अगदी सकाळचीच गोष्ट. मी आणि माझ्या मित्रामध्ये संभाषण सुरु होतं.
“मग काय, इंडियाला परत कधी येतो आहेस?” – मित्र
“का रे बाबा, भारताचा इंडिया केव्हापासून केलास?” – मी. मराठी बोलताना कोणी भारताचा ‘इंडिया’ केला की मला मनस्वी संताप येतो.
‘अरे वा, जपानमध्ये गेल्यावर त्या लोकांकडे बघून तुला पण हे नविन भाषाप्रेम सुचलेलं दिसतंय’
‘तसं काही नाहीये. मला इथे येण्यापूर्वीही ही गोष्ट आवडत नव्हती आणि आजही आवडत नाही. आणि इंग्रजांच्या भाषेत कितीही चांगलं वाटलं तरी आपल्या मायमराठीच्या तोंडी भारताचं ‘इंडिया’ हे नाव शोभत नाही हेच खरं.’
‘बाळ, तू कुठल्या जगात वावरतोयस? तू राहात असलेला ‘भारत’ कधीच अस्तास गेला. आता नविन ‘इंडिया’ उदयास आलाय. पूर्वी इंडिया म्हणणं फॅशन होती. आता ते स्टॅंडर्ड झालं आहे. ‘भारत’ म्हणजे अगदी खेडवळ वाटतं. ‘इंडिया’ बघ कसं एकदम पॉलिश्ड आणि cool वाटतं. अरे, जिथे खेड्यातसुध्दा आजकाल कोणी भारत असं म्हणत नाहीत, तिथे तुझं माझं काय घेउन बसलास. त्यामुळं तूही आता ते जुनंपुराणं नाव टाकून नविन स्टाईलीश ‘इंडिया’ म्हणायला सुरुवात कर.’
‘अरे नाव म्हणजे काय वस्त्रं आहेत का जुनी टाकून नवी परिधान करायला? आम्ही होतो तिथेच बरे आहोत. तुझं ते पॉलिश्ड आणि cool नाव तुलाच लखलाभ असो’
असं म्हणून मी ते संभाषण बंद केलं खरं, पण माझ्या डोक्यात पुन्हा एकदा विचारचक्रं फिरु लागली आणि तावातावानं ही नोंद लिहायला घेतली.
“एखाद्याच्या तोंडून भारताऐवजी ‘इंडिया’ असं ऐकिवात आलं तर महाशय NRI आहेत असं समजावं” असं वर्षा-दोन वर्षांपूर्वी शेखर सुमन त्याच्या कुठल्याश्या एका कार्यक्रमात म्हणाला होता. त्यामुळे आजपर्यंत ‘इंडिया’ म्हणणं म्हणजे निव्वळ NRI अर्थात् Non Required Indians चीच मक्तेदारी होती असंच मला वाटायचं. वर्षा-दोन वर्षात परिस्थिती एवढी बदलली? याचं कारण काय बरं असावं? अर्थात उत्तर सापडायला फार वेळ लागला नाही. म्हणजे बघा. टी.व्ही वरची क्रिकेटची मॅचच घ्या. कॉमेंटेटर ची वाक्यं ही अशी
“इंडिया को जीतने के लिये १ ओवर में ११ रनोंकी जरुरत. बोहोत ही खराब सिच्युएशन. इंडिया का जीतना मुश्कील. चेतन आपको क्या लगता है, क्या युवराज सिंग और कुंबले इस सिच्युएशन से इंडिया को बाहर निकाल पाएंगे?”
हे तर काहीच नाही. सर्वात कहर केलाय तो ‘व्ही.जे’ आणि तत्सम ‘अँकर्स’नी. नुकत्याच झालेल्या स्टार वनवरच्या laughter challenge च्या कार्यक्रमाची ही अँकर पाहा कशी बोलतेय.
“केहते है A laugh a day keeps the doctor away. So welcome to the first ever एक ऐसा शो जो हसा-हसाके आपको घायल करदेगा. हम आपके लिये ढूंढके लाये है इंडिया के टॉप funny 50 और हर हफ्ते we get you five of them. So let’s see कौन बनेगा इंडिया का नंबर वन कॉमिक”
अहाहा¡ काय Hinglish (Hindi + English) आहे. ऐकून कान अगदी तृप्त झाले. ‘M’ आणि ‘V’ वाहिन्यांवरच्या V.J. बद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. त्यांनी तर स्टॅंडर्ड Hinglish कसं बोलावं याचा नविन आदर्शच उभा करुन ठेवलाय.
आता माझ्या मित्रासारखे काही लोक म्हणतील
‘च्यामारी, त्यांना काय म्हणायचंय ते म्हणू दे ना. तुला काय प्रॉब्लेम आहे. या देशात, चुकलो, ‘इंडियात’ प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. कोणी काय म्हणावं हे ठरवण्याचा अधिकार तुला कोणी दिला?’
खरं आहे. ह्या सर्वांबद्दल आक्षेप घेण्याचा मला काहीच अधिकार नाही. आणि कदाचित नकळतपणे मीही या मार्गावरुन गेलो असेन किंवा जात असणारच. पण आत कुठेतरी एक आंतरिक टोचणी लागून राहते की हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. बदललं पाहिजे. कारण शेवटी बदलणं हे आपल्याच हातात असतं नाही का? (ही वरची वाक्यं कुठेतरी वाचल्यासारखी वाटतायत. मला अशा वेळी अगदी टीपीकल चित्रपटातले किंवा कथांमधले उपदेशाचे डोस का आठवतात कुणास ठावूक. भावनेच्या भरात ही नोंद लिहीत असल्यामुळे असेल कदाचित. असो.) आत्ताच आजचा सकाळचा अग्रलेख वाचला. काय योगायोग आहे. अग्रलेखाचा विषय आहे ‘मराठी अस्मितेचा आग्रह’. म्हणजे आम्ही इतरांपेक्षा फारसा वेगळा विचार नाही करत आहोत तर. पण मग हे सगळं होण्याचं कारण काय असावं? काहीही असो. ‘इंडिया शायनिंग’ चा हळूहळू वाढत चाललेला प्रभाव कुठेतरी कमी करुन ‘भारत उदय’ घडवायला हवा. चला, आपण आपल्यापासूनच सुरुवात करुया.
हीहीही. माझं मलाच हसू येतंय. मघापासून विचार करतोय. हे मी लिहीतोय हे कशाची तरी आठवण करुन देतंय. आत्ता आठवलं. दूरदर्शनवरची राष्ट्रीय साक्षरता मिशनची जाहिरात. 'चलो पढाएं, कुछ कर दिखाएं'.
दूरदर्शन झिंदाबाद!
आता एवढं सगळं गंभीरपणे लिहील्यावर ही नोंद या गाण्याशिवाय कशी पूर्ण होईल?
भारत हमको जान से प्यारा है
सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है
सदियों से भारतभूमी दुनिया की शान है
भारत मां की रक्षा में जीवन कुर्बान है
भारत हमको जान से प्यारा है
सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है ...
ही नोंद २६ जानेवारीसाठी परफेक्ट आहे एकदम. काय म्हणता?
।। जय भारत ।।
Saturday, January 21, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
9 comments:
विशाल,
मनाला थेट स्पर्श करणा-या विषयावर लिहीलेला आपला हा लेख अतिशय समर्पक आहे.
भारत न म्हणता 'इंडिया' म्हणणे हे मानसिक गुलामगिरीचे प्रतिक आहे. कोठुन काय स्वीकारायचे त्याचा सारासार विचार न केल्याने असे होते. एक रोजचे उदाहरण घेऊ. मुलांना लहानपणापासुनच "टा-टा" करायला शिकवतात, "या, या" असे का नाही शिकवित?
आजही बहुतांश लोकांना "संगणक" असे म्हणावेसे न वाटता "कॉम्प्युटर" म्हणणे जास्त भूषणावह वाटते. खरे तर संगणक हा शब्द मराठीचा गोडवा आणि लेऊन अवरततो आणि त्यात कॉम्प्युटर या शब्दांतील जोडाक्षरांच्या कसरती नाहीत तरीसुद्धा ही परिस्थिती आहे.
ह्यांत बदल घडवणे आपल्या सर्वांच्याच हातात आहे. मराठीत नूतन शब्दांची भर घालुन आणि त्यांचा उत्कृष्ट लेखांमध्ये वा कवितांमध्ये प्रयोग करून आपण ह्या बदलात सहयोग करू या. एकदा हे चक्र जोरात फिरु लागले की त्याच्या प्रभावाने इतरही चांगल्या बाबी पुढे येतील.
(ता.क. आधिच्या दोन प्रतिक्रियांमध्ये आवेशात शुद्धलेखनाच्या चुका असल्याने त्या येथुन काढल्या आहेत.)
शेतकरी आंदोलनाचे नेते श्री. शरद जोशी यांनीच काही वर्षांपूर्वी शहरी भाग इंडिया आणि ग्रामीण भाग भारत यांच्यातील संघर्षाचे चित्र उभे केले होते, ते आज हा लेख वाचून आठवले. छान लेख!
अनाकारण इंग्रजी भाषेत बोलंणं हे भूषणावह नक्कीच नाही पण जर आजच्या हळूहळू साकार होत चालल्येला "वसूधैव कुटुंबकम्" ( Globalisation ) संकल्पनेसोबत लोकांना जर ते जास्त सहज वाटत असेल तर त्यात चुकलं कुठे?
भाषेची उत्क्रांती होत असते आणि प्रांतांची नावं तर बदलतच असतात. आज भारतासमोर याहीपेक्षा कितीतरी गंभीर विषय आहेत चर्चा करायला असं नाही का वाटत? आणि "कॉम्प्युटर" सारख्या गोष्टी जर घेतल्याच आहेत आंग्ल लोकांकडून तर त्याचं नावही तेच वापरण्यात कसला कमीपणा?
शैलेश, नंदन आणि किरण,
प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
मूळ नोंद फारच घाईत लिहिल्यामुळे काही गोष्टी व्यवस्थित मांडता आल्या नाहीत.
मला सांगायचे असलेले मुद्दे सकाळच्या दुव्यामधील लेखात अधिक प्रभावीपणे आणि अचूकतेने मांडलेले आहेत. किरण यांनी जागतिकीकरणाचा मुद्दा मांडलेलाच आहे म्हणून त्या लेखामधील काही वाक्यं अधिक स्पष्टीकरणासाठी इथे देत आहे.
'जागतिकीकरण, नवीन अर्थकारण, माहिती तंत्रज्ञान यांमुळे इंग्रजीचे महत्त्व वाढले असले, तरी त्यामुळे कोणत्याही भाषेचा संकोच करणे मानवी संस्कृतीच्या विरोधात आहे. ज्ञानभाषा, जागतिक व्यवहाराची भाषा या दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी इंग्रजीकडे प्रतिष्ठेची भाषा म्हणून पाहिले जात असल्याने आणि त्याला वर्गीय जोड दिली जात असल्याने भाषिक विषमताही निर्माण होत आहे. मातृभाषेबद्दल अनास्था, लोकभाषेचा अनादर आणि इंग्रजी येत असल्याचा अहंगंड हा या विषमतेतूनच जन्माला येत आहे.'
मी लेखात दिलेल्या काही प्रातिनिधिक उदाहरणांमधील भाषा पाहिल्यास वरील विधानांना पुष्टी मिळते. पूर्ण इंग्रजी वाक्यामध्ये दोन-चार हिंदी किंवा मराठी शब्द चवीपुरते मिसळणे याला भाषेची उत्क्रांती नक्कीच म्हणता येणार नाही.
दुसरा मुद्दा भारताला 'इंडिया' म्हणण्यात वाटणा-या कमीपणाचा. पुन्हा एकदा सकाळमधल्या लेखामधील काही वाक्यं उद्धृत करावीशी वाटतात.
'मातृभाषा ही समाजाची अभिव्यक्ती असते. वसाहतवादामुळे बदललेली शहरांची वा देशांची नावे मूळ रुपात आणण्याची प्रक्रियाही या अभिव्यक्तीचा भाग आहे. त्यामुळे सिलोनचे श्रीलंका, ब्रह्मदेशाचे म्यानमार, बॉंबेचे मुंबई, मद्रासचे चेन्नई, कलकत्त्याचे कोलकता आणि आता बेंगलोरचे बेंगळुरु होणे, ही स्वाभाविक प्रक्रिया आहे.'
दुर्दैवाने मद्रासला चेन्नई असं अभिमानानं म्हणणा-या आपल्यातल्याच काही लोकांना मुंबईला मात्र बॉम्बे म्हणण्यातच अभिमान वाटतो. मद्रासला चेन्नई असं सर्वांकडून म्हटलं जाण्यात तमिळ लोकांचा जसा वाटा आहे तसा बॉम्बेचं मुंबई होण्यात मराठी लोकांचा का नाही? बॉम्बेला मुंबई म्हटलं नाही तर काही फरक पडत नाही. पण यातून आपली पराभूत मनोवृत्ती दिसून येत नाही का?
नव्या शतकातील नव्या तंत्रज्ञानातील गोष्टी मूळ भाषेत वापरण्यात काहीच गैर नाही. पण त्याची तुलना वर्षानुवर्षे आपण वापरत असलेल्या प्रांताच्या किंवा देशाच्या नावाशी होऊ शकत नाही.
'संदेश, दळणवळण क्रांती, इंटरनेट आदींमुळे जग आकुंचित होत असले, तरी त्यामुळे आपले भाषिक, वांशिक, धार्मिक वेगळेपण नष्ट तर होणार नाही ना, या भीतीने अनेक लोकसमूहांना ग्रासले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या आणि इंग्रजी यांच्या वाढत्या वर्चस्वामुळे ही भीती अनाठायी नाही. बहुभाषिकता आणि बहुविध संस्कृती हे भारताचे आणि सा-या जगाचे वैशिष्ट्य आहे. ते टिकवून ठेवायचे असेल, तर प्रत्येकाने आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगणे गरजेचे आहे'
कदाचित मी ही या वर उल्लेखलेल्या समूहाचाच एक भाग असेन आणि या भीतीमुळेच वरील लेख आणि हा एवढा मोठा प्रतिसाद लिहिला आहे.
'भाषिक दहशतवाद' किंवा 'संकुचितवाद' अशी विशेषणे देत या भूमिकेवर कदाचित टीका होईल;परंतु हा मराठी अस्मितेचा प्रश्न आहे.
जे शब्द मुळातच इंग्रजी आहेत, जसे 'फ़्रिज, त्यांना उगाच 'शीतकपाट' म्हणणं म्हणजे आपण स्वतःहूनच मायमराठीची थट्टा उडवत असतो, असं माझं प्रामाणिक मत आहे. पण 'इंडिया', 'टाईम' सारखे शब्द मात्र आपण टाळायला हवेत. त्याला 'भारत', 'वेळ' असे तोडीचे प्रतिशब्द मराठीत विद्यमान आहेत.
दुसरा मुद्दा असा की आपण जे ऐकतो, ते बोलतो. यात मीडियाचा सिंहाचा वाटा आहे. ndtv च्या हिंदी चॅनलचं नावच 'ndtv india' असं आहे, यावरूनच त्यांना या मुद्यांविषयी किती आस्था आहे हे उघड आहे!
by the way, मराठीत 'भारत' शब्द आहे, पण आश्चर्याची बाब अशी की तामिळमध्ये भारताला शब्दच नाही! ते भारताला 'इंदिया' असच म्हणतात! आता बोल..!
Do write about ur latest expedition to UStayAlone!
Me tujhyashi purna-pane sahamat aahe. Aapanch aaplya pasun suruvaat keli pahije. Me aaj pasun 'Bharat'ch mhanaar aahe.
Post a Comment