Saturday, August 18, 2007

इझु सहल

आळशीपणात भर म्हणून एकापाठोपाठ एक प्रोजेक्ट यामुळे ब-याच सहलींच्या नोंदी लिहायच्या राहून गेल्या. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कारुइझावा सहलीनंतर दुस-याच आठवड्यात लॅबची सहल ठरली. आता वेळ मिळेल तशा या नोंदी लिहून काढायचं ठरवलं. गेल्या वर्षी बॅंडच्या सरावानिमित्त झालेल्या फुकुशिमा सहलीच्या आठवणी अजूनही ताज्या होत्या. त्याच धर्तीवर यंदाही दोन-तीन दिवस कुठेतरी सहलीला जायचं ठरलं. जपानीमध्ये अश्या छोट्या सहलीला 'गाश्युकू' म्हणतात. गाश्युकू किंवा कुठेतरी सहलीला जायचं म्हटलं की आमच्या लॅबमधली मुलांचा उत्साह अगदी ओसंडून वाहायला लागतो. सहलीचा विषय निघाला की एक दोन महिने अगोदरच कुठे जायचं, किती दिवस राहायचं, काय काय करायचं याची चर्ची सुरु होते. त्या बाबतीत आमची लॅब विद्यापीठातल्या इतर लॅबपेक्षा काकणभर सरसच ठरावी. या वेळीही महिनाभर आधीच सहलीचा कार्यक्रम निश्चित झाला. नोव्हेंबरच्या दुस-या शनिवारी पहाटे ३ गाड्यांमधून लॅबमधील मंडळी ३ दिवसांच्या इझु सहलीसाठी निघाली.

टोक्योच्या नैऋत्येस साधारण १०० कि.मी. अंतरावर प्रशांत महासागराच्या दिशेने वसलेला इझु द्विपकल्प (peninsula) तिथले नैसर्गिक गरम पाण्याचे झरे (ओनसेन), गर्द पर्वतराजीने नटलेले सुंदर समुद्रकिनारे आणि शांत, सौम्य हवामानासाठी प्रसिध्द आहे. इझुचं आणखी एक आकर्षण म्हणजे तिथून दिसणारा मा. फुजीचा नयनरम्य देखावा. शिवाय मासे आणि इतर समु्द्रातील जलचर आवडणा-या खवैयांसाठी इझु म्हणजे पर्वणीच. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये इथले समुद्रकिनारे गर्दीने अगदी भरुन जातात.

पहाटे लवकर सुरुवात करुन दहाच्या सुमारास सर्वजण इझुमधल्या इतो या ठिकाणी पोचलो. आभाळ भरुन आल्यामुळे लवकरच पाऊस पडण्याची चिन्हं दिसत होती. पावसामुळे फार कुठे फिरता येणार नसल्यामुळे तिथून जवळ असलेली इनडोअर कॅक्टस पार्क पाहायचं ठरलं. काही मुलांनी मात्र गाडीतून इझु फिरण्याचा पर्याय निवडला. मी ही दुस-या टीममध्ये सामील झालो आणि आम्ही पाच जण एका कारमधून इझुचा फेरफटका मारायला निघालो. गाडी सुरु करताच जोरदार पाऊस सुरु झाला. पण आता मागं फिरायचं नाही असा निर्धार करुन तिथून बाहेर पडलो. रस्ता किना-याच्या कडेनेच जात होता. वाटेत दुपार झाल्यामुळे दुपारचं जेवण करायचं ठरवलं. किना-याजवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये ताज्या 'सुशी'वर ताव मारुन पुढे निघालो. (परदेशस्थ भारतीय मंडळींना जगप्रसिध्द जपानी 'सुशी' ऐकून किंवा चाखून माहिती असेलच. इतरांसाठी सुशीवर एक सविस्तर लेख आमच्या आगामी जपानी खाद्यसंस्कृतीच्या लेखमालेत लवकरच देण्यात येईल. अर्थात जर ती लेखमाला सुरु झाली तर.. :) )

वाटेत समुद्रकिना-याजवळच एक छान ओनसेन दिसला. गेस्टहाऊसचा ताबा मिळायला अजून बराच वेळ अवकाश होता. त्यामुळं संध्याकाळपर्यंतचा वेळ ओनसेनमध्येच काढायचं ठरलं. पावसाची रिपरिप अजून सुरु होतीच. तश्यातच बाहेरच्या रोतेंबुरोमध्ये (open air hot spring) बराच वेळ बसून राहिलो. गारगार पावसाचे थेंब अंगावर घेत गरम पाण्यात डुंबण्याची मजा काही वेगळीच. ओनसेन आटोपून संध्याकाळी गेस्टहाऊसवर पोचलो. यावेळी लॅबमधल्या मुलांनी जेवण बनवण्याची व्यवस्था असलेलं गेस्टहाऊस बुक केलं होतं. वाटेतच जपानी 'नाबे' नावाच्या पाककृतीसाठी लागणारं सामान विकत घेऊन गेस्टहाऊसवर पोचलो. पोचल्यापोचल्या हौशी मंडळींनी जेवणाची तयारी सुरू केली. चीनीमातीपासून बनवलेल्या कढईच्या आकाराच्या पण तळाशी पसरट असलेल्या भांड्याला जपानीत 'नाबे' म्हणतात. हिवाळ्याच्या दिवसांत भाज्या, अंडी, मांस, मासे असे नानाविध पदार्थं एकाच भांड्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या सूपमध्ये एकत्र शिजवले की झाला 'नाबे' तयार. यात वापरण्या-या भांड्याला आणि तयार होणा-या पाककृतीला, दोघांनाही नाबेच म्हणतात. (नाबेची सविस्तर माहितीही आगामी लेखमालेत पाहूच.)
या वेळी तीन प्रकारची सूपं (जात्याबरोबरचं सूप नव्हे. soup चं अनेकवचन) वापरुन मुलांनी नाबे बनवला होता. नाबे बनवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. मीही मग व्हेजिटेबल बिर्याणीसोबत 'कारे' (जपानीत भारतीय curry ला कारे म्हणतात) बनवून 'हम भी कुछ कम नहीं' दाखवून दिलं. सर्वांनाच कडकडून भूक लागल्यामुळे नाबे आणि बिर्याणी केव्हा फस्त झाले कळलंही नाही. जेवल्यावर रात्री उशीरापर्यंत नेहमीप्रमाणे गप्पांचा कार्यक्रम रंगला.

दुस-या दिवशी सकाळी नाश्ता उरकून इझुभोवती चक्कर मारण्यासाठी सा-या गाड्या सज्ज झाल्या. त्या दिवशी एक गट इझु पाहण्यासाठी निघाला. दुसरा गट तिथल्या एका ठिकाणी टेनिस खेळण्यासाठी गेला. टेनिस काय कुठेही खेळता येत असल्यामुळे ट्रिप सत्कारणी लावण्याचा विचार करुन मी इझु फिरण्याचा पर्याय निवडला. सकाळी नदीमध्ये 'फिशींग' चा बेत आखला होता. ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर डोंगरातून वाहणा-या एका छोट्या नदीपाशी पोचलो. डोंगर उतरुन खाली गेल्यावर एक छोटासा धबधबा होता. त्याच्या बाजूलाच खळाळणा-या पाण्यात गळ टाकून मंडळींनी मासे पकडायला सुरुवात केली. मी थोडा वेळ प्रयत्न करुन पाहिला. पण मासा काही गळाला लागेना. काय करणार.. नशीब एकेकाचं..
मासे पकडायचा विचार सोडून देऊन तिथेच एक स्केच बनवत बसलो. स्केच पूर्ण होईपर्यंत मुलांनी बरेच मासे पकडले होते. लगेचच वरती येऊन तिथल्या एका छोट्याश्या टपरीवजा दुकानात शेकोटीवर भाजून फस्तही केले. एव्हाना दुपार होत आली होती. तिथून निघून 'इप्पेकीको' नावाच्या सरोवरापाशी पोचलो. तिथेच दुपारचं जेवण करुन सरोवराभोवती एक चक्कर मारण्यासाठी निघालो. जवळच सरोवरात बोटींगची सोय होती. काही जण बोटींग करुन आलो. नोव्हेंबरचा महिना असल्यामुळे कोयो(autumn colours) भरात होता. सरोवरातून भोवतालच्या झाडांचा लालपिवळा रंग उन्हामुळे अधिकच उठून दिसत होता. तिथे थोडी छायाचित्रे घेऊन पुढे जवळच असलेल्या माऊंट ओमुरो नावाच्या एका छोट्या डोंगराजवळ आलो. डोंगरावरुन एका दिशेला खळाळणारा समुद्र आणि दुस-या दिशेला माऊंट फुजी असा सुंदर देखावा पाहण्यासाठी रोपवेची सोय केली होती. पण गरम कपडे बरोबर नेले नसल्यामुळे वरती गेल्यावर थंड हवेमुळे हुडहुडी भरली. मग फार वेळ तिथे न थांबता लगेच खाली आलो. पुढे निघून एका मगरींच्या प्राणिसंग्रहालयात गेलो. सूर्यास्ताची वेळ जवळ आल्यामुळे प्राणिसंग्रहालय बंद झाले होते. त्यामुळे तिथून जवळच एका टेकडीवरुन सूर्यास्त पाहून गेस्टहाऊसवर परतलो.

पुन्हा कालच्याप्रमाणेच जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यावर 'जेंगा'चा डाव रंगला. जपानमध्ये गाश्युकु(सहल) म्हटल्यावर जेंगा आलाच. लाकडाच्या सोंगट्यांचा मनोरा तयार करुन खालची एकेक सोंगटी काढून मनोरा पडू न देता वरती ठेवत मनोरा वाढवत न्यायचा. ज्याने खालची सोंगटी काढताना मनोरा पाडला तो हरला. मग पेनल्टी म्हणून त्याला काहीतरी शिक्षा. अशा सहलींमध्ये जेंगाची मजा काही औरच.

डोंगराच्या माथ्यावर बांधलेल्या गेस्टहाऊसची जागा खूपच सुंदर होती. तिथून दिसणारं दृश्य कायमचं लक्षात राहावं म्हणून तिस-या दिवशी सकाळी लवकर उठून गेस्टहाऊसच्या गॅलरीतून त्याचं एक स्केच काढलं आणि टोक्योच्या वाटेला लागलो.