Tuesday, February 27, 2007

आभार

'स्वर्गादपि गरीयसी' भारतभूमीतून परत येऊन एक आठवडा लोटला. जवळजवळ दोन वर्षांनी भारतवारीचा योग आला. मित्रांच्या आणि आप्तांच्या भेटीगाठींमध्येच महिनाभराचा वेळ कसा गेला ते कळलंही नाही. आल्यावर पुन्हा रहाटगाडगं सुरु झालं. भारतातून परत आलं की थोडे दिवस एक विचित्र कंटाळा येतो. काही करायचा मूडच होत नाही. ब-याच दिवसांपासून काहीतरी लिहावं असा विचार होता. पण 'कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो' अशी काहीशी अवस्था झाल्यामुळं काहीच लिहीणं झालं नाही. आज सहज खूप दिवसांनी थोडे ब्लॉग वाचल्यावर नवीन घडामोडी वाचायला मिळाल्या आणि लिहायचा उत्साह आला.

इंडिब्लॉगीज्२००६ मध्ये सर्वोत्कृष्ट ब्लॉगची निवड झाल्याबद्दल ट्युलिपचं हार्दिक अभिनंदन! माझ्यासारखे अनेक नियमित वाचक असणारा हा ब्लॉग सर्वोत्कृष्ट ठरला नसता तरच नवल. या उपक्रमाची मला काहीच कल्पना नव्हती. आज खूप दिवसांनी ट्युलिपच्याच ब्लॉगवर ही बातमी वाचली. विदग्धवर पात्रता फेरीत नामांकन असलेल्या ब्लॉग्समध्ये माझ्या ब्लॉगचं नाव बघून एक सुखद आश्चर्याचा धक्का बसला. आणि खरं सांगायचं झालं तर थोडं ओशाळल्यासारखंही झालं. नामांकित झालेल्या एकापेक्षा एक सरस अनुदिनीकारांच्या यादीत बसण्याची पात्रता नक्कीच या ब्लॉगमध्ये नाही. पण तरीही हा ब्लॉग नामांकित करावासा वाटून नामांकित करणा-या, त्याला अतिम फेरीत पोचवून मत देणा-या आणि ध्यानीमनी नसताना आश्चर्याचा एक सुखद धक्का देणा-या अनामिक वाचकांचा मी मनःपूर्वक आभारी आहे.

धन्यवाद.

Saturday, December 09, 2006

इयम् आकाशवाणी |

इयम् आकाशवाणी|संप्रति वार्ताः श्रूयंताम्| प्रवाचकः बलदेवानन्द सागरः| ...
लहानपणी आजोळी गेलं की आकाशवाणीवरच्या संस्कृत बातम्या हमखास कानावर पडायच्या. त्यात हे पहिलं वाक्य ठरलेलं असायचं. संस्कृत शिकायला नुकतीच सुरुवात झालेली असल्यामुळं पहिल्या वाक्याशिवाय काही कळायचं नाही. पुढेपुढे जसजसं शिकत गेलो, तसतसं थोडं थोडं कळायला लागलं. पण बारावीनंतर संस्कृतही सुटलं आणि रेडिओचा संपर्कही. आज का कुणास ठाऊक, अचानक हे वाक्य आठवलं. संस्कृत बातम्या ऐकाव्याश्या वाटल्या. लागलीच आकाशवाणीचं संकेतस्थळ उघडलं. तिथं बातम्या सापडल्या. आजकाल आकाशवाणी एकदम तत्पर झाली आहे. रोजच्यारोज सगळ्या भाषांमधल्या बातम्या अपडेट वगैरे करणे म्हणजे जरा जास्तच आहे नाही का? सरकारी यंत्रणांमध्ये एवढी तत्परता क्वचितच पाहायला मिळते.
आज कोणीतरी पंकजा घै नावाच्या बाई बातम्या देत होत्या. जरा अडखळत बोलत असल्यासारखं वाटत होतं. पूर्वीच्या निवेदकांसारखी त्यांची संस्कृतावर पकड आहे असं वाटत नव्हतं. पूर्वीच्या संस्कृत बातम्या ऐकताना ते निवेदक लहानपणापासून संस्कृताशिवाय आणखी कुठल्याही भाषेत बोलले नसावेत असं वाटायचं. पण तरीही आज खूप वर्षांनी पुन्हा एकदा संस्कृत बातम्या ऐकताना मजा आली. संस्कृताशी संबंध संपून बरीच वर्षं झाली. बातम्या ऐकूनही फारसं काही कळलं नाही. पण ऐकल्याचं एक वेगळंच समाधान मिळालं. कधीतरी मध्येच एखादी गोष्ट करण्याची लहर आली आणि ती पटकन करायला मिळाली की एक वेगळाच आनंद मिळतो, नाही?
 आज मनात सहज विचार आला. लहानपणी रेडिओवर आपली आवड कार्यक्रम लागायचा. त्यानंतर त्याची जागा टीव्हीनं घेतली. रंगोली, चित्रहार, छायागीत.. नंतर केबल वाहिन्यांचं जाळं आल्यावर चोवीस तास तास नको असलेल्या गाण्यांचा भडीमार सुरु झाला. आजकालच्या इंटरनेटच्या इंस्टट जमान्यात तेही मागे पडत चाललंय. आजकाल YouTube किंवा Raaga सारख्या संकेतस्थळांवर कुठलंही गाणं इंस्टंट ऐकता किंवा पाहता येतं. पण रविवारी दुपारी भरपेट जेवण आटोपून हॉलमध्ये पहुडल्यावर जरा डुलकी घ्यावी तोच अचानक कानावर पडणा-या छायागीतातल्या आवडीच्या गाण्याची सर त्याला थोडीच येणार आहे?

Friday, November 17, 2006

कारुइझावा

बारावीची परीक्षा संपल्यावर जशी अवस्था होते तशी काहीशी सध्या माझी अवस्था झाली आहे. परीक्षेच्या आधी अभ्यास न करता सुट्टीत काय काय गोष्टी करायच्या याची एक मोठी यादी बनवायची आणि परीक्षेचा ताण एकदम नाहीसा झाल्यावर त्यातलं काहीच करायची इच्छा होऊ नये तसंच झालंय. महत्त्वाचा प्रोजेक्ट संपून आता दोन आठवडे झाले. प्रोजेक्ट संपल्यावर करायच्या गोष्टींची एक मोठी यादी बनवली होती. पण दोन गोष्टी सोडल्या तर बाकीच्या कुठल्याच गोष्टी करण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. पहिली म्हणजे ‘कारुइझावा’ सहल आणि दुसरी म्हणजे ही नोंद. प्रोजेक्टचा महत्त्वाचा टप्पा व्यवस्थित पार पडल्यामुळं कामाचा ताण बराचसा कमी झाला होता. त्यामुळं एका वीकेन्डला टोकियोच्या गजबजाटापासून कुठेतरी दूर drive cum photo expedition ला जाऊन यायचा विचार होता. नुकतंच Autumn चं आगमन झाल्यामुळे ‘कोयो’ म्हणजे autumn colours पाहण्यासाठी एखाद्या शांत ठिकाणी जायचं ठरवलं.

कारुइझावा ब-याच दिवसांपासून मनात घर करुन होतं. इंटरनेटवर माहिती पाहिली तर ‘कोयो’ तिथं अगदी भरात होता. मग जास्ती विचार न करता कार आणि तिथं राहण्यासाठी पेन्शनचं बुकींग केलं आणि शनिवारी सकाळी कारुइझावाच्या दिशेनं सुटलो. टोकियोच्या बाहेर ब-याच वेळा गाडी चालवली होती. पण टोकियोमधून गाडी बाहेर घेऊन जायची माझी पहिलीच वेळ होती. पहिल्यांदा मुंबईला गेल्यावर जशी अवस्था होते तशी अवस्था झाली. या वेळीही GPS महाशय मदतीला होते, पण टोकियोतल्या गर्दीपुढे त्यांनीही हात टेकले आणि माझ्यासारख्या नवशिक्याला रस्ता चुकल्यावर नवीन रस्ता शोधून देता देता त्यांची पार पुरेवाट झाली. सुरवातीचं हायवे इंटरसेक्शन चुकल्यामुळे टोकियो शहरातून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. टोकियोतून बाहेर पडता पडताच दोन-अडीच तास गेले, पण त्यानिमित्तानं ‘टोकियो दर्शन’ घडलं. हायवेला लागल्यावर मात्र फारसा त्रास झाला नाही. दुपारी एक-दीडच्या सुमारास २०० किलोमीटरचा ड्राईव्ह आटोपून कारुइझावाला पोचलो.

‘कारुइझावा’ या ठिकाणाभोवती एवढं वलय का आहे हे तिथं गेल्याशिवाय कळत नाही. आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून कळालं सांगितलं की जपानचे सध्याचे राजे ‘आकिहीतो’ आणि राणी ‘मिचिको’ यांची टेनिस खेळताना तिथं प्रथम भेट झाली आणि कारुइझावा सम्राटांची सासुरवाडी बनली. विकिपीडीयानंही याला दुजोरा दिला. कारुइझावा हे जपानमधल्या summer destinations च्या यादीत खूप वरच्या स्थानी आहे हे ऐकून होतो. विकिपीडीयानं ज्ञानात आणखी भर टाकली. कारुइझावामध्ये कायमच्या रहिवाश्यांची ६००० घरं आहेत. पण उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी outhouse किंवा dormitory ची संख्या १३००० च्या आसपास आहे यावरुन कारुइझावाच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. जुनी चर्च आणि चॅपेलमुळे कारुइझावा लग्नसमारंभासाठीही प्रसिध्द आहे. पण त्या ‘शाही टेनिस प्रसंगा’मुळे कारुइझावामध्ये टेनिस कोर्टस् ची रेलचेल आहे. आणखी एका गोष्टीची रेलचेल म्हणजे ‘ओनसेन’(Natural hot spring) जी सहलीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. आलिशान हॉ़टेल्स आणि ओनसेन रिसॉर्टस् ची इथे काहीएक कमी नाही. त्यामुळेच कारुइझावा म्हटलं की एका शाही ठिकाणाची प्रतिमा डोळ्यासमोर येते.

दुपारचं जेवण आटोपून कारुइझावाच्या बाजारातून एक चक्कर टाकून तिथल्या मिहारानदाई या ठिकाणी गेलो. मिहारानदाई एका डोंगराच्या माथ्यावर आहे. तिथून सभोवतालचा परिसर सूर्यास्ताच्या वेळी अतिशय सुंदर दिसतो. आम्ही पोचलो त्यावेळी सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. पण ढगाळ वातावरणामुळं सूर्यास्त पाहायला मिळणार नाही असं वाटत असतानाच जणू आमच्यासाठीच अचानक पश्चिमेच्या दिशेचं आकाश मोकळं होऊ लागलं आणि सूर्यदेवांनी दर्शन दिलं. पण पश्चिमेच्या आकाशातली लाल रंगपंचमी आणि सभोवतालच्या गर्द वनराईनं नेसलेला लाल-पिवळ्या रंगाचा शालू, यातलं कोणतं दृश्य अधिक सुंदर आहे हे ठरवायचा वेळ न देताच सूर्यदेव पुन्हा ढगांत अदृश्य झाले. तिथं आलेल्या आणखी काही जपानी पर्यटक आजी-आजोबांबरोबर बोलताना कळलं की त्या बागेत रविंद्रनाथ टागोरांचा पुतळा आहे. टागोरांचा पुतळा, इथं एवढ्या लांब, अशा टेकडीवर..ऐकून आश्चर्य वाटलं. जाऊन पाहिलं तर खरोखरच तिथं रविंद्रनाथ टागोरांचा पुतळा होता. क्षणभर मनातून अभिमानाची एक लहर उमटून गेली. रविंद्रनाथ टागोर जपानच्या महिला विद्यापीठात प्रार्थनेवर व्याख्यान देण्यासाठी जपानमध्ये आले होते. १९८० साली त्यांची १२० जन्मतिथी साजरी करण्यासाठी हा पुतळा तिथे उभारण्यात आला होता. टागोरांना वंदन करुन मिहारानदाईवरुन पेन्शनच्या वाटेला लागलो.

जपानमध्ये सहलीला जाऊन ओनसेनला गेलो नाही तर तो फाऊल ठरतो. पेन्शनमध्ये पोचल्यापोचल्या सामान टाकून रात्रीचं जेवण (खरं तर ते संध्याकाळचंच जेवण असतं) उरकलं आणि तिथल्या काकांकडून सर्वात आधी जवळपासच्या ओनसेनची माहिती मिळवली. तिथून जवळच असलेल्या एका चांगल्या ओनसेनचा पत्ता GPS मध्ये टाकला आणि ओनसेनच्या दिशेनं सुटलो. रात्रीच्या थंडीत, कढत पाण्यात रोतेंबुरो(open air onsen)मध्ये डुंबताना प्रशांत दामलेचं एक गाणं आठवल्याशिवाय राहात नाही. ‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं’. जपानीत यासाठी एक खास शब्द आहे, ‘शिआवासे’.

दुस-या दिवशी सकाळी मिशन कोयोसाठी कारुइझावाच्या उत्तरेला निघालो. शिरानेसान् नावाच्या डोंगराच्या माथ्यापर्यंतचा रस्ता छान गर्द झाडीतून जातो. दोन्ही बाजूला गर्द पिवळ्या, तांबडया झाडांमधून ड्राइव्ह करताना मजा येत होती.

शिरानेसानच्या माथ्यावर पोचण्यापूर्वी वाटेत एक छान जागा मिळाली. तिथं थोडं फोटोसेशन करुन पुढे निघालो. शिरानेसान पार केल्यावर पुढे पाच छोट्या तळ्यांचा समूह आहे. तिथं कोयो पाहायला मिळतो का पाहण्यासाठी गेलो. पण तिथला सीझन संपला होता. कारुइझावामध्ये परतेपर्यंत संध्याकाळ झाली. दुस-या दिवशीचा मुक्काम वेगळ्या पेन्शनमध्ये हलवून रात्रीचा ओनसेनचा दिनक्रम आटोपला.

तिस-या दिवशी कारुइझावातच फिरायचं ठरवलं. सुट्टयांचा हंगाम नसल्यामुळे कुठेच फारशी गर्दी नव्हती. १५-२० मिनीटं डोंगर चढून गेल्यावर शिराइतोनोताकी नावाचा असा छोटासा धबधबा दिसतो. डोंगरातली पायवाट ‘ओइरासे’ची आठवण करुन देते.

शिराइतोनोताकी हून परतताना वाटेत एका मंदिराच्या आवारात असा एक छान बहरलेला मेपल दिसला.

जपानी मंदिरांच्या आवारात हमखास असे छोटे मेपल दिसतात. त्यांना ‘मोमिजी’ म्हणतात.


कारुइझावामध्ये autumn अगदी बहरात होता आणि हवाही अतिशय आल्हाददायक होती. तिथून पुढे तिथले प्रसिध्द ‘कुमोबानो इके’ (इके = तळे) पाहण्यास गेलो. काही परदेशी लोक त्याला swan lake ही म्हणतात. तीन दिवसांच्या ट्रिपचा पैसा वसूल ठिकाण.
मस्तपैकी एक बैठक मारुन याचं स्केच काढण्याची फार इच्छा होती. पण दुर्दैवानं तेवढा वेळही नव्हता आणि स्केचबुकही. संध्याकाळी टोकियोला कार परत करायची असल्यामुळं मन मारुनच तिथून निघालो. पण काही चांगली छायाचित्रं काढल्याचं समाधान मिळाल्यामुळं हा तीन दिवसांचा autumn drive नेहमीच मनात घर करुन राहील.


आणखी छायाचित्रे इथे