Saturday, December 09, 2006

इयम् आकाशवाणी |

इयम् आकाशवाणी|संप्रति वार्ताः श्रूयंताम्| प्रवाचकः बलदेवानन्द सागरः| ...
लहानपणी आजोळी गेलं की आकाशवाणीवरच्या संस्कृत बातम्या हमखास कानावर पडायच्या. त्यात हे पहिलं वाक्य ठरलेलं असायचं. संस्कृत शिकायला नुकतीच सुरुवात झालेली असल्यामुळं पहिल्या वाक्याशिवाय काही कळायचं नाही. पुढेपुढे जसजसं शिकत गेलो, तसतसं थोडं थोडं कळायला लागलं. पण बारावीनंतर संस्कृतही सुटलं आणि रेडिओचा संपर्कही. आज का कुणास ठाऊक, अचानक हे वाक्य आठवलं. संस्कृत बातम्या ऐकाव्याश्या वाटल्या. लागलीच आकाशवाणीचं संकेतस्थळ उघडलं. तिथं बातम्या सापडल्या. आजकाल आकाशवाणी एकदम तत्पर झाली आहे. रोजच्यारोज सगळ्या भाषांमधल्या बातम्या अपडेट वगैरे करणे म्हणजे जरा जास्तच आहे नाही का? सरकारी यंत्रणांमध्ये एवढी तत्परता क्वचितच पाहायला मिळते.
आज कोणीतरी पंकजा घै नावाच्या बाई बातम्या देत होत्या. जरा अडखळत बोलत असल्यासारखं वाटत होतं. पूर्वीच्या निवेदकांसारखी त्यांची संस्कृतावर पकड आहे असं वाटत नव्हतं. पूर्वीच्या संस्कृत बातम्या ऐकताना ते निवेदक लहानपणापासून संस्कृताशिवाय आणखी कुठल्याही भाषेत बोलले नसावेत असं वाटायचं. पण तरीही आज खूप वर्षांनी पुन्हा एकदा संस्कृत बातम्या ऐकताना मजा आली. संस्कृताशी संबंध संपून बरीच वर्षं झाली. बातम्या ऐकूनही फारसं काही कळलं नाही. पण ऐकल्याचं एक वेगळंच समाधान मिळालं. कधीतरी मध्येच एखादी गोष्ट करण्याची लहर आली आणि ती पटकन करायला मिळाली की एक वेगळाच आनंद मिळतो, नाही?
 आज मनात सहज विचार आला. लहानपणी रेडिओवर आपली आवड कार्यक्रम लागायचा. त्यानंतर त्याची जागा टीव्हीनं घेतली. रंगोली, चित्रहार, छायागीत.. नंतर केबल वाहिन्यांचं जाळं आल्यावर चोवीस तास तास नको असलेल्या गाण्यांचा भडीमार सुरु झाला. आजकालच्या इंटरनेटच्या इंस्टट जमान्यात तेही मागे पडत चाललंय. आजकाल YouTube किंवा Raaga सारख्या संकेतस्थळांवर कुठलंही गाणं इंस्टंट ऐकता किंवा पाहता येतं. पण रविवारी दुपारी भरपेट जेवण आटोपून हॉलमध्ये पहुडल्यावर जरा डुलकी घ्यावी तोच अचानक कानावर पडणा-या छायागीतातल्या आवडीच्या गाण्याची सर त्याला थोडीच येणार आहे?

Friday, November 17, 2006

कारुइझावा

बारावीची परीक्षा संपल्यावर जशी अवस्था होते तशी काहीशी सध्या माझी अवस्था झाली आहे. परीक्षेच्या आधी अभ्यास न करता सुट्टीत काय काय गोष्टी करायच्या याची एक मोठी यादी बनवायची आणि परीक्षेचा ताण एकदम नाहीसा झाल्यावर त्यातलं काहीच करायची इच्छा होऊ नये तसंच झालंय. महत्त्वाचा प्रोजेक्ट संपून आता दोन आठवडे झाले. प्रोजेक्ट संपल्यावर करायच्या गोष्टींची एक मोठी यादी बनवली होती. पण दोन गोष्टी सोडल्या तर बाकीच्या कुठल्याच गोष्टी करण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. पहिली म्हणजे ‘कारुइझावा’ सहल आणि दुसरी म्हणजे ही नोंद. प्रोजेक्टचा महत्त्वाचा टप्पा व्यवस्थित पार पडल्यामुळं कामाचा ताण बराचसा कमी झाला होता. त्यामुळं एका वीकेन्डला टोकियोच्या गजबजाटापासून कुठेतरी दूर drive cum photo expedition ला जाऊन यायचा विचार होता. नुकतंच Autumn चं आगमन झाल्यामुळे ‘कोयो’ म्हणजे autumn colours पाहण्यासाठी एखाद्या शांत ठिकाणी जायचं ठरवलं.

कारुइझावा ब-याच दिवसांपासून मनात घर करुन होतं. इंटरनेटवर माहिती पाहिली तर ‘कोयो’ तिथं अगदी भरात होता. मग जास्ती विचार न करता कार आणि तिथं राहण्यासाठी पेन्शनचं बुकींग केलं आणि शनिवारी सकाळी कारुइझावाच्या दिशेनं सुटलो. टोकियोच्या बाहेर ब-याच वेळा गाडी चालवली होती. पण टोकियोमधून गाडी बाहेर घेऊन जायची माझी पहिलीच वेळ होती. पहिल्यांदा मुंबईला गेल्यावर जशी अवस्था होते तशी अवस्था झाली. या वेळीही GPS महाशय मदतीला होते, पण टोकियोतल्या गर्दीपुढे त्यांनीही हात टेकले आणि माझ्यासारख्या नवशिक्याला रस्ता चुकल्यावर नवीन रस्ता शोधून देता देता त्यांची पार पुरेवाट झाली. सुरवातीचं हायवे इंटरसेक्शन चुकल्यामुळे टोकियो शहरातून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. टोकियोतून बाहेर पडता पडताच दोन-अडीच तास गेले, पण त्यानिमित्तानं ‘टोकियो दर्शन’ घडलं. हायवेला लागल्यावर मात्र फारसा त्रास झाला नाही. दुपारी एक-दीडच्या सुमारास २०० किलोमीटरचा ड्राईव्ह आटोपून कारुइझावाला पोचलो.

‘कारुइझावा’ या ठिकाणाभोवती एवढं वलय का आहे हे तिथं गेल्याशिवाय कळत नाही. आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून कळालं सांगितलं की जपानचे सध्याचे राजे ‘आकिहीतो’ आणि राणी ‘मिचिको’ यांची टेनिस खेळताना तिथं प्रथम भेट झाली आणि कारुइझावा सम्राटांची सासुरवाडी बनली. विकिपीडीयानंही याला दुजोरा दिला. कारुइझावा हे जपानमधल्या summer destinations च्या यादीत खूप वरच्या स्थानी आहे हे ऐकून होतो. विकिपीडीयानं ज्ञानात आणखी भर टाकली. कारुइझावामध्ये कायमच्या रहिवाश्यांची ६००० घरं आहेत. पण उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी outhouse किंवा dormitory ची संख्या १३००० च्या आसपास आहे यावरुन कारुइझावाच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. जुनी चर्च आणि चॅपेलमुळे कारुइझावा लग्नसमारंभासाठीही प्रसिध्द आहे. पण त्या ‘शाही टेनिस प्रसंगा’मुळे कारुइझावामध्ये टेनिस कोर्टस् ची रेलचेल आहे. आणखी एका गोष्टीची रेलचेल म्हणजे ‘ओनसेन’(Natural hot spring) जी सहलीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. आलिशान हॉ़टेल्स आणि ओनसेन रिसॉर्टस् ची इथे काहीएक कमी नाही. त्यामुळेच कारुइझावा म्हटलं की एका शाही ठिकाणाची प्रतिमा डोळ्यासमोर येते.

दुपारचं जेवण आटोपून कारुइझावाच्या बाजारातून एक चक्कर टाकून तिथल्या मिहारानदाई या ठिकाणी गेलो. मिहारानदाई एका डोंगराच्या माथ्यावर आहे. तिथून सभोवतालचा परिसर सूर्यास्ताच्या वेळी अतिशय सुंदर दिसतो. आम्ही पोचलो त्यावेळी सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. पण ढगाळ वातावरणामुळं सूर्यास्त पाहायला मिळणार नाही असं वाटत असतानाच जणू आमच्यासाठीच अचानक पश्चिमेच्या दिशेचं आकाश मोकळं होऊ लागलं आणि सूर्यदेवांनी दर्शन दिलं. पण पश्चिमेच्या आकाशातली लाल रंगपंचमी आणि सभोवतालच्या गर्द वनराईनं नेसलेला लाल-पिवळ्या रंगाचा शालू, यातलं कोणतं दृश्य अधिक सुंदर आहे हे ठरवायचा वेळ न देताच सूर्यदेव पुन्हा ढगांत अदृश्य झाले. तिथं आलेल्या आणखी काही जपानी पर्यटक आजी-आजोबांबरोबर बोलताना कळलं की त्या बागेत रविंद्रनाथ टागोरांचा पुतळा आहे. टागोरांचा पुतळा, इथं एवढ्या लांब, अशा टेकडीवर..ऐकून आश्चर्य वाटलं. जाऊन पाहिलं तर खरोखरच तिथं रविंद्रनाथ टागोरांचा पुतळा होता. क्षणभर मनातून अभिमानाची एक लहर उमटून गेली. रविंद्रनाथ टागोर जपानच्या महिला विद्यापीठात प्रार्थनेवर व्याख्यान देण्यासाठी जपानमध्ये आले होते. १९८० साली त्यांची १२० जन्मतिथी साजरी करण्यासाठी हा पुतळा तिथे उभारण्यात आला होता. टागोरांना वंदन करुन मिहारानदाईवरुन पेन्शनच्या वाटेला लागलो.

जपानमध्ये सहलीला जाऊन ओनसेनला गेलो नाही तर तो फाऊल ठरतो. पेन्शनमध्ये पोचल्यापोचल्या सामान टाकून रात्रीचं जेवण (खरं तर ते संध्याकाळचंच जेवण असतं) उरकलं आणि तिथल्या काकांकडून सर्वात आधी जवळपासच्या ओनसेनची माहिती मिळवली. तिथून जवळच असलेल्या एका चांगल्या ओनसेनचा पत्ता GPS मध्ये टाकला आणि ओनसेनच्या दिशेनं सुटलो. रात्रीच्या थंडीत, कढत पाण्यात रोतेंबुरो(open air onsen)मध्ये डुंबताना प्रशांत दामलेचं एक गाणं आठवल्याशिवाय राहात नाही. ‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं’. जपानीत यासाठी एक खास शब्द आहे, ‘शिआवासे’.

दुस-या दिवशी सकाळी मिशन कोयोसाठी कारुइझावाच्या उत्तरेला निघालो. शिरानेसान् नावाच्या डोंगराच्या माथ्यापर्यंतचा रस्ता छान गर्द झाडीतून जातो. दोन्ही बाजूला गर्द पिवळ्या, तांबडया झाडांमधून ड्राइव्ह करताना मजा येत होती.

शिरानेसानच्या माथ्यावर पोचण्यापूर्वी वाटेत एक छान जागा मिळाली. तिथं थोडं फोटोसेशन करुन पुढे निघालो. शिरानेसान पार केल्यावर पुढे पाच छोट्या तळ्यांचा समूह आहे. तिथं कोयो पाहायला मिळतो का पाहण्यासाठी गेलो. पण तिथला सीझन संपला होता. कारुइझावामध्ये परतेपर्यंत संध्याकाळ झाली. दुस-या दिवशीचा मुक्काम वेगळ्या पेन्शनमध्ये हलवून रात्रीचा ओनसेनचा दिनक्रम आटोपला.

तिस-या दिवशी कारुइझावातच फिरायचं ठरवलं. सुट्टयांचा हंगाम नसल्यामुळे कुठेच फारशी गर्दी नव्हती. १५-२० मिनीटं डोंगर चढून गेल्यावर शिराइतोनोताकी नावाचा असा छोटासा धबधबा दिसतो. डोंगरातली पायवाट ‘ओइरासे’ची आठवण करुन देते.

शिराइतोनोताकी हून परतताना वाटेत एका मंदिराच्या आवारात असा एक छान बहरलेला मेपल दिसला.

जपानी मंदिरांच्या आवारात हमखास असे छोटे मेपल दिसतात. त्यांना ‘मोमिजी’ म्हणतात.


कारुइझावामध्ये autumn अगदी बहरात होता आणि हवाही अतिशय आल्हाददायक होती. तिथून पुढे तिथले प्रसिध्द ‘कुमोबानो इके’ (इके = तळे) पाहण्यास गेलो. काही परदेशी लोक त्याला swan lake ही म्हणतात. तीन दिवसांच्या ट्रिपचा पैसा वसूल ठिकाण.
मस्तपैकी एक बैठक मारुन याचं स्केच काढण्याची फार इच्छा होती. पण दुर्दैवानं तेवढा वेळही नव्हता आणि स्केचबुकही. संध्याकाळी टोकियोला कार परत करायची असल्यामुळं मन मारुनच तिथून निघालो. पण काही चांगली छायाचित्रं काढल्याचं समाधान मिळाल्यामुळं हा तीन दिवसांचा autumn drive नेहमीच मनात घर करुन राहील.


आणखी छायाचित्रे इथे

Monday, September 18, 2006

..घर पाहावे शोधून

‘मनासारखं घर मिळेल.’
रविवारी सकाळी नेहमीप्रमाणं इ-सकाळ उघडून साप्ताहिक राशीभविष्य वाचलं ते हे. मनात म्हटलं, ‘ज्योतिषीबुवा, भविष्य तर बरोबर लिहीलंत पण एक महिना उशीरानं.’ आपले ज्योतिषी आणि हवामानखातं, दोघांमध्येही फारसा फरक नाही कारण दोघांचीही भाकितं कधीच वेळेवर खरी होत नाहीत. नवीन घरात राहायला येऊन आता तीन आठवडे होत आले. मनासारखं घर मिळेल असं ज्योतिषीबुवांनी लिहीलं तरी टोकियो किंवा योकोहामामध्ये मनासारखं घर मिळण्यासाठी कोणत्या दिव्व्यातून जावं लागतं हे त्यांना कसं कळणार म्हणा.

जपानमध्ये दोन वर्षं संपली तसा Hiyoshi International House या विद्यापीठाच्या वसतीगृहातला मुक्कामही हलवायची वेळ आली. नवीन मुलांना राहण्याची संधी मिळावी म्हणून तिथं दोन वर्षांपेक्षा जास्त दिवस राहाता येत नाही. जागा शोधताना काय काय उपद्व्याप करावे लागतात त्याचं ट्रेलर मागच्या वर्षी सिनीअर्सबरोबर जागा शोधताना पाहायला मिळालं होतं. इथं नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात एप्रिलमध्ये होते. त्यावेळी जागा मिळण्याची शक्यता अधिक असल्यामुळं त्यावेळीच नवीन जागा शोध असा सल्ला सिनीअर्सकडून वारंवार मिळाला होता. पण HIH ची well furnished room, वीज, पाणी, इंटरनेट, फोनच्या बीलाची फिकीर नाही, दर महिन्याला लॉंड्रीहून येणारे चार चकचकीत बेडकव्हर्सचे सेट, तिथला इंटरनॅशनल मित्रपरिवार, त्यांच्याबरोबरच्या वीकेन्ड मूव्हीज्, पार्ट्या अश्या five star dormitory ला सहा महिने आधीच मुकण्यासाठी कोण तयार होणार? माझा नॉर्वेचा एक मित्र नेहमी म्हणत असे. “We are ruined by HIH.” खरंच होतं ते. We were ruined. त्यामुळं ऑगस्ट २५ म्हणजे अखेरच्या दिवसापर्यंत HIH चा किल्ला लढवायचा निर्णय आम्हा मित्रपरिवारानं घेतला.

जपानमध्ये घर शोधणं सोपी गोष्ट नाही. घर शोधायला सुरुवात केली की त्याचा प्रत्यय लगेच यायला लागतो. इथं तुम्हाला थेट घरमालकाकडून घर भाड्याने मिळवता येत नाही. भाड्याच्या घरासाठी किंवा घर विकत घेण्यासाठी real estate agents कडे जावं लागतं. त्यांना ‘फुदोसान्’ म्हणतात. फुदोसानला तुमच्या गरजा आणि बजेट सांगितल्यावर तो तुम्हाला त्याच्या गाडीतून तुमच्या आवाक्यातली घरं दाखवून आणतो. त्यातलं एखादं घर तुम्हाला पसंत पडलं तर मग घरमालकांच्या संमतीने तुम्हाला तिथं भाड्यानं राहाता येतं. सुरुवातीला घरात राहायला जाण्यापूर्वी घरमालकाला रेइकिन्(Thank you money) दोन महिन्यांचं भाडं, शिकीकिन्(deposit, जे घर सोडताना परत मिळण्याची शक्यता कमीच असते) दोन महिन्यांचं भाडं आणि राहायला जातानाच्या महिन्याचं भाडं असं पाच महिन्याचं भाडं द्यावं लागतं. फुदोसानला त्यानं घर हुडकून दिल्याबद्दल एक महिन्याचं भाडं द्यावं लागतं ते वेगळंच. तुम्ही नोकरी करत असाल तर ठीक. पण विद्यार्थी असाल तर वर्षभर बचत करुन किंवा part-time job करुन मिळवलेल्या सहा महिन्यांच्या भाड्याची रक्कम एका दिवसात अकाउंटमधून नाहीशी झाल्याचा धक्का पचवणं वाटतं तितकं सोपं नसतं. बरं इथल्या घरांचं भाडंही थोडंथोडकं नसतं. एवढं अव्वाच्या सव्वा भाडं देऊन घर पाहावं तर ती असते एक ९x९ ची खोली आणि टीचभर किचन. जागांच्या किंमतीच्या बाबतीत जपान जगातला सर्वात महागडा देश असावा. रेइकिन किंवा शिकीकिन हे प्रत्येक घरमालकानुसार बदलत असलं तरी साधारणपणे सुरुवातीला ५-६ महिन्यांच्या भाड्याची रक्कम द्यावीच लागते. तुम्ही जपानी असाल तर हे सहा महिन्यांचं भाडं भरुन तुम्हाला लगेच राहायला सुरुवात करता येते. पण परदेशी असाल तर प्रश्न एवढ्यावर सुटत नाही. ९०-९५% घरमालक आपल्या घरात परदेशी लोकांना भाडेकरू म्हणून ठेवून घेण्यास तयार नसतात. त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे भाषेचा अडसर. शिवाय परदेशी लोकांचा बेशिस्तपणा, नियमानुसार न वागण्याची वृत्ती आणि एकंदरीतच इथं परदेशी लोकांबद्दल असलेलं discrimination अशी आणखीही कारणं असू शकतील. पण तुम्ही परदेशी आहात हा घर शोधण्याच्या मार्गातला सर्वात मोठा अडसर आहे.

या सर्व गोष्टींची कल्पना असल्यामुळं थोडीफार बचत सुरु होतीच. जुलै महिना सुरु झाला तशी नवीन जागा पाहण्यासाठी सर्वांची कसरत सुरु झाली. फुदोसानकडे जाण्यापूर्वी युनिव्हर्सिटीतून काही मदत मिळते का पाहावी म्हणून ऑफिसमध्ये गेलो. त्यांच्याकडे परदेशी मुलांना राहाता येईल अशा काही जागांची माहिती होती. त्यातली एक जवळची जागा पाहावी म्हणून एका इंडोनेशिअन मित्राबरोबर जागा पाहण्यासाठी गेलो. जपानीत घरमालकाला ‘ओयासान्’ म्हणतात. बहुतांश जागी ‘ओयासान्’ म्हणजे मालकिणबाई असतात. फोनवरुन ओयासान् ला आम्ही येतोय असं सांगितलं. मालकिणबाई साठीच्या आसपास असाव्यात. त्यांनी आम्हाला एक खोली उघडून दाखवली आणि एकेक एकेक अटी सांगायला सुरुवात केली. त्यांचं बोलणं आणि एकेक अटी ऐकून मला ‘अशी ही बनवाबनवी’ मधला सुधीर जोशी दिसायला लागला. मी आणि मित्र खोली बघत ऐकत होतो. काकूंच्या अटी संपायचं नावच घेत नव्हत्या.
“इथं राहताना मोठ्या आवाजात बोलायचं नाही.
गाणी लावायची नाहीत.
रात्री १० नंतर मित्र रुमवर आलेले चालणार नाहीत.
खोलीत अभ्यास आणि अभ्यासच करायचा. आमचे हे अधुमधून येऊन अभ्यासाची चौकशी करतीलच.
खोलीत जेवण बनवणार असला तर उग्र वास येईल असं काही बनवायचं नाही.
मोठा आवाज मला आणि आमच्या ह्यांना अजिबात आवडत नाही. त्यामुळं रात्री १० नंतर टी.व्ही. लावला तर हेडफोन लावून ऐकायचा.
खोलीत पाळीव प्राणी आणलेले चालणार नाहीत...”
शेवटी एकदाच्या त्यांच्या अटी संपल्या. मी कुठून आलो आहे, काय शिकतो वगैरे ऐकल्यावर त्यांनी बाल्कनी उघडून दाखवली.
“मुलगा तसा चांगला आहे हो. दंगा करणा-यालातला वाटत नाही.” काकू माझ्या मित्राला म्हणाल्या. ‘अरे वा! सुधीर जोशींची एकदम काळभोर मावशी कशी काय झाली?’ मला अचानक सुधीर जोशीच्या जागी ‘अशी ही बनवाबनवी’ मधली मोतीबिंदुचं ऑपरेशन झालेली ‘काळभोर मावशी’ दिसायला लागली. माझ्यातला ‘धनंजय माने’ अचानक जागा झाला.
“तुम्हाला एखादी मुलगी आहे का हो काकू?” वाक्य अगदी ओठांवर आलं होतं पण मी जिभेला आवर घातला.
“दोन दिवसांत मला काय ते सांग बरं का.” काकू म्हणाल्या.
“ठीक आहे” असं म्हणून मनातल्या मनात मी आमचा टीपीकल आर्मी स्टाईल ‘सायोनारा’ सलाम ठोकला आणि तिथून सटकलो. एवढ्या अटी ऐकल्यावर काकूंना मुलगी असली तरी तिथं राहण्याचा प्रश्नच नव्हता. तशीही ती रुम माझ्या दृष्टीनं लहानच होती.
आणखी एक-दोन फुदोसानकडे चौकशी केली. पण परदेशी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडे फारश्या जागा नव्हत्या. इंटरनेटवरुन काही ठिकाणी जागा शोधून तिथे फोन केले. पण तिथेही तोच प्रकार. पुन्हा एकदा युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल सेंटरमधून एका फुदोसानचा पत्ता मिळवला. त्याच्याकडे ब-याच जागा होत्या. पण प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी प्रॉब्लेम होताच. पाच-सहा घरं बघितल्यावर शेवटी लॅबमधल्या चीनी मुलाच्या शेजारची अपार्टमेंट निवडली. घर थोडं जुनं होतं पण प्रशस्त होतं. दोन मजल्यांवर वन रुम किचनच्या प्रत्येकी दोन अपार्टमेंटस् होत्या. माझी अपार्टमेंट तळमजल्यावर होती. आत जपानी पध्दतीची तातामी असलेली एक खोली होती. तातामी म्हणजे जपानी मॅट्रेस. आपल्याकडच्या चटईसारखी. गवतापासून बनवलेली. साधारणपणे सहा तातामीची एक खोली असते. अलिकडच्या घरांमध्ये wooden flooring असतं. पण अजूनही ब-याच जपानी लोकांना घरात तातामीच आवडते. त्यावर टेबल खुर्च्या ठेवता येत नाहीत. भारतीय बैठक किंवा जपानी बैठक. तातामीच्या खोलीला जोडून छोटंसं किचन होतं. तिथं मात्र flooring होतं. बाहेर कंपाऊंडच्या आत छोटीशी झाडं लावली होती. बाहेरच्या दरवाज्यापाशी एक मॅपलचं छोटं झाड होतं. आजूबाजूचा परिसरही शांत होता. एकंदरीत जागा राहण्यासाठी चांगली होती. शिवाय शेजारी लॅबमधल्या चीनी मुलाची सोबत असल्यामुळं फारसा विचार न करता हो म्हणून टाकलं. त्यानंतर मालकिणबाईंबरोबर मला कितपत जपानी बोलता येतं हे पाहण्यासाठी एक रीतसर इंटरव्ह्यू झाला. मालकीणबाई आधीच्या काकूंच्याच वयाच्या होत्या पण शांत आणि प्रेमळ स्वभावाच्या वाटल्या. त्यांची खात्री पटल्यावर कॉन्ट्रॅक्ट बनवलं आणि फुदोसाननं पुन्हा एकदा घरात राहण्यासाठीच्या आणि कचरा टाकण्याच्या अटी समजावून सांगितल्या. कचरा कसा स्वतंत्र करावा हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. आठवड्याच्या कोणत्या वारी कोणत्या प्रकारचा कचरा टाकायचा, आणि तो कसा टाकायचा यासाठी वॉर्डाकडून मिळालेलं एक खास पुस्तक त्यानं मला दिलं. मनात म्हटलं आता असं आणखी काय काय मिळणार आहे कुणास ठावूक? एखाद्या लहान मुलाला समजावतात तश्या कॉन्ट्रॅक्टमधल्या अटी त्यानं पुन्हा एकदा समजावून सांगितल्या. आलीया भोगासी म्हणत जड अंतःकरणानं सहा महिन्यांच्या भाड्याचं पाकिट त्याच्या हातावर ठेवलं आणि घराच्या किल्ल्या घेतल्या.

शेवटच्या दिवसापर्यंत HIH सोडायला मन तयार होत नव्हतं. शेवटी ठरल्याप्रमाणं शेवटच्या दिवशी सामान हलवलं आणि नवीन रुममध्ये राहायला गेलो. हळूहळू सामानाची खरेदी आणि पत्ताबदल अशा छोट्याछोट्या गोष्टी आवरत एकदाचं बस्तान बसलं. HIH मधलं विलासी जीवन संपल्याची खंत मनात होतीच. पण दारावरच्या मॅपलनं हळूहळू रंग बदलायला सुरुवात केली तशी मनातली हळहळही दूर होत गेली. नवीन घरात गेल्याचा उत्साह टिकून आहे तोपर्यंत बाहेर थोडं बागकाम करावं म्हणतो. येताय का मदतीला?

Monday, September 04, 2006

राफ्टींग

ऑक्टोबरच्या सुरुवातीस प्रोजेक्टची डेडलाईन असल्यामुळं सध्या घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं काम सुरु आहे. स्वेच्छेनं की अनिच्छेनं ठाऊक नाही पण मीही या लोकांसारखा workaholic होत चाललो आहे असं वाटतं. सकाळी लॅबमध्ये गेलं की रात्री उशीरापर्यंत तिथेच. जेवणाची सवय केव्हाच झालेली असल्यामुळं दोन्ही वेळचं जेवण तिथेच. शनिवार रविवारीही तिथेच. आंघोळही रात्री घरी परतल्यावर झोपण्यापूर्वी. हळूहळू मी पुरता जपानी बनण्याच्या मार्गावर आहे असं मला वाटायला लागलं आहे. इथं कोणीही कामाची सक्ती करत नाही. पण सतत आपल्यापुढे कामाचा फार मोठा गराडा आहे असं वाटत राहतं. भारतात इंजिनीअरींगमध्ये चार वर्षं काढली असल्यामुळं पार्श्वभागावर लाथ बसल्याशिवाय काम करायची आपल्याला (म्हणजे मला. सगळेच माझ्यासारखे नसतात) सवय नसते. कदाचित त्यामुळेच असं वाटत असावं. किंबहुना आजूबाजूची परिस्थिती तसं वाटायला भाग पाडते. जो तो पाहावं तर कामात गुंतलेला. काम नसलं तरी सकाळपासून रात्री उशीरापर्यंत लॅबमध्ये थांबलेला. वीकेन्डलाही येणारा. त्यांच्याबरोबर काम करता करता मग आपणही त्यांच्यातलेच एक होऊन जातो. बॅडमिंटन, गिटार, फोटोग्राफी, चित्रकला, पोहणे, अनुदिनी लिहीणे असं खूप काही करायचंय असं एक मन म्हणत असतं. पण दुसरं मन सतत ‘तुझ्यापुढे केवढं काम आहे, हे सगळं करायला तुला वेळ तरी आहे का?’ असं म्हणत राहातं. शेवटी दुस-या मनाचाच विजय होतो आणि यातल्या एकाही गोष्टीसाठी मग आपल्याकडे वेळ नसतो. आयुष्य फक्त एक रुटीन बनून राहातं. आज रविवार. सुट्टीचा दिवस. पण आजही नेहमीच्या रुटीनप्रमाणे लॅबमध्ये गेलो. संध्याकाळी जेवल्यावर सहज विचार करता करता लक्षात आलं की सप्टेंबर महिना सुरु झाला. जपानमध्ये येऊन आपल्याला दोन वर्षं झाली. दोन वर्षं कशी गेली कळलंदेखील नाही. बघता बघता M.S. चा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाला. M.S. संपलं यावर विश्वास ठेवणं थोडंसं अवघड जात होतं. कारण इथं येण्यापूर्वीच M.S+Ph.D. अशा पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रवेश मिळाल्यामुळं M.S. पूर्ण करणं ही एक औपचारिकताच होती. त्यामुळं त्याचं खास celebration असं काही झालं नाही. शिवाय M.S. मध्ये सुरु असलेलं संशोधन Ph.D. मध्येही तसंच पुढे सुरु राहणार होतं. पण तरीही प्रोजेक्टच्या गडबडीत आपण इथं दोन वर्षं घालवली आणि एक पदवी मिळवली हा विचारच कधी मनात आला नाही. त्यामुळं आज ठरवलं की सगळ्या कामांना सुट्टी. आज फक्त जुन्या आठवणींना उजाळा आणि अनुदिनी लेखन!

एका महिन्यापूर्वी आणखी एका Adventure trip ला जाऊन आलो. तोमितासाननं नेहमीप्रमाणे त्याची गाडी काढली. आशान् बरोबर होताच. प्रयोगशाळेतल्या आणखी दोघांना बरोबर घेऊन तोक्योच्या उत्तरेला असणा-या गुम्मा राज्यात एक दिवसाच्या white water rafting ट्रिपला जाऊन आलो. राफ्टींगचा माझा पहिलाच अनुभव होता. पण नदीच्या फेसाळत्या प्रवाहात राफ्टींगचा थरार अनुभवताना मजा आली. त्याची काही छायाचित्रं. (कॅमेरा नेता येत नसल्यामुळं मी काढलेली नाहीत.)



वाटेतच आमच्या इंस्ट्रक्टरनं एका पाणी खोल असलेल्या ठिकाणी थांबवलं आणि पाच मीटर उंचीच्या खडकावरुन सगळ्यांना नदीत उड्या मारायला लावल्या. खूप दिवसांनी नदीत डुंबण्याची मजा अनुभवता आली. भर उन्हाळ्यात नदीच्या थंडगार पाण्यात पोहण्याचा अनुभव काही औरच होता. दीड तासांचं राफ्टींग केव्हा संपलं ते कळालंच नाही. परतीच्या वाटेवर संध्याकाळी एक छान ओनसेन मिळाला. तासभर ओनसेनचा आनंद लुटून जेवण आटोपलं आणि गाडी तोक्योच्या दिशेनं वळवली. ऑगस्ट महिन्यात सगळ्या जपानमध्ये 'ओबोन' निमित्त एक आठवडा सुट्टी असते. माझ्या युनिव्हर्सिटीलाही एक पूर्ण आठवडा सुट्टी होती. पण पूर्ण ऑगस्ट महिन्यात मला मिळालेली ही एकमेव सुट्टी. पण सगळ्या महिन्याच्या सुट्ट्या एकत्र करुनही येणार नाही तेवढी मजा या एका दिवसात आली. आता पुन्हा अशी सुट्टी केव्हा मिळते कुणास ठावूक?

Tuesday, August 15, 2006

स्वातंत्र्यदिन

आज १५ ऑगस्ट. भारतीय स्वातंत्र्यदिन!
१५ ऑगस्ट म्हटलं की जिकडेतिकडे आपण या दिवशी काय करतो, काय करत नाही किंवा आत्तापर्यंत आपण काय मिळवलं, काय गमावलं, काय करायला हवं होतं किंवा काय करायला नको होतं ह्या चर्चांना सगळीकडे ऊत आलेला असतो. त्यात मी वेगळी भर घालणार नाही. पण स्वातंत्र्यदिनाविषयी माझ्यासारख्या सामान्या भारतीय नागरिकाच्या मनात असलेले विचार समर्पक मांडणारा म.टा. मधला हा लेख वाचायला जरुर सांगेन. अर्थात तुम्ही आधीच वाचला नसेल तर.
सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
वंदे मातरम्!!

Monday, July 31, 2006

मिशन माउंट फुजी - १

खूप दिवसांत काही लिहीलं नाही. लिहायला तसं कारणही नव्हतं आणि वेळही. पण या शनिवार-रविवारी एका 'मोहिमे'वर जाण्याचा योग आला आणि मोहिमेच्या रोमांचकारक आठवणी लिहून काढाव्या म्हटलं.

उन्हाळा आला की सगळीकडचं वातावरण कसं बदलून जातं नाही? तसा उन्हाळा मला फारसा आवडत नाही. आणि इथला दमट उन्हाळा तर आणखीनच वाईट. पण काही गोष्टी उन्हाळ्यातच करायला मिळतात. जसं इथल्या बार्बेक्यू पार्ट्या किंवा हानाबी(आतषबाजी). पण उन्हाळ्यातली मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे सहली. उन्हाळा आला की सगळ्यांना कसे सहलीचे वेध लागतात. गेल्या वर्षी माझं M.S.चं पहिलंच वर्ष असल्यामुळं सुट्टीत वेळच वेळ होता. त्यामुळं तोहोकु प्रांतात ब-याच ठिकाणी फिरता आलं. या वर्षी मात्र थेसीस आणि प्रोजेक्टची कामं यातून कुठंही जायला वेळ मिळणार नाही हे माहीती असल्यामुळं मन मारुन निमूटपणे काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. गेल्या आठवड्यात शिंगो-सान् (साकुराचे फोटो काढण्यासाठी ज्याच्याबरोबर गेलो होतो तो सिनीअर)नं येत्या शनिवारी माउंट फुजीवर चढाई करायची का विचारलं. शिंगो-सान् जॉब करत असल्यामुळं त्याला नंतर वेळ नव्हता. मलाही ऑगस्टपासून सप्टेंबर अखेरपर्यंत कुठेही जाण्यासाठी वेळ मिळणार नव्हता. काय थोडा वेळ होता तो आत्ताच होता. मी लगेचच हो म्हणून टाकलं. तसंही कोणी फिरायला, सहलीला किंवा खेळायला जाऊया का असं विचारलं की मी नेहमीच फारसा विचार न करता हो म्हणून टाकतो. शिंगो-सान् त्याची गाडी घेणार होता. मग गाडीत बसतील अशा इतर मंडळींची जमवाजमव सुरु झाली. तिसरा सदस्य तोमिता-सान् जो साकुरा सहलीच्या वेळीही बरोबर होता तो नेहमीप्रमाणे ठरलेलाच होता. गाडीत आणखी तिघं बसतील एवढी जागा होती. रविवारी संध्याकाळी हानाबी म्हणजे आतषबाजीचा मोठा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे योकोहामा बंदरावर होणार होता. प्रयोगशाळेतल्या दोन मुलींनी तिथं युकाता(पारंपारिक जपानी पेहराव) घालून जायचं ठरवलं होतं. त्यांची ब-याच दिवसांपासून त्यासाठी तयारी चालली होती. त्यामुळं त्या येण्याची शक्यता नव्हतीच. इतर मुलांचेही कार्यक्रम आधीपासूनच ठरलेले होते. शेवटी एक चीनी मुलगा आशान् आणि आणखी एक भारतीय मुलगा अमित त्याच्या बायकोसोबत यायला तयार झाले. कार्यक्रम ठरल्यावर सहलीची माहिती जमवायला सुरुवात केली.

माउंट फुजी अर्थात् 'फुजीसान्'. फुजीसानच्या चित्रलिपीतील अक्षरांमध्ये पर्वताचं चित्र असलेलं एक अक्षर आहे. त्यामुळं पाश्चात्य देशांमध्ये किंवा आपल्याकडे त्याचा ब-याच वेळा 'फुजीयामा' असा चुकीचा उच्चार केला जातो. पण योग्य उच्चार हा 'फुजीसान्' असाच आहे. त्यातही 'फु' म्हटलं की त्याचा उच्चार 'फुटका' मध्ये असतो तसाच करायची आपल्याला सवय असते. पण जपानी 'फु' चा उच्चार 'फुटका' मधल्या 'फु' सारखा नसतो. जपानी 'फु' हा 'हु' आणि 'फु' यांच्या मध्ये कुठेतरी येतो. त्यामुळं 'फुजीसान्' चा उच्चार 'हुजीसान्' ला जास्त जवळचा वाटतो. मागे जेव्हा त्सुनामी आली होती त्यावेळी बहुतेक सर्व मराठी वर्तमानपत्रांमध्ये 'सुनामी' असं लिहीलं होतं. फिरंगी लोकांना 'tsu' म्हणता येत नसल्यामुळं त्यांनी त्याला सुनामी बनवून टाकलं. जपानी 'tsu' चा उच्चार 'चुकीचा' मधल्या 'चु' ला जास्त जवळचा आहे. आपल्याला तो सहज जमण्यासारखा आहे. पण प्रत्येक गोष्टीत पाश्चात्यांची नक्कल करण्याची आपल्याला जणू सवयच लागून गेली आहे. विषय जरा जास्तच लांबला नाही? उच्चारांच्या, विशेषतः जपानी उच्चारांच्या बाबतीत मी जरा जास्तच काटेकोर असल्यामुळं कुणाच्याही तोंडून टीपीकल 'फु'जीयामा ऐकलं की मला त्याचं असं स्पष्टीकरण दिल्याशिवाय राहवत नाही. आता तुम्ही म्हणाल 'आपल्याकडं जिथं लोकं मुंबईलाच बॉम्बे म्हणतात तिथं जपानीचं काय घेवून बसला राव'. असो. या विषयावर आधी एकदा लिहून झालेलं आहे.

बहुतांश परदेशी लोकांसारखंच मलाही फुजीसान् बद्दल एक आदरयुक्त कुतूहल आहे. तो एक जागृत ज्वालामुखी आहे हे त्याचं एक कारण असू शकेल. पण लहानपणापासून जपान म्हणजे फुजीसान् अशी जपानची मनात निर्माण झालेली एक प्रतिमा हे त्यामागचं महत्त्वाचं कारण असावं. सर्वात पहिल्यांदा जपानमध्ये येताना विमानातून फुजीसान दिसला होता. त्यावेळी त्याची छायाचित्रं काढण्यासाठी खिडकीजवळ परदेशीच काय, जपानी लोकांचीही झुंबड उडाली होती. तेव्हापासून फुजीसानबद्दलचं माझं कुतूहल दिवसागणिक वाढतच चाललं होतं. तोक्यो किंवा योकोहामामधून हिवाळ्यातल्या एखाद्या स्वच्छ हवामाना्च्या दिवशी फुजीसानला पाहता येतं. कॉलेजमधल्या गॅलरीतून मी ब-याच वेळा पाहीलाही होता. 'फुजीसान् हा दुरुनच चांगला दिसतो' असं बहुतांश जपानी लोकांचं मत असतं. ते खरंही आहे. पण माझ्यातल्या परदेशी पर्यटकाचं त्यावर प्रत्यक्ष चढाई केल्याशिवाय समाधान होणार नव्हतं. गेल्या वर्षी फुजीसानवर चढाईचा बेत आखून आम्ही सकाळी निघालो पण आयत्या वेळी खराब हवामानामुळं पायथ्यापासूनच परतावं लागलं होतं. त्यामुळं या वर्षी काहीही करुन वरती जायचंच असा निर्धार करुन संकेतस्थळांवरुन चढाईची माहिती आणि लोकांचे अनुभव वाचायला लागलो.

शिझुओका आणि यामानाशी या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या फुजीसानला पाच सरोवरांनी वेढलेलं आहे. १७०७ साली त्याचा शेवटचा उद्रेक झाला होता. काही जणांच्या मते तो निद्रीस्त ज्वालामुखी आहे तर काही जण त्याला जागृत ज्वालामुखींमध्ये गणतात. साधारणपणे वर्षातून जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या काळातच जपानमधील या सर्वात उंच पर्वतावर चढाई करता येते. इतर दिवसांमध्ये तो बर्फानं वेढला असल्यामुळं प्रशिक्षित गिर्यारोहकांशिवाय तिथं जाण्याचं धाडस सहसा कुणी करत नाही. पण या दोन महिन्यांत साधारण ३-५ लाख पर्यटक फजीसानवर चढाई करतात. ३७७६ मी. उंचीच्या या पर्वताचे चढण्याच्या सोयीसाठी दहा टप्पे पाडले आहेत. त्यावर चार वेगवेगळ्या बाजूंनी चढाई करता येते. चारी मार्गांवर साधारण २००० मी. उंचीच्या पाचव्या टप्प्यापर्यंत वाहनाने जाता येतं. पाचव्या टप्प्यापासून चढाईला सुरुवात करता येते. अगदीच हौशी गिर्यारोहकांना पायथ्यापासूनही चढाई करता येते. सर्वच मार्गांच्या प्रत्येक टप्प्यावर विश्रांतीसाठी जागा आणि एक छोटंसं उपहारगृह आहे. आठव्या टप्प्यावर राहण्यासाठी एक लॉजची व्यवस्था आहे. फुजीसानवर चढून ‘गोराइको’ म्हणजे सूर्योदय पाहणे हा standard course असतो. पाचव्या टप्प्यापासून संध्याकाळी चढायला सुरुवात करुन विश्रांती न घेता थेट सूर्योदयाच्या सुमारास माथ्यावर पोचता येतं. पण बहुतांश लोक दुपारी चढायला सुरुवात करुन संध्याकाळी आठव्या टप्प्यावरील लॉजवर पोचतात. संध्याकाळचं जेवण आटोपून पाच-सहा तास लॉजमध्ये विश्रांती घेवून मध्यरात्री पुन्हा चढायला सुरुवात करुन सूर्योदयाच्या आधी थोडावेळ माथ्यावर पोचतात. माझी आणि शिंगोसानची विश्रांती न घेता चढाईची तयारी होती. पण इतरांच्या सोयीसाठी आम्ही विश्रांतीचा दुसरा मार्ग निवडला. शिंगोसाननं आठव्या टप्प्यावरच्या लॉजचं बुकींग केलं. ‘कावागुचीको’ मार्ग हा चार मार्गांपैकी सर्वात सोपा आणि गर्दीचा असल्यामुळं त्या मार्गावरच्या लॉजचं बुकींग आधीच झालं होतं. त्यामुळं मग शिझुओका राज्यातील ‘सुबाशिरी’ मार्गे जायचं ठरलं.

महाराष्ट्रातले काही निवडक किल्ले सोडले तर माझा गिर्यारोहणाचा अनुभव कमीच आहे. नाही म्हणायला दोन वर्षांपूर्वी वैष्णोदेवीला गेलो होतो. मला नक्की कल्पना नाही पण तिथली चढाईची उंची फुजीसानच्या फार फार तर निम्मी असेल. त्यामुळं एवढ्या उंचीवर चढून जाण्याचा प्रसंग कधी आला नव्हता. पण अनुभवात कमतरता असली तरी उत्साहात मात्र कमतरता नव्हती. शनिवारला अजून पाच दिवस अवकाश होता. हवामान खात्याचा अंदाज बघितला तर शनिवार रविवारी पाऊस दिसत होता. पुन्हा एकदा फुजीसान् वर चढाई करण्याच्या आशा अंधुक झाल्या होत्या. शुक्रवारी संध्याकाळी हवामानाचा अंदाज घेवून काय ते ठरवू असं ठरलं. शुक्रवारी हवामान बघितलं तर शनिवारी दुपारी स्वच्छ सुर्यप्रकाश आणि संध्याकाळपासून ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवला होता. चढाईसाठी फार चांगलं म्हणता येईल असं हे हवामान नव्हतं. पण तरीही गेल्या वर्षीचा बदला घ्यायच्या तीव्र इच्छेपोटी आम्ही चढाईचा बेत निश्चित केला.

शनिवारी सकाळी शिंगोसानच्या गाडीतून सहा जण शिझुओकाच्या दिशेनं निघालो. अकराच्या सुमारास पायथ्याजवळ आलो आणि फुजीसानचं डोळ्यात न मावणारं महाकाय रुप दिसू लागलं. गेल्या वर्षीही याच ठिकाणी आलो होतो. त्यावेळी शिंगोसान चेष्टेनं म्हणाला होता. ‘There is a very huge mountain standing in front of us. feel it.’ पण पावसाळी वातावरण आणि ढगांमुळं तो महाकाय पर्वत आम्हाला feel काय पण imagine देखील करता आला नव्हता. यावेळी मात्र खरोखरच फुजीसान् ‘feel’ करता येत होता. पण त्याचा तो आकार कॅमे-यात बंदिस्त करणं निव्वळ अशक्य होतं. वरती चढत जावू तसतसं वस्तू आणि पाण्याच्या किंमती वाढत जात असल्यामुळे वाटेत जेवण आणि परत येईपर्यंत पुरेल एवढं पाणी विकत घेतलं. शनिवार,रविवार आणि सोमवार अशी तीन दिवस जोडून सुट्टी मिळाल्यामुळे फुजीसान चढण्यासाठी खूप गर्दी असणार याची कल्पना होती. त्यामुळं आधी पाचव्या टप्प्यावरच्या पार्किंगमध्ये जागा मिळवणं महत्वाचं होतं. त्यानंतर जेवण करायचं ठरलं. पाचव्या टप्प्याच्या जवळ पोचलो तसं गाड्यांची भली मोठी रांग दिसू लागली. अपेक्षेप्रमाणं पार्किंग केव्हाच भरलं होतं. पार्किंगच्या जागेपासून २-३ किलोमीटर अलिकडंच लोकांनी रस्त्यावरच गाड्या पार्क करायला सुरुवात केली होती. जपानमध्ये हे दृश्य मला जरा नविनच होतं. आम्हीही मग एका बाजूला गाडी पार्क करून जेवण आटोपलं. सामानाची आवराआवर केली आणि एका रोमांचकारी मोहिमेला निघण्यासाठी सज्ज झालो.

क्रमश:

Monday, July 17, 2006

मिशन माउंट फुजी - २

गाडी पार्क केलेल्या जागेपासून पाचव्या टप्प्यापर्यंत एक-दीड किलोमीटर अंतर जालत जायचं होतं. जुलैच्या मध्यावर भर दुपारी रणरणत्या उन्हात चढताना पाचच मिनीटात घामानं सगळे कपडे भिजून गेले. साडेबाराला २००० मी. उंचीवर असलेल्या पाचव्या टप्प्यावर पोचलो. तिथल्या दोन-तीन दुकानांत वरती लागणा-या वस्तू आणि चढताना उपयोगी येतील अशा काठ्या ठेवल्या होत्या. जसजसं वरती चढत जाऊ तसतसं प्रत्येक टप्प्यावर त्या काठीवर त्या त्या टप्प्याचा शिक्का मारुन मिळतो. शेवटी माथ्यावर पोचल्यावर शेवटचा शिक्का मारला की परत येऊन पायथ्याशी त्या काठीचा छोटेसा तुकडा करुन मिळतो. मग ते शिक्के असलेली काठी छोट्याश्या काचेच्या पेटीत बंद करुन ‘आम्ही फुजीसान् सर करुन आलो’ असं सांगत शोकेसमध्ये ठेवायला आपण मोकळे. पण ती काठी, शिक्के आणि पेटी यांचा एकत्र खर्च पाहता ही सर्व शोकेसची कल्पना आम्हाला तितकीशी आवडली नाही. आणि तसेही सगळे तरुण असल्यामुळे काठीची आवश्यकताही नव्हती. त्यामुळं थोडासा वॉर्मअप करुन चढायला सुरुवात केली.

पाचव्या टप्प्यापासून सहाव्या टप्प्यापर्यंतचा रस्ता गर्द झाडीतून जातो. तिथं उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. पण थोड्याच वेळात आभाळ दाटून आलं आणि गर्द झाडीत जिकडं तिकडं धुकं दिसू लागलं. वातावरणात एक सुखद गारवा जाणवू लागला. दररोज सकाळी पळायला जायचा निश्चय करुन एकदाच कधीतरी हिवाळ्यातल्या एखाद्या पहाटे उठून धुक्यात फिरायला गेल्यावर जसं वाटतं अगदी तसंच वाटत होतं. पण टोकियोतल्या कॉंक्रिटच्या जंगलात राहायला आल्यापासून पहाटच काय, सकाळदेखील मी कधी पाहिलेली नव्हती. थोड्या वेळानं लक्षात आलं की ते धुकं नसून आपण ढगांमधून चाललो आहोत. ढग खाली उतरुन आल्यामुळं वातावरण धुसर बनलं होतं. त्या गर्द झाडीत ढगांमधून जाताना मन आपोआपच ‘नभ उतरु आलं, अंग झिम्माड झालं’ गुणगुणू लागलं. पाचव्या आणि सहाव्या टप्प्यामधलं अंतर सर्वाधिक आहे. पण त्या आल्हाददायक वातावरणातून जाताना ते अंतर केव्हा संपलं कळलंच नाही. संध्याकाळ व्हायच्या आत आम्हाला आठव्या टप्प्यावरच्या लॉजमध्ये पोचायचं असल्यामुळं सहाव्या टप्प्यावर थोडी विश्रांती घेऊन पुन्हा पुढे चढायला सुरुवात केली. आता जंगल संपून जिंकडेतिकडे छोटी झुडुपं आणि गवत दिसत होतं. मघापर्यंत आमच्यामध्ये मिसळून गेलेले ढग खाली राहिले होते. सातवा आणि आठवा टप्पा नजरेच्या टप्प्यात होते आणि त्याही वर ढगांच्या आड लपलेलं शिखर खुणावत होतं. उन-सावलीचा खेळ सुरुच होता पण दुपारच्या उन्हातही उंचीमुळं हवेत गारठा जाणवू लागला होता. आम्ही बॅगेतून जॅकेट काढून अंगावर चढवली. शिंगोसान् आणि तोमितासान् नेहमीप्रमाणं जय्यत तयारीनिशी आले होते. मीदेखील संकेतस्थळांवरुन माहिती वाचून थोड्याफार तयारीनिशी आलो होतो. पण जपानी लोकांच्या अतिसावधगिरी किंवा गरजेपेक्षा जरा जास्तच तयारी करुन जाण्याच्या स्वभावाची कल्पना असल्यामुळं मीही त्यांनी संकेतस्थळावर सांगितलेल्या सगळ्याच वस्तू बरोबर घेतल्या नव्हत्या. पण अमित आणि त्याच्या बायकोने ‘जो भी होगा देखा जायेगा’ या भारतीय स्थायीस्वभावानुसार काहीच तयारी केलेली दिसत नव्हती. भर उकाड्यात कशाला हवंय जॅकेट किंवा रेनकोट म्हणत त्यांनी दोघात मिळून एकच रेनकोटवजा जॅकेट आणलं होतं. सुदैवानं ‘आशान्’नं दोन जॅकेटस् आणली असल्यामुळं त्यानं स्वतःकडील एक जॅकेट त्यांना दिलं. सातव्या टप्प्यावर पोचल्यावर गार बोच-या वा-यामुळं गारठा आणखीनच जाणवू लागला. गरम कॉफीचा आस्वाद घेत मग सातव्या टप्प्यावर आम्ही थोडी विश्रांती घेतली. वाटेवरच्या लोकांची रांग अखंड पुढं सरकत होती. खाली पाहिल्यावर हिरव्यागार पसरलेल्या शेतांचं दृश्य ढगांमधून सुंदर दिसत होतं. सूर्यास्तापूर्वी आठव्या टप्प्यापर्यंत पोचायचं असल्यामुळं तिथं फार वेळ न थांबता पुढे निघालो. अमितची बरीच दमछाक झाल्यामुळे त्याचा वेग एव्हाना बराच मंदावला होता. त्याला आमच्या वेगानं चढणं फारच कठीण जात होतं. मला आणि शिंगोसानला आठव्या टप्प्यावरुन सूर्यास्ताची छायाचित्रं काढायची असल्यामुळं आम्ही चौघं त्या जोडप्याला जमेल तशा वेगानं यायला सांगून पुढे निघालो.

गवत आणि खुरट्या झुडुपांची जागा आता लाव्हारसापासून बनलेल्या काळ्या रेतीनं घेतली होती. त्यावर चढताना पाय घसरत होते आणि पुरेसा जोर न मिळाल्यामुळे पुढे सरकताना फारच मेहनत घ्यावी लागत होती. ब-याचश्या ठिकाणी दगडांची रचना करुन चढण्यासाठी आधार मिळेल अशी वाट तयार केली होती. पण तरीही रेतीमुळं चालण्याचा वेग बराच मंदावला होता. वरती चढू तसा गारठा वाढतच निघाला होता. ढग दाटून आल्यामुळे पावसाची चिन्हं होतीच. त्याच्या जोडीला सोसाट्याचा वारा पुढे सरकू देत नव्हता. पण तशा परिस्थितीतही कठीण चढण असलेल्या त्या वाटेवर पाठीवरचं ओझं पेलत नेटानं चढणा-या जपानी आजी-आजोबांच्या एका समूहाला पाहिलं आणि आमची आम्हालाच लाज वाटू लागली. ते लोक ट्रॅव्हल कंपनीतर्फे आले असावेत. इथं बरेचसे आजी-आजोबा ट्रॅव्हल कंपनीतर्फे अशा सहलीला जातात. जपानी लोक सहलीला निघालेले निघालेलं पाहिलं की मला शाळेची प्रभातफेरी आठवते. त्यांच्यातला एक म्होरक्या हातात कुठलातरी छोटासा झेंडा घेवून नेहमी पुढे चालत असतो. लहान किंवा मोठा, कोणीही असो, एकदा एक म्होरक्या ठरवला की अगदी वयोवृध्दांपासून छोट्या मुलांपर्यंत सगळे कसे आज्ञाधारक मुलाप्रमाणे शिस्तीने त्याच्या मागून चालत असतात. त्यांना तसं सहलीला निघालेलं पाहण्यात एक वेगळीच मजा असते.

आठव्या टप्प्याजवळ आलो तसा वा-याचा वेग आणखीनच वाढला. वा-यात उभं राहणंही कठीण होत होतं आणि वा-यामुळं उडणा-या धुळीनं पुढची वाट दिसेनाशी होत होती. एव्हाना हलका पाऊस सुरु झाला होता. सूर्यास्ताच्या सुमारास कसंबसं आठव्या टप्प्यावर पोचलो. आम्ही पूर्वेकडून चढत असल्यामुळं सूर्यास्त पाहता येणं शक्य नव्हतं. पण सूर्यास्ताच्या वेळच्या आकाशातल्या विहंगम दृश्याचं आम्हाला छायाचित्र काढायचं होतं. पण ढगांमुळं आणि पावसाळी वातावरणामुळं ते शक्य झालं नाही. मात्र तिथून दिसणारं सूर्यास्तावेळचं दृश्य निव्वळ अप्रतिम होतं. एका बाजूला फुजीसानला वेढलेल्या पाच सरोवरांपैकी सर्वात मोठं यामानाका सरोवर, त्याभोवती विस्तीर्ण पसरलेला हिरवागार प्रदेश, दुस-या बाजूला आणखी एक सरोवर आणि या सर्वांवर पांघरलेली शुभ्र ढगांची क्षितिजापर्यंत पसरलेली चादर. विमानाच्या खिडकीतून अजानक डोकं बाहेर काढून बघावं तसं काहीसं ते दृश्य दिसत होतं.

अंधार पडेपर्यंत तिथं थांबून संध्याकाळचं जेवण करण्यासाठी लॉजमध्ये परतलो. अमित आणि त्याची बायको अजून पोचले नव्हते. पावसाचा आणि वा-याचा जोर वाढत चालला होता. त्यांच्याकडे पुरेसे गरम कपडे नसल्यामुळं त्यांची काळजी वाटत होती. शेवटी साडेसातच्या सुमारास कसेबसे ते पोचले. त्यांची एकंदर अवस्था पाहून ते आणखी वरती चढणार नाहीत याची खात्री होती. अपेक्षेप्रमाणे त्यांनी सकाळपर्यंत तिथेच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. लॉजमध्ये संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था केली होती. पण दुप्पट पैसे मोजूनही तिथल्या जेवणाची quantity पाहिल्यावर ‘एक से मेरा क्या होगा’ असं म्हणायची वेळ आली. सुदैवानं पुरेसं खाण्याचं सामान बरोबर घेतल्याचा उपयोग झाला. रात्री झोपायला जागा मिळाली होती. पण तिथंही जेवणासारखीच परिस्थिती होती. तीन टप्प्यांच्या बेडवर खूप लोकं दाटीवाटीनं झोपली होती. एक माणूस कसाबसा झोपेल एवढीच जागा प्रत्येकाला मिळाली. अगदी कुशीवर वळायचीही सोय नव्हती. तशातच आजूबाजूच्या लोकांच्या तारस्वरामुळं झोप लागण्याची शक्यता पुरती मावळली. सोसाट्याचा वारा आणि कोसळणारा पाऊस यांचा आवाज लॉजच्या छपरावर सतत ऐकू येत होता. तशा पावसात अंधारात वरती चढणं म्हणजे एक दिव्यच होतं. पाच-सहा तासांच्या कालावधीत झोप अशी मिळालीच नाही. रात्री एक वाजता लॉजच्या मॅनेजरनं वरती जाणा-या सगळ्या लोकांना उठवलं. लगबगीनं आवरुन सकाळच्या नाश्त्याचं पाकीट घेतलं आणि बाहेर पडलो.

बाहेर येवून पाहतो तर, अंधारात माथ्यापर्यंत टॉर्चच्या प्रकाशाची भली मोठी रांग दिसत होती. पाऊस कोसळतच होता, पण त्यातही लोकांचा उत्साह आणि निश्यच अजिबात ढळलेला दिसत नव्हता. प्रत्येकाच्या डोक्यावर हेलमेट, त्यावर बसवलेला टॉर्च, हाइकिंग गियर अशी जपानी लोकांची जय्यत तयारी बघितल्यावर पुन्हा एकदा आपण काहीच तयारी न करता आलोय याची जाणीव झाली. भारतीय आणि चीनी, दोघांच्याही मानसिकतेत फारसा फरक नव्हता. दोघांनीही फारशी तयारी केलेली नव्हती. आमच्या चौघात मिळून दोनच टॉर्च होते. ते ही दोन जपानी मुलांनी आणलेले. त्यामुळं सर्वांनी एकत्र राहायचं ठरवलं. हळूहळू त्या अरुंद वाटेवरुन गर्दीतून पुढे सरकू लागलो. शिखरावर पोहोचण्यासाठी अजून दोन तास चढावं लागणार होतं. आजूबाजूच्या लोकांच्या टॉर्चच्या प्रकाशात अंधुकसा रस्ता दिसत होता. त्यामुळं रांगेत उभं न राहाता एका कडेनं पुढेपुढे चालत राहावं असं ठरवलं. पण अंधारात किंचीत तोल जाऊन पाय घसरला तर काय होईल या भीतीनं तो विचार रद्द केला. रात्रीच्या थंडीत बोचरं वारं आणि चारी दिशांनी झोडपणारा पाऊस चढणं आणखीनंच कठीण बनवत असल्यामुळं रांग फार हळूहळू पुढे सरकत होती. पावसाचा जोर वाढतच चालला होता. चारी दिशांनी झोडपणारा पाऊस हळूहळू जॅकेटमधून आत शिरत चालला होता. पॅंट तर केव्हाच भिजली होती. तशा अवस्थेत रांगेत उभं राहणं शक्य नव्हतं. त्यामुळं अपु-या प्रकाशातही पुढे जायचा निर्णय घेतला. शेजारचे लोक थोड्या थोड्या अंतरावर थांबून चढत होते. आम्ही विश्रांती न घेता पुढे जात राहिलो. पावणेतीनच्या सुमारास दीड तासात शिखराच्या जवळ पोचलो. शिखरावर एका मोठ्या 'तोरीइ'गेटनं(पारंपारिक जपानी शिंतो मंदिरासमोराच्या प्रवेशद्वारावरील कमान) आमचं स्वागत केलं. गेटमधून पुढे गेल्यावर एक छोटंसं शिंतो मंदिर दिसलं आणि आपण शिखरावर पोचलो याची खात्री पटली. मंदिराच्या शेजारी एक-दोन छोटी उपहारगृहं होती पण ती उघडायला अजून अवकाश होता. त्याच्या आडोशाला लोकांनी जागा मिळेल तिथं आसरा घेतला होता. मी आणि आशान् इथपर्यंत येईपर्यंत पूर्ण भिजलो होतो. रेनकोट असून नसल्यातच जमा होता. वा-याचा प्रचंड वेग उभा राहू देत नव्हता. त्यातच बर्फासारखं गारठलेलं पावसाचं पाणी अंग झोडपून काढत होतं. तापमान शून्याच्या खाली पोचलं होतं. बाजूला एक-दोन झोपडीवजा विश्रांतीगृह दिसत होती. पण तीही अजून उघडली नव्हती. तिथं जावून कुठं आडोसा मिळतोय का पाहिलं तर तिथंही मिळेल त्या जागी लोकं कुडकुडत बसली होती. आडोसा शोधूनही काही उपयोग नव्हता कारण वारा आणि पाऊस मिळेल चारी दिशांनी झोडपून काढत होते. तिथंच एका दगडी झोपडीच्या बाजूला छोट्याश्या जागेत गर्दी करुन बसलो. थंडीनं इतकं गारठून गेलो होतो की कोणाच्याच तोंडातून शब्द फुटत नव्हते. सगळं अंग थरथरत होतं. भिजलेल्या केसांवर बर्फाचे छोटे कण जमा झाले होते. आशानची अवस्था सर्वात बिकट होती कारण त्यानं आपल्याकडचं एक जॅकेट अमितला दिलं होतं. वारा आणि पावसापासून बचाव व्हावा म्हणून त्यानं छत्री उघडायचा केविलवाणा प्रयत्न केला पण एका सेकंदातच त्याच्या छत्रीचे सारे जोड हातात देवून वा-यानं आपला प्रभाव दाखवून दिला. तशा परिस्थितीत पाच मिनीटंदेखील तिथं थांबणं अशक्य होतं. परत खाली उतरुन जावं म्हटलं तर अंधारामुळं उतरण्यासाठीही आणखी एक-दीड तास लागणार होता. सूर्योदय व्हायला अजून दीड तास अवकाश होता. भिजलेल्या अवस्थेत गोठवणा-या थंडीत आणि पावसात दीड तास असा काढायचा या विचारानं जिवाचा थरकाप उडाला. पुन्हा एकदा निसर्गासमोर माणूस किती क्षूद्र आहे याचा प्रत्यय आला. एकाच वेळी मला व्हर्टिकल लिमीट चित्रपटात K2 वर अडकलेले गिर्यारोहक आणि टायटॅनिकमधला अटलांटिकच्या गोठवणा-या पाण्यात बुडालेला ‘Jack’ डोळ्यासमोर दिसू लागले. त्या बापड्या गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी कोणीतरी खालून निघालं होतं आणि ‘Jack’च्या बरोबर त्याची ‘Rose’ तरी होती. आमच्याबरोबर ना ‘Rose’ होती ना कोणी खालून वरती निघणारं होतं. आशान् ला तशा परिस्थितीतही विनोद सुचत होते. “आज तुम्हाला चायनिज् कुंग फू चं सामर्थ्य दाखवूनच देतो. हा मी आता इथे असा बसलो की एक तास इथून हलणारही नाही.” असं म्हणत एका ठिकाणी तो त्याच्या कुंग फू पोझमध्ये ठाण मांडून बसला. ‘जिवंत राहिलास तर हलशील ना.’ शिंगोसान् हळूच त्याला म्हणाला. मला आणि तोमितासानला हसण्याची इच्छा असूनही हसू फुटत नव्हतं. एकेक मिनीट घड्याळाचा काटा पाहात पुढच्या मिनीटाला काहीतरी होईल या आशेवर काढत होतो. पाच, दहा करत पंधरा मिनीटं उलटून गेली. बर्फाचा खडा पाच मिनीटं तळहातावर ठेवल्यावर जी अवस्था होते तीच अवस्था सगळ्या शरीराची झाली होती. एव्हाना शरीरावर संवेदना जाणवणं बंद झालं होतं. शेवटी अर्ध्या तासानं देवानं आमची प्रार्थना ऐकली. दोन उपहारगृहांपैकी एकाचा दरवाजा उघडला आणि आत घुसण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. मी, तोमितासान आणि शिंगोसाननं भराभर बॅगा उचलल्या आणि तिकडे निघालो. आशान् मात्र अजून तसाच कुंग फू पोझमध्ये बसला होता. शिंगोसाननं त्याला हलवून उठवायचा प्रयत्न केला पण गारठून गेल्यामुळे त्याला हलताच येत नव्हतं. कसबसं त्याला उठवून उपहारगृहात घेवून गेलो. शेकोटीजवळ बसून गरम गरम कॉफीचा घोट घेतल्यावर सगळ्यांच्या जीवात जीव आला. पंधरा-वीस मिनीटं शेकोटीजवळ बसलो. कॉफी संपल्यामुळं उठून इतर लोकांना बसायला जागा देणं भाग होतं. सूर्योदयाला अजून अर्धा तास अवकाश होता. अर्धा तास आता सहज बाहेर काढता येईल असं म्हणून बाहेर पडलो. बाहेर पडल्याबरोबर पुन्हा तोच सोसाट्याचा वारा आणि पाऊस. एका क्षणात पुन्हा ‘जैसे थे’. आता मात्र गर्दी वाढल्यामुळं उपहारगृहात सहजासहजी प्रवेश मिळणार नव्हता. जरा पुढे चालत जातो तोच पुन्हा एकदा अंगात हुडहुडी भरली. उब मिळावी म्हणून थोडा वेळ सगळ्यांनी उड्या मारुन पाहिल्या. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मग शेवटी पुन्हा एकदा रांगेत उभं राहून कसंबसं उपहारगृहात पोचलो आणि आत आडोशाला उभं राहिलो. एव्हाना तांबडं फुटायची वेळ झाली होती. बाहेर सूर्योदय पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. उपहारगृहाच्या काचेच्या खिडकीआडून मला थोडंफार आकाश दिसत होतं. पूर्वेच्या आकाशात हळूहळू केशरी छटा दिसू लागल्या होत्या. पण त्या वादळी हवामानात सूर्योदय दिसणं अशक्य होतं. विमानातून येताना मी एक-दोनदा सूर्योदय पाहिला होता. हा सूर्योदयही त्यापेक्षा काही वेगळा नसणार अशी मनाची समजूत काढून मी आणि आशान् तिथं एक जागा मिळवून बसलो. शिंगो-सान आणि तोमितासान बाहेर सूर्योदयाची छायाचित्रं काढता येतात का ते पाहण्यासाठी गेले. जरी सूर्योदय दिसला असता तरी बाहेर जावून बॅगेतून कॅमेरा काढून तो स्टॅंडवर लावण्याचा उत्साह माझ्यात नव्हता आणि स्टॅंडशिवाय थरथरत्या हातानं छायाचित्रं काढणं शक्य नव्हतं. त्यामुळं शिखरावर पोचलो हेही काही कमी नाही या समाधानात आम्ही दोघं निमूटपणे शेकोटीजवळ बसून राहिलो. आशानच्या हातावर अर्ध्या तासापूर्वी आलेला काटा अजूनही तसाच होता. तीन-चार तास गारठलेल्या शरीराला पंधरा-वीस मिनीटांची शेकोटीची उब पुरणार नव्हती. तिथून उठायला लागू नये म्हणून एकापाठोपाठ एक काहीतरी मागवत तिथंच बसून राहीलो. साडेपाचच्या सुमारास शिंगोसान आणि तोमितासान परत आले.

पावसाचा जोर आता जरा कमी झाला होता आणि बाहेर चांगलंच उजाडलं होतं. म्हणून मग बाहेर पडून शिखराच्या मध्यभागी असलेल्या क्रेटरभोवती एक चक्कर मारण्यासाठी निघालो. क्रेटरभोवती प्रदक्षिणा घालण्यास जवळजवळ एक तास लागतो. आम्ही होतो तिथून क्रेटरच्या दुस-या बाजूला जपानमधील सर्वात उंचीवर असलेलं पोस्ट ऑफिस आहे. तिथून कोणालाही भेटकार्ड पाठवता येतं. पण बोच-या थंडीत तिथपर्यंत जायची कोणाचीच इच्छा नव्हती. क्रेटरपर्यंत जावून तिथं आत डोकावून पाहिलं. आत खूप खोल दरी दिसत होती आणि कडांवर बरंच बर्फ साठलं होतं. हात अजूनही थरथरतच होते त्यामुळे कॅमेरा बाहेर काढून क्रेटरचा फोटो काढणं शक्य झालं नाही. तसाही त्याचा आकार कॅमे-यात मावण्यासारखा नव्हता. थोडं पुढे जावून खाली दिसणा-या सुंदर लॅंडस्केपची थोडी छायाचित्रं काढली. पण ढगाळ वातावरणामुळं ती म्हणावी तितकी चांगली आली नाहीत. तशा वातावरणात आणखी फिरण्याचा उत्साह कोणाच्याच अंगात नव्हता. पाच-दहा मिनीटं तिथं थांबून परतीच्या वाटेला लागलो.

उतरायच्या वाटेवर वाळूवरुन आपोआपच पुढे सरकत जात असल्यामुळं उतरणं सोपं जात होतं. अर्ध्या तासाच्या आतच आठव्या टप्प्यावर पोचलो. संध्याकाळची हानाबी(आतषबाजी) गाठायची असल्यामुळं अमित आणि त्याच्या बायकोला उठवून लगबगीनं उतरायला लागलो. परतीच्या वाटेत ‘ओनसेन’ला(नैसर्गिक गरम पाण्याचं कुंड) भेट द्यायची असल्यामुळं १० च्या आत पायथ्याशी पोचणं गरजेचं होतं. पण सातव्या टप्प्यापाशी पोचलो तसं पुन्हा मुसळधार जे पावसानं गाठलं ते पायथ्याशी पोचेपर्यंत सोडलंच नाही. पावसातून वाट काढत पाचव्या टप्प्यापर्यंत पोचेपर्यंत अकरा वाजले. वाळू आणि चिखलानं सगळे कपडे माखून गेले होते. ओनसेनला जाण्याची तीव्र इच्छा होत होती पण उशीर झाल्यामुळं ओनसेनचा बेत रद्द करावा लागला. परतीच्या वाटेवर ओनसेनशिवाय घडलेली ही पहिलीच सहल असावी. पण आधी घडलेल्या चित्तथरारक अनुभवांच्या आठवणींमध्ये ओनसेन चुकल्याची हुरहुर केव्हाच नाहीशी झाली होती. त्या रोमांचक आठवणी आणि फुजीसान् ‘सर’ केल्याचा आनंद मनात साठवून परतीच्या वाटेला लागलो. दरवेळी सहलीत तोमितासान मला काहीतरी जपानी शिकवत असतो पण सहल संपल्यावर मी नेहमी ते विसरतो. यावेळी मात्र त्यानं शिकवलेलं वाक्य विसरता येणं शक्य नव्हतं.
‘जिनसेइवा केइकेन दा’ (Life is an experience).

ही आणि आणखी काही छायाचित्रं इथं पाहता येतील.

Saturday, May 27, 2006

माझं कोल्हापूर

इमेलमधून आलेली एक कविता आज वाचली आणि मन कोल्हापूरच्या नॉस्टॅल्जियानं भरुन आलं. ती कविता इथं लिहायचा मोह आवरला नाही.

कोल्हापूर...

खळाळत्या जीवनाचा निर्झर कोल्हापूर...
मनातल्या माणूसकीचा पाझर कोल्हापूर...

रंकाळ्याचा वारा कोल्हापूर...
पन्हाळ्याच्या धारा कोल्हापूर...

खासबागेतील कुस्ती कोल्हापूर...
जेवल्यानंतरची सुस्ती कोल्हापूर...

चपलेपासून फेट्यापर्यंत मातीचा सुगंध कोल्हापूर...
मनानं शरीरानं आत्म्यानं बेधूंद कोल्हापूर...

मिसळीचं वाटण कोल्हापूर...
पांढ-या रश्श्यातलं मटण कोल्हापूर...

विन्या मिल्या पश्या कोल्हापूर...
पम्या पक्या दिप्या कोल्हापूर...

शिव्यांमधलं प्रेम कोल्हापूर...
राजकारणातील गेम कोल्हापूर...

शाहिरीचा बाज कोल्हापूर...
गळ्यातला साज कोल्हापूर...

मातीमधलं पसरलेलं घोंगडं कोल्हापूर...
नखशिखांत रांगडं कोल्हापूर...

ताराबाई पार्कातलं चुणचुणीत कोल्हापूर...
शिवाजी पेठेतलं झणझणीत कोल्हापूर...

क्षणोक्षणी
जिथे तिथे
भरपूर पुरेपूर
ते.... माझं कोल्हापूर...

Thursday, May 11, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

नंदननं टॅग बुकींग चा अतिशय चांगला उपक्रम सुरु केलाय. त्यानं मला या खेळात सामील केलंय खरं, पण मी त्याच्या निवडीला न्याय देऊ शकेन असं वाटत नाही. त्यानं वाचलेल्या पुस्तकांची यादी केली तर त्यातली १/१० पुस्तकंही मी वाचली असतील की नाही याबाबत मलाच शंका आहे. 'आता इथं जपानमध्ये मराठी पुस्तकं मिळणार कुठून? शिवाय रोजचा अभ्यास, संशोधन, जपानीचा अभ्यास अशा कसरतीतून वेळ मिळायला तर वाचणार.' अशी भरपूर कारणं देता येतील. पण आता विषय निघालाच आहे तर प्रांजळपणे एक गोष्ट कबूल करावीशी वाटते. मला वाचनाची आवड आहे, पण वेड नाही. नंदनसारखी मुलं, ज्यांना वाचनाचं वेड आहे, ते कुठूनही पुस्तकं मिळवून कसाही वेळ काढून वाचतीलच. पण माझं तसं नाही. मी पुस्तकं वाचतो, नाही असं नाही. एखादं पुस्तक आवडलं तर एका रात्रीत खाली न ठेवता वाचूनही काढतो. पण एखादं पुस्तक वाचायचंच असं ठरवून, खटपट करुन ते मिळवून वाचण्याइतपत मला वाचनाचं वेड नाही. लहानपणापासूनच वाचनापेक्षा खेळण्याकडे माझा कल जास्ती होता. अजूनही आहे. अजूनही जास्तीत जास्त वेळ मला मैदानावर घालवायला आवडतं. मग ते मैदान क्रिकेटचं असो किंवा बेसबॉलचं. (आजच बेसबॉलचा एक सराव सामना खेळून आलो.) शक्यतो जमेल तेवढे सगळ्या प्रकारचे खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो. खेळाची ही आवड शाळेपासून इंजिनिअरींगपर्यंत वेळोवेळी गुणतक्यात परिवर्तित झालेलीच आहे. असो. दरवेळी काहीतरी लिहीताना हे असं कुठेतरी भरकटायला होतं. तर विषय पुस्तकांचा होता.

शाळेत असताना मी नियमित मराठी पुस्तकं वाचायचो. कॉलेजात गेल्यावर हळूहळू मराठी पुस्तकांची जागा इंग्रजी पुस्तकं आणि वर्तमानपत्रांनी घेतली. खरं सांगायचं तर शाळा सुटून कॉलेजात गेल्यावर एखादं नवीन पुस्तक आवर्जून विकत घ्यावं असं कधी वाटलं नाही. कारण घरी आई महानगगरपालिकेच्या वाचनालयातून नियमितपणे पुस्तकं आणत असे. मी केव्हातरी त्यातलं एखादं वाचत असे. पण मुख्य गोष्ट अशी की भारतात असताना, मराठमोळ्या वातावरणात वावरत असताना आपण आपल्या भाषेपासून दूर आहोत असं कधीच वाटलं नाही. एका मोठ्या आनंदाला आपण दिवसागणिक किती मुकत चाललो आहोत याची जाणीव ख-या अर्थानं इथं जपानमध्ये आल्यावर झाली. मला वाटतं, भारत किंवा महाराष्ट्र सोडलेल्या प्रत्येकाची माझ्यापेक्षा फार काही वेगळी अवस्था नसावी. मग हे असं ब्लॉग लिहीणं, मराठीतलं काहीही दिसलं की अधाश्यासारखं वाचून काढणं सुरु झालं. त्याला मराठी ब्लॉगविश्वानं खूप मोठा दिलासा दिला. पण तिथंही कुठंतरी एखाद्या पुस्तकाबद्दल वाचलं की आपण ते वाचलेलं नाही याची खंत वाटू लागली. पण आता मात्र पक्का निश्चय केलाय. इथून पुढे मिळतील तितकी मराठी पुस्तकं वाचायची.

आता नंदनच्या प्रश्नांची उत्तरं. मला सर्वात आवडता चित्रपट किंवा गाणं किंवा पुस्तक असं काही ठरवायला नेहमीच अवघड जातं. त्यामुळे लहानपणापासून त्या त्या वयात आवडलेली काही पुस्तकं इथं लिहीतो.

शेवटचं वाचलेलं पुस्तक:
'Memoirs of a Geisha' हे Arthur Golden चं पुस्तक नुकतंच वाचून संपवलं. पण दुर्दैवानं अलिकडे मराठी पुस्तक वाचायला मिळालं नाही. इंथं येण्यापूर्वी मी पु.लं. च्या 'पूर्वरंग'ची एकदा उजळणी केली होती. पण त्यालाही आता दोन वर्षं होत आली. आता नक्की आठवत नाही पण त्याआधी श्री. ना. पेंडसेंचं 'गारंबीचा बापू' वाचलं असावं बहुदा. पुस्तक खूप जुनं आहे. त्याच्यावर तसाच खूप जुना एक चित्रपटही निघाला आहे. मी असंच केव्हातरी वाचनालयातून घरी आलेलं ते पुस्तक वाचल्याचं आठवतंय.

आवडलेली पुस्तकं:

मराठी पुस्तकांचा विषय निघाल्यावर पुलंचं नाव घेतलं नाही तर तो फाऊल ठरतो. त्यांची पुस्तकं आवडत्या पुस्तकांच्या यादीत नसलेला माणूस विरळाच. 'अपूर्वाई' आणि 'असा मी असामी' चा नंबर माझ्या यादीत सर्वात वरचा. हलकीफुलकी, फारशी गंभीर नसलेली पुस्तकं मला सर्वात जास्त आवडतात. त्यामुळं चि. वि. जोशी हे लहानपणीचे आवडीचे लेखक. त्यांचं 'ओसाडवाडीचे देव' पुस्तक त्यावेळी आवडायचं.

इतिहास हा लहानपणापासून माझा आवडीचा विषय. पण तिथंही सर्वपरिचित पानिपत, स्वामी अशी उल्लेखनीय पुस्तकं वगळता माझी पाटी कोरीच आहे. केव्हातरी 'घाशीराम कोतवाल' वाचल्याचं आठवतंय. दुस-या महायुध्दाचा इतिहास हा दहावीपासून माझ्या आवडीचा विषय झाला होता. त्यावर मिळतील तितके नवे आणि जुने हॉलिवूडपट मी पाहिलेले आहेत. त्यामुळे वाळींबेंचं 'हिटलर' हे पुस्तक मला आवडायचं. (व्याकरणाचे वाळींबे आणि लेखक वाळींबे यांच्यात माझा नेहमी गोंधळ होतो. इथंही झाला असेल तर त्यातले नक्की कोणते वाळींबे की दोघेही एकच आहेत ते समजून घेण्याची जबाबदारी वाचकांची). पण त्यांनीच लिहीलेलं 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' पुस्तक वाचल्यावर मला 'हिटलर' आवडेनासं झालं.

स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचलं होतं. आता वर एवढ्या गोष्टी कबूल केल्याच आहेत तशी आणखीही एक करतो. खूप पूर्वी वाचल्यामुळं या पुस्तकाचं नाव आणि लेखक दोन्ही मला आता आठवत नाहीत. पण पहिल्या पाचात याचं स्थान नक्कीच आहे.

अनुवादित पुस्तकांमध्ये रविंद्र गुर्जर यांचं 'सत्तर दिवस' पुस्तक मला आवडलं. दक्षिण अमेरीकेत विमानाला अपघात होऊन त्यातल्या वाचलेल्या प्रवाश्यांनी बर्फाच्छादित एंडीज् पर्वतात अन्नपाण्यावाचून काढलेल्या सत्तर दिवसांचा अनुभव वाचताना अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही.

आधी लिहील्याप्रमाणं मी ठरवून कोणतंही पुस्तक वाचत नसल्यामुळं पहिल्या पाचांबद्दल भाष्य करणं अवघड आहे. शिवाय इथून पुढं हातात पडेल ते पुस्तक वाचायचं ठरवल्यामुळं तसं काही लिहायची गरजही नाही.

मला खेळायची आवड असली तरी हा टॅग बुकींग चा खेळ खेळता खेळता माझी पुरेवाट झाली. पण त्यानिमित्तानं चांगल्या पुस्तकांची ओळख झाली हेही नसे थोडके. त्याबद्दल नंदनचे खरंच आभार मानायला हवेत.
आता साखळी पुढे सरकवताना कोणी कोणाला टॅग केलंय हे मला कळायला मार्ग नाही. पण तरीही मी या पाच लोकांना टॅग करतो.
कौस्तुभ
शब्दभ्रमर
आनंद
गिरिराज
आशुतोष

Friday, April 14, 2006

पुन्हा एकदा साकुरा

यावर्षी साकुरा (चेरी ब्लॉसम) चे मनासारखे फोटो काढता आले नाहीत याची थोडी हुरहुर लागलीच होती. गेल्या वर्षी नविन कॅमेरा घेतला त्यावेळी साकुराचा बहर संपून गेला होता. यावर्षी ती संधी चुकवायची नाही असं ठरवलं होतं. पण कामाच्या गडबडीत इथला साकुराचा बहर केव्हा ओसरला ते कळलंच नाही. कोणतीही गोष्ट उत्साह असेपर्यंत केलेली बरी असते. त्यामुळे मागच्या शनिवारी लॅबमधल्या एका मुलानं ‘उद्या साकुराचे फोटो काढायला जाउया का’ विचारताच मी लगेच ‘हो’ म्हणून टाकलं.

रविवारी सकाळी आम्ही दोन हौशी फोटोग्राफर एका हौशी ड्रायव्हरला पकडून साकुराचे फोटो काढण्यासाठी बाहेर पडलो. टोकियोजवळ साकुराचा बहर केव्हाच संपून गेला होता. दुस-या कोणत्यातरी प्रसिध्द ठिकाणी जायचं म्हटलं तर या दिवसांत जिकडेतिकडे प्रचंड गर्दी असते. त्यामुळं कुठंतरी लांब आणि शांत ठिकाणी जायचं ठरवलं. टोकियोच्या पश्चिमेला असणा-या यामानाशी राज्यात त्यांनी दोन-तीन चांगल्या ठिकाणांची माहिती काढली होती. अशी सगळी माहिती काढून स्वतःची गाडी घेउन आपण ट्रीपला जाउया का असं विचारणारी माणसं सहसा कुणाला भेटत नाहीत. का कुणास ठाऊक पण माझं नशिब फार चांगलं आहे या बाबतीत. त्यांच्या माहितीनुसार इप्पोनसाकुरा या फारश्या गजबजाट नसलेल्या जागी निघालो. दोन-अडीच तासांचा ड्राईव्ह संपतो तोच हायवेवरच एक छोटीशी बाग दिसली. ही ट्रिप Exclusively साकुराचे फोटो काढण्यासाठी असल्यामुळे वाटेत कुठंही मनाला येईल तिथं गाडी थांबवून फोटो काढण्याची मुभा होती. त्या बागेपाशी गाडी थांबवून आमचं फोटोसेशन सुरु झालं.

असं म्हणतात की हजार शब्दांपेक्षा एक चित्र पुरेसं असतं. त्यामुळं मी जास्ती लांबड न लावता तुम्हाला चित्रं पाहायला मोकळं करतो. चित्रांसोबत जागांची माहीती आणि किचकट नावंही आहेत. पण ती वाचायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं. मी मात्र माझ्या संदर्भाकरता लिहीली आहेत.



हायवेवरच्या छोट्याश्या बागेतली 'Peach' ची फुलं









त्याच बागेतील साकुरा












यामानाशी राज्यातील 'कात्सुनुमा-बुदोक्यो' गावाजवळ असलेला हा प्रसिध्द 'इप्पोनसाकुरा'. विस्तीर्ण मैदानात असलेलं साकुराचं हे एकमेव झाड जवळजवळ दोनशे वर्षं जुनं आहे.





साकुराचे फोटो काढण्यासाठी तिथं आमच्याव्यतिरिक्त आणखीही काही वेडे लोक होते. आणि अगदी जय्यत तयारीनिशी आले होते.












'साकुरा आणि फुजीसान्' अर्थात माऊंट फुजी.
त्याजसाठी केला तो अट्टाहास.
हे छायाचित्र म्हणजेच जपानची आजवर सगळीकडे पाहिलेली प्रतिमा कॅमे-यात बंद केली आणि इथवर आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.


'शिदारेझाकुरा' : यामानाशी राज्यातील आणखी एक प्रसिध्द साकुराचं झाड. हे झाडदेखील खूप जुनं आहे असं ऐकलं. याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला वडाच्या पारंब्यांसारख्या फांद्या आहेत आणि त्यावर साकुरा फुलतो.





हा असा.












रात्रीच्या प्रकाशात हा शिदारेझाकुरा अधिकच खुलून दिसतो.




दिवसभर फिर फिर फिरुन फोटो काढल्यावर नेहमीप्रमाणं 'ओनसेन' (नैसर्गिक गरम पाण्याचं कुंड) ला जायचं ठरलं. ओनसेनला गेलो नाही तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. नेहमीप्रमाणं जपानी मित्रांनी तिथल्या एका प्रसिध्द ओनसेनची माहिती काढून ठेवलेलीच होती. संध्याकाळी परतीच्या प्रवासात तिथून जवळच एका डोंगराच्या माथ्यावर असणा-या 'होत्ताराकाशी ओनसेन'मध्ये गेलो.

कल्पना करा. सूर्यास्ताची वेळ आहे. डोंगराच्या माथ्यावर आजूबाजूला कोणतीही घरं नाहीत. समोर बर्फाच्छादित माउंट फुजी सोनेरी सूर्यकिरणांनी न्हाउन निघाला आहे. मधली खोल दरी दिव्यांनी झगमगते आहे. थंडगार वा-याची झुळूक अंगावर घेत तुम्ही गरम पाण्याच्या कुंडामध्ये त्या दृश्याचा आस्वाद घेत बसला आहात. अशा वातावरणात आजूबाजूच्या जगाचा विसर न पडला तरच नवल.
अर्थातच आमच्या तिघांच्या तोंडून एकच शब्द उमटत होता: 'साईको' (परमोच्च)

(ओनसेनमध्ये छायाचित्रं काढायला परवानगी नसल्यामुळे हे छायाचित्र मी या ओनसेनच्या संकेतस्थळावरुन मिळवलेलं आहे.)



ही आणि इतर काही छायाचित्रं इथं पाहू शकता.

Sunday, April 02, 2006

नेमेचि येतो मग साकुरा

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात सुट्टीसाठी भारतात गेल्यामुळे स्प्रिंग अर्थात वसंत ऋतूचं आगमन मला पाहताच आलं नाही. या वर्षी मात्र ‘साकुरा’ फुलताना छायाचित्रं काढायला विसरायचं नाही असं मनाशी अगदी ठरवलं होतं. पण गेल्या आठवड्यात कामाच्या गराड्यापुढे दिवसा प्रयोगशाळेतून बाहेरच पडता आलं नाही. परवा सकाळी सहज घराच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर साकुरा चक्क पूर्णपणे बहरात होता. छे.. नेमकं याच दिवसात मला काम लागावं आणि मी पुन्हा एकदा साकुरा बहरताना छायाचित्रं काढायला मुकावं..आता यासाठी आणखी एक वर्ष थांबावं लागणार या विचारानं त्या दिवशी थोडा हिरेमोडच झाला. पण बाहेर पडल्यावर आजूबाजूला सर्वत्र ऐन बहरात आलेला साकुरा पाहिला आणि उदास झालेलं मन साकुरासारखंच क्षणात फुलून आलं. साकुरा फुलताना पाहता आला नाही किंवा त्याची छायाचित्रं काढता आली नाहीत याच्या दुःखापेक्षा बहरलेला साकुरा पाहण्याचं सुख कित्येक पटीनं अधिक होतं. त्यानंतर दोन-तीन दिवस रोज साकुरा पाहण्यात आणि ‘हानामी’ची मजा लुटण्याच्या कल्पनेत अगदी छान गेले.

तुम्ही म्हणत असाल हा साकुरा काय प्रकार आहे आणि ही हानामी कशाशी खातात? काय आहे, जपानबद्दल माहिती वाचताना, जपानी भाषेचा थोडासा छळ सहन करावा लागणारच, नाही का? ठीक आहे. सांगतो. कदाचित काही जणांना माहितीही असेल. दर वर्षी वसंताची चाहूल लागताच हिवाळ्यात थंडीनं गारठून गेलेल्या आणि पानं झडलेल्या चेरीच्या झाडांना नवी पालवी फुटू लागते आणि बघता बघता चेरीचं झाड फिकट गुलाबी फुलांनी अगदी बहरुन जातं. अगदी आपल्याकडचं गुलमोहराचं झाड जसं बहरुन जातं तसंच. तसं पाहिलं तर समशीतोष्ण कटिबंधात हा प्रकार सर्वत्रच पाहायला मिळतो. यात जपानमध्ये विशेष वेगळं आहे असं काहीच नाही. याला पश्चिमेकडे चेरी ब्लॉसम म्हणतात तर इथे साकुरा. हा साकुरा जपानच्या दक्षिणेच्या टोकापासून सुरु होउन हळूहळू उत्तरेला सरकत जातो. टोकियो साधारण मध्यावर असल्यामुळे मार्चअखेरीस टोकियोमध्ये सगळीकडे साकुरानं डवरलेली झाडं दिसू लागतात आणि सगळीकडे एखाद्या उत्सवासारखं वातावरण पसरतं. शाळा, कॉलेजांना वर्षअखेरीची सुट्टी लागलेली असते. ऑफिसेस्, घरा-घरांमध्ये हानामीची वेळापत्रकं आखली जातात. ही ‘हानामी’ म्हणजे कुठलीतरी खायची गोष्ट नाही तर कुटूंब किंवा मित्रमंडळींसोबत फिरायला जाऊन चेरी ब्लॉसमची मजा लुटणे म्हणजे 'हानामी'. आता ही हानामी सहल (किंवा पिकनिक म्हणा हवं तर) घराजवळची एखादी बाग किंवा दूर कुठेतरी दुस-या गावत असणं हे ज्याच्या त्याच्या उत्साहावर अवलंबून असतं. पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हानामीचा आनंद लुटण्यासाठी एकदा तरी बाहेर पडतातच. मला तरी वाटतं अशा वातावरणात हानामी पिकनिकला न जाता कुणाला चैनच पडणार नाही. त्यामुळं या दिवसांत बागा किंवा साकुरा पाहण्यासाठी असलेली ठिकाणं गर्दीनं फुलून गेली नाहीत तरच नवल. सुट्टीच्या दिवशी तर काही पाहायलाच नको. काही ठिकाणी तर गर्दीतून वाटही काढता येत नाही. तसा हानामी पिकनिक आणि आपल्याकडची पिकनिक यात फारसा फरक नाहीच. हल्ली आपल्याकडच्या पिकनिकच्या संकल्पना बदलल्या आहेत. पण मी लहान असताना घरातल्या मंडळींबरोबर गेलेल्या पिकनिक मला चांगल्या आठवतायत. शक्यतो सगळ्या पिकनिक म्हणजे कुठल्यातरी देवस्थानला दिलेली एखादी छोटी भेटच असायची. सकाळचा वेळ तिथं पोचल्यावर देवदर्शन आटोपून आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यात जाई. दुपार झाली, की जवळवासच्या कुठल्यातरी वडाच्या झाडाखाली चटई अंथरुन त्यावर जेवणाचे डबे उघडले जात. घरातून कालवून आणलेला दहीभात आणि डाळमेथीचा बेत अगदी फक्कड जमलेला असे. त्यावर मनसोक्त ताव मारला तरी नंतर ताकाचा पेला रिचवून मोठी ढेकर दिल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्याचं समाधान मिळत नसे. तश्या त्या दहीभात आणि डाळमेथीची चव इतर कुठेही आणि कितीही वेळा खाल्ली तरी येत नसे. जेवणानंतर तिथेच झाडाच्या सावलीत बायकांच्या गप्पा रंगत असत आणि परुषमंडळींची वामकुक्षी होत असे. आम्ही मुले मात्र दिवसभर कोणता ना कोणता खेळ खेळण्यात किंवा इतरांच्या खोड्या काढण्यात दंग असू. उन्हं उतरतीला लागल्यावर सामानाची आवराआवर सुरु होई आणि अंधार पडायच्या सुमारास आम्ही घरी परतत असू. त्या सहलींच्या आठवणी मनात अजूनही ताज्या आहेत. तश्या सहलींची मजा आता पुन्हा येणार नाही आणि इथं तर मुळीच येणार नाही हे माहित असलं तरी इथल्या प्रत्येक सहलीत काहीतरी वेगळं अनुभवण्याचा प्रयत्न सुरुच असतो.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एप्रिलच्या पहिल्याच रविवारी प्रयोगशाळेची हानामी सहल ठरली. पण रविवारी हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळं हानामीसाठी एक दिवस आधीच जायचं ठरलं. शनिवारी सकाळी ठरल्याप्रमाणे तोक्यो(टोकियो) मधली कमी गर्दी असणारी एक छोटीशी बाग निवडून सगळे सदस्य तिथे जमा झाले. हवेतला किंचीत गारठा आणि लख्ख सूर्यप्रकाशामुळे वातावरण अगदी आल्हाददायक होतं. प्रा. कुरोदा, म्हणजे माझे मार्गदर्शकही त्यांच्या कुटुंबियांसमवेत आले होते. त्यांच्या पत्नीने घरातून आमच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते. थोडा वळ बागेत फेरफटका मारुन साकुराचं सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवलं. प्रत्येकाकडे कॅमेरा असल्यामुळे छायाचित्रांना काही तोटा नव्हताच. बागेत फारशी गर्दी नसली तरी प्रयोगशाळेतील काही मुलांनी आधीच जाऊन जागा पकडून ठेवली होती. तिथे एका चेरीच्या झाडाखाली मेणकापड अंथरुन मंडळींनी त्यावर बैठक मारली. वरती जणू साकुराचं छतच तयार झालं होतं. पेयपानाचा कार्यक्रम आटोपल्यावर मंडळींनी जेवणाचे डबे उघडले. जपानी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत गप्पा रंगल्या. प्रा. कुरोदांचा छोटा मुलगा योशितोची दंगामस्ती आणि खोड्यांमुळे सगळ्यांची चांगलीच करमणूक होत होती. दुपारी यथावकाश जेवण आटोपून गप्पा संपल्यावर एकेक सदस्य निघू लागला. मग सगळ्यांनीच आवराआवर करायला सुरुवात केली. तीन-साडेतीनच्या सुमारास साफसफाई करुन सर्वजण परत निघाले. मी आणि काही मित्र भारतीय दूतावासात असलेला ‘साकुरा बझार’ पाहण्यासाठी निघालो.

दरवर्षी ‘कुदानशिता’ इथं असणा-या भारतीय दूतावासात ‘साकुरा बझार’ भरतो. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमधील खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल आणि दूतावासासमोर असणारी साकुरानं फुलून गेलेली प्रसिध्द बाग हे या साकुरा बझारचं आकर्षण असतं. दूतावासात जाईपर्यंतच चार वाजले. कुदानशिता स्टेशनपासून दूतावासापर्यंतचा रस्ता गर्दीनं फुलून गेला होता. जपानी मित्रांना साकुरा बझारमधील मराठी मंडळाच्या स्टॉलमधले बटाटेवडे खायला घालायचा विचार होता. पण बटाटेवडे केव्हाच संपून गेले होते आणि उरलेले पदार्थही संपण्याच्या बेतात होते. रांगेत उभे असताना अर्ध्यातच सगळे पदार्थ संपल्याची घोषणा झाली. त्यामुळे मग समोरच्या प्रसिध्द बागेत चक्कर मारण्यास निघालो. बागेतील रस्त्यावर गर्दी मावत नव्हती. रस्त्याच्या दुतर्फा फुललेला साकुरा पाहताना लोकांचा उत्साह ओसंडून वाहात होता. काही लोक त्याची चित्रं रेखाटत होते तर काही हौशी आजोबा मोक्याची जागा पटकावून आपला जुना कॅमेरा स्टॅंडवर लावून साकुराची छायाचित्रं काढण्यात दंग होते. एकंदरीतच गर्दीला उत्सवाचं स्वरुप आलं होतं. एक मोक्याची जागा पकडून मीही छायाचित्रांची हौस भागवून घेतली. पण गर्दीमुळे फारशी मनासारखी छायाचित्रं काढता आली नाहीत. त्यामुळं पुढच्या वर्षी एखाद्या निवांत ठिकाणी छायाचित्रं काढायचा निश्चय करुन परतीची लोकल पकडली.

हा साकुराचा बहर फार फार तर एक आठवडा किंवा दहा दिवस टिकतो. तोक्योमधील साकुरा आता संपण्याच्या मार्गावर आहे. पण उत्तरेला काही मैलांवर तो नुकताच सुरु झालाय. या महिन्याच्या अखेरीस मला उत्तरेकडील 'नागानो' राज्यात जाण्याची संधी मिळतेय. पाहूया त्यावेळी साकुराला आणखी एकदा भेटण्याची संधी मिळते का?

Friday, March 31, 2006

पुन्हा व्यत्त्यय!

हुश्श... पुन्हा एकदाचा ब्लॉग परत सुरु झाला बुवा. महिनाभर तरी बंद पडला असावा. मागची नोंद पण आत्ता कुठे प्रकाशित झाली. नाहीतर कितीतरी दिवस २२% वरच अडखळतच होती. 'ब्लॉगर'नं हा असा दुस-यांदा दगा दिलाय. या 'ब्लॉगर'चा काही भरवसा नाही. सारख्या काही ना काही अडचणी येतच असतात. त्यामुळे या वेळी दुसरीकडे कुठेतरी याचा बॅकअप घेउन ठेवायला हवा म्हणून इथं बॅकअप घेउन ठेवला. पण कुठेही बॅकअप वगैरे घेतला तरी गुगलवर जीव जडलेला असल्यामुळे फिरुन फिरुन परत इथं आल्याशिवाय राहवत नाही. आज ब-याच दिवसांनी ब्लॉगवर काहीतरी उचापती केल्याचं समाधान मिळालं. ब-याच विषयांवर ब-याच दिवसांपासून काहीतरी लिहायचं मनात आहे. पण ब्लॉग पूर्ववत सुरु झाला तरी नजिकच्या भविष्यकाळात लिहायला मुहूर्त मिळेल असं वाटत नाही.

Friday, March 17, 2006

कैफियत टायपिंग येणा-याची

पूर्वी म्हणजे आपले आईवडील ग्रॅज्युएट झालेल्या दिवसांत इंटरव्ह्यूसाठी ‘बायो-डाटा’ भरला जायचा. (आजकाल ‘बायो-डाटा’ साठी ‘रिझ्युमे’ वगैरे ‘फ्याशनेबल’ शब्द आले आहेत. अर्थात आम्हीही तेच वापरतो.) त्या काळी बायो-डाटावर Skills मध्ये ‘टायपिंग’ असलं तर तो फार मोठा प्लसपॉईंट असायचा. म्हणजे आजकाल आपण कोणत्याही शाखेचे पदवीधर असलो तरी ‘रिझ्युमे’ वर ‘जावा’, ‘सी’, ‘सी++’ असं काहीतरी असलं की जसा प्लस पॉईंट असतो तसा. (एकदा इंजिनीअरींगला असताना आमच्या मास्तरांनी ‘सी++’ मधले दोन ++ कशासाठी असतात असा याच विषयाच्या तोंडी परिक्षेत प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर मला अजूनही सापडलेलं नाहीये. कोणाला माहिती असेल तर जरुर कळवा.) विषयांतर बाजूला, मुद्दा असा आहे की पूर्वीच्या काळी टायपिंग येणं हा एक प्लस पॉइंट होता. तुम्हाला वाटेल, आज, या संगणकाच्या युगात जिथं एक सहस्रांश सेकंदालाही इतकं महत्व आहे, तिथं टायपिंगची गरज जास्त आहे. कारण सरळ आहे. वेळ वाचावा म्हणून. पण मला तसं मुळीच वाटत नाही. इथे वेळ वाचवायचाय कुणाला. त्यामुळे टायपिंग येण्याचे फायद्यापेक्षा तोटेच जास्ती आहेत हे मी स्वानुभवावरुन सांगू शकतो. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याल्या टायपिंग येतं आणि आपण रेल्वेचं आरक्षण करायला गेलो आहोत असं समजा.

कुठेही गेलं तरी रांगेत उभं राहणं हे आपल्या पाचवीलाच पुजलेलं असतं. कारण.... बरोबर... रांगेचा फायदा सर्वांना. अर्धा-पाउण तास रांगेत उभं राहिल्यावर आपल्या पुढच्या माणसाचा नंबर येतो. तो आरक्षण खिडकीजवळ जातो. आपण त्याच्या मागेच उभे असतो त्यामुळे आपल्याला खिडकीच्या आतलं सगळं दिसत असतं. पुढच्याला महालक्ष्मी एक्स्प्रेसचं स्लीपरचं आरक्षण हवं असतं. मिश्रा किंवा राव असा कोणीतरी आरक्षण अधिकारी त्याच्याकडचा फॉर्म घेतो. एकदा चष्म्यातून फॉर्मकडे बघतो. नंतर चष्म्यावरुन तिरप्या नजरेने फॉर्म भरणा-याकडे बघतो. महालक्ष्मी मधलं ‘म’ टाईप करण्यासाठी तर्जनी पुढे करुन ‘म’ शोधू लागतो. दोनेक मिनीटांनी त्याला सगळी अक्षरं सापडतात. त्याला तसं एका हाताच्या एका बोटानं अक्षरं शोधताना पाहून आपले हात टाईप करण्यासाठी शिवशिवत असतात. महालक्ष्मीचा डबा भरलेला असतो. आरक्षण हव्या असलेल्या समोरच्या माणसाला तो अधिकारी विचारतो,
“महालक्ष्मी १२ तारीखको फुल है, १३ का चलेगा क्या?”
“१२ का फुल्ल है क्या? मग सह्याद्रीका देखो.” आपल्या पुढचा म्हणतो.
पुन्हा ह्याचा ‘स’ शोधण्याचा खेळ सुरु होतो. आता मात्र आपला संयम सुटलेला असतो. त्याच्या हातातून तो कीबोर्ड हिसकावून घेउन फटाफट फॉर्म टाईप करुन देण्यासाठी आपले हात असे शिवशिवत असतात. पण निमूटपणे त्याचा तो अक्षरं शोधाशोधीचा खेळ पाहण्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे आपला संताप अनावर होतो.

पण टायपिंग येत नसेल तर असा संताप अनावर होण्याचा प्रश्न येत नाही. कारण आपल्याला स्वतःला येत नसल्यामुळे आपण इतरांना फारसा दोष देत नाही. टायपिंग येत असेल तर मात्र असा छळ इतर ब-याच ठिकाणी सहन करावा लागतो.

कुणाशीही याहू निरोप्या किंवा गुगल बोलक्यावर आपण चॅटिंग करायला बसतो. आपण फटकन काहीतरी प्रश्न विचारतो आणि पलिकडच्याच्या उत्तराकडे डोळे लावून बसतो. खालच्या चौकटीत दोन मिनीटं ‘अमुक व्यक्ती टाईप करत आहे’ असं दिसत असतं. नंतर थोड्या वेळानं ‘अमुक व्यक्तीनं संदेश पाठवेलेला आहे’ असं दिसतं. पण तो संदेश काही लवकर येत नाही. शेवटी कंटाळून आपण पुढचा संदेश लिहीत असतानाच त्याच्याकडून उत्तराऐवजी दुसराच प्रश्न येतो. मग आपण अर्धवट लिहीलेला पहिला संदेश खोडून त्याच्या प्रश्नाला उत्तर पाठवतो आणि प्रत्युत्तराची वाट पाहात बसतो. पण पुन्हा आपण पहिल्याच चक्रामध्ये अडकतो आणि हा खेळ असाच सुरु राहातो. हल्ली इंटरनेटचा वेग वाढल्यामुळं वेबकॅमवर पलिकडच्या व्यक्तीला पाहण्याची सोय झाली आहे. पण वेबकॅम लावला तरी आपला प्रॉब्लेम काही सुटत नाही. आपण वेबकॅम लावतो ते पलिकडच्या व्यक्तिला पाहायला. पण दिसतं ते फक्त मान खाली घालून कीबोर्डवरची अक्षरं शोधणारं डोकं. आत्ता वर बघेल, नंतर वर बघेल म्हणून आपण अगदी स्क्रीनकडे पाहात बसतो. पलिकडचा ज्या वेळी वर बघतो त्यावेळी कॅमेरा रिफ्रेशच होत नाही आणि पुन्हा स्क्रीनवरचं दृश्य तेच राहतं. आपला धीर असा हळूहळू सुटतच जातो आणि सर्वांना शाळेतच टायपिंग सक्तीचं का केलं नाही म्हणून शिक्षणमंत्र्यांना आपण शिव्यांची लाखोली वाहातो.

त्यामानानं टायपिंग न येणा-या लोकांचं बरं असतं. टायपिंग न येणा-या दोन व्यक्ती चॅटींग करत असल्या की त्यांना काही अडचणी येत नाहीत. आपण काहीतरी टाईप करताना समोरच्यानं उत्तर दिलं तरी आपण आपलं उत्तर पाठवून झाल्यावरच वरती स्क्रीनकडे बघतो. त्यामुळं आधी लिहीलेलं खोडून परत दुसरं लिहिण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपण उत्तर पाठवेपर्यंत आणखी दोन संदेश आलेले असतात. त्याला उत्तर देईपर्यंत आणखी दोन येतात. पलिकडेही तशीच परिस्थिती असल्यामुळं दोघांचं सिंक्रोनायझेशन अगदी छान जमतं.

बघा. टायपिंगचे फायद्यापेक्षा तोटेच कसे जास्त आहेत. टायपिंगमुळे वेळ वाचतो वगैरे या सर्व बाता आहेत. वेळ वाचण्यापेक्षा असा वायाच जातो आणि वर मनस्ताप होतो तो वेगळाच. त्यामुळे टायपिंग शिकू इच्छिणा-या सर्व लोकांना माझा एक सल्ला आहे. तो म्हणजे पुन्हा एकदा विचार करा. कारण पुढे केव्हाही जाता येईल पण एकदा पुढे गेलात की मागे फिरता येणार नाही. टायपिंग न येणा-या लोकांना टायपिंग न शिकण्याचे फायदे इतरांना पटवून देण्यासाठी या लेखाचा निश्चितच उपयोग होईल अशी आशा करतो आणि ही 'टायपिंग येणा-याची कैफियत' इथेच संपवतो.

Wednesday, March 01, 2006

एक अनुभव संयुक्त संस्थानांचा

संयुक्त संस्थानाचा दोन आठवड्यांचा दौरा, त्यानंतर तीन दिवसांची स्की सहल आणि या सर्वांची तयारी. त्यामुळे मागचा महिना तसा धावपळीतच गेला. प्रयोगशाळेतल्या दोन मुलांचे दोन शोधनिबंध निवडले गेल्यामुळे त्यांच्याबरोबर आम्हालाही सॅन फ्रान्सिस्कोतील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राला उपस्थित राहण्याची संधी प्राध्यापकांनी दिली. त्यानिमित्त संयुक्त संस्थानाला भेट देण्याचा योग आला. एके काळी तिथं जाऊन उच्च शिक्षणाचं स्वप्न पाहणा-या माझं जपानला आल्यापासून संस्थानाचं आकर्षण ब-याच प्रमाणात कमी झालं होतं. किंबहूना संस्थानाला भेट देण्यापेक्षा माझ्या संशोधन क्षेत्रामध्ये सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या ISSCC (International Solid State Circuits Conference) या चर्चासत्राचच मला जास्त आकर्षण होतं. पण तरीही आत्तापर्यंत निरनिराळ्या लोकांकडून ऐकलेली वर्णनं, हॉलिवू़ड चित्रपट आणि मालिकांमधून दिसणारी प्रतिमा आणि भारतीयांना (का कुणास ठावूक) एकदा गेल्यावर परत न यावसं वाटणारा असा हा देश प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता होतीच. एक-दीड वर्ष जपानच्या राहणीमानाची सवय होऊन अमेरीकेला भेट देणारे माझ्यासारखे फारच थोडे जण असावेत. प्रत्येक भेटीगणिक आपला एखाद्या देशाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. म्हणूनच आपला अमेरीकेच्या पहिल्या प्रवासाचा अनुभव कसा होता हे परत कधीतरी वाचण्यासाठी लिहून ठेवावंसं वाटलं. अर्थात माझं लिखाण हे इतरांनी वाचण्याच्या पात्रतेचं नसल्यामुळं त्यात थोडी छायाचित्रं घालून माझ्या लेखनमर्यादा लपवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. तसा इथेही केलाय.

नेहमीप्रमाणे सामानाची आवराआवर करुन प्रयोगशाळेतल्या दहा जणांसोबत टोकियोजवळील नारिता विमानतळावर पोचलो. शनिवारी दुपारी ४ वाजता विमानात बसून शनिवारीच सकाळी ६ वाजता सॅन फ्रान्सिस्कोला पोचलो. वेळेतील फरकामुळे आपल्याला एक दिवस ज्यादा अनुभवायला मिळाला याची मजा वाटली. पण परत येताना निघण्याच्या वेळेपेक्षा एक दिवस उशीरा पोचल्यामुळे ती मजा विरली. व्हीजा मिळवताना अमेरीकनांच्या व्यावसायिकतची झलक दिसलीच होती. सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर उतरल्यापासून त्याची पुरेपूर प्रचिती येऊ लागली. विमानतळावर उतरल्यावर इमिग्रेशन आटोपून बाहेर आम्ही काही सहका-यांची वाट पाहात थांबलो असतानाच तिथल्या एका अधिका-यानं "hey you guys, party's over. leave now" असं म्हणत आम्हाला तिथून अक्षरशः हाकलून लावलं. एरवी भारतातून थेट गेलो असतो तर मला त्याच्या या वागण्याचं काहीच वाटलं नसतं. पण जपानमधील आदरातिथ्य आणि आपुलकीची सवय झाल्यामुळं मला आणि माझ्याबरोबरील भारतीय आणि चीनी मुलांना त्याचं ते बोलणं फारच उर्मट आणि गुर्मीनं भरलेलं वाटलं. पण जिथे जॉर्ज फर्नांडिस संरक्षणमंत्री असूनदेखील यातून सुटले नाहीत तिथे आम्ही काय असा विचार करत आम्ही बाहेर पडलो.

विमानतळापासून हॉटेल फार दूर नव्हतं. लोकल ट्रेनमधून चाळीसएक मिनीटांमध्ये हॉटेलवर पोचलो. चर्चासत्र सुरु होण्यास अजून दोन दिवस अवकाश होता. त्यामुळे थोडा वेळ विश्रांती घेऊन शहराचा फेरफटका मारायला निघालो. हॉटेल अगदी शहराच्या डाउनटाउन की काय म्हणतात तश्या जागी होतं. तिथून जवळच केबल कारचं स्टेशन होतं. केबल कारमध्ये बसून जवळच्या 'Fishermans Wharf' कडे निघालो. आजूबाजूला दिसणा-या प्रत्येक गोष्टींची तुलना मन आपोआपच जपानशी करत होतं. अमेरीकेतील गोष्टींचं (त्यात माणसंही आली) दुपटीने किंवा तिपटीनं मोठं असणारं आकारमान सोडलं तर दोन्हींमध्ये तुलनात्मक फरक तसा कमीच होता. टोकियोत भारतीय फारच कमी दिसतात. इथे मात्र पावलोपावली बरेच भारतीय दिसत होते. 'Fishermans Wharf' वर पोचल्यावर जपानी आणि चीनी सहका-यांनी खेकड्यांवर यथेच्छ ताव मारला. आम्ही मात्र ब-याच दिवसांनंतर शाहाकारी जेवण मिळाल्याच्या वेगळ्याच आनंदात होतो. 'Fishermans Wharf' वरुन जगप्रसिध्द गोल्डन गेट पुल दिसत होता. पण तिथे जाण्यासाठी गाडी नसल्यामुळे बेत रद्द करावा लागला. इथं गाडी नसेल तर माणूस अपंगच आहे असं ऐकून होतो. त्याचा प्रत्यय आला. मग तिथेच जवळपास थोडा फेरफटका मारुन हॉटेलवर परतलो. रात्री वालचंदमधले चार मित्र भेटले. त्यांच्याबरोबर जुन्या आठवणींना उजाळा देत रात्र कशी गेली ते कळलंच नाही.

दुस-या दिवशी जगविख्यात स्टॅन्फर्ड विद्यापीठ पाहून आलो. पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेपुढे गुडघे टेकून कसंबसं विद्यापीठात पोचलो. पण विद्यापीठाच्या परिसरात पोचल्यावर मात्र एवढी कसरत करुन गेल्याचं समाधान मिळालं. विद्यापीठाच्या मोठ्या नावाला साजेसाच असणारा विस्तीर्ण पसरलेला हिरवागार परिसर आणि कल्पक रचनेच्या इमारतींनी लक्ष वेधून घेतलं. रविवार असल्यामुळे बरेच विभाग आणि इमारती बंद होत्या. तरीही उरलेल्या इमारती आणि परिसर पाहण्यात दिवस कसा गेला ते कळलंच नाही. पण खरोखरच स्टॅन्फर्ड विद्यार्थ्यांची 'dream university' का आहे ते तिथे गेल्यावर लक्षात आलं.

पुढचे तीनही दिवस चर्चासत्रामध्ये व्यग्र असल्यामुळे कुठेही फिरता आलं नाही. पण ज्यांची पुस्तकं वाचून आम्ही इंजिनिअरींगचे धडे गिरवले अशा जगभरातून आलेल्या प्राध्यापक आणि इतर बुध्दीवंतांना प्रत्यक्ष भेटल्यावर तिथे गेल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. चर्चासत्र आटोपल्यावर मी काही दिवसांसाठी आप्तेष्ट आणि मित्रांना भेटण्यासाठी फिलाडेल्फियाला निघालो. मला डेट्रॉइटवरुन विमान बदलायचे असल्यामुळे मी डेट्रॉइटकडे जाणा-या विमानाजवळच्या प्रतिक्षाकक्षात बसलो. तिथे एक भारतीय मुलगा भेटला. विमान सुटायला बराच अवकाश असल्यामुळे आम्ही बोलायला सुरुवात केली. माझ्या मते भारतीयांचे काही गुणधर्म ते कुठेही गेले तरी बदलत नसावेत (त्याला मीही अपवाद नाही). दोन भारतीय माणसे भेटली तरी आधी इतरच गोष्टी होतात. नावाचा उल्लेख नेहमी शेवटी होतो. यावेळेही तसंच झालं. त्यानं थेट प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली.
"कुठे निघाला आहेस?" - तो
"फिलाडेल्फिया" -मी
"मीही फिलाडेल्फियालाच निघालो आहे. कुठे राहतोस तू?" - तो
"मी फिलाडेल्फियामध्ये राहात नाही. मी काही कामानिमित्त निघोलो आहे"
"अच्छा अच्छा. मग कुठे असतोस तू?"
"मी जपानला असतो"
मी जपान म्हटल्याबरोबर त्याच्या भुवया उंचावल्या. चमत्कारीक नजरेने माझ्याकडे पाहात तो म्हणाला "जपानमध्ये काय करतोस तू?" जपान ही काय राहायची जागा आहे का, असंच त्याच्या आविर्भावावरुन वाटत होतं.
"मी तिथे एका विद्यापीठात शिकतो."
"मग इकडे काय करतो आहेस?"
"इथे एका चर्चासत्रासाठी आलो होतो" मी मनात म्हटलं, 'का बाबा, मी जपानमध्ये राहातो म्हणजे अमेरीकेला येवू शकत नाही का? की पुढच्या वेळी तुझी परवानगी घेऊन येऊ?'
"जपानमध्ये काय शिकतोस तू?" - जपानमध्ये शिकण्यासारखं काही असतं का अश्या आविर्भावात त्यानं पुढचा प्रश्न केला.
"मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगमध्ये एम.एस. करतो आहे." - मी
हा 'चुकून भारतात जन्मला' आहे हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं.
"तू पण इथे शिकतोस का?" - मी
"हो. मी फिलाडेल्फीयामधल्या एका विद्यापीठात शिकतो. तू तूझं इंजिनिअरींग कुठून केलंस?" -त्यानं विचारलं.
"मी सांगलीच्या वालचंद इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिकलो" - मी
"कोणती युनिव्हर्सिटी?"
"कोल्हापूरची शिवाजी युनिव्हर्सिटी"
"ती कुठे आहे?"
"महाराष्ट्रात." याला सांगली आणि कोल्हापूर कुठे आहे ते माहीत नसणार असं मला वाटलंच होतं. मी ही त्याला तोच प्रश्न विचारला.
"तू तुझं याधीचं शिक्षण कुठे पूर्ण केलंस?" - मी
त्यानं 'बँगलोर" असं उत्तर दिलं. मी काही पुढं बोलणार एवढ्यात त्यानं खिशातून मोबाईल काढून मित्राला/मैत्रिणीला फोन लावला आणि जे मोठ्यानं बोलायला सुरुवात केली ते विमानात बसेपर्यंत त्याचं बोलणं चालूच होतं.
'बाबा रे, तू इथं आहेस हेच बरं आहे. भारतात परत येण्याचा विचार करु नकोस' असं मनात म्हणत मीही हेडफोन लावून गाणी ऐकायला सुरुवात केली.
कोणीतरी भारतीय बोलायला भेटल्यामुळे मला झालेला आनंद असा थोड्याच वेळात विरला.

दुस-या दिवशी सकाळी फिलाडेल्फियाला पोचलो. विमानतळापासून ऍलनटाउनमधल्या घरी जाईपर्यंत शहराबाहेरील (ग्रामीण अमेरीका असं लिहायचं होतं पण ही कल्पना जरा झेपत नाहीये.) अमेरीकेचं दर्शन घडत होतं. रस्ताच्या दुतर्फा टुमदार पण प्रशस्त बंगले, त्यांच्यासमोर असलेली हिरवळ आणि सभोवती उभ्या असणा-या अनेक गाड्या असं दृश्य चित्रपटात पाहिलेलं दृश्याशी अगदी मिळतंजुळतं होतं. फिलाडेल्फियात पाच-सहा दिवस घरच्या जेवणावर ताव मारत वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही. मध्येच एका शनिवारी वालचंदमधला मित्र प्रशांत भेटला. त्याच्या समवेत न्यूयॉर्कला जायचा बेत आखला. हवामान खात्यानं बर्फाची सूचना दिली होतीच. तरीही आल्यासारखं न्यूयॉर्कला एक चक्कर टाकून येवू असं म्हणून निघालो. दोन अडीच तास ड्राईव्ह करुन न्यूजर्सीला पोचलो. गाडी पार्किंगचा तिथं मोठाच प्रश्न होता. त्यात एक-दीड तास खर्ची पडला. शेवटी एका ठिकाणी गाडी पार्किंगसाठी जागा मिळाली. तिथून लोकल ट्रेन पकडून सर्वात आधी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा पाहण्यासाठी फेरी सुटण्याच्या जागेवर पोचलो. वाटेत स्टेशनवर वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीची जागा दिसली. एका मोठ्या खड्ड्याशिवाय आता तिथं काहीही उरलं नव्हतं. त्यामुळे तिथे जास्त वेळ न घालवता फेरी सुटण्याच्या जागेकडे निघालो. पुतळ्याकडे जाणारी शेवटची फेरी अगदी पाच मिनीटांच्या अंतराने चुकल्यामुळं आम्ही थोडं निराश झालो. पण धूसर हवामानामुळं तिथं जाउनही फारसा फायदा झाला नसता अशी मनाची समजूत घालून आजूबाजूला चक्कर टाकायला निघालो. ब्रॉडवे, वॉल स्ट्रीट अशी प्रसिध्द ठिकाणं पाहिल्यावर टाईम्स स्क्वेअरला जायचं ठरलं. वाटेत प्रसिध्द मादाम तुसॉ संग्रहालय लागलं. त्यामध्ये दोन तास वेळ कसा गेला ते कळलंच नाही. बाहेर पडून टाईम्स स्क्वेअरला पोचलो. एव्हाना तुरळक बर्फ पडायला सुरुवात झाली होती. टाईम्स स्क्वेअरला थोडा वेळ थांबून जवळच असलेल्या प्रसिध्द एंपायर स्टेट इमारतीकडे निघोलो. एंपायर स्टेटच्या टोकावरुन रात्री न्यूयॉर्क शहराचं दर्शन घेण्याचा बेत होता. पण खराब हवामानामुळे त्या इमारतीमधला निरीक्षण कक्ष बंद आहे असं कळल्यामुळे तिथेही निराशाच झाली. रात्र झाल्यामुळे परत फिलाडेल्फियाला निघालो. बर्फाचा जोर वाढला होता. बर्फात रस्त्यावरुन गाडी चालवणं तसं साहसच होतं. प्रशांतसाठीही बर्फातून गाडी चालवण्याची पहिलीच वेळ होती. पण तरीही त्यानं दोन तासात गाडी व्यवस्थित फिलाडेल्फियाला पोहोचवली.

दुस-या दिवशी रविवार असल्यामुळे निवांत उठून नाष्टा उरकल्यावर 'रंग दे बसंती' चित्रपट पाहायला जायचं ठरलं. चित्रपटगृह चाळीस मैलावर होतं. वाटेत बरंच बर्फ साठल्यामुळे पत्ता शोधत तिथं पोचेपर्यंत दीड-दोन तास जाणार होते. आमच्याकडे जेमतेम सव्वा तास होता. टोकियोत हिंदी चित्रपट पाहण्याची कोणतीही संधी उपलब्ध नसल्यामुळे ही संधी न दवडता हा चित्रपट पाहायचाच असं ठरवलं. पुन्हा मी आणि प्रशांत बर्फामध्ये गाडी घेउन बाहेर पडलो. चित्रपट सुरु होण्याची वेळ जवळ येत चालली होती आणि अंतर मात्र संपत नव्हतं. निम्मं अंतर आल्यावर लक्षात आलं की चित्रपटाचा सुरुवातीचा अर्धा-पाऊण तास चुकणार आहे. मग तशीच गाडी परत मागे वळवावी का असा विचार चालू होता. पण प्रशांतला बर्फात गाडी चालवण्यात एक वेगळीच मजा येत होती. त्यामुळं हा साहसी प्रवास असाच पुढे चालू ठेवायचं ठरलं. त्यानं मोठ्या शिताफिनं गाडी चालवत आम्हाला चित्रपटगृहापाशी आणलं पण तरीही अर्धा तास उशीर झालाच. चित्रपटगृहाजवळ जाउन पाहतो तर तिथे टाळं. पण येतानाच्या दोन तासांच्या थ्रिलिंग प्रवासामुळे त्याचं फारसं वाईट वाटलं नाही. चार तासांचा ड्राईव्ह आटोपून पुन्हा घरी परतलो.

एक दोन शॉपिंग मॉल आणि ग्रंथालय यांना दिलेल्या भेटी सोडल्या तर नंतर ऍलनटाउनमध्ये इतरत्र कुठे जाण्याचा प्रसंग आलाच नाही. पण एकंदरीत भारतीयांच्या मोठ्या संख्येमुळे किराणा दुकानात मिळणा-या भारतीय वस्तू आणि ग्रंथालयात मिळणा-या हिंदी चित्रपटांच्या चकत्या पाहिल्यावर अमेरीका म्हणजे एक छोटेखानी भारतच असल्यासारखं वाटलं.

अमेरीकेतील दोन आठवड्यांचा मुक्काम संपवून पुन्हा टोकियोकडे येण्यासाठी निघालो. दोन आठवडे तिथे राहताना तिथले प्रशस्त रस्ते, टुमदार बंगले, भारतातली कोणतीही मिळणारी वस्तू, सर्वत्र इंग्रजीत असणा-या पाट्या, कुठेही मिळणारं शाकाहारी जेवण या सर्वांचा हेवा वाटला. पण अमेरीकन व्यावसायिकता आणि कोरड्या औपचारीकपणामध्ये जपानच्या आदरातिथ्यामधला ओलावा आणि आपुलकीची उणीव भासली. नारिता विमानतळावर पोचल्यावर जपानी पाट्या दिसल्या आणि जपानी सूचना ऐकल्यावर एकदम हायसं वाटलं. नाही म्हटलं तरी आपण जिथं राहतो त्या जागेशी एक भावनिक बंध तयार होतोच. (अर्थात् या वाक्याचा 'हा आता जपानचा झाला' असा कोणी अर्थ काढू नये). कोण जाणे, उद्या मी अमेरीकेत एक वर्ष राहिलो तर तिथंही असाच बंध तयार होईल. असो.

अमेरीकेहून आल्यावर दुस-या दिवशी लगेच तीन दिवसांची स्की सहल झाली. पण त्याविषयी पुन्हा केव्हातरी. तूर्तास इतकेच.

Saturday, January 21, 2006

भारत वि. इंडिया

अगदी सकाळचीच गोष्ट. मी आणि माझ्या मित्रामध्ये संभाषण सुरु होतं.

“मग काय, इंडियाला परत कधी येतो आहेस?” – मित्र
“का रे बाबा, भारताचा इंडिया केव्हापासून केलास?” – मी. मराठी बोलताना कोणी भारताचा ‘इंडिया’ केला की मला मनस्वी संताप येतो.
‘अरे वा, जपानमध्ये गेल्यावर त्या लोकांकडे बघून तुला पण हे नविन भाषाप्रेम सुचलेलं दिसतंय’
‘तसं काही नाहीये. मला इथे येण्यापूर्वीही ही गोष्ट आवडत नव्हती आणि आजही आवडत नाही. आणि इंग्रजांच्या भाषेत कितीही चांगलं वाटलं तरी आपल्या मायमराठीच्या तोंडी भारताचं ‘इंडिया’ हे नाव शोभत नाही हेच खरं.’
‘बाळ, तू कुठल्या जगात वावरतोयस? तू राहात असलेला ‘भारत’ कधीच अस्तास गेला. आता नविन ‘इंडिया’ उदयास आलाय. पूर्वी इंडिया म्हणणं फॅशन होती. आता ते स्टॅंडर्ड झालं आहे. ‘भारत’ म्हणजे अगदी खेडवळ वाटतं. ‘इंडिया’ बघ कसं एकदम पॉलिश्ड आणि cool वाटतं. अरे, जिथे खेड्यातसुध्दा आजकाल कोणी भारत असं म्हणत नाहीत, तिथे तुझं माझं काय घेउन बसलास. त्यामुळं तूही आता ते जुनंपुराणं नाव टाकून नविन स्टाईलीश ‘इंडिया’ म्हणायला सुरुवात कर.’
‘अरे नाव म्हणजे काय वस्त्रं आहेत का जुनी टाकून नवी परिधान करायला? आम्ही होतो तिथेच बरे आहोत. तुझं ते पॉलिश्ड आणि cool नाव तुलाच लखलाभ असो’
असं म्हणून मी ते संभाषण बंद केलं खरं, पण माझ्या डोक्यात पुन्हा एकदा विचारचक्रं फिरु लागली आणि तावातावानं ही नोंद लिहायला घेतली.

“एखाद्याच्या तोंडून भारताऐवजी ‘इंडिया’ असं ऐकिवात आलं तर महाशय NRI आहेत असं समजावं” असं वर्षा-दोन वर्षांपूर्वी शेखर सुमन त्याच्या कुठल्याश्या एका कार्यक्रमात म्हणाला होता. त्यामुळे आजपर्यंत ‘इंडिया’ म्हणणं म्हणजे निव्वळ NRI अर्थात् Non Required Indians चीच मक्तेदारी होती असंच मला वाटायचं. वर्षा-दोन वर्षात परिस्थिती एवढी बदलली? याचं कारण काय बरं असावं? अर्थात उत्तर सापडायला फार वेळ लागला नाही. म्हणजे बघा. टी.व्ही वरची क्रिकेटची मॅचच घ्या. कॉमेंटेटर ची वाक्यं ही अशी
“इंडिया को जीतने के लिये १ ओवर में ११ रनोंकी जरुरत. बोहोत ही खराब सिच्युएशन. इंडिया का जीतना मुश्कील. चेतन आपको क्या लगता है, क्या युवराज सिंग और कुंबले इस सिच्युएशन से इंडिया को बाहर निकाल पाएंगे?”
हे तर काहीच नाही. सर्वात कहर केलाय तो ‘व्ही.जे’ आणि तत्सम ‘अँकर्स’नी. नुकत्याच झालेल्या स्टार वनवरच्या laughter challenge च्या कार्यक्रमाची ही अँकर पाहा कशी बोलतेय.
“केहते है A laugh a day keeps the doctor away. So welcome to the first ever एक ऐसा शो जो हसा-हसाके आपको घायल करदेगा. हम आपके लिये ढूंढके लाये है इंडिया के टॉप funny 50 और हर हफ्ते we get you five of them. So let’s see कौन बनेगा इंडिया का नंबर वन कॉमिक”
अहाहा¡ काय Hinglish (Hindi + English) आहे. ऐकून कान अगदी तृप्त झाले. ‘M’ आणि ‘V’ वाहिन्यांवरच्या V.J. बद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. त्यांनी तर स्टॅंडर्ड Hinglish कसं बोलावं याचा नविन आदर्शच उभा करुन ठेवलाय.

आता माझ्या मित्रासारखे काही लोक म्हणतील
‘च्यामारी, त्यांना काय म्हणायचंय ते म्हणू दे ना. तुला काय प्रॉब्लेम आहे. या देशात, चुकलो, ‘इंडियात’ प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. कोणी काय म्हणावं हे ठरवण्याचा अधिकार तुला कोणी दिला?’
खरं आहे. ह्या सर्वांबद्दल आक्षेप घेण्याचा मला काहीच अधिकार नाही. आणि कदाचित नकळतपणे मीही या मार्गावरुन गेलो असेन किंवा जात असणारच. पण आत कुठेतरी एक आंतरिक टोचणी लागून राहते की हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. बदललं पाहिजे. कारण शेवटी बदलणं हे आपल्याच हातात असतं नाही का? (ही वरची वाक्यं कुठेतरी वाचल्यासारखी वाटतायत. मला अशा वेळी अगदी टीपीकल चित्रपटातले किंवा कथांमधले उपदेशाचे डोस का आठवतात कुणास ठावूक. भावनेच्या भरात ही नोंद लिहीत असल्यामुळे असेल कदाचित. असो.) आत्ताच आजचा सकाळचा अग्रलेख वाचला. काय योगायोग आहे. अग्रलेखाचा विषय आहे ‘मराठी अस्मितेचा आग्रह’. म्हणजे आम्ही इतरांपेक्षा फारसा वेगळा विचार नाही करत आहोत तर. पण मग हे सगळं होण्याचं कारण काय असावं? काहीही असो. ‘इंडिया शायनिंग’ चा हळूहळू वाढत चाललेला प्रभाव कुठेतरी कमी करुन ‘भारत उदय’ घडवायला हवा. चला, आपण आपल्यापासूनच सुरुवात करुया.
हीहीही. माझं मलाच हसू येतंय. मघापासून विचार करतोय. हे मी लिहीतोय हे कशाची तरी आठवण करुन देतंय. आत्ता आठवलं. दूरदर्शनवरची राष्ट्रीय साक्षरता मिशनची जाहिरात. 'चलो पढाएं, कुछ कर दिखाएं'.
दूरदर्शन झिंदाबाद!
आता एवढं सगळं गंभीरपणे लिहील्यावर ही नोंद या गाण्याशिवाय कशी पूर्ण होईल?

भारत हमको जान से प्यारा है
सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है

सदियों से भारतभूमी दुनिया की शान है
भारत मां की रक्षा में जीवन कुर्बान है

भारत हमको जान से प्यारा है
सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है ...

ही नोंद २६ जानेवारीसाठी परफेक्ट आहे एकदम. काय म्हणता?

।। जय भारत ।।

Monday, January 16, 2006

सफर राजप्रासादाची

रविवारी नेहमीप्रमाणे वर्तमानपत्रातलं साप्ताहिक राशिभविष्य वाचलं. दर आठवडयाला मी नित्यनेमानं भविष्य वाचतो खरं, पण त्यातलं फारसं काही मनावर घेत नाही. आणि भविष्य वाचून झाल्यावर दुस-या मिनीटाला त्यातलं काहीही लक्षातही राहिलेलं नसतं. पण वाचताना मजा येते. ज्योतिषी महोदयांनी बहुदा एकदाच काय ते पाच-पन्नास प्रकारचं भविष्य लिहून ठेवलेलं असावं. अचानक धनलाभ संभवतो, प्रत्येक कृतीतून यश, खर्चाला आवर घाला, अनुकूलतेकडे नेणारा सप्ताह, मानसन्मान मिळेल, वाहन जपून चालवा, आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, विचारपूर्वक निर्णय घ्या असं काहीतरी भविष्य १२ राशींना परम्युटेशन आणि कॉम्बीनेशन करुन आलटून पालटून येत असावं. या आठवड्यात मात्र माझ्या भविष्यामध्ये चक्क ‘लेखन व प्रकाशनाच्या क्षेत्रात प्रसिध्दी मिळेल’ असं लिहीलं होतं. खरं तर अलिकडे काही लिहायला वेळ मिळत नाहीये. पण भविष्य वाचल्यावर मनात म्हटलं आता काहीतरी लिहायलाच पाहिजे. पण काही सुचेना. मग मागच्या महिन्यातल्या राजप्रासादाच्या सहलीविषयी थोडसं लिहावं म्हटलं.

२३ डिसेंबरला जपानच्या सम्राटाचा वाढदिवस असतो. त्या दिवशी पूर्ण जपानला सुट्टी असते. लोकांना राजप्रासादात जाउन सम्राटाला भेटायची संधी मिळते. राजप्रासाद वर्षातून दोनच दिवस सामान्य लोकांना पाहण्यासाठी खुला असतो. एक म्हणजे २३ डिसेंबर आणि दुसरा नविन वर्षाच्या पहिला आठवड्यातील दुसरा दिवस. या वेळी प्रयोगशाळेतील एक मुलगा आम्हा परदेशी विद्यार्थ्यांना सम्राटाला पाहण्यासाठी घेउन गेला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याची सुध्दा ही पहिलीच वेळ होती.

टोकियो शहराच्या मध्यभागी टोलेजंग इमारतींच्या मधोमध शेकडो एकर जमिन एखाद्या राजाचीच असू शकते. टोकियो स्थानकावर उतरुन समोर थोडंसं अंतर चालून गेल्यावर राजवाड्याची सर्वात बाहेरील बाग आणि प्रवेशद्वार दिसू लागतं.




राजवाडा चोहोबाजूंनी असा खंदकानं वेढलेला आहे. आत अजून किती अंतर चालावं लागतं कोण जाणे असा विचार करत पुढे निघालो.







बाहेरील प्रवेशद्वारावर असं शाही स्वागत झालं.











खूप अंतर आत चालून गेल्यावर ही मुख्य राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरील इमारत दिसली.



मुख्य राजवाड्याच्या आत राजाला पाहण्यासाठी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. प्रत्येकाच्या हातात जपानचा राष्ट्रध्वज होता. सम्राट शाही परिवारासोबत दूरवर दिसणा-या बाहेरील सज्जावर येताच लोकांनी हातातील झेंडे फडकावत 'सम्राटांना दहा हजार वर्षे आयुष्य लाभो' अशा जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. पाच मिनीटं सारं वातावरण घोषणांनी एकदम भरुन गेलं.


सम्राट आणि सम्राज्ञी यांनीही हात उंचावून अभिवादनाचा असा स्वीकार केला.








राजवाड्यातून दुस-या मार्गानं बाहेर पडताना ही आणखी एक प्रवेशद्वारावरील इमारत दिसली.








सर्वात बाहेरच्या बगीच्यातील कारंजे.








बाहेर पडल्यावर राजवाड्याभोवती एक चक्कर टाकून पाहावी म्हटलं. बाहेरच्या तटबंदीवरील अशी एक चौकी दिसली.










(छायाचित्रांवर टिचकी मारल्यास मोठ्या आकारात पाहता येतील.)