Thursday, May 03, 2007

कुसात्सु ओनसेन स्की सहल

एप्रिल अखेर ते मे महिन्याचा पहिला आठवडा जपानमध्ये गोल्डन वीक म्हणून साजरा होतो. कारण, या दिवसांत आठवडाभर जोडून मिळणा-या सुट्टया. मग या दिवसांत सहलींना ऊत येतो आणि थिएटर्स, प्लेपार्क्स, रेस्टॉरंटस् आणि हायवे गर्दीने ओसंडून वाहू लागतात. यंदा कधी नव्हे ते गोल्डन वीकमध्ये फारसं काम नाही. पण तरीही लॅबमध्ये जावंच लागणार आहे. पण गोल्डन वीकच्या सुट्टीचा सदुपयोग करुन ब्लॉगवर राहून गेलेल्या नोंदी लिहायचं ठरवलं. सुरुवात ब्लॉगचा पेहराव बदलण्यापासून. :)

दरवर्षी फेब्रुवारीमध्ये आमच्या लॅबची स्की सहल आयोजित केली जाते. प्रोफेसर त्यांच्या कुटुंबासह आणि आम्ही साधारण १५-२० मुलं उत्तरेला कुठेतरी स्की रिसॉर्टवर जाऊन ३ दिवस स्की करणे असा दरवर्षीच्या स्की सहलीचा कार्यक्रम असतो. सर्वात ज्युनिअर मुलांकडे हॉटेलच्या बुकींगची जबाबदारी असते. यंदा प्रोफेसर परदेशी जाणार असल्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस फक्त आम्हा लॅबमधल्या मुलांचीच स्की ट्रिप ठरली. ठिकाण होतं गुम्मा राज्यातील ओनसेन(नैसर्गिक गरम पाण्याचे झरे) साठी प्रसिध्द असणारं 'कुसात्सु ओनसेन'.

टोकियोहून सकाळी लवकर निघून चार तासांच्या बस प्रवासानंतर कुसात्सु ओनसेनला पोचलो. यावर्षी सहलीला थोडा उशीर झाल्यामुळं बर्फ थोडं कमी दिसत होतं. राहाण्याची व्यवस्था एका '-योकान्' (ओनसेन रिसॉर्ट) मध्ये झाली होती. दुपारचं जेवण आटोपून स्की साठी निघालो. माझी स्की ला जाण्याची ही चौथी वेळ असल्यामुळं ब-यापैकी सराव झाला होता. पण तरीही बर्फ थोडं कठिण झाल्यामुळे पहिल्या दिवशी स्की करताना म्हणावी तेवढी मजा आली नाही. संध्याकाळी दमून आल्यावर -योकानमधल्याच ओनसेनमध्ये थोडावेळ बसून रात्रीच्या जेवणासाठी तिथल्या डायनिंग हॉलमध्ये हजर झालो.


-योकानच्या पारंपारिक तातामी असलेल्या हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था होती. वज्रासनातील खास जपानी बैठक आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. प्रत्येक आसनापुढे एका छोट्याश्या टेबलावर वेगवेगळे जपानी पदार्थ मांडून ठेवले होते. बाकी मांडणीच्या बाबतीत जपानी लोकांचा हात कोणी धरु शकणार नाही. मग ते खाद्यपदार्थ असोत किंवा फुलं किंवा आणखी काही. प्रत्येक पदार्थासाठी त्या त्या आकाराची चिनी मातीची भांडी. नानाविध आकारांच्या, प्रकारांच्या त्या डिशेस् आणि मेहनत घेऊन त्यात मांडलेले रंगीबेरंगी पदार्थ पाहूनच आपलं अर्धं पोट भरावं. (अर्थात त्यात काय काय आहे ते ऐकल्यावर आपल्यापैकी ब-याच जणांची आहे तीही भूक पळून जाईल हा भाग वेगळा.) बाह्यदर्शनाला अवास्तव महत्व देण्याच्या ह्या लोकांच्या स्वभावामुळे असेल कदाचित, पण एकंदरीतच जपानमध्ये खाद्यपदार्थांची मांडणी बघण्यासारखी असते. जपानी खाद्यसंस्कृतीवर एक स्वतंत्र लेखमाला लिहीण्याचा विचार ब-याच दिवसांपासून डोक्यात घोळतोय. पण सध्या तरी त्यासाठी वेळ मिळेल अशी चिन्हं दिसत नाहीत.

रात्रीचं जेवण आटोपल्यावर बाहेर एक फेरफटका मारुन आलो. एव्हाना भुरभुरु बर्फ सुरु झालं होतं. रात्री नेहमीच्या सहलीसारखाच पेयपानाबरोबर बराच वेळ गप्पांचा कार्यक्रम रंगला.

दुसरा दिवस पूर्णवेळ स्की करण्यात गेला. आदल्या दिवशी रात्री बर्फ पडल्यामुळे दुस-या दिवशी मऊ बर्फावर स्की करताना मजा आली. तिस-या दिवस होता कुसात्सु ओनसेन गावात साईटसीईंगचा. ओनसेनसाठी संपूर्ण जपानमध्ये प्रसिध्द असणा-या कुसात्सु ओनसेनमध्ये सकाळी फेरफटका मारण्यासाठी निघालो.

शतकानुशतके कुसात्सु ओनसेनची माहिती जपानी लोकांना होती. पण एकोणीसाव्या शतकामध्ये जर्मन डॉक्टर एरविन वॉन बाल्झने इथल्या नैसर्गिक गरम कुंडातील औषधी पाण्याचं महत्व राजदरबारात सांगितल्यामुळे या जागेला प्रसिध्दी मिळाली. pH १.५ असणारं इथलं पाणी मात्र भलतंच आम्लयुक्त आहे. -योकानपासून निघून गावातल्या मध्यभागी असणा-या युबाताके या जागी आलो. रस्त्याच्या मधोमध

गंधकाचे झरे आणि एक गरम पाण्याचा छोटासा धबधबा. भोवताली छोटी छोटी दुकानं आणि पारंपारिक लोकनाट्याचं एक छोटंसं थिएटर असा युबाताकेचा परिसर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये खुलून दिसत होता. जवळच्या थिएटरमधून पारंपारिक जपानी गाण्याचा आवाज कानावर पडला. तिथे चौकशी केल्यावर एक लोकनृत्याचा छोटासा कार्यक्रम सुरु असल्याचं कळलं. तिकिटं काढून आत शिरलो तर आतमध्ये शंभर दीडशे वर्षांपूर्वीचं जुनं थिएटर. समोर उंचावर स्टेज आणि थिएटरच्या मधोमध स्टेजच्या समोरच एक गरम पाण्याचं कुंड. स्टेजवर दोन महिला तिथल्या लोकगीतावर एक नृत्य सादर करत होत्या. समोरच्या गरम पाण्याच्या कुंडाभोवती काही स्त्रिया हातात लाकडी फळ्या घेऊन गाण्याच्या तालावर कुंडातलं पाणी ढवळून काढत होत्या. माझ्या प्रश्नार्थक चेह-याकडे बघून लॅबमधल्या एका मुलानं मला तो प्रकार समजावून सांगितला. कुंडातल्या गरम आणि गार पाण्याची पातळी सारखी करण्यासाठी त्या गाण्याच्या तालावर कुंडातलं पाणी एकसारखं करत होत्या. त्यांचा कार्यक्रम संपल्यावर त्यांनी प्रेक्षकातल्या काही जणांना कुंडातलं पाणी हलवण्यासाठी बोलावलं. माझ्या मित्रानं मला बळजबरीच तिथे पाठवलं. मी ही मग इतर लोकांबरोबर त्या गाण्याच्या तालावर फळीने थोडं पाणी हलवलं. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी आम्हाला एक प्रमाणपत्र आणि टॉवेल दिला. तेवढीच मजा.

एव्हाना दुपारचे १२ वाजले होते. दुपारचं जेवण एका छोट्याश्या रेस्टॉरंटमध्ये उरकून तिथल्या प्रसिध्द साइनो कावारा ओनसेनमध्ये गेलो. ओनसेनच्या वाटेवर अनेक लहानमोठे गरम पाण्याचे झरे दिसत होते. प्रशस्त रोतेंबुरो (open air bath) मध्ये दुपारी तासभर डुंबून बाहेर पडलो. परतीच्या बसला अजून तास-दोन तास अवकाश होता. तेवढ्या वेळात बाजारातून एक चक्कर टाकून यावी असा विचार केला. गाव तसं छोटंच असल्यामुळं बाजार असा फारसा नव्हताच. दोन-तीन अरुंद रस्ते आणि त्यात दोन्ही बाजूला छोटी छोटी दुकानं. गावात ओनसेन असल्यामुळं ओनसेन मांज्यू ची भरपूर दुकानं होती. ओनसेन मांज्यू म्हणजे तांदुळाचं पीठ आणि एका प्रकारच्या डाळीपासून बनवलेली जपानी मिठाई. ओनसेनमधून परतल्यावर कडवट ओच्या (ग्रीन टी) समवेत गरम गरम मांज्यू खाण्याची मजा वेगळीच. मांज्यूचा आकार साधारणपणे आपल्या मोदकाएवढा. दोन-तीन मांज्यू मटकावून वर थोडासा ओच्या प्यायल्यावर पोटोबा थंड झालाच पाहिजे. बाजारातली फेरी आटोपून बस थांब्यावर आलो. टोकियोची परतीची बस लागलेलीच होती. स्की सहलीच्या आठवणी मनात साठवून परतीच्या प्रवासाला लागलो.

(स्कीच्या पेहरावातच माझी सामानाची बॅग भरल्यामुळं या वेळी मी कॅमेरा बरोबर घेतला नव्हता. त्यामुळे लॅबमधल्या मुलांनी काढलेली छायाचित्रे दिली आहेत.)

4 comments:

Mandar said...

As usual, very meticulous description ...felt like being there!!
Good that u've some time now.. we can look for more blogs here :)

Also the new pic which you have put on the header of this blog is amazing!!

Vishal said...

Thanks Mandar. The picture on the header was taken at Fisherman's Wharf, SF.

प्रिया said...

आज कित्येक महिन्यांनी तुझ्या ब्लॉगवर चक्कर टाकली आणि नेहमीप्रमाणेच काहीतरी interesting वाचायला/ बघायला मिळालं :) बरेच दिवस झालेत... काहीतरी लिही की आता... तो जापानी खाद्यसंस्कृतीवरचा लेख कधी येतोय? :)

Vishal said...

प्रिया,

धन्यवाद.

इरादे तो काफी है... :)
तू स्वत:च या विषयावर इतकी छान पोस्ट लिहीली आहेस, त्यामुळे मी इथं वेगळं काही लिहीत नाही.
पण जपानी खाद्यसंस्कृतीवरचा लेख लवकरच लिहीन म्हणतो.