Thursday, December 01, 2005

गणपती बाप्पा मोरया!


गणेशचतुर्थीच्या शुभदिनी गणरायाला वंदन करुन धुळ खात पडलेली ही Blog ची गाडी पुन्हा सुरु करावी असा विचार आला आणि हा Blog लिहायला घेतला. गणेशोत्सवाला बाहेर असण्याची ही पहिली वेळ नसली तरी आज जरा जास्तच चुकल्याचुकल्यासारखं वाटतंय. आज शाळा-कॉलेजातल्या गणपतीच्या वेळच्या सगळ्या आठवणी एकदम दाटून आल्या. ती गणपतीची आरास करण्यासाठी केलेली धावपळ, आदल्या दिवशी गणपती घरी घेउन आल्यावर दारात आईनं धुतलेले पाय, चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून केलेली प्रतिष्ठापना, पूजा आणि आरतीपेक्षा नंतर मिळणा-या मोदकांकडे लागून राहिलेलं लक्ष, सर्व भावंडाबरोबर मिळून म्हटलेल्या आरत्या, रात्री मित्रांबरोबर गर्दीत गणपती पाहाण्यासाठी केलेली पायपीट, घराबाहेर पडताच जागोजागी कानावर पडणारी 'गणराज रंगी नाचतो' किंवा 'ओंकारस्वरुपा' सारखी गाणी, विसर्जनावेळचा 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, विसर्जनानंतर प्रसादाचे चुरमुरे आणि खोबरं वाटताना मध्येच एक घास तोंडात टाकण्याची मजा, अशा एक ना अनेक, कितीतरी आठवणी. आता हे सगळं परत अनुभवायला मिळेल का? कदाचित मिळणारही नाही. कारण आता ते वयही राहिलं नाही आणि तो गणेशोत्सवही. विसर्जनाच्या मिरवणुकीबाबत तर काही बोलायचीच गरज नाही. हे वाचा.

पण या वर्षी गणेशोत्सव साजरा करायची दुधाची तहान ताकावर का असेना भागवता आली. तोक्यो (जपानीत 'टोकियो'ला 'तोक्यो' म्हणतात) मराठी मंडळानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. गेल्या वर्षी इथं येउन एकच आठवडा झाला असल्यामुळे जाता आलं नव्हतं. या वर्षी मात्र गणेशोत्सव चुकवायचा नाही असं ठरवलं. कार्यक्रमही तसा खासच होता. यावर्षी खास पाहुणे म्हणून प्रशांत दामले आणि सुधीर गाडगीळ येणार होते. ठरल्याप्रमाणे शनिवारी दुपारी सर्वात प्रथम गणपतीची पूजा आणि सामुहिक अथर्वशीर्ष पठण आणि आरती झाल्यावर भारताच्या राजदूतांचं १०-१२ पानांचं (छोटंसं) भाषण होउन कार्यक्रमाला सुरुवात झाली. आमच्यामध्ये एक होउन आरत्या म्हणणारे प्रशांत दामले आणि सुधीर गाडगीळ यांच्याबरोबर आरती, अथर्वशीर्ष आणि 'गणपती बाप्पा मोरया' म्हणताना आपण टोकियोमध्ये आहोत याचा विसरच पडला.

नंतर प्रशांत दामले आणि सुधीर गाडगीळ यांचा 'रंग शब्द सुरांचे' हा कार्यक्रम सुरु झाला. सुधीर गाडगीळांनी प्रशांत दामलेंची अनौपचारीक मुलाखत घेतली आणि नंतर दोघांनी जमलेल्या मंडळींबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या. मध्येमध्ये त्यांनी दूरदर्शनवरील मुलाखतीत दाखवतात तश्या प्रशांत दामलेंच्या नाटक आणि चित्रपटातल्या काही चित्रफिती दाखवल्या. सुरवातीला चित्रफितींसोबत आवाजच येईना. त्याबरोबर लगेच सुधीर गाडगीळांच्या "अहो आम्ही दूरदर्शनची माणसं. जिथं जाऊ तिथं 'व्यत्यय' हा येणारच" या वाक्यानं हॉलमध्ये एकच हशा पिकला. राजदूतांच्या (छोटयाश्या) भाषणावर टोमणा मारायलाही त्यांनी कमी केलं नाही. कार्यक्रमाची मजा इथे लिहीता येण्यासारखी नाही. त्याचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा. प्रशांत दामलेंबद्दल तर काही बोलायची गरजच नाही. त्या दोघांबरोबर गप्पा मारताना वेळ कसा गेला ते कळलंच नाही. शेवटी कार्यक्रम संपल्यावर खास भारतीय जेवणावर ताव मारल्यावर खरा गणेशोत्सव साजरा झाला.

उत्तर जपानची सहल - २

सुरवातीला दोन नंतर तीन दिवस ठरलेल्या या सहलीचे पहीले दोन्ही दिवस हिराईझुमीमध्येच गेल्याने ही सहल आणखी एक दिवस वाढवायचं ठरलं. मोरीओकात कारची मुदत आणखी एक दिवस वाढवून बुधवारी सकाळी ६ वाजता उत्तरेला १४० कि.मी.वर असणा-या ‘आओमोरी’ राज्यातील ‘तोवादा’ सरोवर पाहण्यासाठी निघालो.

‘होन्शु’ या जपानच्या मुख्य बेटावरील उत्तरेकडील टोकाच्या, हिरव्यागार, गर्द जंगलांनी भरलेल्या या राज्याला ‘आओमोरी’ हे नाव सार्थच आहे. निसर्गाचं देणं लाभलेल्या या प्रदेशात वर्षातील कोणत्याही ऋतुत सृष्टीसौंदर्य पाहायला गेलेला पर्यटक निराश होउन परतण्याची शक्यता कमीच. ‘ऋतु हिरवा’ ची गाणी ऐकत आणि त्या गाण्यांची समोर दिसणा-या चित्राशी तुलना करत तोवादा शहरात केव्हा पोचलो ते कळलंदेखील नाही.

तोवादामध्ये हॉटेल्स शोधताना पुन्हा मोरीओकाचाच प्रत्यय आला. बरीचशी हॉटेल्स आरक्षित होती आणि उरलेल्यांच्या किंमती गगनाला भिडलेल्या. अशातच मोडकीतोडकी जपानी आणि इंटरनेटविना लुळेपांगळे झालेलो आम्ही एका मोठया हॉटेलमध्ये घुसलो. हॉटेलचं एका दिवसाचं भाडं ऐकून आमचे उतरलेले चेहरे पाहून व्यवस्थापिकेला आमची दया आली आणि तिनं आम्हाला काही स्वस्तातल्या ‘-योकान्’ची नावं आणि पत्ते दिले. ते शोधत शेवटी एका ‘मिनशोकु’मध्ये विचारलं असता तिथल्या काकूंनी जागा रिकामी असल्याचं सांगितलं आणि आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. तेव्हा ठरवलं की इथून पुढे कुठेही नियोजनाशिवाय गेलं तरी आरक्षणाशिवाय जायचं नाही. ‘मिनशोकु’ म्हणजे एक प्रकारचं –योकानच, पण कमी व्यावसायिक आणि जास्त घरगुती. मिनशोकुच्या काकूंना आम्हा जपानी बोलू शकणा-या भारतीयांना पाहून कुतूहल आणि कौतुक वाटलं. दुपारी ३ वाजेपर्यंत मिनशोकुमध्ये उतरता येत नाही असं काकूंनी सांगितल्यामुळं आमची टीम तेवढया वेळात तोवादा सरोवराची परिक्रमा करण्यास बाहेर पडली.

पर्वतावर ४४० मीटर उंचीवर असणारं तोवादा सरोवर तोहोकु प्रांताच्या सौंदर्याचं प्रतीक आहे. ५२ कि.मी.चा परिघ असणारा हे सरोवर ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालं आहे. चोहोबाजुंनी वेढलेल्या पर्वतांमधून नागमोडी वळणं घेत जात असलेल्या रस्त्यावरुन सरोवराचं दृश्य सुंदर दिसत होतं. पण गाडी चालवताना त्याचा मनमुराद आस्वाद घेता येईना म्हणून मी गाडीचा वेग जरा कमी केला. पण लगेच मागे गाडयांची भली मोठी रांग उभी. हॉर्न वाजवणे किंवा पुढे जाणे हे जपानी लोकांच्या स्वभावातच नाही. तुम्ही ज्या वेगाने जाल त्याच वेगाने ते तुमच्या मागेमागे येतील पण पुढे जाणार नाहीत. रस्त्यात मध्येच थांबायला मनाई असल्याने थांबायचीदेखील पंचाईत आणि हळू गेलं तरी पंचाईत. या जपानी लोकांना खास भारतीय ‘कट मारणे’ या संकल्पनेचं प्रात्यक्षिक दाखवावं असं मला राहूनराहून वाटत होतं. शेवटी डोंगराच्या माथ्यावर सरोवर पाहण्यासाठी तयार केलेल्या एका निरीक्षणस्थळावर आम्ही आणि आमच्या मागुन येणारा तो लवाजमा असे सगळे पोचलो आणि आमचा ससेमिरा थांबला. या निरीक्षणस्थळावरुन तोवादा सरोवराचं दिसणारं दृश्य डोळ्यात मावत नव्हतं. सर्व बाजूंनी वेढलेले हिरवे डोंगर आणि मध्ये स्वच्छ, निळंशार पाणी छानच दिसत होतं. काही लोक हेलिकॉप्टरमधुन या दृश्याचा आनंद घेत होते. तोवादा सरोवराची परिक्रमा पूर्ण करुन आम्ही ३ वाजता मिनशोकुमध्ये परतलो. काही काळ विश्रांती घेऊन ‘यासुमिया’ या ठिकाणी सरोवराचं जवळून दर्शन घेण्यासाठी निघालो.

‘यासुमिया’ याचा शब्दशः अर्थ विश्रांतीस्थळ असा होतो. नावाप्रमाणेच ते विश्रांतीस्थळ होतं. सरोवराच्या किना-यावर हॉटेल्स, उपहारगृहं यांची कॉफीचा आस्वाद घेताना सरोवराचं सुंदर दृश्य दिसेल अशी रचना केली होती. काही काळ आम्हीही बाहेरचं जग विसरुन तिथं विश्रांती घेतली. तिथून जवळच किना-यावर ‘Statue of Maidens’ नावाचा प्रसिध्द पुतळा आहे असं कळलं. तो पाहण्यासाठी गेल्यावर तिथं बरीच गर्दी दिसली. पुतळ्याचं वर्णन जपानीत लिहीलं असल्यामुळं तो पुतळा कशासाठी प्रसिध्द आहे हे मात्र कळू शकलं नाही. या पूर्ण सहलीत एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटत होतं. हिराईझुमी आणि तोवादा या दोन्ही प्रसिध्द ठिकाणी आमच्याखेरीज कोणी परदेशी पर्यटक दिसत नव्हते. कदाचित सुदूर जपानमध्ये यासारख्या ठिकाणी भाषेच्या अडचणीमुळे फारसे परदेशी पर्यटक येत नसावेत. पण जपानी लोक मात्र सहलीचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत होते. यासुमियापासुन तोवादा सरोवरामध्ये बोटीची सफरही करता येते. पण आम्ही पुन्हा एकदा सरोवराभोवती गाडीने चक्कर मारणेच पसंत केले. संध्याकाळी सात वाजता अर्ध्या सरोवराभोवती चक्कर मारुन रात्रीच्या जेवणासाठी यासुमियाला परत येउन पाहिलं तर अर्ध्या-एक तासापूर्वी गर्दीनं फुलून गेलेल्या त्या ठिकाणी अगदी सामसुम होती. सारी दुकानं आणि उपहारगृहं बंद झाली होती. सारे लोक आपापल्या '–योकान्' आणि 'मिनशोकु' मध्ये जेवायला गेले असावेत असा विचार करुन उघडया असलेल्या एकुलत्या एक उपहारगृहात रात्रीचं जेवण आटोपून आम्ही पण आमच्या 'मिनशोकु'मध्ये परतलो.

इथं ‘–योकान्’ किंवा ‘मिनशोकु’मध्ये नैसर्गिक नसला तरी कृत्रिम ओनसेनचा आनंद घेण्याची सोय असते. त्याला ‘ओफुरो’ म्हणतात. रात्री झोपण्यापूर्वी स्नान करुन १५-२० मिनीटं ओफुरोमध्ये डुंबणे हा जपानी माणसाच्या दिनक्रमाचा एक भाग असतो. मग तो ‘मिनशोकु’मध्येही कसा चुकेल? ‘–योकान’प्रमाणंच इथंही ‘युकाता’ घालायला मिळतो. ‘किमोनो’ ह्या पारंपारिक पोषाखात बाहेरील मुख्य पोषाखाच्या आत घालायचा पेहराव म्हणजे ‘युकाता’. हल्ली ‘किमोनो’ किंवा ‘युकाता’ यांचा वापर आपल्याकडच्या धोतर-कोट-पगडी किंवा नऊवारी साडी यांच्यासारखा सणा-समारंभात किंवा अशा मिनशोकुपुरताच मर्यादित राहिला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी एकाच प्रकारचा युकाता असतो. पण बाहेरील ‘किमोनो’ मात्र वेगळा असतो. आम्हीही थोडावेळ ‘ओफुरो’मध्ये डुंबुन नंतर ‘युकाता’ घालून खास जपानी ‘ओच्या’ म्हणजे ‘ग्रीन टी’चा आस्वाद घेतला आणि त्यानंतर अशी शांत झोप लागली की बस्स.

गुरुवारी सकाळी लवकर उठून आम्ही 'मिनशोकु'च्या काकूंचा निरोप घेतला आणि तोवादापासून जवळच असलेल्या ‘ओईरासे’ या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. तोवादा परिसरातील सर्वात प्रसिध्द असलेलं हे ठिकाण कल्पनेपेक्षाही सुंदर होतं. तोवादा सरोवरातून निघून पाण्याचा एक छोटासा झरा गर्द झाडीतून सरोवराच्या डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या १४ कि.मी. अंतरावरील ‘ओईरासे’ या ठिकाणी येतो. ‘ओईरासे’ पासून तोवादा सरोवरापर्यंत झ-याच्या कडेने १२ कि.मी.ची पायवाट खास हा झरा पाहण्यासाठी तयार केली आहे. ओईरासेला गाडी लावून आम्ही या पायवाटेने डोंगर चढण्यास निघालो. हा १२ कि.मी.चा प्रवास या सहलीतील सर्वात अविस्मरणीय अनुभव होता. त्याचं शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य. घनदाट, गर्द हिरव्या जंगलात कडेकपारींमधून खळाळत, फेसाळत वाहणारं ते स्वच्छ, नितळ पाणी, वाटेत लागणारे असंख्य छोटे-मोठे धबधबे पाहून निसर्गानं मुक्त हस्तानं केलेली उधळण म्हणजे काय याचा प्रत्यय आला. आत्तापर्यंत असं दृश्य मी केवळ दिवाणखान्यातल्या भिंतीवर लावलेल्या शोभेच्या छायाचित्रांमध्ये आणि ती छायाचित्रं विकणा-या दुकानांमध्येच पाहिलं होतं. पण प्रत्यक्ष पाहण्याची ही पहिलीच वेळ होती. डोंगरामधून वेडीवाकडी वळणे घेत, उडया मारत तो झरा जात होता आणि प्रत्येक वळणावर स्वप्नवत वाटावं असं चित्र डोळ्यांपुढे येत होतं. काही जण ते कॅमे-यात साठवून ठेवत होते तर काही कुंचल्यानं कॅनव्हासवर उतरवत होते. भान हरवून चालत असताना १२ कि.मी.चं ते अंतर कधी संपलं ते कळलंच नाही. या परिसरात एक गोष्ट मला अतिशय आवडली आणि त्याबद्दल मला जपानी लोकांचं कौतुक करावंसं वाटलं. ती म्हणजे या पूर्ण १२ कि.मी. परिसराचं नैसर्गिक सौंदर्यं आहे तसं जपलं आहे. वाटेत कुठेही कचरा नाही, घरं, किंवा हॉटेल्स नाहीत, सिमेंट, कॉंक्रीटचे पूलही नाहीत. झ-याभोवतीची पायवाटही अगदी नैसर्गिक वाटावी अशीच. झ-यात कोणी माणसं किंवा मुलं डुंबताना दिसत नाहीत. थोडक्यात अगदी १००-२०० वर्षांपूर्वी जाउन पाहिलं तरी आताचं हे दृश्य असंच दिसावं असं. कठीण चढण असलेल्या त्या पायवाटेवरुन डोक्यावर टोपी, पाठीवर पिशवी आणि हातात कॅमेरा घेउन जोमानं चालणा-या जपानी आजीआजोबांचंही मला कौतुक करावंसं वाटलं. या ठिकाणाहून निघण्याचं मनच होत नव्हतं. वाटलं, आणखी एक दिवस राहायला काय हरकत आहे. पण कारची मुदत संपत आल्यानं मन मारुन आम्हाला तिथून निघावं लागलं. तिथून निघून संध्याकाळी साडेपाच वाजता मोरीओकात परत आलो. कार परत करुन टोकियोला जाणा-या शिंकानसेनचं तिकीट काढलं. पुन्हा एकदा इथं यायचंच असा निश्चय करुन शिंकानसेनमध्ये बसलो. परत येताना ओठांवर एकच गाणं तरळत होतं
‘हे जीवन सुंदर आहे.......’

(ही आणि इतर छायाचित्रे इथे पाहा. )

Thursday, September 01, 2005

उत्तर जपानची सहल - १

शाळेत असताना निबंध लिहावा लागायचा. त्यानंतर मराठीत काहीतरी लिहायची माझी ही पहिलीच वेळ असावी. लेखन हा माझा प्रांत नाही. आणि 'पूर्वरंग' वाचल्यावर जपानविषयी आणखी काही वाचायची गरज आहे असं मला वाटत नाही. तरीही एका अविस्मरणीय सहलीच्या आठवणी साठवून ठेवाव्यात असं वाटलं म्हणून हा छोटासा प्रयत्न.

आत्तापर्यंत जपानमध्ये अनेक ठिकाणी फिरुन आलो, पण जपानी मित्र बरोबर नसताना फिरायची ही पहिलीच वेळ होती. या उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी ड्राईव्हला जायचंच असा निश्चय करुन जपानी भाषेचा गंध नसणारा एक आणि कामचलाऊ जपानी येणारे आम्ही दोघे अशी तिघा जणांची टीम तयार झाली. अशा परिस्थितीत सुदूर जपानमध्ये कोणत्याही नियोजनाअभावी फिरायला जाणं हेच मुळी एक साहस होतं. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे तिघांचीही जपानी जेवण जेवायची तयारी होती. क्योतो, ओसाका ही प्रसिध्द ठिकाणं पाहिली असल्यामुळं शेवटी भरभरुन निसर्गसौंदर्य लाभलेल्या उत्तर जपानच्या 'तोहोकु' नावाच्या प्रांतात फिरायला जायचं ठरलं. इंटरनेट आणि जपानी मित्रांकडून माहिती मिळवल्यावर तोहोकुमधील 'हिराईझुमी' आणि 'तोवादा' ही दोन ठिकाणं उन्हाळी सहलीसाठी प्रसिध्द आहेत असं कळलं. दोन्ही ठिकाणांच्या मध्ये असलेल्या 'मोरीओका' या मोठया स्थानकावर उतरुन तिथून कार रेंट करुन दोन दिवसात दोन्हीकडे जाऊन परत य़ायचं असा बेत ठरवून रविवारी रात्री आम्ही झोपी गेलो.

सोमवारी भल्या पहाटे सहा वाजता आम्ही टोकियोहून उत्तरेला ५०० किलोमीटरवर असणा-या मोरीओकाला जाणारी पहिली शिंकानसेन (बुलेट ट्रेन) पकडली. सकाळी ९ वाजता मोराओकाला पोचल्यापोचल्याच साहसाला सुरुवात झाली. मोरीओकाला जाऊन तिथूनच कार रेंट करायची असा आमचा बेत होता. पण जपानमध्ये जवळजवळ एक वर्ष राहूनही जपानी लोकांकडून अजून ब-याच गोष्टी शिकायच्या आहेत हे कार शोधताना आमच्या लक्षात आलं. तिथे पोचल्यावर कळलं की आरक्षणाशिवाय कार मिळतच नाही आणि जपानी लोकांनी अगोदरच ब-याचश्या जागी गाडयांचं आरक्षण करुन ठेवलं होतं. अनोळखी गावाची काहीच माहीती नव्हती. शिवाय भाषेची मोठी अडचण होतीच. चारच दिवसांपू्र्वी फुजी पर्वतारोहण करुन तिथून सूर्योदय पाहण्याच्या आमच्या बेतावर वरुणराजांनी पाणी फिरवल्यामुळे आम्हाला अर्ध्या वाटेवरुनच निराश होउन परतावं लागलं होतं. त्यामुळे यावेळीही सुट्टी अशीच फुकट जाणार असं वाटत असतानाच शेवटी एकदाची एका ठिकाणी कार मिळाली आणि आमचा खरा प्रवास सुरू झाला.

दुपारी ३ वाजता मोरीओकाच्या दक्षिणेस ९० कि.मी.वर असणा-या हिराईझुमी या गावी आम्ही पोचलो. 'किता आल्पस्' म्हणजे उत्तर आल्पस् असे संबोधल्या जाणा-या पर्वतरांगांमधून ड्राईव्ह करणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. उन्हाळ्यातही गर्द झाडी आणि हिरव्यागार शेतांनी भरलेला तो परिसर पाहून काश्मीरची आठवण येणं साहजिकच होतं. लोकांनी सार्वजनिक रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी लावलेली रंगीबेरंगी फुलझाडे आणि त्यांची राखलेली निगा पाहून जपानी माणसाविषयी माझ्या मनात असलेला आदर आणखीनच वाढला. हिराईझुमी, अकराव्या शतकात फुजीवारा संस्थानिकांनी वसवलेलं हे गाव त्या काळातील जपानमधील एक समृध्द आणि महत्वाचं शहर होतं. मोठाले डोंगर, हिरवीगार शेतं आणि त्यांच्यामधून वाहणारी नदी अशा या गावात प्रेक्षणीय ठिकाणांची कमी नसती तर नवलच. हिराईझुमीत पोचल्यावर सर्वात प्रथम पर्यटन केंद्रात जाउन आम्ही स्थानिक पर्यटन स्थळांची माहिती मिळवली. दुपारचं जेवण उरकून (जेवणाबद्दल काही लिहीत नाही. तो एक स्वतंत्र लेखनाचा मुद्दा आहे) आम्ही सर्वात प्रथम मोत्सुजी मंदिर पाहावयास निघालो. नवव्या शतकात बांधलेल्या या मंदिराचे बरेचसे अवशेष नष्ट झाले असले तरी त्याभोवती असणा-या छोट्या तळ्यांनी आणि देवदार वृक्षांनी नटलेला तो परिसर पाहून तिथून निघायची कोणाचीच इच्छा होत नव्हती. अखेर संध्याकाळी मंदिर बंद झाल्यावर तिथून निघून जवळच असलेला 'गेम्बेकी गॉर्ज' पाहावयास गेलो. कडेकपारींमधून खळाळत वाहणा-या नदीचं सूर्यास्ताच्या वेळी दिसणारं चित्र विहंगमच होतं. थोडा वेळ सारं काही विसरुन ते दृश्य डोळ्यात आणि कॅमे-यात साठवून हिराईझुमीला परतलो.

जपानचं एक वैशिष्टय म्हणजे पूर्ण जपानमध्ये 'ओनसेन' म्हणजे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे पसरलेले आहेत. काही ठिकाणी अशा ओनसेनच्या ठिकाणी हॉटेल्स बांधलेली आहेत. तिथे तुम्हाला काही पैसे देउन ठराविक वेळासाठी ओनसेनचा आनंद लुटता येतो. ओनसेन हा औषधी तर असतोच, पण थकवा दूर करण्यासाठी अतिउत्तम. जपानी लोकांच्या दीर्घायुष्याच्या रहस्यांपैकी एक म्हणजे ओनसेन. अशाच एका ओनसेनमध्ये दिवसभराचा थकवा दूर करून आम्ही '-योकान' म्हणजे जपानी पध्दतीच्या घरगुती हॉटेलमध्ये उतरलो. आम्हा परदेशी पाहुण्यांना पाहून -योकानमधल्या आजोबांना नवल वाटणं स्वाभाविकच होतं. रात्री खास जपानी पाहुणचार घेतल्यावर दुस-या दिवशी सकाळी हिराईझुमी परिसरातील उरलेली ठिकाणं पाहायची असं ठरवून झोपलो. '-योकान' मध्ये पारंपारिक जपानी पोषाख 'युकाता' घालून झोपण्याची मजा काही औरच होती.

दुस-या दिवशी सकाळी 'इवाया केव्ह टेंपल्' पासून सुरुवात केली. पाषाणातील गुहेत बांधलेल्या या मंदिराचा परिसरही सुंदरच. मंदिराभोवतीच्या छोटया तळ्यांमधील कमळे पाहून मन प्रसन्न झालं. इथल्या सगळ्या मंदिरांची रचना एकाच प्रकारची असते. आणि देवही एकच. अर्थातच बुध्द. बाकी मंदिरातील दिवे, उदबत्त्या, घंटा नमस्कार करण्याची पध्दत अशा गोष्टी थोडयाफार फरकाने आपल्यासारख्याच. एकच वेगळी गोष्ट म्हणजे गाभा-यात नसली तरी मुख्य मंदिरात चपला घालून जाण्यास परवानगी असते. पण जपानी घरात मात्र चपला घालून जाता येत नाही. मंदिरात आपल्यासारखा प्रसादही मिळत नाही. मात्र ब-याचश्या मंदिरांच्या बाहेर भविष्य पाहायची सोय असते. काही पैसे देऊन एक कागद उचलायचा आणि आपलं भविष्य पाहायचं. जर भविष्य चांगलं असेल तर कागद आपल्याकडेच ठेवायचा. नाहीतर मंदिराशेजारीच एका दो-याला बांधून पुजा-याला आपल्या चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करायला सांगायचं. एकदा मी असा भविष्याचा कागद घेतला होता. पण भविष्य वाचता न आल्यामुळे ते चांगलंच असेल असा विचार करुन खिशात ठेउन दिला. तिथून निघून हिराईझुमीमधील सर्वात मोठं आकर्षण असणा-या च्युसोंजी मंदिरात पोचलो. बाहेरुन साधं दिसणारं हे मंदिर एवढं प्रसिध्द का आहे हे मला मंदिराच्या आत गेल्यावर कळलं. आतील मुख्य मंदिर आणि मूर्तींना सोन्याचा मुलामा दिला आहे. कलाकुसरही अप्रतिम. मात्र छायाचित्र काढण्यास मनाई असल्यामुळे या वेळी ते चित्र फक्त डोळ्यातच साठवावं लागलं. नवव्या शतकात बांधलेलं हे मंदिर त्या काळी हिराईझुमीच्या समृध्दतेचं प्रतीक होतं. छोट्या टेकडीवर बांधलेल्या या मंदिरावरुन दिसणारं हिरवंगार हिराईझुमी गाव, त्यातून वाहणारी नदी पाहून इथं कडक उन्हाळा सुरू आहे यावर विश्वास बसत नव्हता. या सहलीला सुरुवात झाल्यापासून प्रत्येक दिवशी एक नवीनच अनुभव येत होता. च्युसोंजी मंदिराच्या परिसरात फिरत असतानाच अचानक पायाखालची जमीन हादरु लागली आणि आमच्या लक्षात आलं की भूकंप सुरु झाला. रस्त्यावरचे सारे लोक स्तब्ध झाले. आजवर इथं असताना अनेक भूकंप अनुभवले आणि आता त्याची सवयही झाली आहे. पण हा भूकंप त्यातला सर्वात मोठा आणि प्रदीर्घ होता. तिथली प्रचंड झाडं भूकंपामुळं इतकी हालत होती की आपल्यावर पडली तर या विचारानं अंगावर काटा येउन गेला. त्यानंतर दोन तास आमची भूकंपाविषयीच चर्चा सुरु होती. पण जपानी लोक मात्र काही न झाल्याच्या आविर्भावात दोन मिनीटांत कामाला लागलेदेखील.

हिराईझुमीतील मुक्काम आटोपून आम्ही मोरीओकाच्या परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत सेनमाया इथं एक चांगलं ठिकाण आहे असं GPS महोदयांनी सांगितलं. ( GPS ला मराठी शब्द माहिती नाही). मग मुख्य रस्त्यावरुन गाडी वळवून सेनमाया इथला 'गेईबेकी गॉर्ज' पाहायला निघालो. पूर्वनियोजन न केल्याचा हा सर्वात मोठा फायदा. तुम्हाला कोठेही, केव्हाही आणि हवा तितका वेळ जाता येतं. वेळापत्रकानुसार जाण्यात मजा ती कसली. असो. दोन्ही बाजूंना १०० मीटर उंचीचे कडे, गर्द झाडी, मधून वाहणारी नदी, नदीत छोट्या नावेतून सफर, नावेत 'ओ माजी रे' अशाच अर्थाचं काहीतरी जपानी लोकगीत म्हणणारा नावाडया, याशिवाय सहलीची आणखी मजा ती कोणती? दोन दिवसातच सहलीचे पैसे वसूल. 'गेईबेकी गॉर्ज' चा मनमुराद आनंद लुटून आम्ही संध्याकाळी मोरीओकाला परतलो. रात्री मोरीओकात मुक्काम करुन तिस-या दिवशी सकाळी आणखी एका साहसी प्रवासाला निघण्यास सज्ज झालो.

क्रमशः

(ही आणि इतर छायाचित्रे इथे पाहा. )