बारावीची परीक्षा संपल्यावर जशी अवस्था होते तशी काहीशी सध्या माझी अवस्था झाली आहे. परीक्षेच्या आधी अभ्यास न करता सुट्टीत काय काय गोष्टी करायच्या याची एक मोठी यादी बनवायची आणि परीक्षेचा ताण एकदम नाहीसा झाल्यावर त्यातलं काहीच करायची इच्छा होऊ नये तसंच झालंय. महत्त्वाचा प्रोजेक्ट संपून आता दोन आठवडे झाले. प्रोजेक्ट संपल्यावर करायच्या गोष्टींची एक मोठी यादी बनवली होती. पण दोन गोष्टी सोडल्या तर बाकीच्या कुठल्याच गोष्टी करण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. पहिली म्हणजे ‘कारुइझावा’ सहल आणि दुसरी म्हणजे ही नोंद. प्रोजेक्टचा महत्त्वाचा टप्पा व्यवस्थित पार पडल्यामुळं कामाचा ताण बराचसा कमी झाला होता. त्यामुळं एका वीकेन्डला टोकियोच्या गजबजाटापासून कुठेतरी दूर drive cum photo expedition ला जाऊन यायचा विचार होता. नुकतंच Autumn चं आगमन झाल्यामुळे ‘कोयो’ म्हणजे autumn colours पाहण्यासाठी एखाद्या शांत ठिकाणी जायचं ठरवलं.
कारुइझावा ब-याच दिवसांपासून मनात घर करुन होतं. इंटरनेटवर माहिती पाहिली तर ‘कोयो’ तिथं अगदी भरात होता. मग जास्ती विचार न करता कार आणि तिथं राहण्यासाठी पेन्शनचं बुकींग केलं आणि शनिवारी सकाळी कारुइझावाच्या दिशेनं सुटलो. टोकियोच्या बाहेर ब-याच वेळा गाडी चालवली होती. पण टोकियोमधून गाडी बाहेर घेऊन जायची माझी पहिलीच वेळ होती. पहिल्यांदा मुंबईला गेल्यावर जशी अवस्था होते तशी अवस्था झाली. या वेळीही GPS महाशय मदतीला होते, पण टोकियोतल्या गर्दीपुढे त्यांनीही हात टेकले आणि माझ्यासारख्या नवशिक्याला रस्ता चुकल्यावर नवीन रस्ता शोधून देता देता त्यांची पार पुरेवाट झाली. सुरवातीचं हायवे इंटरसेक्शन चुकल्यामुळे टोकियो शहरातून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. टोकियोतून बाहेर पडता पडताच दोन-अडीच तास गेले, पण त्यानिमित्तानं ‘टोकियो दर्शन’ घडलं. हायवेला लागल्यावर मात्र फारसा त्रास झाला नाही. दुपारी एक-दीडच्या सुमारास २०० किलोमीटरचा ड्राईव्ह आटोपून कारुइझावाला पोचलो.
‘कारुइझावा’ या ठिकाणाभोवती एवढं वलय का आहे हे तिथं गेल्याशिवाय कळत नाही. आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून कळालं सांगितलं की जपानचे सध्याचे राजे ‘आकिहीतो’ आणि राणी ‘मिचिको’ यांची टेनिस खेळताना तिथं प्रथम भेट झाली आणि कारुइझावा सम्राटांची सासुरवाडी बनली. विकिपीडीयानंही याला दुजोरा दिला. कारुइझावा हे जपानमधल्या summer destinations च्या यादीत खूप वरच्या स्थानी आहे हे ऐकून होतो. विकिपीडीयानं ज्ञानात आणखी भर टाकली. कारुइझावामध्ये कायमच्या रहिवाश्यांची ६००० घरं आहेत. पण उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी outhouse किंवा dormitory ची संख्या १३००० च्या आसपास आहे यावरुन कारुइझावाच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. जुनी चर्च आणि चॅपेलमुळे कारुइझावा लग्नसमारंभासाठीही प्रसिध्द आहे. पण त्या ‘शाही टेनिस प्रसंगा’मुळे कारुइझावामध्ये टेनिस कोर्टस् ची रेलचेल आहे. आणखी एका गोष्टीची रेलचेल म्हणजे ‘ओनसेन’(Natural hot spring) जी सहलीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. आलिशान हॉ़टेल्स आणि ओनसेन रिसॉर्टस् ची इथे काहीएक कमी नाही. त्यामुळेच कारुइझावा म्हटलं की एका शाही ठिकाणाची प्रतिमा डोळ्यासमोर येते.
दुपारचं जेवण आटोपून कारुइझावाच्या बाजारातून एक चक्कर टाकून तिथल्या मिहारानदाई या ठिकाणी गेलो. मिहारानदाई एका डोंगराच्या माथ्यावर आहे. तिथून सभोवतालचा परिसर सूर्यास्ताच्या वेळी अतिशय सुंदर दिसतो. आम्ही पोचलो त्यावेळी सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. पण ढगाळ वातावरणामुळं सूर्यास्त पाहायला मिळणार नाही असं वाटत असतानाच जणू आमच्यासाठीच अचानक पश्चिमेच्या दिशेचं आकाश मोकळं होऊ लागलं आणि सूर्यदेवांनी दर्शन दिलं. पण पश्चिमेच्या आकाशातली लाल रंगपंचमी आणि सभोवतालच्या गर्द वनराईनं नेसलेला लाल-पिवळ्या रंगाचा शालू, यातलं कोणतं दृश्य अधिक सुंदर आहे हे ठरवायचा वेळ न देताच सूर्यदेव पुन्हा ढगांत अदृश्य झाले. तिथं आलेल्या आणखी काही जपानी पर्यटक आजी-आजोबांबरोबर बोलताना कळलं की त्या बागेत रविंद्रनाथ टागोरांचा पुतळा आहे. टागोरांचा पुतळा, इथं एवढ्या लांब, अशा टेकडीवर..ऐकून आश्चर्य वाटलं. जाऊन पाहिलं तर खरोखरच तिथं रविंद्रनाथ टागोरांचा पुतळा होता. क्षणभर मनातून अभिमानाची एक लहर उमटून गेली. रविंद्रनाथ टागोर जपानच्या महिला विद्यापीठात प्रार्थनेवर व्याख्यान देण्यासाठी जपानमध्ये आले होते. १९८० साली त्यांची १२० जन्मतिथी साजरी करण्यासाठी हा पुतळा तिथे उभारण्यात आला होता. टागोरांना वंदन करुन मिहारानदाईवरुन पेन्शनच्या वाटेला लागलो.
जपानमध्ये सहलीला जाऊन ओनसेनला गेलो नाही तर तो फाऊल ठरतो. पेन्शनमध्ये पोचल्यापोचल्या सामान टाकून रात्रीचं जेवण (खरं तर ते संध्याकाळचंच जेवण असतं) उरकलं आणि तिथल्या काकांकडून सर्वात आधी जवळपासच्या ओनसेनची माहिती मिळवली. तिथून जवळच असलेल्या एका चांगल्या ओनसेनचा पत्ता GPS मध्ये टाकला आणि ओनसेनच्या दिशेनं सुटलो. रात्रीच्या थंडीत, कढत पाण्यात रोतेंबुरो(open air onsen)मध्ये डुंबताना प्रशांत दामलेचं एक गाणं आठवल्याशिवाय राहात नाही. ‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं’. जपानीत यासाठी एक खास शब्द आहे, ‘शिआवासे’.
दुस-या दिवशी सकाळी मिशन कोयोसाठी कारुइझावाच्या उत्तरेला निघालो. शिरानेसान् नावाच्या डोंगराच्या माथ्यापर्यंतचा रस्ता छान गर्द झाडीतून जातो. दोन्ही बाजूला गर्द पिवळ्या, तांबडया झाडांमधून ड्राइव्ह करताना मजा येत होती.
शिरानेसानच्या माथ्यावर पोचण्यापूर्वी वाटेत एक छान जागा मिळाली. तिथं थोडं फोटोसेशन करुन पुढे निघालो. शिरानेसान पार केल्यावर पुढे पाच छोट्या तळ्यांचा समूह आहे. तिथं कोयो पाहायला मिळतो का पाहण्यासाठी गेलो. पण तिथला सीझन संपला होता. कारुइझावामध्ये परतेपर्यंत संध्याकाळ झाली. दुस-या दिवशीचा मुक्काम वेगळ्या पेन्शनमध्ये हलवून रात्रीचा ओनसेनचा दिनक्रम आटोपला.
तिस-या दिवशी कारुइझावातच फिरायचं ठरवलं. सुट्टयांचा हंगाम नसल्यामुळे कुठेच फारशी गर्दी नव्हती. १५-२० मिनीटं डोंगर चढून गेल्यावर शिराइतोनोताकी नावाचा असा छोटासा धबधबा दिसतो. डोंगरातली पायवाट ‘ओइरासे’ची आठवण करुन देते.
शिराइतोनोताकी हून परतताना वाटेत एका मंदिराच्या आवारात असा एक छान बहरलेला मेपल दिसला.
जपानी मंदिरांच्या आवारात हमखास असे छोटे मेपल दिसतात. त्यांना ‘मोमिजी’ म्हणतात.
कारुइझावामध्ये autumn अगदी बहरात होता आणि हवाही अतिशय आल्हाददायक होती. तिथून पुढे तिथले प्रसिध्द ‘कुमोबानो इके’ (इके = तळे) पाहण्यास गेलो. काही परदेशी लोक त्याला swan lake ही म्हणतात. तीन दिवसांच्या ट्रिपचा पैसा वसूल ठिकाण.
मस्तपैकी एक बैठक मारुन याचं स्केच काढण्याची फार इच्छा होती. पण दुर्दैवानं तेवढा वेळही नव्हता आणि स्केचबुकही. संध्याकाळी टोकियोला कार परत करायची असल्यामुळं मन मारुनच तिथून निघालो. पण काही चांगली छायाचित्रं काढल्याचं समाधान मिळाल्यामुळं हा तीन दिवसांचा autumn drive नेहमीच मनात घर करुन राहील.
आणखी छायाचित्रे इथे
Subscribe to:
Post Comments (Atom)
11 comments:
विशाल,
कोयोचे फोटो फार सुरेख आहे. आणि टागोरांच्या पुतळ्याबद्दल माहित नव्हत. आमचा राहिला पाह्यचा याची आता हळहळ वाटते. पण- योकोहामातील सांकेई येन् मधे टागोरांनी ज्या जागेला भेट दिली ती झोपडी आहे. तू पाहिली आहेस क?
आत्ताच सेन्दाईहून परतलो आहोत. फोटो नंतर पाठवते. कोयो चा बहर गेलाय पण अवशेष ही फार सुंदर होते.
वा! नोंद खूप आवडली, आणि छायाचित्रं तर फारच वेधक. वेळोवेळी जपानची सहल आम्हाला घरबसल्या घडवून आणल्याबद्दल धन्यवाद! लिहीत रहा :-)
फोटो अतिशय सुंदर आहेत, असे फोटो आधी फक्त वॉलपेपरवरच पाहिले होते. हा छंद असाच चालू ठेव.
रैना, सुमेधा, शैलेश,
प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. फोटोग्राफीमध्ये मी अजून नवशिक्याच आहे. पण कालिदासाचं वाचन कमी पडल्यामुळं उपमांऐवजी मी छायाचित्रं देणंच पसंत करतो. तुम्हाला छायाचित्रं आवडली हे वाचून आनंद झाला.
योकोहामामधली टागोरांनी भेट दिलेली झोपडी मी अजून पाहिलेली नाही. पण आता माहिती मिळाल्यामुळे अवश्य भेट देईन.
हाय विशाल, वर्णन सुरेख आहे. आणि छायाचित्रे तर अप्रतिम.
Ekdam Zakkas Mitra! u r improving by leaps and bound when it comes to Photo Graphy!
hi vishal
i read abt marathiblogs in sakal and just visited the site.
i never visited japan.but our neighbour always talks about the country.
i read all this in ur beautiful article.be writing something like this its really nice.snaps are just beautiful.
सुरेख! लिखाण आणि फोटो दोन्ही... ती रंगीत झाडाची फांदी आणि तळ्यातल्या बदकांचा फोटो विशेष आवडला. जापान एकंदरीत फारच सुंदर देश दिसतोय. रैनाच्या ब्लॉगवरही वाचलं. तसंच 'साकुरा' बद्दल पण वाचलंय बरेचदा.
छायाचित्रे आणि वर्णन दोन्हीही मस्त
Wow! Vishal, you are awesome! I have never read and seen so much beauty in my life. Keep it up dude!! You are rocky rocking!!
Btw, I watched Rocky Balboa yesterday. It's nice.
prashant
fotos aNi warNan..ekdam fujisaan :-)
Post a Comment