कारुइझावा ब-याच दिवसांपासून मनात घर करुन होतं. इंटरनेटवर माहिती पाहिली तर ‘कोयो’ तिथं अगदी भरात होता. मग जास्ती विचार न करता कार आणि तिथं राहण्यासाठी पेन्शनचं बुकींग केलं आणि शनिवारी सकाळी कारुइझावाच्या दिशेनं सुटलो. टोकियोच्या बाहेर ब-याच वेळा गाडी चालवली होती. पण टोकियोमधून गाडी बाहेर घेऊन जायची माझी पहिलीच वेळ होती. पहिल्यांदा मुंबईला गेल्यावर जशी अवस्था होते तशी अवस्था झाली. या वेळीही GPS महाशय मदतीला होते, पण टोकियोतल्या गर्दीपुढे त्यांनीही हात टेकले आणि माझ्यासारख्या नवशिक्याला रस्ता चुकल्यावर नवीन रस्ता शोधून देता देता त्यांची पार पुरेवाट झाली. सुरवातीचं हायवे इंटरसेक्शन चुकल्यामुळे टोकियो शहरातून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. टोकियोतून बाहेर पडता पडताच दोन-अडीच तास गेले, पण त्यानिमित्तानं ‘टोकियो दर्शन’ घडलं. हायवेला लागल्यावर मात्र फारसा त्रास झाला नाही. दुपारी एक-दीडच्या सुमारास २०० किलोमीटरचा ड्राईव्ह आटोपून कारुइझावाला पोचलो.
‘कारुइझावा’ या ठिकाणाभोवती एवढं वलय का आहे हे तिथं गेल्याशिवाय कळत नाही. आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून कळालं सांगितलं की जपानचे सध्याचे राजे ‘आकिहीतो’ आणि राणी ‘मिचिको’ यांची टेनिस खेळताना तिथं प्रथम भेट झाली आणि कारुइझावा सम्राटांची सासुरवाडी बनली. विकिपीडीयानंही याला दुजोरा दिला. कारुइझावा हे जपानमधल्या summer destinations च्या यादीत खूप वरच्या स्थानी आहे हे ऐकून होतो. विकिपीडीयानं ज्ञानात आणखी भर टाकली. कारुइझावामध्ये कायमच्या रहिवाश्यांची ६००० घरं आहेत. पण उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी outhouse किंवा dormitory ची संख्या १३००० च्या आसपास आहे यावरुन कारुइझावाच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. जुनी चर्च आणि चॅपेलमुळे कारुइझावा लग्नसमारंभासाठीही प्रसिध्द आहे. पण त्या ‘शाही टेनिस प्रसंगा’मुळे कारुइझावामध्ये टेनिस कोर्टस् ची रेलचेल आहे. आणखी एका गोष्टीची रेलचेल म्हणजे ‘ओनसेन’(Natural hot spring) जी सहलीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. आलिशान हॉ़टेल्स आणि ओनसेन रिसॉर्टस् ची इथे काहीएक कमी नाही. त्यामुळेच कारुइझावा म्हटलं की एका शाही ठिकाणाची प्रतिमा डोळ्यासमोर येते.
दुपारचं जेवण आटोपून कारुइझावाच्या बाजारातून एक चक्कर टाकून तिथल्या मिहारानदाई या ठिकाणी गेलो. मिहारानदाई एका डोंगराच्या माथ्यावर आहे. तिथून सभोवतालचा परिसर सूर्यास्ताच्या वेळी अतिशय सुंदर दिसतो. आम्ही पोचलो त्यावेळी सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. पण ढगाळ वातावरणामुळं सूर्यास्त पाहायला मिळणार नाही असं वाटत असतानाच जणू आमच्यासाठीच अचानक पश्चिमेच्या दिशेचं आकाश मोकळं होऊ लागलं आणि सूर्यदेवांनी दर्शन दिलं. पण पश्चिमेच्या आकाशातली लाल रंगपंचमी आणि सभोवतालच्या गर्द वनराईनं नेसलेला लाल-पिवळ्या रंगाचा शालू, यातलं कोणतं दृश्य अधिक सुंदर आहे हे ठरवायचा वेळ न देताच सूर्यदेव पुन्हा ढगांत अदृश्य झाले. तिथं आलेल्या आणखी काही जपानी पर्यटक आजी-आजोबांबरोबर बोलताना कळलं की त्या बागेत रविंद्रनाथ टागोरांचा पुतळा आहे. टागोरांचा पुतळा, इथं एवढ्या लांब, अशा टेकडीवर..ऐकून आश्चर्य वाटलं. जाऊन पाहिलं तर खरोखरच तिथं रविंद्रनाथ टागोरांचा पुतळा होता. क्षणभर मनातून अभिमानाची एक लहर उमटून गेली. रविंद्रनाथ टागोर जपानच्या महिला विद्यापीठात प्रार्थनेवर व्याख्यान देण्यासाठी जपानमध्ये आले होते. १९८० साली त्यांची १२० जन्मतिथी साजरी करण्यासाठी हा पुतळा तिथे उभारण्यात आला होता. टागोरांना वंदन करुन मिहारानदाईवरुन पेन्शनच्या वाटेला लागलो.
जपानमध्ये सहलीला जाऊन ओनसेनला गेलो नाही तर तो फाऊल ठरतो. पेन्शनमध्ये पोचल्यापोचल्या सामान टाकून रात्रीचं जेवण (खरं तर ते संध्याकाळचंच जेवण असतं) उरकलं आणि तिथल्या काकांकडून सर्वात आधी जवळपासच्या ओनसेनची माहिती मिळवली. तिथून जवळच असलेल्या एका चांगल्या ओनसेनचा पत्ता GPS मध्ये टाकला आणि ओनसेनच्या दिशेनं सुटलो. रात्रीच्या थंडीत, कढत पाण्यात रोतेंबुरो(open air onsen)मध्ये डुंबताना प्रशांत दामलेचं एक गाणं आठवल्याशिवाय राहात नाही. ‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं’. जपानीत यासाठी एक खास शब्द आहे, ‘शिआवासे’.
दुस-या दिवशी सकाळी मिशन कोयोसाठी कारुइझावाच्या उत्तरेला निघालो. शिरानेसान् नावाच्या डोंगराच्या माथ्यापर्यंतचा रस्ता छान गर्द झाडीतून जातो. दोन्ही बाजूला गर्द पिवळ्या, तांबडया झाडांमधून ड्राइव्ह करताना मजा येत होती.
शिरानेसानच्या माथ्यावर पोचण्यापूर्वी वाटेत एक छान जागा मिळाली. तिथं थोडं फोटोसेशन करुन पुढे निघालो. शिरानेसान पार केल्यावर पुढे पाच छोट्या तळ्यांचा समूह आहे. तिथं कोयो पाहायला मिळतो का पाहण्यासाठी गेलो. पण तिथला सीझन संपला होता. कारुइझावामध्ये परतेपर्यंत संध्याकाळ झाली. दुस-या दिवशीचा मुक्काम वेगळ्या पेन्शनमध्ये हलवून रात्रीचा ओनसेनचा दिनक्रम आटोपला.
तिस-या दिवशी कारुइझावातच फिरायचं ठरवलं. सुट्टयांचा हंगाम नसल्यामुळे कुठेच फारशी गर्दी नव्हती. १५-२० मिनीटं डोंगर चढून गेल्यावर शिराइतोनोताकी नावाचा असा छोटासा धबधबा दिसतो. डोंगरातली पायवाट ‘ओइरासे’ची आठवण करुन देते.
शिराइतोनोताकी हून परतताना वाटेत एका मंदिराच्या आवारात असा एक छान बहरलेला मेपल दिसला.
जपानी मंदिरांच्या आवारात हमखास असे छोटे मेपल दिसतात. त्यांना ‘मोमिजी’ म्हणतात.
कारुइझावामध्ये autumn अगदी बहरात होता आणि हवाही अतिशय आल्हाददायक होती. तिथून पुढे तिथले प्रसिध्द ‘कुमोबानो इके’ (इके = तळे) पाहण्यास गेलो. काही परदेशी लोक त्याला swan lake ही म्हणतात. तीन दिवसांच्या ट्रिपचा पैसा वसूल ठिकाण.
मस्तपैकी एक बैठक मारुन याचं स्केच काढण्याची फार इच्छा होती.

आणखी छायाचित्रे इथे