून सफरीची सांगता होते आणि
क्रूझ १८० अंशात वळून परतीच्या वाटेला लागते. या टोकापाशी तसं क्रूझमधून पाहण्यासारखं काहीच नाही. छोट्या बोटीतून गेल्या शिरेतोकोच्या टोकाला उतरुन जंगलात जाता येतं, पण त्यासाठी तिथे मुक्काम करावा लागतो. क्रूझच्या सफरीची मजा सोडली तर तसं या ठिकाणी पाहण्यासारखं विशेष काही नाही. नाही म्हणायला 'तुम्ही शिरेतोको या जगातल्या सर्वात तीन नैसर्गिकरीत्या जतन केलेल्या ठिकाणाला भेट दिली' अशा आशयाचं एक पोस्टकार्ड भेट मिळतं. फारसं काही पाहायला न मिळता सफर संपल्यामुळे आमची थोडी निराशाच झाली. पण आपल्याकडच्या कन्याकुमारीला भेट दिल्यासारखं जपानच्या सर्वात उत्तरेकडील टोकाला भेट दिल्याचं एक समाधान होतंच.
क्रूझहून परत आल्यावर गाडी भरधाव वेगाने 'ओबिहिरो'च्या दिशेने सोडली. शिरेतोकोपासून ओबिहिरोच्या वाटेवर 'आकान्' नावाचे एक प्रसिध्द सरोवर लागते. त्याच्याहून एक तासाच्या अंतरावर 'कुशिरो' हे मोठं शहर आहे. ही दोन ठिकाणं वाटेत पाहायचा विचार होता. पण रात्रीच्या मुक्कामाला ओबिहिरोला पोचण्यासाठी बराच लांबचा पल्ला गाठायचा होता. त्यामुळे ही दोन्ही ठिकाणं पाहता आली नाहीत. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ओबिहिरोला पोचलो. रात्रीचं जेवण आटोपून एक मस्त ओनसेन शोधला. दिवसभराचा ड्रायव्हिंगचा थकवा ओनसेनमध्ये शिरताच कुठल्या कुठे पळाला.
पुढच्या म्हणजे सहलीच्या पाचव्या दिवस तसा मोकळाच होता. रात्रीच्या मुक्कामाला साप्पोरोमध्ये जायचं एवढाच बेत ठरलेला असल्यामुळे बरीच मुभा होती. वाटेत जे ठिकाण चांगलं दिसेल तिकडे गाडी वळवायची असा विचार करुन साप्पोरोच्या दिशेने निघालो. ओबिहिरोच्या आसपास बरेच फार्म आहेत असे ऐकून होतो. वाटेवरच चिनी मित्राने गाईडबुकमधून जवळच्या एका फार्मची माहिती शोधून काढली आणि तिकडे निघालो. ओबिहिरोचा परिसर तसा निसर्गरम्य. दोन्ही बाजूला लांबच्या लांब पसरलेली हिरवीगार कुरणं, त्यावर चरणारे घोड्यांचे किंवा जर्सी गायींचे कळप, मध्येच देवदार आणि पाईनच्या वनराईने वेढलेले डोंगर आणि त्यांच्या मधोमध जाणारा वळणदार मोकळा रस्ता. सकाळच्या कोवळ्या उन्हात अशा ड्राईव्हची मजा काही औरच! एक छोटीशी टेकडी चढून गेल्यावर मित्राने सुचवलेल्या 'नाईताई कोगेन बोकुजो' (ナイタイ高原牧場) या फार्मवर पोचलो. छोट्याश्या टेकडीवर वसलेल्या या फार्महाऊसवरुन समोर पसरलेल्या हिरव्यागार पठाराचं मोठं विलोभनीय दृश्य दिसतं. जरा खाली उतरुन तिथल्या मउशार हिरवळीवर पहुडल्यावर क्षणार्धात भोवतालच्या जगाचा विसर पडलाच म्हणून समजा. त्या हिरवळीवर मनसोक्त लोळावं, मन भरलं की लांब पळत जावं, हवं तितकं मोठ्याने ओरडावं, तिथल्या मोठाल्या दगडांवरुन उड्या मारतानाच्या विविध पोझमधले फोटो काढावेत, आणि दमलो की फार्महाऊसवर परतून तिथल्या ताज्या उकडलेल्या बटाट्यांवर ताव मारावा आणि त्यावर एक मस्त ताजं आईस्क्रीम वरपावं. लॉंग ड्राईव्हवर जाण्याची यापेक्षा वेगळी मजा ती कोणती?
नाईताई कोगेन पासून निघून दुपारी जवळच्याच एका प्रेक्षणीय आर्च ब्रिजपाशी पोजलो. 'नुकाबिरा' नावाच्या धरणवजा सरोवरावर हा पूल बांधला आहे. १९८७ साली सेवेतून बाद झालेला हा पूल जवळजवळ पन्नास वर्षं कार्यरत होता. हा पूल जपानमधल्या प्रेक्षणीय दहा पुलांमध्ये गणला जातो अशीही माहिती मिळाली. जपानमध्ये निरनिराळ्या पुलांचे फोटो काढण्याचा छंद असलेले बरेच 'पुल'वेडे लोक आहेत हे ऐकून होतो. या पुलापाशी जमलेली गर्दी पाहून त्याचा प्रत्यय आला. धरणातला पाणीसाठा वाढल्यावर हा पूल पाण्याखाली जातो. आमच्या सुदैवाने त्या वेळी धरणात खूपच कमी पाणी होतं, त्यामुळे पुलाला जवळून पाहता आलं. या परिसरात आणखीही बरेच जुने प्रसिध्द पूल आहेत अशी माहिती मिळाली. पण वेळेअभावी एक-दोनच पाहता आले. तिथून निघून संध्याकाळी 'साप्पोरो'ला पोचलो. पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली होतीच. होटेलमध्ये सामान टाकून थेट रेस्टॉरंट गाठलं. साप्पोरोमध्ये लॅबमधला एक जुना मित्र नोकरीच्या निमित्ताने राहात होता. साप्पोरो सूप करी साठी प्रसिध्द आहे. त्याच्याबरोबर तिथल्या एका छानश्या soup curry restaurant मध्ये गेलो. इतके दिवस चवहीन सीफूड आणि मासे खाऊन कंटाळा आला होताच. तिथल्या चमचमीत सूप करीवर आडवा हात मारता मारता जुन्या गप्पा रंगल्या आणि साप्पोरोला आल्याचं सार्थक झालं.