Friday, April 14, 2006

पुन्हा एकदा साकुरा

यावर्षी साकुरा (चेरी ब्लॉसम) चे मनासारखे फोटो काढता आले नाहीत याची थोडी हुरहुर लागलीच होती. गेल्या वर्षी नविन कॅमेरा घेतला त्यावेळी साकुराचा बहर संपून गेला होता. यावर्षी ती संधी चुकवायची नाही असं ठरवलं होतं. पण कामाच्या गडबडीत इथला साकुराचा बहर केव्हा ओसरला ते कळलंच नाही. कोणतीही गोष्ट उत्साह असेपर्यंत केलेली बरी असते. त्यामुळे मागच्या शनिवारी लॅबमधल्या एका मुलानं ‘उद्या साकुराचे फोटो काढायला जाउया का’ विचारताच मी लगेच ‘हो’ म्हणून टाकलं.

रविवारी सकाळी आम्ही दोन हौशी फोटोग्राफर एका हौशी ड्रायव्हरला पकडून साकुराचे फोटो काढण्यासाठी बाहेर पडलो. टोकियोजवळ साकुराचा बहर केव्हाच संपून गेला होता. दुस-या कोणत्यातरी प्रसिध्द ठिकाणी जायचं म्हटलं तर या दिवसांत जिकडेतिकडे प्रचंड गर्दी असते. त्यामुळं कुठंतरी लांब आणि शांत ठिकाणी जायचं ठरवलं. टोकियोच्या पश्चिमेला असणा-या यामानाशी राज्यात त्यांनी दोन-तीन चांगल्या ठिकाणांची माहिती काढली होती. अशी सगळी माहिती काढून स्वतःची गाडी घेउन आपण ट्रीपला जाउया का असं विचारणारी माणसं सहसा कुणाला भेटत नाहीत. का कुणास ठाऊक पण माझं नशिब फार चांगलं आहे या बाबतीत. त्यांच्या माहितीनुसार इप्पोनसाकुरा या फारश्या गजबजाट नसलेल्या जागी निघालो. दोन-अडीच तासांचा ड्राईव्ह संपतो तोच हायवेवरच एक छोटीशी बाग दिसली. ही ट्रिप Exclusively साकुराचे फोटो काढण्यासाठी असल्यामुळे वाटेत कुठंही मनाला येईल तिथं गाडी थांबवून फोटो काढण्याची मुभा होती. त्या बागेपाशी गाडी थांबवून आमचं फोटोसेशन सुरु झालं.

असं म्हणतात की हजार शब्दांपेक्षा एक चित्र पुरेसं असतं. त्यामुळं मी जास्ती लांबड न लावता तुम्हाला चित्रं पाहायला मोकळं करतो. चित्रांसोबत जागांची माहीती आणि किचकट नावंही आहेत. पण ती वाचायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं. मी मात्र माझ्या संदर्भाकरता लिहीली आहेत.



हायवेवरच्या छोट्याश्या बागेतली 'Peach' ची फुलं









त्याच बागेतील साकुरा












यामानाशी राज्यातील 'कात्सुनुमा-बुदोक्यो' गावाजवळ असलेला हा प्रसिध्द 'इप्पोनसाकुरा'. विस्तीर्ण मैदानात असलेलं साकुराचं हे एकमेव झाड जवळजवळ दोनशे वर्षं जुनं आहे.





साकुराचे फोटो काढण्यासाठी तिथं आमच्याव्यतिरिक्त आणखीही काही वेडे लोक होते. आणि अगदी जय्यत तयारीनिशी आले होते.












'साकुरा आणि फुजीसान्' अर्थात माऊंट फुजी.
त्याजसाठी केला तो अट्टाहास.
हे छायाचित्र म्हणजेच जपानची आजवर सगळीकडे पाहिलेली प्रतिमा कॅमे-यात बंद केली आणि इथवर आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.


'शिदारेझाकुरा' : यामानाशी राज्यातील आणखी एक प्रसिध्द साकुराचं झाड. हे झाडदेखील खूप जुनं आहे असं ऐकलं. याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला वडाच्या पारंब्यांसारख्या फांद्या आहेत आणि त्यावर साकुरा फुलतो.





हा असा.












रात्रीच्या प्रकाशात हा शिदारेझाकुरा अधिकच खुलून दिसतो.




दिवसभर फिर फिर फिरुन फोटो काढल्यावर नेहमीप्रमाणं 'ओनसेन' (नैसर्गिक गरम पाण्याचं कुंड) ला जायचं ठरलं. ओनसेनला गेलो नाही तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. नेहमीप्रमाणं जपानी मित्रांनी तिथल्या एका प्रसिध्द ओनसेनची माहिती काढून ठेवलेलीच होती. संध्याकाळी परतीच्या प्रवासात तिथून जवळच एका डोंगराच्या माथ्यावर असणा-या 'होत्ताराकाशी ओनसेन'मध्ये गेलो.

कल्पना करा. सूर्यास्ताची वेळ आहे. डोंगराच्या माथ्यावर आजूबाजूला कोणतीही घरं नाहीत. समोर बर्फाच्छादित माउंट फुजी सोनेरी सूर्यकिरणांनी न्हाउन निघाला आहे. मधली खोल दरी दिव्यांनी झगमगते आहे. थंडगार वा-याची झुळूक अंगावर घेत तुम्ही गरम पाण्याच्या कुंडामध्ये त्या दृश्याचा आस्वाद घेत बसला आहात. अशा वातावरणात आजूबाजूच्या जगाचा विसर न पडला तरच नवल.
अर्थातच आमच्या तिघांच्या तोंडून एकच शब्द उमटत होता: 'साईको' (परमोच्च)

(ओनसेनमध्ये छायाचित्रं काढायला परवानगी नसल्यामुळे हे छायाचित्र मी या ओनसेनच्या संकेतस्थळावरुन मिळवलेलं आहे.)



ही आणि इतर काही छायाचित्रं इथं पाहू शकता.

Sunday, April 02, 2006

नेमेचि येतो मग साकुरा

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात सुट्टीसाठी भारतात गेल्यामुळे स्प्रिंग अर्थात वसंत ऋतूचं आगमन मला पाहताच आलं नाही. या वर्षी मात्र ‘साकुरा’ फुलताना छायाचित्रं काढायला विसरायचं नाही असं मनाशी अगदी ठरवलं होतं. पण गेल्या आठवड्यात कामाच्या गराड्यापुढे दिवसा प्रयोगशाळेतून बाहेरच पडता आलं नाही. परवा सकाळी सहज घराच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर साकुरा चक्क पूर्णपणे बहरात होता. छे.. नेमकं याच दिवसात मला काम लागावं आणि मी पुन्हा एकदा साकुरा बहरताना छायाचित्रं काढायला मुकावं..आता यासाठी आणखी एक वर्ष थांबावं लागणार या विचारानं त्या दिवशी थोडा हिरेमोडच झाला. पण बाहेर पडल्यावर आजूबाजूला सर्वत्र ऐन बहरात आलेला साकुरा पाहिला आणि उदास झालेलं मन साकुरासारखंच क्षणात फुलून आलं. साकुरा फुलताना पाहता आला नाही किंवा त्याची छायाचित्रं काढता आली नाहीत याच्या दुःखापेक्षा बहरलेला साकुरा पाहण्याचं सुख कित्येक पटीनं अधिक होतं. त्यानंतर दोन-तीन दिवस रोज साकुरा पाहण्यात आणि ‘हानामी’ची मजा लुटण्याच्या कल्पनेत अगदी छान गेले.

तुम्ही म्हणत असाल हा साकुरा काय प्रकार आहे आणि ही हानामी कशाशी खातात? काय आहे, जपानबद्दल माहिती वाचताना, जपानी भाषेचा थोडासा छळ सहन करावा लागणारच, नाही का? ठीक आहे. सांगतो. कदाचित काही जणांना माहितीही असेल. दर वर्षी वसंताची चाहूल लागताच हिवाळ्यात थंडीनं गारठून गेलेल्या आणि पानं झडलेल्या चेरीच्या झाडांना नवी पालवी फुटू लागते आणि बघता बघता चेरीचं झाड फिकट गुलाबी फुलांनी अगदी बहरुन जातं. अगदी आपल्याकडचं गुलमोहराचं झाड जसं बहरुन जातं तसंच. तसं पाहिलं तर समशीतोष्ण कटिबंधात हा प्रकार सर्वत्रच पाहायला मिळतो. यात जपानमध्ये विशेष वेगळं आहे असं काहीच नाही. याला पश्चिमेकडे चेरी ब्लॉसम म्हणतात तर इथे साकुरा. हा साकुरा जपानच्या दक्षिणेच्या टोकापासून सुरु होउन हळूहळू उत्तरेला सरकत जातो. टोकियो साधारण मध्यावर असल्यामुळे मार्चअखेरीस टोकियोमध्ये सगळीकडे साकुरानं डवरलेली झाडं दिसू लागतात आणि सगळीकडे एखाद्या उत्सवासारखं वातावरण पसरतं. शाळा, कॉलेजांना वर्षअखेरीची सुट्टी लागलेली असते. ऑफिसेस्, घरा-घरांमध्ये हानामीची वेळापत्रकं आखली जातात. ही ‘हानामी’ म्हणजे कुठलीतरी खायची गोष्ट नाही तर कुटूंब किंवा मित्रमंडळींसोबत फिरायला जाऊन चेरी ब्लॉसमची मजा लुटणे म्हणजे 'हानामी'. आता ही हानामी सहल (किंवा पिकनिक म्हणा हवं तर) घराजवळची एखादी बाग किंवा दूर कुठेतरी दुस-या गावत असणं हे ज्याच्या त्याच्या उत्साहावर अवलंबून असतं. पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हानामीचा आनंद लुटण्यासाठी एकदा तरी बाहेर पडतातच. मला तरी वाटतं अशा वातावरणात हानामी पिकनिकला न जाता कुणाला चैनच पडणार नाही. त्यामुळं या दिवसांत बागा किंवा साकुरा पाहण्यासाठी असलेली ठिकाणं गर्दीनं फुलून गेली नाहीत तरच नवल. सुट्टीच्या दिवशी तर काही पाहायलाच नको. काही ठिकाणी तर गर्दीतून वाटही काढता येत नाही. तसा हानामी पिकनिक आणि आपल्याकडची पिकनिक यात फारसा फरक नाहीच. हल्ली आपल्याकडच्या पिकनिकच्या संकल्पना बदलल्या आहेत. पण मी लहान असताना घरातल्या मंडळींबरोबर गेलेल्या पिकनिक मला चांगल्या आठवतायत. शक्यतो सगळ्या पिकनिक म्हणजे कुठल्यातरी देवस्थानला दिलेली एखादी छोटी भेटच असायची. सकाळचा वेळ तिथं पोचल्यावर देवदर्शन आटोपून आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यात जाई. दुपार झाली, की जवळवासच्या कुठल्यातरी वडाच्या झाडाखाली चटई अंथरुन त्यावर जेवणाचे डबे उघडले जात. घरातून कालवून आणलेला दहीभात आणि डाळमेथीचा बेत अगदी फक्कड जमलेला असे. त्यावर मनसोक्त ताव मारला तरी नंतर ताकाचा पेला रिचवून मोठी ढेकर दिल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्याचं समाधान मिळत नसे. तश्या त्या दहीभात आणि डाळमेथीची चव इतर कुठेही आणि कितीही वेळा खाल्ली तरी येत नसे. जेवणानंतर तिथेच झाडाच्या सावलीत बायकांच्या गप्पा रंगत असत आणि परुषमंडळींची वामकुक्षी होत असे. आम्ही मुले मात्र दिवसभर कोणता ना कोणता खेळ खेळण्यात किंवा इतरांच्या खोड्या काढण्यात दंग असू. उन्हं उतरतीला लागल्यावर सामानाची आवराआवर सुरु होई आणि अंधार पडायच्या सुमारास आम्ही घरी परतत असू. त्या सहलींच्या आठवणी मनात अजूनही ताज्या आहेत. तश्या सहलींची मजा आता पुन्हा येणार नाही आणि इथं तर मुळीच येणार नाही हे माहित असलं तरी इथल्या प्रत्येक सहलीत काहीतरी वेगळं अनुभवण्याचा प्रयत्न सुरुच असतो.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एप्रिलच्या पहिल्याच रविवारी प्रयोगशाळेची हानामी सहल ठरली. पण रविवारी हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळं हानामीसाठी एक दिवस आधीच जायचं ठरलं. शनिवारी सकाळी ठरल्याप्रमाणे तोक्यो(टोकियो) मधली कमी गर्दी असणारी एक छोटीशी बाग निवडून सगळे सदस्य तिथे जमा झाले. हवेतला किंचीत गारठा आणि लख्ख सूर्यप्रकाशामुळे वातावरण अगदी आल्हाददायक होतं. प्रा. कुरोदा, म्हणजे माझे मार्गदर्शकही त्यांच्या कुटुंबियांसमवेत आले होते. त्यांच्या पत्नीने घरातून आमच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते. थोडा वळ बागेत फेरफटका मारुन साकुराचं सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवलं. प्रत्येकाकडे कॅमेरा असल्यामुळे छायाचित्रांना काही तोटा नव्हताच. बागेत फारशी गर्दी नसली तरी प्रयोगशाळेतील काही मुलांनी आधीच जाऊन जागा पकडून ठेवली होती. तिथे एका चेरीच्या झाडाखाली मेणकापड अंथरुन मंडळींनी त्यावर बैठक मारली. वरती जणू साकुराचं छतच तयार झालं होतं. पेयपानाचा कार्यक्रम आटोपल्यावर मंडळींनी जेवणाचे डबे उघडले. जपानी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत गप्पा रंगल्या. प्रा. कुरोदांचा छोटा मुलगा योशितोची दंगामस्ती आणि खोड्यांमुळे सगळ्यांची चांगलीच करमणूक होत होती. दुपारी यथावकाश जेवण आटोपून गप्पा संपल्यावर एकेक सदस्य निघू लागला. मग सगळ्यांनीच आवराआवर करायला सुरुवात केली. तीन-साडेतीनच्या सुमारास साफसफाई करुन सर्वजण परत निघाले. मी आणि काही मित्र भारतीय दूतावासात असलेला ‘साकुरा बझार’ पाहण्यासाठी निघालो.

दरवर्षी ‘कुदानशिता’ इथं असणा-या भारतीय दूतावासात ‘साकुरा बझार’ भरतो. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमधील खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल आणि दूतावासासमोर असणारी साकुरानं फुलून गेलेली प्रसिध्द बाग हे या साकुरा बझारचं आकर्षण असतं. दूतावासात जाईपर्यंतच चार वाजले. कुदानशिता स्टेशनपासून दूतावासापर्यंतचा रस्ता गर्दीनं फुलून गेला होता. जपानी मित्रांना साकुरा बझारमधील मराठी मंडळाच्या स्टॉलमधले बटाटेवडे खायला घालायचा विचार होता. पण बटाटेवडे केव्हाच संपून गेले होते आणि उरलेले पदार्थही संपण्याच्या बेतात होते. रांगेत उभे असताना अर्ध्यातच सगळे पदार्थ संपल्याची घोषणा झाली. त्यामुळे मग समोरच्या प्रसिध्द बागेत चक्कर मारण्यास निघालो. बागेतील रस्त्यावर गर्दी मावत नव्हती. रस्त्याच्या दुतर्फा फुललेला साकुरा पाहताना लोकांचा उत्साह ओसंडून वाहात होता. काही लोक त्याची चित्रं रेखाटत होते तर काही हौशी आजोबा मोक्याची जागा पटकावून आपला जुना कॅमेरा स्टॅंडवर लावून साकुराची छायाचित्रं काढण्यात दंग होते. एकंदरीतच गर्दीला उत्सवाचं स्वरुप आलं होतं. एक मोक्याची जागा पकडून मीही छायाचित्रांची हौस भागवून घेतली. पण गर्दीमुळे फारशी मनासारखी छायाचित्रं काढता आली नाहीत. त्यामुळं पुढच्या वर्षी एखाद्या निवांत ठिकाणी छायाचित्रं काढायचा निश्चय करुन परतीची लोकल पकडली.

हा साकुराचा बहर फार फार तर एक आठवडा किंवा दहा दिवस टिकतो. तोक्योमधील साकुरा आता संपण्याच्या मार्गावर आहे. पण उत्तरेला काही मैलांवर तो नुकताच सुरु झालाय. या महिन्याच्या अखेरीस मला उत्तरेकडील 'नागानो' राज्यात जाण्याची संधी मिळतेय. पाहूया त्यावेळी साकुराला आणखी एकदा भेटण्याची संधी मिळते का?