‘मनासारखं घर मिळेल.’
रविवारी सकाळी नेहमीप्रमाणं इ-सकाळ उघडून साप्ताहिक राशीभविष्य वाचलं ते हे. मनात म्हटलं, ‘ज्योतिषीबुवा, भविष्य तर बरोबर लिहीलंत पण एक महिना उशीरानं.’ आपले ज्योतिषी आणि हवामानखातं, दोघांमध्येही फारसा फरक नाही कारण दोघांचीही भाकितं कधीच वेळेवर खरी होत नाहीत. नवीन घरात राहायला येऊन आता तीन आठवडे होत आले. मनासारखं घर मिळेल असं ज्योतिषीबुवांनी लिहीलं तरी टोकियो किंवा योकोहामामध्ये मनासारखं घर मिळण्यासाठी कोणत्या दिव्व्यातून जावं लागतं हे त्यांना कसं कळणार म्हणा.
जपानमध्ये दोन वर्षं संपली तसा Hiyoshi International House या विद्यापीठाच्या वसतीगृहातला मुक्कामही हलवायची वेळ आली. नवीन मुलांना राहण्याची संधी मिळावी म्हणून तिथं दोन वर्षांपेक्षा जास्त दिवस राहाता येत नाही. जागा शोधताना काय काय उपद्व्याप करावे लागतात त्याचं ट्रेलर मागच्या वर्षी सिनीअर्सबरोबर जागा शोधताना पाहायला मिळालं होतं. इथं नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात एप्रिलमध्ये होते. त्यावेळी जागा मिळण्याची शक्यता अधिक असल्यामुळं त्यावेळीच नवीन जागा शोध असा सल्ला सिनीअर्सकडून वारंवार मिळाला होता. पण HIH ची well furnished room, वीज, पाणी, इंटरनेट, फोनच्या बीलाची फिकीर नाही, दर महिन्याला लॉंड्रीहून येणारे चार चकचकीत बेडकव्हर्सचे सेट, तिथला इंटरनॅशनल मित्रपरिवार, त्यांच्याबरोबरच्या वीकेन्ड मूव्हीज्, पार्ट्या अश्या five star dormitory ला सहा महिने आधीच मुकण्यासाठी कोण तयार होणार? माझा नॉर्वेचा एक मित्र नेहमी म्हणत असे. “We are ruined by HIH.” खरंच होतं ते. We were ruined. त्यामुळं ऑगस्ट २५ म्हणजे अखेरच्या दिवसापर्यंत HIH चा किल्ला लढवायचा निर्णय आम्हा मित्रपरिवारानं घेतला.
जपानमध्ये घर शोधणं सोपी गोष्ट नाही. घर शोधायला सुरुवात केली की त्याचा प्रत्यय लगेच यायला लागतो. इथं तुम्हाला थेट घरमालकाकडून घर भाड्याने मिळवता येत नाही. भाड्याच्या घरासाठी किंवा घर विकत घेण्यासाठी real estate agents कडे जावं लागतं. त्यांना ‘फुदोसान्’ म्हणतात. फुदोसानला तुमच्या गरजा आणि बजेट सांगितल्यावर तो तुम्हाला त्याच्या गाडीतून तुमच्या आवाक्यातली घरं दाखवून आणतो. त्यातलं एखादं घर तुम्हाला पसंत पडलं तर मग घरमालकांच्या संमतीने तुम्हाला तिथं भाड्यानं राहाता येतं. सुरुवातीला घरात राहायला जाण्यापूर्वी घरमालकाला रेइकिन्(Thank you money) दोन महिन्यांचं भाडं, शिकीकिन्(deposit, जे घर सोडताना परत मिळण्याची शक्यता कमीच असते) दोन महिन्यांचं भाडं आणि राहायला जातानाच्या महिन्याचं भाडं असं पाच महिन्याचं भाडं द्यावं लागतं. फुदोसानला त्यानं घर हुडकून दिल्याबद्दल एक महिन्याचं भाडं द्यावं लागतं ते वेगळंच. तुम्ही नोकरी करत असाल तर ठीक. पण विद्यार्थी असाल तर वर्षभर बचत करुन किंवा part-time job करुन मिळवलेल्या सहा महिन्यांच्या भाड्याची रक्कम एका दिवसात अकाउंटमधून नाहीशी झाल्याचा धक्का पचवणं वाटतं तितकं सोपं नसतं. बरं इथल्या घरांचं भाडंही थोडंथोडकं नसतं. एवढं अव्वाच्या सव्वा भाडं देऊन घर पाहावं तर ती असते एक ९x९ ची खोली आणि टीचभर किचन. जागांच्या किंमतीच्या बाबतीत जपान जगातला सर्वात महागडा देश असावा. रेइकिन किंवा शिकीकिन हे प्रत्येक घरमालकानुसार बदलत असलं तरी साधारणपणे सुरुवातीला ५-६ महिन्यांच्या भाड्याची रक्कम द्यावीच लागते. तुम्ही जपानी असाल तर हे सहा महिन्यांचं भाडं भरुन तुम्हाला लगेच राहायला सुरुवात करता येते. पण परदेशी असाल तर प्रश्न एवढ्यावर सुटत नाही. ९०-९५% घरमालक आपल्या घरात परदेशी लोकांना भाडेकरू म्हणून ठेवून घेण्यास तयार नसतात. त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे भाषेचा अडसर. शिवाय परदेशी लोकांचा बेशिस्तपणा, नियमानुसार न वागण्याची वृत्ती आणि एकंदरीतच इथं परदेशी लोकांबद्दल असलेलं discrimination अशी आणखीही कारणं असू शकतील. पण तुम्ही परदेशी आहात हा घर शोधण्याच्या मार्गातला सर्वात मोठा अडसर आहे.
या सर्व गोष्टींची कल्पना असल्यामुळं थोडीफार बचत सुरु होतीच. जुलै महिना सुरु झाला तशी नवीन जागा पाहण्यासाठी सर्वांची कसरत सुरु झाली. फुदोसानकडे जाण्यापूर्वी युनिव्हर्सिटीतून काही मदत मिळते का पाहावी म्हणून ऑफिसमध्ये गेलो. त्यांच्याकडे परदेशी मुलांना राहाता येईल अशा काही जागांची माहिती होती. त्यातली एक जवळची जागा पाहावी म्हणून एका इंडोनेशिअन मित्राबरोबर जागा पाहण्यासाठी गेलो. जपानीत घरमालकाला ‘ओयासान्’ म्हणतात. बहुतांश जागी ‘ओयासान्’ म्हणजे मालकिणबाई असतात. फोनवरुन ओयासान् ला आम्ही येतोय असं सांगितलं. मालकिणबाई साठीच्या आसपास असाव्यात. त्यांनी आम्हाला एक खोली उघडून दाखवली आणि एकेक एकेक अटी सांगायला सुरुवात केली. त्यांचं बोलणं आणि एकेक अटी ऐकून मला ‘अशी ही बनवाबनवी’ मधला सुधीर जोशी दिसायला लागला. मी आणि मित्र खोली बघत ऐकत होतो. काकूंच्या अटी संपायचं नावच घेत नव्हत्या.
“इथं राहताना मोठ्या आवाजात बोलायचं नाही.
गाणी लावायची नाहीत.
रात्री १० नंतर मित्र रुमवर आलेले चालणार नाहीत.
खोलीत अभ्यास आणि अभ्यासच करायचा. आमचे हे अधुमधून येऊन अभ्यासाची चौकशी करतीलच.
खोलीत जेवण बनवणार असला तर उग्र वास येईल असं काही बनवायचं नाही.
मोठा आवाज मला आणि आमच्या ह्यांना अजिबात आवडत नाही. त्यामुळं रात्री १० नंतर टी.व्ही. लावला तर हेडफोन लावून ऐकायचा.
खोलीत पाळीव प्राणी आणलेले चालणार नाहीत...”
शेवटी एकदाच्या त्यांच्या अटी संपल्या. मी कुठून आलो आहे, काय शिकतो वगैरे ऐकल्यावर त्यांनी बाल्कनी उघडून दाखवली.
“मुलगा तसा चांगला आहे हो. दंगा करणा-यालातला वाटत नाही.” काकू माझ्या मित्राला म्हणाल्या. ‘अरे वा! सुधीर जोशींची एकदम काळभोर मावशी कशी काय झाली?’ मला अचानक सुधीर जोशीच्या जागी ‘अशी ही बनवाबनवी’ मधली मोतीबिंदुचं ऑपरेशन झालेली ‘काळभोर मावशी’ दिसायला लागली. माझ्यातला ‘धनंजय माने’ अचानक जागा झाला.
“तुम्हाला एखादी मुलगी आहे का हो काकू?” वाक्य अगदी ओठांवर आलं होतं पण मी जिभेला आवर घातला.
“दोन दिवसांत मला काय ते सांग बरं का.” काकू म्हणाल्या.
“ठीक आहे” असं म्हणून मनातल्या मनात मी आमचा टीपीकल आर्मी स्टाईल ‘सायोनारा’ सलाम ठोकला आणि तिथून सटकलो. एवढ्या अटी ऐकल्यावर काकूंना मुलगी असली तरी तिथं राहण्याचा प्रश्नच नव्हता. तशीही ती रुम माझ्या दृष्टीनं लहानच होती.
आणखी एक-दोन फुदोसानकडे चौकशी केली. पण परदेशी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडे फारश्या जागा नव्हत्या. इंटरनेटवरुन काही ठिकाणी जागा शोधून तिथे फोन केले. पण तिथेही तोच प्रकार. पुन्हा एकदा युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल सेंटरमधून एका फुदोसानचा पत्ता मिळवला. त्याच्याकडे ब-याच जागा होत्या. पण प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी प्रॉब्लेम होताच. पाच-सहा घरं बघितल्यावर शेवटी लॅबमधल्या चीनी मुलाच्या शेजारची अपार्टमेंट निवडली. घर थोडं जुनं होतं पण प्रशस्त होतं. दोन मजल्यांवर वन रुम किचनच्या प्रत्येकी दोन अपार्टमेंटस् होत्या. माझी अपार्टमेंट तळमजल्यावर होती. आत जपानी पध्दतीची तातामी असलेली एक खोली होती. तातामी म्हणजे जपानी मॅट्रेस. आपल्याकडच्या चटईसारखी. गवतापासून बनवलेली. साधारणपणे सहा तातामीची एक खोली असते. अलिकडच्या घरांमध्ये wooden flooring असतं. पण अजूनही ब-याच जपानी लोकांना घरात तातामीच आवडते. त्यावर टेबल खुर्च्या ठेवता येत नाहीत. भारतीय बैठक किंवा जपानी बैठक. तातामीच्या खोलीला जोडून छोटंसं किचन होतं. तिथं मात्र flooring होतं. बाहेर कंपाऊंडच्या आत छोटीशी झाडं लावली होती. बाहेरच्या दरवाज्यापाशी एक मॅपलचं छोटं झाड होतं. आजूबाजूचा परिसरही शांत होता. एकंदरीत जागा राहण्यासाठी चांगली होती. शिवाय शेजारी लॅबमधल्या चीनी मुलाची सोबत असल्यामुळं फारसा विचार न करता हो म्हणून टाकलं. त्यानंतर मालकिणबाईंबरोबर मला कितपत जपानी बोलता येतं हे पाहण्यासाठी एक रीतसर इंटरव्ह्यू झाला. मालकीणबाई आधीच्या काकूंच्याच वयाच्या होत्या पण शांत आणि प्रेमळ स्वभावाच्या वाटल्या. त्यांची खात्री पटल्यावर कॉन्ट्रॅक्ट बनवलं आणि फुदोसाननं पुन्हा एकदा घरात राहण्यासाठीच्या आणि कचरा टाकण्याच्या अटी समजावून सांगितल्या. कचरा कसा स्वतंत्र करावा हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. आठवड्याच्या कोणत्या वारी कोणत्या प्रकारचा कचरा टाकायचा, आणि तो कसा टाकायचा यासाठी वॉर्डाकडून मिळालेलं एक खास पुस्तक त्यानं मला दिलं. मनात म्हटलं आता असं आणखी काय काय मिळणार आहे कुणास ठावूक? एखाद्या लहान मुलाला समजावतात तश्या कॉन्ट्रॅक्टमधल्या अटी त्यानं पुन्हा एकदा समजावून सांगितल्या. आलीया भोगासी म्हणत जड अंतःकरणानं सहा महिन्यांच्या भाड्याचं पाकिट त्याच्या हातावर ठेवलं आणि घराच्या किल्ल्या घेतल्या.
शेवटच्या दिवसापर्यंत HIH सोडायला मन तयार होत नव्हतं. शेवटी ठरल्याप्रमाणं शेवटच्या दिवशी सामान हलवलं आणि नवीन रुममध्ये राहायला गेलो. हळूहळू सामानाची खरेदी आणि पत्ताबदल अशा छोट्याछोट्या गोष्टी आवरत एकदाचं बस्तान बसलं. HIH मधलं विलासी जीवन संपल्याची खंत मनात होतीच. पण दारावरच्या मॅपलनं हळूहळू रंग बदलायला सुरुवात केली तशी मनातली हळहळही दूर होत गेली. नवीन घरात गेल्याचा उत्साह टिकून आहे तोपर्यंत बाहेर थोडं बागकाम करावं म्हणतो. येताय का मदतीला?
Monday, September 18, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
12 comments:
घर पहावे बांधुन(भाड्याने घेवुन) आणि लग्न पहावे करुन उगाच नाही म्हणत.:)
पण नविन जागेच्या शुभेच्छा. hostel च life कितीही आकर्षक असल तरीही स्वतंत्र ,स्वताच्या जबाबदरीवर राहाण्यातही खुप गंमत आहे,बरं का. आणि challenge ही.
मस्त जमुन गेलाय लेख. आवडला एकदम.:)
कोठेही जा, पळसाला पाने तीनच.
नोकरी करणाऱ्यांसाठी भाडेवाढ, agents, 'bachelors नको',घरमालकांच्या अटी हे सगळीकडे कमी-अधिक प्रमाणात आहेच.. मग तो स्वदेश असो की परदेश :)
"कचरा कसा स्वतंत्र करावा हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल."
>>>खरं आहे. हा खरंच एका देगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल. मला वाटतं जपानएव्ह्ढी कचयाची कौतुकं जगात कोणी करत नसेल.कधीकधी ते कचयाचं वर्गीकरण आणि वेळापत्रक पाहून हसूही येतं पण गंभीरपणे पाहिल्यास ते आज अत्यंत जरूरी आहे ते कळतं.पण हे जपानीच करु शकतो. इथे अमेरिकेतही कचयाविषयी एवढा seriousness दिसला नाही.
अर्रे.. मस्तंच!
घर शोधणे! हं..!! कुठल्याच देशात कधीच हे सोपे का नसते?
छान लिहिल आहेस. शेवट तर एकदम छान!
धन्यवाद ब्लॉगर दोस्तहो.
हा अनुभव तुम्ही जपानमधला असला तरी थोड्या फार फरकाने मी तो जगात इतर ठिकाणी पण अनुभवला आहे.... सुंदर लिहिलेले आहे.
Too Good!
nice vishalda
mast lihilay
are i got very different experiance than you here
here before my arrival all friends had arranged everything for me!!
so it wasnt any strange feeling in the forign country
ani aftreall sagali marathi manasa barobar asalyavar kay
ek ghar sodun dusarya ghari aalo evadach!!!
तुला काय वाटत असेल ते समझू शकतो मी, मला आत्तापासूनच हॉस्टेल सोडायचा विचार करुन कसेतरी होते.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद.
hi iam impressed
to read all this
Post a Comment