Monday, January 19, 2009

होक्काईदो सहल ३

सकाळी उठल्यावर हॉटेलची खिडकी उघडताच समोर विस्तीर्ण पसरलेलं आबाशिरी लेक पाहून एकदम प्रसन्न वाटलं. आदल्या दिवशी रात्री अंधारात इथे एवढं मोठं सरोवर असेल याचा अंदाजच आला नाही. सकाळी लक्षात आलं की आम्ही उतरलेल्या हॉटेलचं नावच लेक व्ह्यू होतं. सातव्या

मजल्यावरच्या आमच्या खोलीतून लेकचा छान व्ह्यू दिसत होता. खोलीतच नाश्ता उरकून खाली आलो. लवकरात लवकरशिरेतोकोगाव गाठायचं असल्यामुळे आबाशिरी बघण्यास वेळ नव्हता. तसं आबाशिरी शहरात या मोसमात विशेष काही पाहण्यासारखं नसतं. हिवाळ्यात मात्र जानेवारी फेब्रुवारी महिन्यात तिथे ड्रिफ्ट आईस पाहायला मिळतो. होक्काईदो बेटाच्या आग्नेय किना-यावर हे आबाशिरी गाव वसलं आहे. होक्काईदो आणि इटलीचे अक्षांश एकच, पण हिवाळ्यात ड्रिफ्ट आईस पाहायला मिळणारं होक्काईदो हे उत्तर गोलार्धातलं सर्वात दक्षिणेचं ठिकाण!  

आबाशिरी ते शिरेतोको अंतर दोन तासांचं. हा संपूर्ण रस्ता समुद्राच्या काठाने जातो. सकाळीसकाळी डावीकडे पसरलेला निळाशार समुद्र पाहात वळणावळणांच्या रस्त्यावरुन समुद्राच्या कडेकडेने ड्रायव्हिंग करण्याची मजा काही औरच. मध्येच एखादी छान जागा सापडली की गाडी तिथेच कडेला उभी करावी, समुद्राच्या पाण्यात मस्ती करावी, फोटो काढावे की पुन्हा पुढचा प्रवास सुरु. सकाळी साडेदहा अकराच्या दरम्यान शिरेतोको जवळच्याउतोरो अोनसेनगावात पोचलो. शिरेतोकोला जाण्यासाठी रस्ता नाही. फेरीने जावं लागतं. उतोरो ओनसेन पासून या फेरी सुटतात. तिथे पोचल्यावर कळलं की सुट्टीच्या मौसमामुळे त्या दिवशीच्या सगळ्या फे-यांचं बुकींग संपलं होतं. आता काय करावं? एवढ्या लांब आल्यासारखं तिथे जायचं तर होतंच. आजचा मुक्काम याच गावात होता. मग दुस-या दिवशीच्या  तिकिटांचं बुकींग करुन आजचा दिवस इथेच जवळपास फिरायचं ठरवलं. तसेही या परिसरासाठी दोन दिवस राखून ठेवलेले होतेच


सूर्य माथ्यावर आला होताच. दुपारचं जेवण करुन पुढे निघायचं ठरलं. ‘उनी’ (sea urchin) नावाच्या कुठल्याश्या सागरी प्राण्याच्या अंड्यांसाठी म्हणे उतोरो ओनसेन प्रसिध्द आहे. जागोजागी रेस्टॉरंटच्या पाट्यांवर उनी आणि खेकड्यांची चित्रं दिसत होती. ती बघूनच चिन्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. ते चित्रविचित्र समुद्री जीव बघून माझ्या मात्र तोंडचं पाणी पळायची वेळ आली होती. चीन्यांनी यथावकाश त्या समुद्री जीवांवर ताव मारला. मी ‘सोबा’ नामक नूडल्सवर आटोपतं घेतलं आणि आम्ही पुढे निघालो. तिथून निघून शिरेतोको नॅशनल पार्क पाहण्यास निघालो. वाटेत एक अमेरीकन जोडप्याने लिफ्ट मागितली. त्यांना गाडीत घेतल्यावर त्यांच्याशी थोड्या गप्पागोष्टी झाल्या. ते गेला आठवडाभर होक्काईदोमध्ये भटकत होते. अमेरीकन काय किंवा युरोपियन काय.. हे लोक फारच धाडसी बुवा. एक बॅगपॅक पाठीला अडकवली की फिरायला मोकळे. रात्री कुठेतरी तंबू ठोकून राहायच,ं आणि सकाळ झाली की पुढच्या मुक्कामाला निघायचं. मिळेल त्या गाडीने प्रवास करायचा, मिळेल ते, मिळेल तिथे जेवायचं. आमच्या गाडीतलं हे जोडपंही तसंच होतं. त्या दिवशी सकाळी आम्ही जिथे त्यांना लिफ्ट दिली तिथेच जंगलात एका ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता. या जंगलात बरीच अस्वलं आहेत असं ऐकलं होतं. या दोघांना पहाटेपहाटेच ओढ्यावर मासे पकडणारं एक अस्वल दिसलं. अगदी डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर दिसतं तसं. त्याबद्दल खूप भरभरुन बोलत होते. 

थोड्याच वेळात शिरेतोको नॅशनल पार्कमध्ये पोहोचलो. या ठिकाणी ‘गोको’ नावाचा पाच सरोवरांचा समूह आहे. या सरोवरांना दाट जंगलानं वेढलेलं आहे आणि त्यामधून पर्यटकांना फिरण्यासाठी नैसर्गिक वाट तयार केली आहे. शिरेतोको नॅशनल पार्क आणि परिसराचं नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यजीवन अबाधित राहावं यासाठी शिरेतोको द्विपकल्पाच्या तीन चतुर्थांश भागात रस्ते बांधलेले नाहीत. पार्कपर्यंत पोचण्यासाठीची सार्वजनिक वाहतूकही फार मर्यादित ठेवण्यात आली आहे. संपूर्ण पार्क फिरण्यासाठई कित्येक दिवस पायी चालावं लागतं. शिरेतोको गोको सरोवरांभोवती जंगलात फिरण्यासाठी एक तासाचा कोर्ससाठी छानशी पायवाट तयार केली आहे. या पायवाटेने सरोवरांभोवती फिरताना आजूबाजूच्या जंगलातून ऐकू येणारे दुर्मिळ पक्ष्यांचे आवाज,  सरोवरात दिसणारं जवळच्याच माउंट राऊसुचं प्रतिबिंब मंत्रमुग्ध करुन टाकतात.  या पार्कमध्ये तपकिरी अस्वलांचे वास्तव्य आहे. अधूनमधून पर्यटकांच्या दृष्टीसही पडतात. अस्वले जवळ येऊ नयेत म्हणून निघण्यापूर्वी काही जण जवळच्या भेटवस्तूंच्या दुकानातून पाठीवरच्या बॅगेला अडकवण्यासाठी छोट्या घंटा विकत घेतात. आमच्या सुदैवानं (आणि दुर्दैवानंही) आमच्या दृष्टीस अस्वल पडलं नाही. 


शिरेतोको नॅशनल पार्क जवळ काही धबधब्यांची ठिकाणं प्रसिध्द आहे. पार्क पाहून तिथून जवळच असलेल्या ओशिनकोशिन फॉल्सपाशी पोचलो. उतोरो ओनसेनला जाणा-या रस्त्यावरच हा धबधबा आहे. रस्त्याच्या एका बाजूला अथांग पसरलेला सागर आणि दुस-या बाजूला उंच डोंगराच्या उतारावरुन हळूहळू खळाळत येणारा धबधबा असं एक दृश्य क्वचितच पाहायला मिळतं. फॉल्स पाहण्यासाठी बरीच गर्दी जमली होती. तिथेच पुन्हा एकदा आम्हाला मघाचंच अमेरिकन जोडपं भेटलं. त्यांनी जवळच असलेल्या एका ओढ्यावर salmon मासे पाहायला जाण्यासाठी सुचवलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ओढ्यावर पोचताच अतिशय दुर्मिळ दृश्य पाहायला मिळालं. एक छोटासा ओढा एका ठिकाणी समुद्राला जाऊन मिळत होता. त्या ओढ्यातून लाखोंच्या संख्येने साल्मोन मासे प्रवाहाच्या विरुध्द दिशेने निघाले होते.  हे मासे खा-या पाण्यात वास्तव्य करतात. पण विणीच्या हंगामात अंडी देण्यासाठी ते नदीच्या प्रवाहात उलट्या दिशेने पोहत जाऊन गोड्या पाण्यात अंडी घालतात. त्याला salmon spawning म्हणतात. ऑगस्ट महिन्यात साधारण एक आठवडाभर 

मोठ्या संख्येने हे मासे गोड्या पाण्यात स्थलांतर करतात. पहाटेच्या वेळेस पोचलं तर हे मासे पकडण्यासाठी आलेली अस्वलं पाहायला मिळतात असं ऐकलं. पण आम्हाला तेवढा वेळ नव्हता. त्यामुळे तिथून पुढे निघून शिरेतोको नॅशनल पार्कच्या दुस-या दिशेला निघालो. इथे रस्त्यावर सर्रास जंगली हरणं पाहायला मिळतात. रस्त्यावर ठिकठिकाणी तसे फलक लावलेले असतात. आम्हालाही काही हरणं पाहायला मिळाली. संध्याकाळच्या वेळी डोंगरावरुन समोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र पाहात ड्राईव्ह करण्याचा अुनभव काही औरच होता. शिरेतोको नॅशनल पार्कला बाहेरुन एक चक्कर टाकून सूर्यास्ताचं दृश्य कॅम-यात बंदिस्त करुन हॉटेलवर पोचलो. 


उतोरो ओनसेन तसं छोटसं गाव असल्यामुळे मोठी हॉटेल्स नव्हतीच. आम्ही उतरलो होतो तेदेखील एक छोटंसं पण टुमदार पेन्शन होतं. 

रात्रीच्या जेवणात पुन्हा खेकड्यांचा बेत असल्यामुळे माझी पुन्हा थोडी पंचाईतच झाली. जेवण आटोपून पेन्शनच्या आजोबांकडून जवळच्या ओनसेनची माहिती घेतली आणि बाहेर पडलो. तिथून जवळच उंच डोंगरावर एक ओनसेन होता. ओनसेन थोडा आडवाटेवरच होता. रस्ता दाट किर्र झाडीतून जात होता. आजूबाजूला कुठेच दिवे नव्हते. ओनसेनपाशी राहण्यासाठी टेन्टची व्यवस्था सोडली तर दूरदूरवर कुठे घरं दिसत नव्हती. जपानमध्ये मी ब-याच ओनसेनमध्ये गेलो. पण काही मोजके ओनसेन कायमचे लक्षात आहेत. हा त्यातलाच एक. उंच डोंगरावरुन चांदण्यात चमचमणारा समुद्र पाहात मंद वा-याची झुळूक अंगावर घेत गरम पाण्यात डुंबण्याची मजा शव्दात काय वर्णावी? त्याचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा. 

जपानमध्ये राहून ओनसेन ला भेट  देणं म्हणजे  'हाय कंबख्त तूने पीही नही' असं काहीसं आहे. िदवसा कितीही मजा केली तरी रात्री ओनसेनमध्ये डुंबल्याशिवाय जपानमधला सहलीचा दिवस सत्कारणी लागत नाही. अर्थात ओनसेनमध्ये जाण्यासाठी काही शिष्टाचारही पाळावे लागतात. पण त्यांना घाबरुन ओनसेनमध्ये जाणं टाळणा-या लोकांना आपण कोणत्या आनंदाला मुकत आहोत हे कळणार नाही. 


ओनसेनचा कार्यक्रम आटोपला आणि होक्काईदो सहलीच्या तिस-या दिवशीची सांगता झाली. 


क्रमशः


8 comments:

Santhosh said...

Hi, visit to http://www.quillpad.in to type in your mother tongue. it is nothing but just type the way you speak. No rules,keymappings.it is user friendly. you can ease your work by using Quillpad. try this and you will sure enjoy.

It supports English word and gives multiple options for each word. It is as easy as writing your name in English.

Expressing views in his/her own mother tongue is great experience. By using ‘Quillpad’ you can ease your work. Enjoy….

Raina said...

Vishal,

Hokkaido miss jhalyachi pharach khanta waatli he waachun.:-)
Photographs aani lekhana donhi sundar.

Asech Nihon darshan ghadvat raha. Baaki bara aahes na ? Abhyaas kasa chalu aahe ?

Vishal said...

धन्यवाद मुग्धा.

होक्काईदो चुकले तरी तुझी ओकीनावा सफर घडली ना. मला तिथे जायची फार इच्छा आहे. अर्थात होक्काईदोलाही युकीमात्सुरीच्या मोसमात जायला आवडेलच.

अजूनही बरंच लिहायचं आहे. वेळ मिळाल्यावर होक्काईदो सहलीचे पुढचे भागही लिहीनच.

Sachin_Gandhul said...

तीसरा दिवस छान गेला ....
. सही लिहले आहेस ...

Vishal said...

धन्यवाद सचिन!

Raj said...

surekh lekha. japan madhe 5 mahine kadhanyacha yog ala hota, te aaThavale

Raj said...

are tuze phoTo pahile.. kevaL apratim.
hardik abhinandan.

Vishal said...

राज,
मनःपूर्वक धन्यवाद!