Sunday, January 18, 2009

होक्काईदो सहल २

जपानच्या असंख्य बेटांपैकी होन्शू या सर्वात मोठ्या बेटानंतर होक्काईदोचा क्रमांक लागतो. जपानच्या उत्तरेला रशियाच्या खालोखाल होक्काईदोचं बेट पसरलं आहे. जपानला भात, मासे आणि फळेभाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करण्यात होक्काईदोचा मोठा वाटा आहे. पण या सर्वांपेक्षा होक्काईदो लक्षात राहातं ते तिथल्या निसर्गसौंदर्याच्या खजिन्यासाठी!


सहलीचा पहिला दिवस तरी सत्कारणी लागला होता. दुस-या दिवशीचं वेळापत्रक अगदी भरगच्च होतं. फुरानोजवळची काही ठिकाणं पाहून रात्री मुक्कामासाठी ब-याच लांबच्या आबाशिरी गावात पोचायचं होतं. सकाळी लवकर नाश्ता करुन पेन्शनच्या काकांचा निरोप घेऊन पुढे निघालो. 

फुरानोपासून उत्तरेला आसाहीकावा शहराच्या वाटेवर बरीच प्रेक्षणीय ठिकाणं होती. गाईडबुकनं शिफारस केलेल्या ‘शिकीसाईनो ओका’ नावाच्या फार्मकडे निघालो. आठच्या सुमारास फार्मवर पोचलो. प्रवेशद्वारावरुन आतल्या फार्मचा अंदाजच येत नव्हता. पण आत शिरणा-या पर्यटकास आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासाठीच जणू फार्मची रचना केली असावी.  आत शिरताच क्षितीजापर्यंत आकाशाला भिडलेल्या फुलांच्या रांगा पाहून डोळ्याचं पारणं फिटलं. आतापर्यंत असं फार्महाऊस पाहिलं नव्हतं असं नाही. पण इथली बातच काही और होती. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश, थोडंसं ढगाळ आकाश, आल्हाददायक हवा, समोर विविधरंगी फुलांचे थवे, त्यामध्ये बागडणारी फुलपाखरं आणि हातात छानसा कॅमेरा असल्यावर कुणाचं देहभान हरपणार नाही. खरंतर माझा हा कॅमेरा घेऊन दोन-अडीच वर्षं झाली होती. पण आत्तापर्यंत मनासारखे मॅक्रो फोटोग्राफ काढायला मिळाले नव्हते. शिकीसाई फार्म नं ती हौस पूर्ण केली. फोटोसेशनमध्ये केव्हा ११ वाजले ते कळलंही नाही. अजून बरीच ठिकाणं पाहायची होती. लगबगीनं तिथून निघालो. 


गाईडबुकमध्ये पुन्हा एक चांगलं ठिकाण दिसलं. पण तिथं जायचं कसं?

जागेचं नावकांजी’ (चित्रलिपीतील अक्षरं) मध्ये लिहीलं होतं आणि त्याचा उच्चार आम्हा तिघांपैकी कोणालाच माहिती नव्हता. आता तिथपर्यंत जाण्यासाठी त्या जागेचं नाव GPS मध्ये घालणं आवश्यक होतं. या वेळी कुणीच जपानी मुलं बरोबर नव्हती

आम्ही तिघेही परदेशी. माझ्या जपानीमध्ये आता -यापैकी सुधारणा झाली असल्यामुळे बोलताना मला काहीच अडचण नव्हती. पण क्लिष्ट कांजी वाचताना मात्र माझी पंचाईत होत असे. चिनी मुलांना त्या कांजीचा अर्थ कळे पण त्यांना त्याचा उच्चार माहिती नसे. त्यामुळे जागांचा पत्ता शोधणे हा एक मोठा यक्षपश्न होता. इंग्रजी भाषेशी जपानचं जणू सात जन्मांचं वैर असावं. इथले GPS पण जपानी. त्यामध्ये औषधालासुद्धा इंग्रजी अक्षर सापडणार नाहीअर्धा तास त्या जागेच्या नावाची काथ्याकूट केल्यावर शेवटी एकदाचा त्याचा उच्चार आम्हाला सापडला आणि गाडी त्या दिशेन वळवली. तिथं पोचेपर्यंत अचानक आभाळ दाटून अंधारुन आलं. वाटेतच अवाढव्य भोपळ्याचं एक शेत दिसलं. मन अचानक लहानपणच्या भोपळ्यात बसून जाणाऱ्या म्हातारीच्या गोष्टीमध्ये गेलं. चीनी मित्रांना ती गोष्ट सांगितल्यावर त्यांना खूप गंमत वाटली. एव्हाना रिमझिम पाऊस सुरु झाला होता. गाडी कडेला लावून शेतात एक चक्कर मारुन आलो.  तेवढीच पावसात भिजण्याची मजा. 

टोक्योमध्ये असताना अशा गोष्टी थोड्याच करायला मिळतात? पुढे निघाल्यावर वाटेत एक मस्त टुमदार रेल्वे स्टेशन लागलं. तिथून टॉय ट्रेनसारख्या छोट्याश्या ट्रेनमधून आजूबाजूच्या प्रेक्षणीय ठिकाणांना जाता येतं. पण आमच्याकडे गाडी होती आणि शिवाय तेवढा वेळही नव्हता. दुपारच्या जेवणासाठी आसाहीकावाला पोचायचं होतं. स्टेशनच्या माहितीकक्षात थोडी माहिती घेऊन आसाहीकावाच्या दिशेन निघालो. थोडं पुढे गेल्यावर वाटेत एक ख्रिसमस ट्री असलेली एक छान जागा दिसली.

 एका मोकळ्या माळावर एकच ख्रिसमस ट्री मोठ्या दिमाखात उभं होतं. आजूबाजूला दूरवर कुठलंच झाड नाही. क्षणभर वाटलं या झाडाला एकटं वाटत नसेल?


एकच्या सुमारास आसाहीकावाला पोचलो. आसाहीकावा तसं ब-यापैकी मोठं शहर होतं. तिथला झू खूप प्रसिध्द आहे. तिथे ध्रुवीय अस्वलं आणि पेंग्विन पाहायला मिळतात असं ऐकलं होतं. पण तो पाहण्याएवढा वेळ नव्हता. आसाहीकावा ‘रामेन’ (मूळचा चीनी असलेला नूडल्सचा एक प्रकार) साठीही प्रसिध्द आहे. दोन चीनी विरुध्द एक भारतीय असा मी अल्पमतात असल्यामुळं चीन्यांचा रामेनचा प्रस्ताव मान्य करण्यावाचून माझ्याकडे पर्याय नव्हता. मग तिथल्या एका प्रसिध्द रामेनच्या रेस्टॉरंटमध्ये लंच आटोपून जवळच्या मार्केटमध्ये फेरफटका मारण्यासाठी निघालो. सुट्टीचे दिवस, त्यात मौसम चांगला असल्यामुळे रस्त्यावर गजबजाट होता.  लॅबमधल्या मुलांसाठी थोडया भेटवस्तू खरेदी करुन तिथल्याच एका कॉफी शॉपमध्ये थोडावेळ विश्रांती घेतली. 

दुपारी तीन वाजता आसाहीकावा सोडलं. मुक्कामाच्या आबाशिरी शहरापर्यंत साडेचार पाच तासांचा रस्ता आहे. अंतर तसं कमीच आहे पण जवळजवळ अर्धा रस्ता डोंगरातून जातो. वाटेत ‘दाईसेत्सुझान’ नावाचं नॅशनल पार्क लागतं. होक्काईदोच्या मध्यावर हे जपानमधलं सर्वात मोठं नॅशनल पार्क वसलं आहे. आबाशिरीसाठीचा रस्ता या पार्कमधून जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्द हिरव्या झाडीने वेढलेले उंचचउंच डोंगरांचे कडे, त्यातच अधूनमधून उंचावरुन कोसळणारे धबधबे असं पार्कचं उन्ह्ाळ्यातलं रुप एकदम आल्हाददायक होतं. एकापाठोपाठ एक वळणांसोबत समोर येणारी डोंगरांची ती भव्यता, त्यातून ड्राईव्ह करणं म्हणजे खूपच सुंदर अनुभव होता. काही ठिकाणी धबधब्यांच्या जवळ पर्यटकांना गाडी थांबवून पाहण्यासाठी व्यवस्था केली होती. ‘गिंगा नो ताकी’ या प्रसिध्द धबधब्यापाशी गाडी थांबवून जवळपासचे इतर धबधबे पाहून आलो. अंधार पडायला सुरुवात झाली होती. अजून बराच पल्ला गाठायचा होता. धबधब्यांचा फेरफटका संपवून आबाशिरीच्या दिशेनं गाडी भरधाव सोडली. रात्रीचं जेवण वाटेतच उरकलं. नऊच्या सुमारास आबाशिरीत बुकींग केलेल्या हॉटेलवर पोचलो. दिवसभर ड्रायव्हींग केल्यामुळे थकवा आला होता. हॉटेलमधल्याच ओनसेनमध्ये थोडावेळ विश्रांती घेऊन पुढच्या दिवशीच्या कार्यक्रमाचे आडाखे बांधत पहुडलो. पाचच मिनीटांत शांत झोप लागली.


क्रमशः


2 comments:

Shalaka said...

असाहीकावा, म्हणजे गनीमी काव्याचा भाऊ वाटतो!!
:)
सुंदर प्रवासवर्णन !!!

Vishal said...

धन्यवाद शलाका.
हाहा.. हो. गनिमी काव्यानंतरचा हाच तो असाही-कावा!