रविवारी सकाळी आम्ही दोन हौशी फोटोग्राफर एका हौशी ड्रायव्हरला पकडून साकुराचे फोटो काढण्यासाठी बाहेर पडलो. टोकियोजवळ साकुराचा बहर केव्हाच संपून गेला होता. दुस-या कोणत्यातरी प्रसिध्द ठिकाणी जायचं म्हटलं तर या दिवसांत जिकडेतिकडे प्रचंड गर्दी असते. त्यामुळं कुठंतरी लांब आणि शांत ठिकाणी जायचं ठरवलं. टोकियोच्या पश्चिमेला असणा-या यामानाशी राज्यात त्यांनी दोन-तीन चांगल्या ठिकाणांची माहिती काढली होती. अशी सगळी माहिती काढून स्वतःची गाडी घेउन आपण ट्रीपला जाउया का असं विचारणारी माणसं सहसा कुणाला भेटत नाहीत. का कुणास ठाऊक पण माझं नशिब फार चांगलं आहे या बाबतीत. त्यांच्या माहितीनुसार इप्पोनसाकुरा या फारश्या गजबजाट नसलेल्या जागी निघालो. दोन-अडीच तासांचा ड्राईव्ह संपतो तोच हायवेवरच एक छोटीशी बाग दिसली. ही ट्रिप Exclusively साकुराचे फोटो काढण्यासाठी असल्यामुळे वाटेत कुठंही मनाला येईल तिथं गाडी थांबवून फोटो काढण्याची मुभा होती. त्या बागेपाशी गाडी थांबवून आमचं फोटोसेशन सुरु झालं.
असं म्हणतात की हजार शब्दांपेक्षा एक चित्र पुरेसं असतं. त्यामुळं मी जास्ती लांबड न लावता तुम्हाला चित्रं पाहायला मोकळं करतो. चित्रांसोबत जागांची माहीती आणि किचकट नावंही आहेत. पण ती वाचायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं. मी मात्र माझ्या संदर्भाकरता लिहीली आहेत.

हायवेवरच्या छोट्याश्या बागेतली 'Peach' ची फुलं

त्याच बागेतील साकुरा


यामानाशी राज्यातील 'कात्सुनुमा-बुदोक्यो' गावाजवळ असलेला हा प्रसिध्द 'इप्पोनसाकुरा'. विस्तीर्ण मैदानात असलेलं साकुराचं हे एकमेव झाड जवळजवळ दोनशे वर्षं जुनं आहे.

साकुराचे फोटो काढण्यासाठी तिथं आमच्याव्यतिरिक्त आणखीही काही वेडे लोक होते. आणि अगदी जय्यत तयारीनिशी आले होते.


'साकुरा आणि फुजीसान्' अर्थात माऊंट फुजी.
त्याजसाठी केला तो अट्टाहास.
हे छायाचित्र म्हणजेच जपानची आजवर सगळीकडे पाहिलेली प्रतिमा कॅमे-यात बंद केली आणि इथवर आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.

'शिदारेझाकुरा' : यामानाशी राज्यातील आणखी एक प्रसिध्द साकुराचं झाड. हे झाडदेखील खूप जुनं आहे असं ऐकलं. याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला वडाच्या पारंब्यांसारख्या फांद्या आहेत आणि त्यावर साकुरा फुलतो.

हा असा.

रात्रीच्या प्रकाशात हा शिदारेझाकुरा अधिकच खुलून दिसतो.
दिवसभर फिर फिर फिरुन फोटो काढल्यावर नेहमीप्रमाणं 'ओनसेन' (नैसर्गिक गरम पाण्याचं कुंड) ला जायचं ठरलं. ओनसेनला गेलो नाही तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. नेहमीप्रमाणं जपानी मित्रांनी तिथल्या एका प्रसिध्द ओनसेनची माहिती काढून ठेवलेलीच होती. संध्याकाळी परतीच्या प्रवासात तिथून जवळच एका डोंगराच्या माथ्यावर असणा-या 'होत्ताराकाशी ओनसेन'मध्ये गेलो.
कल्पना करा. सूर्यास्ताची वेळ आहे. डोंगराच्या माथ्यावर आजूबाजूला कोणतीही घरं नाहीत. समोर बर्फाच्छादित माउंट फुजी सोनेरी सूर्यकिरणांनी न्हाउन निघाला आहे. मधली खोल दरी दिव्यांनी झगमगते आहे. थंडगार वा-याची झुळूक अंगावर घेत तुम्ही गरम पाण्याच्या कुंडामध्ये त्या दृश्याचा आस्वाद घेत बसला आहात. अशा वातावरणात आजूबाजूच्या जगाचा विसर न पडला तरच नवल.
अर्थातच आमच्या तिघांच्या तोंडून एकच शब्द उमटत होता: 'साईको' (परमोच्च)

(ओनसेनमध्ये छायाचित्रं काढायला परवानगी नसल्यामुळे हे छायाचित्र मी या ओनसेनच्या संकेतस्थळावरुन मिळवलेलं आहे.)
ही आणि इतर काही छायाचित्रं इथं पाहू शकता.