Sunday, January 18, 2009

होक्काईदो सहल १


होक्काईदोचा शब्दशः अर्थ उत्तरेकडील समुद्राला जाणारा रस्ता. एका अर्थानं होक्काईदोला हे नाव सार्थच आहे. होक्काईदोकडे सरळ चालत गेलात की तुम्ही उत्तरेच्या समुद्राला जाऊन मिळता. पण होक्काईदो हा शब्द एवढ्यापुरताच मर्यादित नाही. भटकंतीची, छायाचित्रणाची आवड माझ्यासारख्यांसाठी होक्काईदोची सफर म्हणजे एक पर्वणीच.


गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये होक्काईदोची सहा दिवसांची अविस्मरणीय सहल घडली. खूप दिवसांपासून या सहलीबद्दल लिहायचं मनात होतं. आज निश्चय करुन लिहायचं ठरवलं. जपानमध्ये येण्याआधी, आल्यापासून होक्काईदोबद्दल बरंच काही ऐकलं होतं. जायची इच्छा होतीच. पण पाकिट अशक्त असल्यामुळं जाण्याचं धाडस होत नव्हतं. जपानमध्ये देशांतर्गत प्रवास फारच महाग. त्यामुळेच इथली तरुण मुलं सुट्टीच्या दिवसांत परदेशात फिरुन येणं पसंत करतात. होक्काईदोच्या सहलीच्या खर्चात एक भारतवारी सहज होऊन जाते. त्यामुळे होक्काईदोला जाण्यापेक्षा भारतात 

जाऊन आलेलं परवडलं असा विचार करुन आत्तापर्यंत होक्काईदोला जाणं टाळलं होतं. यंदाच्या उन्हाळी सुट्टीत मात्र एकदाचा धीर करुन जायचं ठरवलं. सोबत लॅबमधला एक चिनी मुलगा आणि मुलगीही तयार झाले. लगेचच सहा दिवसांच्या सहलीचा आराखडा तयार होऊन विमानाची तिकिटं, होटेल्स, रेंट-कार, सगळ्याचं बुकींग झालंही.


जपानी लोकांसाठी होक्काईदोचं प्रमुख आकर्षण म्हणजे तिथलं सीफूड. ८० ते ९०% जपानी लोक तिथे निव्वळ सीफूड चा आस्वाद घेण्यासाठी जातात. अर्थात जपानमध्ये फिरताना कुठेही गेलं तरी उदरभरण झाल्याशी कारण असं आमचं धोरण असल्यामुळे तिथल्या सीफूड मध्ये मला काहीच स्वारस्य नव्हतं. बरोबरच्या चीनी मुलांना मात्र केव्हा एकदा तिथल्या खेकड्यांवर तुटून पडतोय असं झालं होतं. साप्पोरोच्या विमानतळावर पोचल्यापोचल्याच तिथल्या एका रेस्टॉरंटमध्ये त्यांना ती संधी मिळाली. टोक्योहून दोन तासांच्या विमानप्रवासानंतर दुपारी १२ च्या दरम्यान होक्काईदोच्या चितोसे विमानतळावर पोचलो. विमानतळावरुन बाहेर पडताच होक्काईदोच्या हवेतील जादू जाणवू लागली. टोक्योमध्ये तितकसं प्रदूषण नसलं तरी उंचच उंच इमारतींमधून मोकळी हवा आणि स्वच्छ आकाश दिसणं दुर्मिळच. टोक्योच्या गोंगाटापासून, उकाड्यापासून दूर होक्काईदोमधलं शांत वातावरण, तिथली स्वच्छ हवा, निरभ्र आकाश आणि अंगाला गुदगुल्या करत निघून जाणारी वा-याची झुळूक एका क्षणातच आम्हाला 'व्हेकेशन मोड'मध्ये घेऊ

न गेले. सहा दिवसांच्या सहलीचं वेळापत्रक अगदी भरगच्च होतं. त्यामुळं तिथून लगेचच कार रेंट करुन 'फुरानो' या शहराच्या दिशेने निघालो. यावेळची कार गेल्या वेळेपेक्षा बरीच चांगली होती. होक्काईदोमधले लांबच लांब निर्मनुष्य रस्ते पाहून गाडी सुसाट वेगाने पळवण्याचा मोह आवरत नव्हता. पण वेगाची मर्यादा ओलांडू नको नाहीतर पकडला जाशील असं टोक्योतून निघताना ब-याच जणांनी बजावल्यामुळं मनाला आवर घातला. दुपारी चारच्या सुमारास फुरानोला पोचलो.


फुरानो हे शहरापेक्षा एक छोटं गावच आहे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. होक्काईदोची राजधानी साप्पोरोपासून साधारण दीडशे कि.मी. किंवा दोन-अडीच तासांवर हे गाव वसलं आहे. फुरानोच्या जवळ जाऊ तसं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विस्तीर्ण भाताची शेतं दिसू लागली. फुरानो प्रसिध्द आहे तिथल्या फार्म हाऊसेस् साठी. जुलै ते ऑगस्टदरम्यान तिथल्या जवळजवळ प्रत्येक फार्महाऊसमध्ये लव्हेंडरच्या बागा फुलतात. हॉटेलचा ताबा मिळण्यास अवकाश असल्यामुळे मग जवळचं 'तोमिता 

फार्महाऊस' पाहण्यासाठी गेलो. आम्ही गेलो तेव्हा लव्हेंडर चा मोसम नुकताच संपला असल्यामुळे तिथे जाऊनही फार काही पाहायला मिळणार नाही असं वाटलं. पण होक्काईदोचा लौकिकच असा आहे की तिथे कोणत्याही मोसमात गेलेला पर्यटक निराश होऊन परततच नाही. 'फार्म तोमिता'नंही आम्हाला निराश केलं नाही. युरोपच्या धर्तीवर बांधलेली छोटे टुमदार रेस्टहाऊसेस, आईस्क्रीम पार्लर्स आणि त्याभोवती नजर फिरेल तिकडे पसरलेले नानाविध रंगांचे फुलांचे ताटवे आणि त्यांच्यावर पसरलेली उतरती उन्हे. सहलीच्या पहिल्याच दिवशी यापेक्षा मोठी मेजवानी ती कोणती?


तिथल्याच एका आईस्क्रीम पार्लरमध्ये लव्हेंडरच्या फ्लेवरचं मस्त आईस्क्रीम चाखून पुढे निघालो. फुरानोमध्येच पहिल्या दिवशीचा मुक्काम ठरला होता. तिथल्या एका पेन्शनमध्ये (पेईंग गेस्ट हाऊस) राहण्याची व्यवस्था केली होती. पेन्शनचं बुकींग संध्याकाळपासून असल्यामुळं मधल्या वेळात दुसरं कुठलं तरी ठिकाण पाहायचं ठरलं. सूर्यास्ताची वेळ जवळ आली होतीच. माहिती नाही पण फुरानोच्या गाईडबुकमध्ये सूर्यास्तासाठी प्रसिध्द असणारी ‘हि नो दे कोएन’ नावाची जागा मिळाली. ‘हि नो दे कोएन’ चा अर्थच सूर्यास्ताची बाग असा असल्यामुळे तिथे

 बरोबर सूर्यास्ताच्या वेळी तिथं पोचणं याला योगायोग म्हणावा की आमचं भाग्य? एका छोट्याश्या टेकडीच्या माथ्यावर एक छोटासा निरीक्षण कक्ष आणि सभोवताली मस्त फुलांचे ताटवे. त्यांच्या मध्येच एक छोटीशी कमान. कमानीत एक छोटीशी घंटा. आणि कमानीतून दिसणारं समोर पसरलेलं छोटंसं फुरानो गाव. संधिप्रकाशातलं हि नो दे बागेतलं ते दृश्य मोठं विहंगम होतं. हिंदी चित्रपटातल्या गाण्याच्या लोकेशनला अगदी साजेसं. कॅम्पिंगची आवड असणा-यांसाठी टेकडीच्या दुस-या बाजूला पायथ्याशी काही कॅम्प होते. आदित्य चोप्राला या जागेचा शोध अजून कसा लागला नाही असा विचार करत थंड वा-याची झुळूक अंगावर घेत बराच वेळ बागेतल्या बाकावर बसून राहिलो.  

   एव्हाना अंधार पडला होता. जेवणाची वेळ झाल्यानं लगबगीनं पेन्शन गाठलं. ‘रेश्शा हाऊस’ नावाचं छान पेन्शन होतं. पेन्शनच्या बाजूलाच राहण्यासाठी रेल्वेच्या डब्यांमध्ये छानश्या टुमदार खोल्या होत्या. त्यावरुनच पेन्शनच्या रेश्शा हाऊस नावाचा अंदाज आला. आमची राहण्याची व्यवस्था मात्र नेहमीच्या घरात होती. रुमचा ताबा घेऊन डायनिंग रुममध्ये हजर झालो. फुरानोच्या फार्ममधले प्रसिध्द बटाटे आणि भोपळ्याचं कालवण, भात असा चक्क शाकाहारी बेत होता. चीनी मुलांची जरा निराशाच झाली पण जपानमध्ये शाकाहारी जेवण म्हणजे माझ्यासाठी मेजवानीच होती. नंतर छान डेझर्टवर ताव मारुन गावात एक फेरफटका मारण्यासाठी निघालो. छोटंसं गाव असल्यामुळे रात्री सगळीकडे अगदीच सामसूम होती. पेन्शनच्या काकांकडून एका ओनसेनचा (नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड) पत्ता मागून ओनसेन गाठला. तासभर ओनसेनमध्ये डुंबून आल्यावर अशी काही गाढ झोप लागली की बस्स!


क्रमशः

No comments: