Thursday, December 01, 2005

अखेर...

अखेर... मी जपानी ड्रायव्हींग लायसन्स् मिळवण्यासाठीच्या दिव्व्यातून बाहेर पडलो. खरं तर माझ्याकडे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हींग लायसन्स् आहे. पण ते वापरुन आणखी फार फार तर सहा महिने गाडी चालवता येईल म्हणून जपानी लायसन्स् मिळवायचं ठरवलं. इकडेतिकडे बरीच चौकशी केल्यावर ते मिळवणं फारच कठीण आहे असं कळालं. कित्येक जणांनी हा नाद अर्धवट सोडून दिला असंही ऐकीवात आलं. पण भारतात सरकारी कचे-यांच्या चकरा मारण्याची सवय झालेल्या माझ्यासारख्याला या जपानी सरकारी कामकाजाचा असा किती त्रास होणार आहे असा विचार करुन मी परवाना मिळवायचं नक्की केलं. घरापासून दोन तास ट्रेनचा प्रवास करुन परवाना मिळण्याच्या परीक्षा केंद्रात पोचलो. चार पैसे हातावर ठेवले की लायसन्स् घरी पोचवणारे एजंट सोडले तर तिथलं वातावरण आपल्याकडच्या R.T.O. पेक्षा फार काही वेगळं नव्हतं. लोकांची वर्दळ, गोंगाट सारं काही तसंच होतं. फरक होता तो फक्त कामातील शिस्तबद्धता आणि प्रामाणिकपणाचा.

लेखी परीक्षेत पहिल्या प्रयत्नातच पास झालो. त्या दिवशीच्या माझ्या बॅच मध्ये टेस्ट पास करणारा मी एकटाच आहे असं तिथल्या अधिका-यानं सांगितलं. मग काय, अस्मादिकांची कॉलर एकदम ताठ. अरे काय चेष्टा आहे काय? इथल्या लोकांना जे दोन-दोन तीन-तीन प्रयत्नांनंतरही करता येत नाही ते आम्ही पहिल्याच प्रयत्नात करुन दाखवलं. मग गाडी चालवण्याच्या टेस्टसाठी एक आठवड्यानंतरची तारीख मिळाली. 'ही टेस्ट फार अवघड असते. पहिल्या प्रयत्नात कोणालाच यश मिळत नाही' असं प्रयोगशाळेतल्या मुलांनी वारंवार सांगितलं होतं. पण लेखी परीक्षेतल्या यशामुळं अजून हवेतच असलेली आमची स्वारी 'ये टेस्ट किस झाड की पत्ती' असं म्हणून काहीही तयारी न करता टेस्ट देण्यासाठी पुन्हा एकदा परीक्षा केंद्रावर पोचली. टेस्टची वेळ झाली. अधिका-यानं मला गाडीत बसायला सांगितलं. गाडीत पुढे एक आणि मागे एक असे दोन अधिकारी बसले होते. एकाचं लक्ष फक्त माझ्या नजरेवर आणि दुस-याचं माझ्या हालचाली आणि गाडीच्या दिशेवर. त्यांना बघितल्यावर मला हळूहळू प्रयोगशाळेतल्या एकेक सहका-यांचे शब्द आठवू लागले. थोडीतरी तयारी करायला हवी होती असा विचार करतच मी गाडी सुरु करुन टेस्ट ट्रॅकवर चालवायला सुरुवात केली. अर्ध्या वाटेवरच शेजारी बसलेल्या अधिका-यांनं थांबायला सांगितलं तेव्हाच मला कळलं की ही टेस्ट इथेच संपली. मी स्टॉपलाईनच्या पुढं ६ इंच गाडी थांबवली होती. टेस्टचा निकाल तिथंच लागला. तरीही अधिकृत निकाल आणि पुढची तारीख मिळण्यासाठी आणखी चार तास वाट पहावी लागणार होती. माझ्याबरोबर एक अमेरीकन मुलगा टेस्ट देण्यासाठी आला होता. त्याची ही तिसरी वेळ होती. मला पाहिल्यावर त्याचा चेहरा जणू 'बेटा, ये तो शुरुआत है' असंच सांगत होता. मी पण मग त्याला 'बेटा, हम इतनी आसानी से हार मानने वालों में से नही है' असा चेहरा करुन उत्तर द्यायचा प्रयत्न केला. जगात कुठेही जा, सरकारी कचे-यांच्या चकरा मारण्याच्या भारतीयांच्या नशिबाचे भोग कधी चुकायचे नाहीत. आता या कचेरीच्या किती फे-या माराव्या लागतात कुणास ठावूक असा विचार करत पुढच्या आठवड्याची तारीख मिळवून घरी परतलो. दुस-या वेळीही फारशी तयारी केली नव्हती.यावेळी मात्र कसाबसा ट्रॅक पूर्ण केला. पण अधिका-यांच्या चेह-यावरचे भाव काही समाधानकारक दिसले नाहीत. निकाल कळेपर्यंत आणखी चार तास वाट पाहावी लागणार होती. मागच्या वेळचा अमेरीकन मुलगा पुन्हा याही वेळी भेटला. या वेळी मात्र त्याचा पेशन्स संपला होता. त्यानं सगळ्या सिस्टीमवर आग ओकायला सुरुवात केली. आपल्याकडच्या कामाच्या पध्दतीतून तावून सुलाखून बाहेर पडल्यामुळे मला यात नविन काहीच नव्हतं. त्यामुळे मी शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होतो. चार तासांनंतर अधिका-यानं निकाल जाहीर करायला सुरुवात केली. टेस्ट पास झालेली मुलं आणि मुली असा काही आनंद व्यक्त करत होती की एखाद्याला वाटावं यांना लॉटरी लागली की काय, किंवा मिस् वर्ल्डचा किताब मिळाला की काय? कदाचित जपानी लोकांच्या जीवनात दोनच गोष्टी सर्वात महत्वाच्या असाव्यात. विद्यापीठात प्रवेश आणि ड्रायव्हींग लायसन्स्. मी याही वेळी पास होण्याची आशा सोडली होती. पण अखेरीस अधिका-यानं माझं नाव पुकारलं आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला. अमेरीकन महोदयांच्या नशिबानं पुन्हा एकदा त्यांना हुलकावणी दिली. दुस-याच प्रयत्नात मला मिळालेला परवाना पाहून चार-चार पाच-पाच प्रयत्नांनंतरही परवाना न मिळालेल्या लोकांची बोटं आपोआपच तोंडात गेली. काही लोकांना तर दहा प्रयत्नांनंतरही यश मिळत नाही. म्हणूनच बहुदा इथली बहुतांश जनता एखादी स्वस्तातली कार घेता येईल एवढी किंमत मोजून ड्राईव्हींग स्कूल मध्ये जात असावी. काही का असेना, आता मी जपानमध्ये गाडी चालवायला मोकळा. आता लवकरच एक 'दिल चाहता है' ची गाण्यांची सी.डी. मागवायला हवी. पण गोव्याला गाडीने जाण्यात जी मजा आहे ती इथे कुठली येणार आहे म्हणा. ठीक आहे. गोवा नाही तर नाही, इथल्या एखाद्या हिरोशिमाला जायला काय हरकत आहे? पाहू या, केव्हा मुहूर्त मिळतो ते !

1 comment:

Anonymous said...

Vishal, Good u got driving license. Congrats