आकेमाशिते ओमेदेतोओ
आजच्या या डिजिटल युगात आॅनलाईन शुभेच्छांचा पाऊस पडत असताना पोस्टकार्डने आलेल्या आपुलकीच्या चार ओळीही सुखावून जातात.
१ जानेवारी हा जपानी नववर्षदिन. चीनी नववर्षाप्रमाणेच जपानमध्येही नवीन वर्षाचा पहिला दिवस हा खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या वेळी तिथे आप्तेष्टांना आणि मित्रमंडळींना पोस्टकार्डने शुभेच्छा पाठवण्याचा प्रघात आहे. दर वर्षअखेरीस तिथे कोट्यावधी पोस्टकार्डांची देवाणघेवाण होते. जपानी भाषेत त्याला नेंगाजो असे नाव आहे. आपल्याकडे दिवाळी जशी अभ्यंगस्नान आणि देवदर्शन आणि फराळाने सुरु होते होते तशी जपानी नवीन वर्षांची सुरुवात शिंतो श्राईन मध्ये देवदर्शन करुन जपानी फराळाचा (ज्याला ओसेइची ऱ्योरी म्हणतात) आस्वाद लुटत ही आलेली भेटकार्डे पाहण्याने सुरु होते. त्यामुळे ही पोस्टकार्डे १ जानेवारीआधी इच्छित स्थळी पोचण्याला फार महत्व आहे. या साऱ्या शुभेच्छापत्र देवाणघेवाणीचा जपानी पोस्टल व्यवस्थेवर खूप ताण पडतो. त्यामुळे १ जानेवारीआधी ही कार्डस् पोचावी यासाठी ती १५-१७ डिसेंबरपर्यंत पोस्टात टाकावी लागतात.
जपानी आणि मराठी भाषेत जशी बरीच साम्यस्थळे आहेत तशीच या अगदी दोन भिन्न लोकांच्या स्वभाववैशिष्ट्यांमध्येही असलेली साम्यस्थळे म्हणजे भिडस्तपणा आणि कलात्मकता. एरवी आपल्या भावना चेहऱ्यावर दिसू नयेत यासाठी कसोशीने प्रयत्न करणारा जपानी माणूस ओरिगामी, इकेबाना सारख्या आर्टफाॅर्ममधून भरभरुन व्यक्त होतो. जपानी खाद्यसंस्कृतीतही पदार्थांच्या कलात्मक मांडणीला फार महत्व आहे, मग तो साधा बेंतो बाॅक्स असो किंवा जपानी पारंपारिक हाॅटेलमध्ये येणारा डिनर सेट. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मांडून ठेवलेला जपानी फराळ हीसुध्दा एक व्हिज्युअल ट्रीट असते. तर एरवी आपल्या वैयक्तिक जीवनात इतरांना जराही न डोकावू देणारा जपानी माणूस नवीन वर्षाच्या या शुभेच्छापत्रांमधून मात्र आपल्या ख्यालीखुशाली आणि कलात्मकतेचे दर्शन घडवतो. काही जण आपण गेल्या वर्षी भेट दिलेल्या ठिकाणाचे फोटो पाठवतात, काही जण आपल्या कुटुंबात आलेल्या नवीन पाहुण्याचे फोटो, तर बहुतांश लोक येणाऱ्या वर्षाच्या प्राण्याचे (झोडिॲक) चित्र रंगवून त्यावर कॅलिग्राफीचा मुलामा चढवतात. पण प्रत्येक कार्डवर वाचणाऱ्यांप्रती एक कृतज्ञतापर ओळ असतेच असते, ज्याचा आशय असतो, “नूतन वर्षाभिनंदन! गेल्या वर्षी आपल्या हातून (माझ्याप्रती) मोठी सेवा घडली. यावर्षी ही कृपा अशीच राहू दे”
यातला ‘सेवा’ हा शब्द जपानी भाषेत जशाचा तसा वापरला जातो. हा आपल्या संस्कृत भाषेचा एक ठेवा.
तर मी तिथे असताना मलाही दर वर्षी खूप सारी भेटकार्डे मिळत असत. आणि मी ही माझ्या मित्रमंडळी आणि शिक्षकवर्गाला पोस्टकार्डस् पाठवत असे. आज जपान सोडून ९ वर्षे उलटून गेली, पण एक पोस्टकार्ड अजूनही न चुकता येते, ते म्हणजे कातो-सान यांचे. त्यांना आम्ही जपानी प्रथेप्रमाणे ओयासान् (घरमालकीणबाई) म्हणायचो. त्यांचा आणि माझा परिचय जेमतेम ३ वर्षांचा, तो ही महिन्याला घरभाडे देण्यापुरता मर्यादित. पण आज ११ वर्षांनंतरही या नात्यातला आपलेपणा त्यांनी जपला आहे.
माझी युनिव्हर्सिटी असलेल्या हियोशी परिसरात कातो-सानचे मोठे घर आणि काही छोट्या प्राॅपर्टीज् आहेत, ज्या युनिव्हर्सिटीतील जपानी विद्यार्थ्यांना त्या भाड्याने देत असत. मी आणि यी (माझा चीनी क्लासमेट), ने कातो-सान च्या दोन अपार्टमेंट भाड्याने घेतल्या होत्या. जपानमध्ये सहसा मुले रुम शेअरींग करत नाहीत. त्यामुळे माझ्या अपार्टमेंट मध्ये मी एकटाच रहात असे. दर महिन्याला आम्ही त्यांच्या घरी भाडे देण्यासाठी जात असू. त्यांचे घर आमच्या अपार्टमेंटपासून जवळच एका ऊंच जागी होते. गेटपासून आत मुख्य दरवाज्यापर्यंत खूप मोठी जपानी बाग होती ज्यात अनेक प्रकारची झाडे मोठ्या कलात्मकरित्या वेगवेगळ्या आकारात कापलेली असत. एक प्रकारचे मिनी बोटॅनिकल गार्डनच होते ते. कातो-सान् ना बागकामाची खूप आवड आहे आणि त्या एक उत्तम इकेबाना आर्टिस्ट आहेत. त्यांच्या पोर्चमध्ये प्रत्येक महिन्याला एक वेगळी इकेबाना कलाकृती सजवलेली दिसून येई. टोक्योच्या प्रसिध्द गिंझा भागात दरवर्षी इकेबाना कलाकृतींचे प्रदर्शन भरते. त्यात त्यांची कलाकृती आवर्जून असे आणि आम्हाला त्यांच्यामुळे ते प्रदर्शन बघायची संधी मिळे. एकदा माझी आई आणि नयनालाही कातो-सान बरोबर ते प्रदर्शन पाहण्याची संधी मिळाली.
आम्ही गेल्यावर त्या आमची आपुलकीने विचारपूस करीत. परदेशी शिकत असताना, एकटेच राहताना आणि विशेषतः बरोबर कोणी भारतीय विद्यार्थी नसताना त्यांचा एक आधार वाटे. मध्यंतरी २०१६ साली आम्ही ५ वर्षांनंतर पुन्हा जपानला गेलो असताना कातो-सानची भेट झाली. त्यांनी आम्हाला योकोहामाच्या लॅंडमार्क टाॅवर आणि अद्वयला तिथल्या थीम पार्कची सफर घडवून आणली. आज त्यांनी वयाची सत्तरी पार केली असेल, पण चेह-यावरचा तजेला अजूनही त्यांच्या बागेप्रमाणेच कायम आहे.
आपण जिथे जातो तिथे आपले भावनिक संबंध जुळतात. काही वेळा ते आपले सहकारी किंवा मित्र असतात तर काही वेळा यातले कोणीच नाही. काही नात्यांना नाव देता येत नाही पण ती आपल्या मनात कायमचे घर करुन राहतात. कातो-सान, माझ्या जपानीच्या शिक्षिका ओसादा सेनसेई, एका पार्टीत योगायोगाने भेटलेला माझा मित्र ताईची आणि त्याचे सहकारी यांच्याबरोबरचं नातं असंच म्हणता येईल. आजही कातो-सानच्या हस्ताक्षरातील ग्रीटींग वाचलं की पुन्हा जपानला गेल्याचा आनंद मिळतो.
ऋणानुबंध यालाच म्हणत असावेत.