Thursday, December 01, 2005

फुकुशिमा सहल

योगायोगानं एक महिन्यांच्या अंतरानं पुन्हा एकदा निसर्गरम्य ‘तोहोकु’ प्रांताला भेट देण्याची संधी मिळाली. पण या वेळी सहलीचा उद्देश निराळा होता. ‘यागामी फेस्टीव्हल’ हा आमच्या विद्यापीठाचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम. या वर्षी या कार्यक्रमात आपलाही बॅंड उतरवायचा असं आमच्या प्रयोगशाळेतील मंडळींनी ठरवलं. एकेक वाद्यासाठी एकेक सदस्य जमू लागला. गायकही ठरला. कार्यक्रम १० दिवसांवर येउन ठेपला होता. पण सरावासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता आणि जागाही. मग टोकियोपासून लांब कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात सराव करायचं ठरलं. त्यासाठी ‘तोहोकु’ शिवाय दुसरी कुठली चांगली जागा असणार? ठरलं. तीन दिवसांच्या फुकुशिमा सहलीचा आराखडा तयार झाला.

रविवारी सकाळी ७ वाजता एका ठिकाणी जमायचं ठरलं होतं. मंडळी आमची वाट पाहातच थांबली होती. जपानी मुलांबरोबर जाण्यात आणि आपण स्वतंत्र जाण्यात हाच फरक आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट कशी अगदी ठरल्याप्रमाणे व्यवस्थित. एका सेकंदाचाही फरक नाही. आम्ही मात्र ‘भारतीय वेळे’नुसार ७.१५ ला तिथे पोचलो. प्रयोगशाळेतील आम्हा दोघा ‘हिंदी’ मुलांबरोबर दोन ‘चिनी भाई’ पण होते. त्यांच्याबरोबर आम्हा १२ जणांची टीम दोन गाड्यांमधून फुकुशिमाच्या दिशेने निघाली. फुकुशिमा राज्य म्हणजे ‘तोहोकु’ प्रांताची सुरुवात. टोकियोच्या उत्तरेला ३०० कि.मी. वर फुकुशिमा राज्यात असणा-या ‘निहोनमात्सु’ या गावात आम्हाला पोचायचं होतं. तीन सदस्य संध्याकाळी उशीरा येणार असल्यामुळे जपानी गाण्यांचा आस्वाद घेत रमतगमत दुपारी १२ वाजता निहोनमात्सु ला पोचलो. दुपारचं जेवण आटोपून आरक्षित केलेल्या ‘पेन्शन’(जपानी ‘-योकान्’,’मिनशोकु’ अशा घरगुती हॉटेलांचंच एक भावंड) मध्ये पोचलो. त्या एवढ्याश्या गावात एका छोट्या ‘पेन्शन’मध्ये एका संगीतकाराच्या स्टुडीओलाही लाजवेल असा स्टुडीओ पाहून मी थक्क झालो. पेन्शनच्या सभोवतालचा परिसरही रम्य होता. तीन बाजूंना हिरवीगार शेतं आणि मागे डोंगर उतरुन गेल्यावर खळाळत वाहणारा छोटासा झरा अशा या पेन्शनरुपी फार्महाउसमध्ये तीन दिवस बाहेरचं जग विसरुन निसर्गाच्या सानिध्यात सुट्टी घालवायची या कल्पनेनं मन सुखावलं. ‘यागामी फेस्टीव्हल’ला अवघा एक आठवडा राहिला होता. त्यामुळे बॅंडच्या सदस्यांना वेळ घालवून चालणार नव्हतं. त्यांनी पोचल्यापोचल्या लगेच स्टुडीओचा ताबा घेतला आणि आपापली वाद्यं जोडून सरावाची तयारी सुरु केली. आम्हाला संगीतात गती नसल्यामुळे आणि जपानी गाणी म्हणण्याएवढा जपानीचा अभ्यास झाला नसल्यामुळे आम्ही आजुबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायचं ठरवलं. पेन्शनच्याएक काकूंना विचारलं असता त्यांनी जवळपासच्या २-३ ठिकाणांची नावं सांगितली. त्यात तिथलं एक प्रसिध्द प्राणिसंग्रहालय होतं. त्या प्राणिसंग्रहालयात पांढरा सिंह आणि पांढरा वाघ आहे असं ऐकिवात आलं. पण मंडळींना प्राणिसंग्रहालय पाहण्यात कोणतंही स्वारस्य नव्हतं. शिवाय ढगाळ वातावरणात पावसाची चिन्हं होतीच. त्यामुळे जवळच असलेला निहोनमात्सु ‘ज्यो’(castle) पाहण्यावर एकमत झालं.

१२व्या शतकात ‘योशित्सुने’ या सामुराई योद्धयाने ही गढी बांधली आहे. आता आपल्याकडील शनिवारवाड्याप्रमाणे इथलेही आतील अवशेष नष्ट झाले आहेत. पण बाहेरील मुख्य बांधकाम सुरक्षित आहे. प्रवेशद्वारावरील ‘योशित्सुने’च्या पुतळ्याने लक्ष वेधून घेतले. आतमध्ये ‘योशित्सुने’चा जीवनप्रवास दृकश्राव्य देखाव्यांच्या स्वरुपात मांडला आहे. ते देखावे आणि त्यांच्यासमोरील रंगाबेरंगी फुलांचे ताटवे पाहून मन प्रसन्न झालं. संध्याकाळी लवकर अंधार पडल्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी पेन्शनमध्ये परतलो. जेवण आटोपून ओनसेनचा आनंद लुटण्यासाठी पुन्हा एकदा बाहेर पडलो. एव्हाना पाउसही सुरु झाला होता. अर्धा-पाउण तास ओनसेनमध्ये डुंबून परतलो. रात्री थोडा वेळ बॅंडचा सराव पाहून झोपी गेलो.दुस-या दिवशी सकाळी न्याहारी उरकून ‘गोशिकीनुमा’ हे आणखी एक नयनरम्य ठिकाण पाहण्यास निघालो.

निहोनमात्सुपासून साधारण एक तासाच्या अंतरावर हा ‘पाच तळ्यांचा समूह’ आहे. या ठिकाणाचं वैशिष्टय म्हणजे पाचही तळ्यांमधील पाण्याचा वेगवेगळा रंग. शरद ऋतुतील वनराईच्या रंगामुळे या तळ्यांचं सौंदर्य आणखीच खुलून दिसत होतं. डोंगरांमधून हे दृश्य पाहण्यासाठी तयार केलेली पायवाट पाहून ‘ओईरासे’ची आठवण झाली. वर्णनापेक्षा ही छायाचित्रे पाहाणे उत्तम.











तीन दिवसांच्या सुट्टीमुळे गर्दीने सगळी ठिकाणं फुलून गेली होती. ‘गोशिकीनुमा’तच दुपारचं जेवण आटोपून जपानमधील ४थ्या क्रमांकाचं सर्वात मोठं, ‘इनावाशिरो’ सरोवर पाहण्यासाठी निघालो. सरोवराच्या जवळ गाडी जात नसल्यामुळे बरंच अंतर जालून जावं लागणार होतं. शिवाय ढगाळ वातावरण आणि नंतर पाऊस सुरु झाल्यामुळे सरोवराजवळ जायचा बेत रद्द करुन आम्ही जवळपासची दुकानं आणि काचेचं वस्तूसंग्रहालय पाहून परतलो. रात्रीचं जेवण आटोपल्यावर पावसानं थोडी मोकळीक दिली. बॅंडच्या सदस्यांनाही थोडी विश्रांती हवी होतीच. त्यामुळे बाहेर ‘हानाबी’ म्हणजे फटाक्यांची आतषबाजी करायचं ठरलं.

इथं जपानमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वत्र हानाबी साजरी केली जाते. प्रत्येक शहरात उन्हाळ्यात एकदा तरी समुद्राच्या किंवा नदीच्या काठाला संध्याकाळी एक जोरदार सार्वजनिक आतषबाजीचा कार्यक्रम असतो. जपानी तरुण मुले आणि मुली पारंपारिक ‘किमोनो’ परिधान करुन हानाबीचा आनंद लुटतात. हा आतषबाजीचा देखावाही अतिशय पाहण्यासारखा असतो. शिवाय इथली तरुण मुलं बाहेर सहलीला गेल्यावर किंवा घराजवळच स्वतंत्र हानाबी साजरी करतात ती वेगळीच. आम्हीही रात्री आमच्या पेन्शनच्या बाहेर हानाबीचा आनंद लुटला. तोहोकु प्रांत टोकियोच्या उत्तरेला असल्यानं इथं हळूहळू थंडी वाढायला सुरुवात झाली होती. बाहेरच्या गारठ्यात फटाक्यांच्या आतषबाजीचा आनंद लुटताना दिवाळीचा आठवण आल्याशिवाय कशी राहील? इथले काही फटाके आपल्यासारखे असले तरी बहुतेक सर्व फटाके कमी आवाज करणारे आणि जास्त प्रकाश देणारे. पण हानाबीची खरी मजा येते ती ‘सेंको हानाबी’मध्ये. गवताच्या काडीप्रमाणे बारीक असणा-या फुलबाजीचं एक टोक सर्वांनी एकाच वेळी पेटवायचं आणि दुस-या टोकाला धरुन फुलबाजी वर जळत येताना पाहायचं. शेवटी संपल्यावर काचेच्या फुग्यासारखा एक फुगा तळाशी तयार होतो आणि तो वा-याने किंवा छोट्याश्या धक्क्यानेही गळून पडतो. जो शेवटपर्यंत हा फुगा टिकवेल तो जिंकला. इथं अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ‘सेंकोहानाबी’चा आनंद लुटतात. किंबहुना त्याच्याशिवाय हानाबी पूर्णच होत नाही. त्याला आम्हीतरी अपवाद कसा असणार? सेंकोहानाबीची अगदी अटीतटीची लढत संपवून,१५ दिवस लवकर का असेना, छोटीशी दिवाळी साजरी करुन रात्री झोपी गेलो. तिस-या दिवशी दुपारी १२ वाजता पेन्शनची मुदत संपत असल्यामुळे सकाळची न्याहारी आटोपून पेन्शनच्या मागे असणा-या झ-याकाठी थोडा वेळ चक्कर मारुन सामानाची आवराआवर सुरु केली. एव्हाना बॅंडच्या सदस्यांची तालीमही व्यवस्थित झाली होती. पेन्शनच्या काका-काकूंचा निरोप घेउन १२ वाजता परतीला निघालो. वाटेत एक छान नैसर्गिस ओनसेन आहे असं कळालं. मग गाड्या तिकडे वळवल्या. जसं चौपाटीवर गेल्यावर भेळ खाल्याशिवाय चौपाटीवर गेल्याची मजा येत नाही तसं जपानमध्ये सहलीला जाउन ओनसेनमध्ये गेलो नाही तर सहल पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही. भुरुभुरु पडणा-या पावसात नैसर्गिक ओनसेनच्या गरम पाण्यात डुंबण्यात वेगळीच मजा असते. अर्धा-एक तास ओनसेनमध्ये डुंबून दुपारचं जेवण उरकून पुन्हा एकदा 'तोहोकु' सहलीच्या आठवणी मनात साठवून टोकियोच्या परतीच्या प्रवासाला लागलो.

(आणखी छायाचित्रे इथे पाहा.)

1 comment:

Prashant M Desai said...

विशाल, सगळे ब्लॊग वाचून झाले. छान लिहीतोस. वर ठेव.(keep it up).

प्रशांत