Monday, July 31, 2006

मिशन माउंट फुजी - १

खूप दिवसांत काही लिहीलं नाही. लिहायला तसं कारणही नव्हतं आणि वेळही. पण या शनिवार-रविवारी एका 'मोहिमे'वर जाण्याचा योग आला आणि मोहिमेच्या रोमांचकारक आठवणी लिहून काढाव्या म्हटलं.

उन्हाळा आला की सगळीकडचं वातावरण कसं बदलून जातं नाही? तसा उन्हाळा मला फारसा आवडत नाही. आणि इथला दमट उन्हाळा तर आणखीनच वाईट. पण काही गोष्टी उन्हाळ्यातच करायला मिळतात. जसं इथल्या बार्बेक्यू पार्ट्या किंवा हानाबी(आतषबाजी). पण उन्हाळ्यातली मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे सहली. उन्हाळा आला की सगळ्यांना कसे सहलीचे वेध लागतात. गेल्या वर्षी माझं M.S.चं पहिलंच वर्ष असल्यामुळं सुट्टीत वेळच वेळ होता. त्यामुळं तोहोकु प्रांतात ब-याच ठिकाणी फिरता आलं. या वर्षी मात्र थेसीस आणि प्रोजेक्टची कामं यातून कुठंही जायला वेळ मिळणार नाही हे माहीती असल्यामुळं मन मारुन निमूटपणे काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. गेल्या आठवड्यात शिंगो-सान् (साकुराचे फोटो काढण्यासाठी ज्याच्याबरोबर गेलो होतो तो सिनीअर)नं येत्या शनिवारी माउंट फुजीवर चढाई करायची का विचारलं. शिंगो-सान् जॉब करत असल्यामुळं त्याला नंतर वेळ नव्हता. मलाही ऑगस्टपासून सप्टेंबर अखेरपर्यंत कुठेही जाण्यासाठी वेळ मिळणार नव्हता. काय थोडा वेळ होता तो आत्ताच होता. मी लगेचच हो म्हणून टाकलं. तसंही कोणी फिरायला, सहलीला किंवा खेळायला जाऊया का असं विचारलं की मी नेहमीच फारसा विचार न करता हो म्हणून टाकतो. शिंगो-सान् त्याची गाडी घेणार होता. मग गाडीत बसतील अशा इतर मंडळींची जमवाजमव सुरु झाली. तिसरा सदस्य तोमिता-सान् जो साकुरा सहलीच्या वेळीही बरोबर होता तो नेहमीप्रमाणे ठरलेलाच होता. गाडीत आणखी तिघं बसतील एवढी जागा होती. रविवारी संध्याकाळी हानाबी म्हणजे आतषबाजीचा मोठा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे योकोहामा बंदरावर होणार होता. प्रयोगशाळेतल्या दोन मुलींनी तिथं युकाता(पारंपारिक जपानी पेहराव) घालून जायचं ठरवलं होतं. त्यांची ब-याच दिवसांपासून त्यासाठी तयारी चालली होती. त्यामुळं त्या येण्याची शक्यता नव्हतीच. इतर मुलांचेही कार्यक्रम आधीपासूनच ठरलेले होते. शेवटी एक चीनी मुलगा आशान् आणि आणखी एक भारतीय मुलगा अमित त्याच्या बायकोसोबत यायला तयार झाले. कार्यक्रम ठरल्यावर सहलीची माहिती जमवायला सुरुवात केली.

माउंट फुजी अर्थात् 'फुजीसान्'. फुजीसानच्या चित्रलिपीतील अक्षरांमध्ये पर्वताचं चित्र असलेलं एक अक्षर आहे. त्यामुळं पाश्चात्य देशांमध्ये किंवा आपल्याकडे त्याचा ब-याच वेळा 'फुजीयामा' असा चुकीचा उच्चार केला जातो. पण योग्य उच्चार हा 'फुजीसान्' असाच आहे. त्यातही 'फु' म्हटलं की त्याचा उच्चार 'फुटका' मध्ये असतो तसाच करायची आपल्याला सवय असते. पण जपानी 'फु' चा उच्चार 'फुटका' मधल्या 'फु' सारखा नसतो. जपानी 'फु' हा 'हु' आणि 'फु' यांच्या मध्ये कुठेतरी येतो. त्यामुळं 'फुजीसान्' चा उच्चार 'हुजीसान्' ला जास्त जवळचा वाटतो. मागे जेव्हा त्सुनामी आली होती त्यावेळी बहुतेक सर्व मराठी वर्तमानपत्रांमध्ये 'सुनामी' असं लिहीलं होतं. फिरंगी लोकांना 'tsu' म्हणता येत नसल्यामुळं त्यांनी त्याला सुनामी बनवून टाकलं. जपानी 'tsu' चा उच्चार 'चुकीचा' मधल्या 'चु' ला जास्त जवळचा आहे. आपल्याला तो सहज जमण्यासारखा आहे. पण प्रत्येक गोष्टीत पाश्चात्यांची नक्कल करण्याची आपल्याला जणू सवयच लागून गेली आहे. विषय जरा जास्तच लांबला नाही? उच्चारांच्या, विशेषतः जपानी उच्चारांच्या बाबतीत मी जरा जास्तच काटेकोर असल्यामुळं कुणाच्याही तोंडून टीपीकल 'फु'जीयामा ऐकलं की मला त्याचं असं स्पष्टीकरण दिल्याशिवाय राहवत नाही. आता तुम्ही म्हणाल 'आपल्याकडं जिथं लोकं मुंबईलाच बॉम्बे म्हणतात तिथं जपानीचं काय घेवून बसला राव'. असो. या विषयावर आधी एकदा लिहून झालेलं आहे.

बहुतांश परदेशी लोकांसारखंच मलाही फुजीसान् बद्दल एक आदरयुक्त कुतूहल आहे. तो एक जागृत ज्वालामुखी आहे हे त्याचं एक कारण असू शकेल. पण लहानपणापासून जपान म्हणजे फुजीसान् अशी जपानची मनात निर्माण झालेली एक प्रतिमा हे त्यामागचं महत्त्वाचं कारण असावं. सर्वात पहिल्यांदा जपानमध्ये येताना विमानातून फुजीसान दिसला होता. त्यावेळी त्याची छायाचित्रं काढण्यासाठी खिडकीजवळ परदेशीच काय, जपानी लोकांचीही झुंबड उडाली होती. तेव्हापासून फुजीसानबद्दलचं माझं कुतूहल दिवसागणिक वाढतच चाललं होतं. तोक्यो किंवा योकोहामामधून हिवाळ्यातल्या एखाद्या स्वच्छ हवामाना्च्या दिवशी फुजीसानला पाहता येतं. कॉलेजमधल्या गॅलरीतून मी ब-याच वेळा पाहीलाही होता. 'फुजीसान् हा दुरुनच चांगला दिसतो' असं बहुतांश जपानी लोकांचं मत असतं. ते खरंही आहे. पण माझ्यातल्या परदेशी पर्यटकाचं त्यावर प्रत्यक्ष चढाई केल्याशिवाय समाधान होणार नव्हतं. गेल्या वर्षी फुजीसानवर चढाईचा बेत आखून आम्ही सकाळी निघालो पण आयत्या वेळी खराब हवामानामुळं पायथ्यापासूनच परतावं लागलं होतं. त्यामुळं या वर्षी काहीही करुन वरती जायचंच असा निर्धार करुन संकेतस्थळांवरुन चढाईची माहिती आणि लोकांचे अनुभव वाचायला लागलो.

शिझुओका आणि यामानाशी या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या फुजीसानला पाच सरोवरांनी वेढलेलं आहे. १७०७ साली त्याचा शेवटचा उद्रेक झाला होता. काही जणांच्या मते तो निद्रीस्त ज्वालामुखी आहे तर काही जण त्याला जागृत ज्वालामुखींमध्ये गणतात. साधारणपणे वर्षातून जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या काळातच जपानमधील या सर्वात उंच पर्वतावर चढाई करता येते. इतर दिवसांमध्ये तो बर्फानं वेढला असल्यामुळं प्रशिक्षित गिर्यारोहकांशिवाय तिथं जाण्याचं धाडस सहसा कुणी करत नाही. पण या दोन महिन्यांत साधारण ३-५ लाख पर्यटक फजीसानवर चढाई करतात. ३७७६ मी. उंचीच्या या पर्वताचे चढण्याच्या सोयीसाठी दहा टप्पे पाडले आहेत. त्यावर चार वेगवेगळ्या बाजूंनी चढाई करता येते. चारी मार्गांवर साधारण २००० मी. उंचीच्या पाचव्या टप्प्यापर्यंत वाहनाने जाता येतं. पाचव्या टप्प्यापासून चढाईला सुरुवात करता येते. अगदीच हौशी गिर्यारोहकांना पायथ्यापासूनही चढाई करता येते. सर्वच मार्गांच्या प्रत्येक टप्प्यावर विश्रांतीसाठी जागा आणि एक छोटंसं उपहारगृह आहे. आठव्या टप्प्यावर राहण्यासाठी एक लॉजची व्यवस्था आहे. फुजीसानवर चढून ‘गोराइको’ म्हणजे सूर्योदय पाहणे हा standard course असतो. पाचव्या टप्प्यापासून संध्याकाळी चढायला सुरुवात करुन विश्रांती न घेता थेट सूर्योदयाच्या सुमारास माथ्यावर पोचता येतं. पण बहुतांश लोक दुपारी चढायला सुरुवात करुन संध्याकाळी आठव्या टप्प्यावरील लॉजवर पोचतात. संध्याकाळचं जेवण आटोपून पाच-सहा तास लॉजमध्ये विश्रांती घेवून मध्यरात्री पुन्हा चढायला सुरुवात करुन सूर्योदयाच्या आधी थोडावेळ माथ्यावर पोचतात. माझी आणि शिंगोसानची विश्रांती न घेता चढाईची तयारी होती. पण इतरांच्या सोयीसाठी आम्ही विश्रांतीचा दुसरा मार्ग निवडला. शिंगोसाननं आठव्या टप्प्यावरच्या लॉजचं बुकींग केलं. ‘कावागुचीको’ मार्ग हा चार मार्गांपैकी सर्वात सोपा आणि गर्दीचा असल्यामुळं त्या मार्गावरच्या लॉजचं बुकींग आधीच झालं होतं. त्यामुळं मग शिझुओका राज्यातील ‘सुबाशिरी’ मार्गे जायचं ठरलं.

महाराष्ट्रातले काही निवडक किल्ले सोडले तर माझा गिर्यारोहणाचा अनुभव कमीच आहे. नाही म्हणायला दोन वर्षांपूर्वी वैष्णोदेवीला गेलो होतो. मला नक्की कल्पना नाही पण तिथली चढाईची उंची फुजीसानच्या फार फार तर निम्मी असेल. त्यामुळं एवढ्या उंचीवर चढून जाण्याचा प्रसंग कधी आला नव्हता. पण अनुभवात कमतरता असली तरी उत्साहात मात्र कमतरता नव्हती. शनिवारला अजून पाच दिवस अवकाश होता. हवामान खात्याचा अंदाज बघितला तर शनिवार रविवारी पाऊस दिसत होता. पुन्हा एकदा फुजीसान् वर चढाई करण्याच्या आशा अंधुक झाल्या होत्या. शुक्रवारी संध्याकाळी हवामानाचा अंदाज घेवून काय ते ठरवू असं ठरलं. शुक्रवारी हवामान बघितलं तर शनिवारी दुपारी स्वच्छ सुर्यप्रकाश आणि संध्याकाळपासून ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवला होता. चढाईसाठी फार चांगलं म्हणता येईल असं हे हवामान नव्हतं. पण तरीही गेल्या वर्षीचा बदला घ्यायच्या तीव्र इच्छेपोटी आम्ही चढाईचा बेत निश्चित केला.

शनिवारी सकाळी शिंगोसानच्या गाडीतून सहा जण शिझुओकाच्या दिशेनं निघालो. अकराच्या सुमारास पायथ्याजवळ आलो आणि फुजीसानचं डोळ्यात न मावणारं महाकाय रुप दिसू लागलं. गेल्या वर्षीही याच ठिकाणी आलो होतो. त्यावेळी शिंगोसान चेष्टेनं म्हणाला होता. ‘There is a very huge mountain standing in front of us. feel it.’ पण पावसाळी वातावरण आणि ढगांमुळं तो महाकाय पर्वत आम्हाला feel काय पण imagine देखील करता आला नव्हता. यावेळी मात्र खरोखरच फुजीसान् ‘feel’ करता येत होता. पण त्याचा तो आकार कॅमे-यात बंदिस्त करणं निव्वळ अशक्य होतं. वरती चढत जावू तसतसं वस्तू आणि पाण्याच्या किंमती वाढत जात असल्यामुळे वाटेत जेवण आणि परत येईपर्यंत पुरेल एवढं पाणी विकत घेतलं. शनिवार,रविवार आणि सोमवार अशी तीन दिवस जोडून सुट्टी मिळाल्यामुळे फुजीसान चढण्यासाठी खूप गर्दी असणार याची कल्पना होती. त्यामुळं आधी पाचव्या टप्प्यावरच्या पार्किंगमध्ये जागा मिळवणं महत्वाचं होतं. त्यानंतर जेवण करायचं ठरलं. पाचव्या टप्प्याच्या जवळ पोचलो तसं गाड्यांची भली मोठी रांग दिसू लागली. अपेक्षेप्रमाणं पार्किंग केव्हाच भरलं होतं. पार्किंगच्या जागेपासून २-३ किलोमीटर अलिकडंच लोकांनी रस्त्यावरच गाड्या पार्क करायला सुरुवात केली होती. जपानमध्ये हे दृश्य मला जरा नविनच होतं. आम्हीही मग एका बाजूला गाडी पार्क करून जेवण आटोपलं. सामानाची आवराआवर केली आणि एका रोमांचकारी मोहिमेला निघण्यासाठी सज्ज झालो.

क्रमश:

3 comments:

Raina said...

विशाल,

फुजीसानच्या चढाईचे वर्णन अप्रतिम आहे.
फोटॊ तर फार सुरेख आहेत.
खूप दिवसांनी लिहिलय- पण एकदम worth the wait.
छ्या! आता काही करुन गेलेच पाहीजे फुजीवर असे वाटायला लागले आहे.

Abhijit Bathe said...

vishal,
I am moving to seattle shortly and the 'mt. rainier' there does not look too different from mt. fuji!
lets see if can gather some great experiences like you!!

Shailesh said...

लेख खरचं चांगल लिहीला आहेस...