नंदननं टॅग बुकींग चा अतिशय चांगला उपक्रम सुरु केलाय. त्यानं मला या खेळात सामील केलंय खरं, पण मी त्याच्या निवडीला न्याय देऊ शकेन असं वाटत नाही. त्यानं वाचलेल्या पुस्तकांची यादी केली तर त्यातली १/१० पुस्तकंही मी वाचली असतील की नाही याबाबत मलाच शंका आहे. 'आता इथं जपानमध्ये मराठी पुस्तकं मिळणार कुठून? शिवाय रोजचा अभ्यास, संशोधन, जपानीचा अभ्यास अशा कसरतीतून वेळ मिळायला तर वाचणार.' अशी भरपूर कारणं देता येतील. पण आता विषय निघालाच आहे तर प्रांजळपणे एक गोष्ट कबूल करावीशी वाटते. मला वाचनाची आवड आहे, पण वेड नाही. नंदनसारखी मुलं, ज्यांना वाचनाचं वेड आहे, ते कुठूनही पुस्तकं मिळवून कसाही वेळ काढून वाचतीलच. पण माझं तसं नाही. मी पुस्तकं वाचतो, नाही असं नाही. एखादं पुस्तक आवडलं तर एका रात्रीत खाली न ठेवता वाचूनही काढतो. पण एखादं पुस्तक वाचायचंच असं ठरवून, खटपट करुन ते मिळवून वाचण्याइतपत मला वाचनाचं वेड नाही. लहानपणापासूनच वाचनापेक्षा खेळण्याकडे माझा कल जास्ती होता. अजूनही आहे. अजूनही जास्तीत जास्त वेळ मला मैदानावर घालवायला आवडतं. मग ते मैदान क्रिकेटचं असो किंवा बेसबॉलचं. (आजच बेसबॉलचा एक सराव सामना खेळून आलो.) शक्यतो जमेल तेवढे सगळ्या प्रकारचे खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो. खेळाची ही आवड शाळेपासून इंजिनिअरींगपर्यंत वेळोवेळी गुणतक्यात परिवर्तित झालेलीच आहे. असो. दरवेळी काहीतरी लिहीताना हे असं कुठेतरी भरकटायला होतं. तर विषय पुस्तकांचा होता.
शाळेत असताना मी नियमित मराठी पुस्तकं वाचायचो. कॉलेजात गेल्यावर हळूहळू मराठी पुस्तकांची जागा इंग्रजी पुस्तकं आणि वर्तमानपत्रांनी घेतली. खरं सांगायचं तर शाळा सुटून कॉलेजात गेल्यावर एखादं नवीन पुस्तक आवर्जून विकत घ्यावं असं कधी वाटलं नाही. कारण घरी आई महानगगरपालिकेच्या वाचनालयातून नियमितपणे पुस्तकं आणत असे. मी केव्हातरी त्यातलं एखादं वाचत असे. पण मुख्य गोष्ट अशी की भारतात असताना, मराठमोळ्या वातावरणात वावरत असताना आपण आपल्या भाषेपासून दूर आहोत असं कधीच वाटलं नाही. एका मोठ्या आनंदाला आपण दिवसागणिक किती मुकत चाललो आहोत याची जाणीव ख-या अर्थानं इथं जपानमध्ये आल्यावर झाली. मला वाटतं, भारत किंवा महाराष्ट्र सोडलेल्या प्रत्येकाची माझ्यापेक्षा फार काही वेगळी अवस्था नसावी. मग हे असं ब्लॉग लिहीणं, मराठीतलं काहीही दिसलं की अधाश्यासारखं वाचून काढणं सुरु झालं. त्याला मराठी ब्लॉगविश्वानं खूप मोठा दिलासा दिला. पण तिथंही कुठंतरी एखाद्या पुस्तकाबद्दल वाचलं की आपण ते वाचलेलं नाही याची खंत वाटू लागली. पण आता मात्र पक्का निश्चय केलाय. इथून पुढे मिळतील तितकी मराठी पुस्तकं वाचायची.
आता नंदनच्या प्रश्नांची उत्तरं. मला सर्वात आवडता चित्रपट किंवा गाणं किंवा पुस्तक असं काही ठरवायला नेहमीच अवघड जातं. त्यामुळे लहानपणापासून त्या त्या वयात आवडलेली काही पुस्तकं इथं लिहीतो.
शेवटचं वाचलेलं पुस्तक:
'Memoirs of a Geisha' हे Arthur Golden चं पुस्तक नुकतंच वाचून संपवलं. पण दुर्दैवानं अलिकडे मराठी पुस्तक वाचायला मिळालं नाही. इंथं येण्यापूर्वी मी पु.लं. च्या 'पूर्वरंग'ची एकदा उजळणी केली होती. पण त्यालाही आता दोन वर्षं होत आली. आता नक्की आठवत नाही पण त्याआधी श्री. ना. पेंडसेंचं 'गारंबीचा बापू' वाचलं असावं बहुदा. पुस्तक खूप जुनं आहे. त्याच्यावर तसाच खूप जुना एक चित्रपटही निघाला आहे. मी असंच केव्हातरी वाचनालयातून घरी आलेलं ते पुस्तक वाचल्याचं आठवतंय.
आवडलेली पुस्तकं:
मराठी पुस्तकांचा विषय निघाल्यावर पुलंचं नाव घेतलं नाही तर तो फाऊल ठरतो. त्यांची पुस्तकं आवडत्या पुस्तकांच्या यादीत नसलेला माणूस विरळाच. 'अपूर्वाई' आणि 'असा मी असामी' चा नंबर माझ्या यादीत सर्वात वरचा. हलकीफुलकी, फारशी गंभीर नसलेली पुस्तकं मला सर्वात जास्त आवडतात. त्यामुळं चि. वि. जोशी हे लहानपणीचे आवडीचे लेखक. त्यांचं 'ओसाडवाडीचे देव' पुस्तक त्यावेळी आवडायचं.
इतिहास हा लहानपणापासून माझा आवडीचा विषय. पण तिथंही सर्वपरिचित पानिपत, स्वामी अशी उल्लेखनीय पुस्तकं वगळता माझी पाटी कोरीच आहे. केव्हातरी 'घाशीराम कोतवाल' वाचल्याचं आठवतंय. दुस-या महायुध्दाचा इतिहास हा दहावीपासून माझ्या आवडीचा विषय झाला होता. त्यावर मिळतील तितके नवे आणि जुने हॉलिवूडपट मी पाहिलेले आहेत. त्यामुळे वाळींबेंचं 'हिटलर' हे पुस्तक मला आवडायचं. (व्याकरणाचे वाळींबे आणि लेखक वाळींबे यांच्यात माझा नेहमी गोंधळ होतो. इथंही झाला असेल तर त्यातले नक्की कोणते वाळींबे की दोघेही एकच आहेत ते समजून घेण्याची जबाबदारी वाचकांची). पण त्यांनीच लिहीलेलं 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' पुस्तक वाचल्यावर मला 'हिटलर' आवडेनासं झालं.
स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचलं होतं. आता वर एवढ्या गोष्टी कबूल केल्याच आहेत तशी आणखीही एक करतो. खूप पूर्वी वाचल्यामुळं या पुस्तकाचं नाव आणि लेखक दोन्ही मला आता आठवत नाहीत. पण पहिल्या पाचात याचं स्थान नक्कीच आहे.
अनुवादित पुस्तकांमध्ये रविंद्र गुर्जर यांचं 'सत्तर दिवस' पुस्तक मला आवडलं. दक्षिण अमेरीकेत विमानाला अपघात होऊन त्यातल्या वाचलेल्या प्रवाश्यांनी बर्फाच्छादित एंडीज् पर्वतात अन्नपाण्यावाचून काढलेल्या सत्तर दिवसांचा अनुभव वाचताना अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही.
आधी लिहील्याप्रमाणं मी ठरवून कोणतंही पुस्तक वाचत नसल्यामुळं पहिल्या पाचांबद्दल भाष्य करणं अवघड आहे. शिवाय इथून पुढं हातात पडेल ते पुस्तक वाचायचं ठरवल्यामुळं तसं काही लिहायची गरजही नाही.
मला खेळायची आवड असली तरी हा टॅग बुकींग चा खेळ खेळता खेळता माझी पुरेवाट झाली. पण त्यानिमित्तानं चांगल्या पुस्तकांची ओळख झाली हेही नसे थोडके. त्याबद्दल नंदनचे खरंच आभार मानायला हवेत.
आता साखळी पुढे सरकवताना कोणी कोणाला टॅग केलंय हे मला कळायला मार्ग नाही. पण तरीही मी या पाच लोकांना टॅग करतो.
कौस्तुभ
शब्दभ्रमर
आनंद
गिरिराज
आशुतोष
Thursday, May 11, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
9 comments:
मराठी पुस्तकांचा विषय निघाल्यावर पुलंचं नाव घेतलं नाही तर तो फाऊल ठरतो
Lol :)
Tu Shriman Yogi nahi vachales?
Namaskar,
What to comment on?
Unable to view Marathi Txt?
Pl. help. Have also sent you a mail separately on this hope you have recd the same.
Regards
ssjoshi
विशाल,
मला Tag केल्याबद्द्ल धन्यवाद. पण खरं सांगू का? मी पण काही फार पुस्तक वेडा नाहीये. मला वाचायला नक्कीच आवडतं आणि मी वेळ मिळेल तसं वाचतोही. पण या विषयावर आत्ता मनासारखं लिहू शकेन असं वाटत नाहीये.
त्याबद्दल सॉरी.
असो. बाकी काय चाललंय? तुझं MS कधी पूर्ण होणार? इकडे परतण्याचा काही विचार?
:) खूप प्रश्न विचारतोय ना मी? kaustubh.nimkar@gmail.com वर Reply केलास तरी चालेल.
विशाल,
लेख छानच आहे. रविंद्र गुर्जर यांच्या "सत्तर दिवस" या पुस्तकाबद्दल प्रथमच कळले.
Namaskar Vishal,
I could read the Marathi Text and is excellent one.
You seem to have a long list of MBooks that you have read. Touch of humour in your writing is appreciated.
Thanks for your guidance.
Regards
ssjoshi
Namaskar Vishal,
Now I find some reference of Photos with your writing. Photos as already commented are very good - self speaking.
Regards
ssjoshi
नाझी भस्मासुराचा.. चे लेखक आहेत वि. ग. कानिटकर. व्याकरणवाले मो. रा. वाळिंबे आणि हिटलरवाले वि. स. वाळिंबे. वि. संची इतिहासावर बरीच पुस्तके आहेत : ५७ ते ४७ वगैरे.
पराग,
दुरुस्तीबद्दल आणि 'वाळींबें' मधला गोंधळ दूर केल्याबद्दल धन्यवाद.
दादु
मला पण फार आवडत पुस्तक वाचायला.मी वाचली आहेत बरिच. मला या लेखाचा उद्देश नाही कळाला.समजाउन सांगशील का?
Post a Comment